Login

ती.... तिचं माहेर.... आणि तिचं बाळंतपण भाग ५ - पार्ट १

About Her

भाग १ आणि २ इथे वाचा


भाग ३ आणि ४ इथे वाचा


किस्सा क्रमांक ५ - पार्ट १

"अहो कसली बेड रेस्ट सांगून राहिलात. आम्ही नाही बाई कधी आराम केला. माझ्या सासूची 12 बाळंतपणं झाली. माझ्या आईची पण ९ झाली. ती पण सगळी घरीच..... माझी स्वतःची ४ झाली. ३ पोरींवर हिचा नवरा झाला म्हणून थांबलो.... वंशाला दिवा आला होता. नाहीतर अजून किती लाईन लागली असती काय माहित. सरकारी दवाखान्यात झाली माझी पण बाळंतपणं. ५ दिवस तिथं राहून पाची पुजायला घरी.... आन सव्वा महिन्यात तर सासरी..... कोद्या उपसायला. आन ह्या आजकालच्या पोरी..... जरा म्हणून कळ सोसायला नको. काही झालं की झोपा.... आराम करा. आम्ही दिवस भरेपर्यंत विहिरीतून पाणी काढून आणत होतो. एवढ्याल्या कचकोल हंड्यांनी.... आमचं नाय कधी पाणी गेलं की रस्ता मोठा झाला खालचा. कधी टाका नाही घातला की काय नाय. शेणसारा, पोचारा..... सरपण गोळा करुन आणा, चूल पेटवा काही चुकलं नाय शेवटच्या दिवसापर्यंत.आन हिला काय तर म्हणं ९ महिने बेडरेस्ट.... अशाने कशी ती पोरं दणकट व्हायची?"

सासूबाईंची टेप थांबायचं नावच घेईना, आणि इकडं सून पाडून फक्त ऐकत होती. तिचा चेहराच सांगत होता, तिचं तिच्या घरातलं स्थान आणि मानसिक अवस्था!

डॉक्टर मॅडम ने एकदा तिच्याकडे पाहिलं, आणि बरंच काही लक्षात आलं त्यांच्या. मग त्यांनी आधी सासुशी संवाद साधायला घेतला.

"मावशी, तुमच्या सासूबाई किती वर्षे जगल्या हो आणि त्या गेल्या तेव्हा त्यांना काय काय आजार होते?"

"अहो ९० वर्षे जगली म्हातारी. आजार नाय की काय नाय. मेली तोवर चष्मा लागला नव्हता त्यांना. काठी सुद्धा हातात मरायच्या ४_५ वर्षे आधी आली. नाहीतर ठणठणीत आणि खणखणीत होती म्हातारी आमची. आमच्या गावात तर एक म्हातारी १०५ वर्षे जगली.... बोला आता"

"अच्छा.... तुम्हाला कमरेला बेल्ट दिसतोय. आणि चष्मा पण आहे....."

"अहो आता वय झालं. दिसायला कमी झालंय. पाठ मी म्हणती. काय करणार?"

"अहो पण सासूच्या मानाने तर तुमचं वय काहीच नाही की. त्यांना तर मरेपर्यंत चष्मा नव्हता म्हणालात ना!"

"अहो त्यांचा काळ वेगळा. आमचा वेगळा. आता कोण एवढं निरोगी राहतं? ७०-८० वर्षे जगलो तरी लई झालं की....अहो जुनी माणसं कधी गोळ्या औषधं घेत नव्हती. घरीच आपलं काहिबाही उपचार करायचे, तरी बरे व्हायचे. आता कुणी आयुर्वेदिक, कुणी त्या साबुदाण्याच्या गोळ्या.... कोण इंजेक्शन... कोण काय तर कोण काय..... नाही का....?"

"आता कसं बोललात. त्यांचा काळ वेगळा.... तुमचा वेगळा.... तसा तुमच्या सुनेचा सुद्धा वेगळा.... नाही का? आधी बायका पोरं थांबवण्यासाठी डॉक्टर कडे जायच्या..... आता पोरं व्हावीत म्हणून डॉक्टर कडे येतात. तेव्हा १०-१० पोरं व्हायची..... आजकाल एक सुद्धा होण्यासाठी जीवाचं रान करतात जोडपी. कारण तेव्हाचं जेवण निरोगी असायचं. आजकाल आपण तेच जेवण जेवायचं म्हटलं तरी शक्य नाही. भाज्या, फळं केमिकल शिवाय पिकत नाहीत. ती आपल्या पोटात येणकेन प्रकारे जातातच. साधी शुद्ध हवा सुद्धा मिळणं मुश्किल झालंय.... बरोबर ना?"

"ते सगळं खरं आहे. पण आता माझ्या तिन्ही पोरींची २-३ बाळंतपणं केलीत की मी. त्यांना नाही कुणाला असा आराम सांगितला. हीच काय लई नाजूक पडली?" डॉक्टर मॅडम चा मुद्दा खोडून काढत सासूबाई उत्तरल्या.

"अहो प्रत्येकाची तब्येत वेगळी असते. आता तुमच्या पोरींपैकी कुणाचं सीझर झालं असेल तर कुणाची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल. तुमच्या सुनेच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. आधी हिची २ मुलं पोटातच गेली आहेत. मागच्या वेळेस नाजूक परिस्थिती होती तिची. त्यात तुम्ही जर असं वागणार असाल तर यावेळीसुद्धा आपण खात्री देऊ शकणार नाही काहीच. फक्त शारीरिक नाही तर मानसिक आराम आणि आधार दोन्हीही हवं आहे तिला. तुम्हाला नातवंड हवयं की नकोय?"

"अहो हवंय का काय विचारता. वंश संपवता का काय आमचा? "

"मग त्यासाठी हे करावंच लागणार मावशी. तुमच्या सुनेचं शरीर आता थकत चाललंय. यावेळी काही झालं तर परत राहील की नाही सांगता येत नाही.... बघा आता काय करायचं ते.... माझं काम होतं सांगायचं. बाकी तुमची मर्जी."


"ठीक आहे आता. तुम्ही म्हणताय तर हेपण करुन बघतो."

सासूबाई तयार तर झाल्या. पण नक्की काय होणार आहे हे पाहूया पुढच्या भागात.....