Feb 06, 2023
Readers choice

ती थरारक पाच मिनिटं .... 

Read Later
ती थरारक पाच मिनिटं .... 

अमेरिकेत यायच्या आधी तिकडच्या  गन violence च्या बातम्या क्वचित कधी कानावर यायच्या , पण ते शिकागो, टेक्सास  किंवा आणि एखाद स्टेट  मध्ये. मग इकडे आल्यावर खूप जवळून अशा घटना, त्यांचे पडसाद , हतबलता, निष्क्रियता  बघायला  मिळाली . तरी  एक आत  कुठेतरी असतंचना, तिकडे (दूर कुठेतरी) असं  सगळं  होतंय आपण तरी  एकदम सुरक्षित, चांगल्या वस्तीत रहातोय. 
ती रोजचीच दुपार होती. मुलं  शाळेतून आली.  खरं तर त्यांना कराटे क्लासला  घेऊन जायच, पण त्या दिवशी सकाळी मी कोविडचा डोस घेतल्यामुळे मला थोडं  बरं वाटत नव्हतं म्हणून मी गोळी  घेतलेली, त्यामुळे  त्यांना ड्राईव्ह करत नेणे  शक्य  नव्हत, मग त्या दिवशी क्लासचा  बेत  रद्द  केला. मुलं  त्यांच्या  त्यांच्या कामाला लागली.  मी पण थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बाहेरच्या खोलीत सोफ्यावरच कलंडले, पण झोप येत नव्हती म्हणून मग मोबईल  वर काहीतरी टाईप  करत होते. 
अचानक माझ्या आणि  मोबाइललाच्या मध्ये काहीतरी आलं. चमकून बघितलं  तर  गन.. चक्क  बंदूक. मी चमकून वर बघितलं  तर एक काळ्या  रंगाची  हुडी घातलेला, काळा मास्क घातलेला एक माणूस माझ्या छातीवर  बंदूक रोखून उभा होता . 
त्या क्षणी डोक्यात असंख्य विचारांची मालिकाच तयार झाली, "आपण स्वप्नात तर नाहीयो?,  नवरा  किंवा मुलंच काही मस्करी तर नाही ना करत आहेत ? अरे  पण आपल्याकडे  तर गन च नाहीये, अगदी खेळातलीसुद्धा  बंदूक नाहीये, ओह म्हणजे  हे कोणीतरी दुसरंच आहे, अरे बापरे!  म्हणजे घरात  चोर  शिरलाय कि काय, आणि  त्याने खरी खुरी बंदूक आपल्यावर रोखलीये, ओह My  God !!! "
ह्या सगळ्या विचारांच्या साखळीत  सुरवातीला उडालेला गोंधळ मग  वाटलेली भीती ह्यांची जागा  रागाने, संतापाने , वैतागाने कधी  घेतली माझं  मलाही नाही कळलं. 
मी दोन्ही हातांनी बंदुकीची नोझल  पकडली, आणि बेंबीच्या देठापासून ओरडायला लागले, त्या क्षणी  मला  त्याच्या डोळ्यात किंचितशी हलचल दिसली. क्षणात दोन्ही हातात बंदूक पकडून झटदिशी  वेगाने उठले, त्याच वेळी जोराने त्याला ढकलले आणि  तोही गर्रकन फिरला गेला, ज्या क्षणी  माझ्याकडे  पाठ  झाली , तो मुख्य दरवाजातून  सरळ बाहेर निघून गेला. एखाद सेकंदात मला तो गेल्याच जाणवलं  आणि मी जोरजोराने  ओरडत  passage  मधून आतल्या खोलिकडे पळत सुटले. ह्या सगळया आवाजाने  मुलं  पण पळत  पळत बाहेर आली . ह्या सगळ्या गडबडीत मला नवरा कुठंच दिसेना. मी अजूनच गोंधळले. 
तेवढ्यात मला  मुख्य  दरवाजातून नवरा आत  येताना दिसला. 
" अरे तू कुठे होतास ?, एक माणूस घरात  घुसलेला .... "
"हो .." त्याचं  शांत  आवाजातलं  उत्तर आणि चेहरा अत्यंत  गंभीर.

