ती, तो आणि खरेदी..

कथा बायकोच्या खरेदीची


ती, तो आणि खरेदी..


" अहो ऐकलत का?"

लोळत बसलेल्या सुमेधच्या कानावर ते स्वर पडताच त्याचे अंग अंग शहारले. प्रेमाने नव्हे भितीने. हा असा मंजुळ स्वर म्हणजे एका नाटकाच्या भव्यदिव्य प्रवेशाची नांदी असायची हे नक्की. त्याने मनातल्यामनात आठवड्याभरातल्या गोष्टींचा आढावा घेतला. आईचे आणि प्रियाचे भांडण? नाही.. आईबाबा काही दिवस सुचेताकडे रहायला गेले आहेत. आईचा फोनही आला नाही त्यामुळे ते कारण रद्द.
मुलांचा निकाल? आत्ता तर परिक्षा झाल्या आहेत. हुश्श.. त्याने स्वतःशीच सुस्कारा सोडला. मुलांचा निकाल म्हणजे घरात महाभारत नक्कीच असायचे. कमी गुण मिळाले की त्यांना धपाटे आणि सुमेधला शाब्दिक फटके. चुकूनमाकून एकदा त्याचे आठवीचे प्रगतिपुस्तक प्रियाच्या हाती लागले होते. त्यावरच्या वरच्या वर्गात ढकलले या शेर्यावरून अजूनही ती ऐकवायची एक संधी सोडत नाही. मुलांचे कमी गुण म्हणजे ती अगदी तुझ्यासारखीच कशी झाली आहेत हे सोदाहरण दाखवायची नामी संधी. अशी संधी ती सोडणार? मुलांचे कौतुक करताना मात्र ती माझ्यासारखी कशी आहेत हे सांगणार. सुमेधने तोंड वाकडे केले.
मग, मित्रांसोबत पार्टी? नाही सगळे एकजात बायकोच्या ताटाखालचे मांजर. बायको नाही म्हणाली की बाहेर भेटत ही नाहीत. मग आपण कुठे गेलो होतो का पार्टीला? डोक्याला ताण देऊन सुमेध थकला पण त्याला काही आठवेना.

" कधीची ओरडते आहे ऐकलं का? ऐकलं का? कान फुटले की काय?" प्रिया बेडरूममध्ये येऊन ओरडली. तिच्या हातातले लाटणे बघून सुमेध थोडा घाबरला.

" तू मला मारणार?" त्याने नसलेली छाती फुगवत विचारले.

" बरा आहेस ना? पोळ्या करत होते. तीनदा प्रेमाने हाक मारली. तू काहीच बोलला नाहीस म्हणून झोपलास का बघायला आले. तर तुझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती." लाटणे दुसर्‍या हातात खेळवत प्रिया बोलली.

" ते ऑफिसच्या कामाचा विचार करत होतो." कारण ऐकून प्रिया कुत्सित हसली.

" हे तुझ्या बॉसला सांग. त्यालाही पटणार नाही. तुम्ही ऑफिसला गेलात तरी मॅचचा विचार करणार आणि सुट्टीच्या दिवशी ऑफिसचा विचार करणार?" मॅचचे नाव ऐकून सुमेधला आजच्या मॅचची आठवण झाली. ती जर निवांत बघायची असेल तर गप्प राहणेच सोयीस्कर त्याचे विचारचक्र सुरू होते.

" मी पण ना? काय सांगायला आले आणि काय बोलत बसले."

" काय बोलायचे होते ग?" जमेल तेवढा गोडवा आवाजात आणण्याचा प्रयत्न करत सुमेधने विचारले.

" आज संध्याकाळी खरेदीला जाऊ या?" प्रियाने पापण्या फडफडवत विचारले. सुमेधच्या पोटात गोळा आला. आजची भारताची करो या मरो असणारी मॅच की बायकोसोबत खरेदी..


तुम्हाला काय वाटते काय असेल सुमेधचा निर्णय? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all