ती, तो आणि खरेदी.. अंतिम भाग

कथा तिच्या खरेदीची


ती, तो आणि खरेदी.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की शेवटी प्रिया सुमेधला खरेदीला जाण्यासाठी तयार करते. पण होईल का त्यांची खरेदी? बघू या भागात.


" हे तर आपण नेहमी येतो तेच ड्रेसचे दुकान आहे." सुमेध गाडी पार्क करत म्हणाला.

" हो.. आधी इथे चौकशी करू. तोच ड्रेस इथे केवढ्याला आहे ते बघू. मगच तसा घेऊ ना." प्रियाने नेहमीप्रमाणे सडेतोड उत्तर दिले. दोघेही दुकानात शिरले. प्रियाने त्याला ड्रेसेस दाखवायला सांगितले. दुकानदाराने ड्रेस दाखवायला सुरुवात केली.

" तो दाखवा.."

" मॅडम, खूपच छान चॉईस आहे तुमचा. ही साऊथची डिझाईन आहे." विक्रेता स्तुती करत बोलला. प्रियाने तो ड्रेस अंगाला लावून पाहिला. मोबाईल मध्ये मॅचचा स्कोर बघत असलेल्या सुमेधला कसा दिसतो म्हणून विचारले. दचकून त्याने वर बघितले.

" तू लुंगी का घातली आहेस?" त्याने निष्पापपणे विचारले. विक्रेत्याने कसेबसे हसू आवरले. प्रियाने सुमेधकडे रागाने बघत तो ड्रेस खाली टाकला.

" तू मोबाईल सोडून माझ्याकडे लक्ष दे जरा." हो असे म्हणत सुमेधने मान हलवली. आपले काय चुकले हे त्याला समजलेच नव्हते. परिस्थिती समजून घेत विक्रेत्याने दुसरे ड्रेस दाखवायला काढले.

" हे बघा मॅडम.. जयपुरी आहे. हे आम्ही स्वतः बनवतो. " विक्रेता स्तुती करत म्हणाला.

" यातले आरसे तर मस्तच. केस विंचरायला मला आरशात बघायची गरज नाही." सुमेध ड्रेसला लावलेले आरसे बघत म्हणाला. यावेळेस विक्रेत्याने तत्परतेने ते उचलून नवीन ड्रेसेस काढले..

" झगामगा आणि मला बघा." इति सुमेध.

" वरण भात.. त्यावर लिंबू कलरची ओढणी घे. मस्त कॉम्बिनेशन.." अजून कोण सुमेधच.

" सुमेध, तू थोडावेळ बाहेरच्या हॉटेलमध्ये बसतोस का?" प्रियाने अगदी प्रेमळ आवाजात विचारले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन सुमेध तिथून बाहेर पडला. हॉटेलमध्ये मस्त बसून चहा पित मॅच बघू लागला. इथे प्रियानेसुद्धा त्याची भुणभुण थांबल्यावर पटापट खरेदी करून घेतली. खरेदी झाल्यावर तिने सुमेधला फोन करून बोलावून घेतले. त्याची मॅच ही तोपर्यंत संपल्याने त्याचा मूड मस्त झाला होता. घरी जाईपर्यंत दोघेही आपापल्या छान मूडमध्ये होते. घरी पोहोचताच प्रियाने आपली खरेदी सुमेधला दाखवायला सुरुवात केली.

" व्वा, छान, सुंदर.." सुमेध प्रत्येक ड्रेसची स्तुती करत होता.

" मग हे तिथे बोलायला काय धाड भरली होती."

" ते मी मॅचच्या नादात होतो ना?" सुमेधने कबुली दिली.

" म्हणूनच मी तुला बाहेर पाठवले."

" मी तुला खरेदीला नकोच होतो तर मग मला का घेऊन आलीस?" आश्चर्याने मग चिडून सुमेधने विचारले.

" ते माझे टॅक्सीचे पैसे वाचावेत म्हणून.. आणि दुसरं म्हणजे तिथे पटापट टॅक्सी ही मिळत नाहीत. मग काय करणार मी ?" प्रिया निरागसपणे बोलण्याचा प्रयत्न करत होती.

"मग ही हुशारी तो अडीच हजाराचा ड्रेस 2499 ला घेताना कुठे गेली होती?"

" ती कशाला कुठे जाईल? हुशारी तर तुझ्याकडे नाही. मी तुला म्हटलं आमच्या मॅडमच्या स्टेटसला होता. कंपनीची ऑफर आमच्या मॅडम कशाला स्टेटसला ठेवतील. तो जोक होता."

" मग तू मला का सांगितलास?"

" त्याशिवाय तू खरेदीला थोडी आला असतास." प्रिया हसत नवीन ड्रेस ट्राय करायला गेली. आणि आपण प्रत्येक वेळेस हिच्या गनिमीकाव्याला कसे फसतो हा विचार करत सुमेध डोक्यावर हात मारू लागला.

कथा आवडली तर नक्की सांगा. तुमचे स्वतःचे असे अनुभव असतील तर ऐकायला नक्की आवडतील.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all