"म्हणजे ते वाईट स्वप्न  नव्हतं तर ... " माझं  स्वगत. 
मग  त्याने सविस्तर  त्याचा भाग  सांगितला. माझा  आवाज ऐकून  तो बाहेर आला तर  त्याला  एक माणूस घरच्या दिशेने येताना दिसला. कोणीतरी अनोळखी माणूस चुकुन इकडे  आला असं  वाटून त्याला विचारायला  तो पुढे सरला . तसा तो माणूस पळायला लागला. मग माझा नवराही  त्याच्या मागे पळाला. तो थोडा पुढे जातोय तोच आमच्या घरातून एक माणूस निघाला आणि त्याला overtake  करून दोघंही पळत घरासमोरच गाडी पार्क केलेली होती त्यात जाऊन बसले आणि पळाले. आम्ही लगेच पोलिसांना फोन केला, ते आले वगैरे वगैरे .. 
आम्ही एकमेकांशी बोलल्यावर कळले, एक नाही तर दोन माणसं होती. एक आत  घुसलेला (मला माहित पडलेला). दुसरा घरात  घुसत असलेला ज्याला नवऱ्याने हटकले. 
हि सगळी घटना  कदाचित दोन पाच मिनिटांचीच असेल, पण नंतर  कितीतरी दिवस  आमच्या डोक्यातून काही तो विषय जात नव्हता. "जर .. तर .." ची मालिका  डोक्यात अखंड चालूच राहिली . "जर तो गडबडला नसता आणि त्याने खट्टा ओढला असता तर? त्याचा साथीदार पण आत आला असता तर? मी प्रतिकार करण्या ऐवजी लागेश त्याला शरण गेले असते तर ? मुलं थोडी आधीच बाहेर अली असती तर?".... एक ना दोन हजारो शक्यता आणि  त्यांचे तेवढेच भयंकर होऊ शकत असलेले  परिणाम . डोकं पार चक्रावुन गेलं. 
मी शक्तीने कमी, निःशस्त्र  असूनही त्याला  कसं  घालवू शकले , ह्याचा परत परत विचार केल्यावर एक जाणवलं की एकाच शक्यता उरते. जेव्हा  तो शास्त्र घेऊन घरात शिरला त्यावेळी त्याला कुठलाही प्रतिकार होईल हे अपेक्षित नव्हते, तर (कोणी असलंच तर ) घरातल्याना बंदुकीचा धाक दाखवून,जे मिळेल ते घ्यायचे आणि पसार व्हायचं  असा बहुदा हेतू असावा. म्हणून तो मानसिक दृष्ट्या तयार नव्हता. माझी प्रतिक्षिप्त क्रिया जर भीती  असती तर मीही प्रतिकार करू शकले नसते . आणि सगळ्यात महत्वाचं  म्हणजे  दैवाची साथ होती, म्हणूनच वर सांगितलेल्या शक्यतां पैकी  काहीच विपरीत घडले नाही  आणि  सगळं थोडक्यात निभावलं. 

त्या गणरायाचंच लक्ष होत म्हणायचं . गणपती बाप्पा  मोरया 


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prerana Kulkarni

Freelancer, Writer, Homemaker

मी एक (आधीची careerist बाई आणि आताची ) सामान्य गृहिणी, दोन वाढत्या मुलांची आई. वाचनाची लहानपणापासून खूप आवड. एकदा असंच पुस्तक वाचत असताना मनात आलं कि आपल्या सामान्य आयुष्यातही असे कित्येक गमतीशीर, तर कधी काळजाला चटका लावून जाणारे, आपल्याला धडा शिकवून जाणारे प्रसंग घडतात. एखाद्या उदास क्षणी तेच आपल्याला उभारी देतात, ओठांवर खुद्कन हसू आणतात. कॅव्हिडच्या नकोशा दिवसांमध्ये तर प्रकर्षाने जाणवले की त्या गोष्टी आपण लिहून काढल्या आणि इतरांनाही वाचायला मिळाल्या तर कदाचित ते किस्से त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणतील. शाळा- कॉलेज सोडल्यावर कधीही काही न लिहिलेल्या मला खूप दडपण आले, एक अनामिक भीती वाटली. पण तेव्हा धावून आले ते आपले लाडके पु. लं., त्यांच्याच आवाजातील "राजहंसाचे चालणे असेल मोठ्या डौलाचे, पण म्हणून इतरे जणांनी चलोच नये कि काय ?" ह्या उक्तीने मला धीर दिला. यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने घडतच असतील. तुम्हाला आवडल्या तर जरूर कळवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये नक्की शेअरकरा.