ती समजायला अवघड?

स्त्री समजायला सोपी की अवघड..


कथेचे नाव : ती समजायला अवघड?
कॅटेगरी : स्त्रीला समजून घेणे एवढे अवघड?
स्पर्धा : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा..

" तुला मी मागे वाचून दाखवलेला विनोद आठवतो का ग?" महेशरावांनी मीराला विचारले..
"कोणता रे?" अभावितपणे मीराने विचारले..
" तो ग.. एक जोडपे आपल्या दुसऱ्या मुलीची पाठवणी करते.. मग नवरा तिला म्हणतो, आठवते का आपली भांडणे झाल्यावर तू म्हणायचीस ते मुलींकडे बघून राहते आहे. नाहीतर कधीची घर सोडून गेले असते.. तू काय म्हणतेस?"
ते ऐकून आजूबाजूला बसलेले सगळे हसायला लागले.. पण मीराच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. नुकतीच त्यांची एकुलती एक लेक कनिका सासरी गेली होती.. तिची पाठवणी करून सगळेजण बसले होते. कार्य कसलेच गालबोट न लागता झाले याचे समाधान तर होतेच, पण लाडाची लेक आता परक्याची झाली हे दुःख जास्त होते. त्यात महेशचे हे बोलणे.. इतर कोणाला नाही पण मीराच्या जावेला हे पटकन जाणवले. ती पटकन बोलून गेली..
" काय हे भाऊजी? हे काय बोलणे? जिभेला तुमच्या काही हाड?" आपली मोठी चूक झाल्याचे महेशच्या लक्षात आले. सांभाळून घेत तो म्हणाला ,
" वहिनी, अग मस्करी करत होतो. जरा मूड हलका करत होतो.."
" हो.. पण मस्करीची पण काळवेळ असते. आधीच लेकीच्या विरहाने पोळलेले मन त्यात तुमचे शब्दशर.." मीराला आपल्या भावना कोणीतरी जाणून घेतल्याने खूप समाधान वाटत होते, पण तो कोणीतरी आपला नवरा नसावा याचे दुःखही होते..
कनिकाची सत्यनारायणाची पूजा झाली, मांडवपरतणी झाली आणि जोडपे पंधरा दिवसांसाठी हनिमूनला निघून गेले. जमलेले पाहुणेही सगळे गेले आणि घर खऱ्या अर्थाने रिकामे झाले.. मीराचे कनिका गेल्यापासूनच काही ना काही आवरणे चालू होते. पण तो विनोदाचा किस्सा झाल्यानंतर महेशची एकट्याची तिच्यासमोर जायची हिंमत झाली नव्हती. इतके दिवस कोणी ना कोणी असायचे त्यामुळेच मीरा काही बोलत नाही हे तो जाणून होता.. आता तर कनिका नावाची ढालही त्याच्याकडे नव्हती.. पण मीराच्या आघाडीवर शांतता होती त्यामुळे त्याला हायसे वाटत होते.. त्याच आनंदात त्याने मीराकडे चहाची मागणी केली..
" मीरा, ए मीरा.. थोडा चहा घे ग.." मीराने चहा आणला..
" हा शेवटचा चहा.." तिने शांतपणे सांगितले..
" शेवटचा कुठे? आत्ताशी दुसरा.." महेश त्याच्याच धुंदीत होता.
" अंहं.. माझ्या हातचा शेवटचा.. तू नंतर तुला जेवढे कप हवा आहे, तितके कप करून घेऊ शकतोस.."
" का? तू कुठे चाललीस?" महेशने हबकून विचारले..
" तूच तर मला बोललास ना? मग मी खूप विचार केला की एवढीच जर तुला मोकळीक हवी आहे तर द्यावी.." मीरा अजूनही शांतपणे बोलत होती..
" अग, हे तू काय बोलते आहेस? ती तर मस्करी होती.."
" पण ही मस्करी नाहीये महेश.. तू सतत मस्करीच्या बुरख्याखाली माझ्या मनाचा विचार न करता मला वाटेल तसे बोलणार आणि मी ही अशा क्षुल्लक गोष्टींसाठी काय घर मोडायचे असा विचार करणार. पण आता थांबवूया हे सगळे."
आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचे बोललो आहोत ते महेशला त्याच दिवशी कळले होते पण त्याचे एवढे गंभीर परिणाम होतील असे त्याला अजिबात वाटले नव्हते.. मीरा नसल्यावर एकदोन दिवस मित्रांसोबत धिंगाणा घालणे वेगळे.. आणि सगळ्या घराची जबाबदारी घेणे वेगळे. हा अनुभव त्याला खूप आधीच आला होता. त्यामुळे काहिही करून तिचे मन वळवणे भाग होते..
" मीरा, मला माफ कर.. चूक झाली माझी. समजून घे ना ग थोडे."
" समजून घे? इतके वर्ष त्याशिवाय काय केले मग मी? पण तू कधी प्रयत्न केलास मला समजून घेण्याचा? एवढे अवघड आहे का ते? आर्थिक दृष्ट्या तर मी स्वतंत्र आहेच, होते.. त्यामुळे तू कधी मला काही विकत हवे आहे का हे विचारले नाहीस.. कनिकाचे शिक्षण, बाकीच्या आवडीनिवडी मी बघत होते त्यामुळे त्या आघाडीवर मला काही अडचणी आहेत का या जाणून घ्यावे असे तुला कधीच वाटले नाही.. मलाही वाटायचे कधीतरी तू स्वतःहून विचारावेस की तुला काही हवे आहे का?"
"पण मी कितीवेळा विचारायचो?"
" ते उगाचच.. म्हणजे तुला जेव्हा मित्रांसोबत पार्टीसाठी जायचे असायचे तेव्हा तू संध्याकाळी पाच वाजता मी अंथरूणे घालू का असे विचारायचास.. ते ही मी तुला तिथे आडकाठी आणू नये म्हणून.. "
"मग तुला जेव्हा जे हवे ते सांगायचेस ना. तुझ्या मनात काय चालले आहे ते मला कसे समजणार?"
" जसे मला समजले तसे.. तू हा कधी विचार नाही का केलास की आपण चहा मागताच चहा समोर कसा येतो.. तो उकळायला वेळ नाही का लागत? पण तरिही दुसर्‍या सेकंदात चहा समोर असतो. कारण तुझ्या मनात काय चालू आहे, तुला कधी काय हवे असते हे मी ओळखायला शिकले आहे. मग तुलाच माझे मन समजणे एवढे अवघड जावे? काय हवे असते रे मला तुझ्याकडून? मायेचे, कौतुकाचे चार शब्द.. मी जसा तुला देते तसा मान आणि प्रेमाची नजर.. हे हो जर तुला इतक्या वर्षात समजले नसेल तर मग बोलणेच खुंटले.."
" मीरा मी यापुढे नक्की समजून घेईन.. पण तू असा आतताई निर्णय नको ना ग घेऊस.." महेश काकुळतीला आला होता.
" निर्णय तर मी घेतलाच आहे.. आता फक्त अमलात आणायचा आहे. मी उद्याच निघते आहे फक्त बायकांसाठी असलेल्या एका सहलीला.. तुला जरी मला समजून घेणे अवघड वाटत असले तरी मी मला आता नव्याने समजून घेऊन माझ्या मनासारखे वागणार आहे.. कोणाच्या समजून घेण्याची वाट न बघता.."
" पण मग तू घरी येशील ना?"
" यावे तर लागेलच ना? या गोष्टीसाठी मी नाही संसार मोडू शकत.. आणि मुलीचे लग्न जरी झाले असले तरी "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" हे मी नाही विसरू शकत..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई