Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

ती सध्या काय करते

Read Later
ती सध्या काय करते
ज्याक्षणी तिला पाहिले त्याक्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. पांढरा शुभ्र मुखचंद्रमा , काळेभोर लांब केस , नाजूक गुलाबी ओठ , कमळासारखे नेत्रे असे अप्सरेला लाजवेल इतके विलक्षण सौंदर्य तिचे होते. आमच्या कोचिंगला बरेच विद्यार्थी होते. सुरुवातीला ती समोरच्या बेंचेसवर बसायची. त्यामुळे माझी आणि तिची कसलीच ओळख नव्हती. फक्त क्लास सुटल्यावर मी चोरून तिला पाहत आणि नेत्रांची तृप्ती करवून घेत. पण नियतीला माझ्यावर दया आली. एकेदिवशी ती उशिरा आली. माझ्या बाजूची सीट रिकामी होती. मी ती सीट तिलाच ऑफर केली. मग ती बाजूला बसली. मी तेव्हा सातव्या आसमंतात होतो. इतकी सुंदर मुलगी पहिल्यांदा जवळून पाहत होतो. ती " सियासत " मालिकेतील चारू शंकर या अभिनेत्रीसारखी दिसायची. मी धाडस करून तिला तिचे नाव विचारले.

" अनामिका. " ती म्हणाली.

ती झारखंडची होती. पण तिच्या बोलण्याची पध्दत ( लेहेजा ) मला बिहारी भाषेसारखी वाटायची. तेव्हा तिने मला झारखंड बिहारमधूनच विभाजित झालेले राज्य आहे ही माहिती दिली. दिवसेंदिवस आमची ओळख वाढू लागली. मैत्री वाढू लागली. मित्रांनाही ती माझी " क्रश " आहे हे कळून चुकले होते. मी माझ्या दोन जिवलग मित्रांसाठी सीट्स पकडायचो आणि तिच्यासाठी एक अश्या तीन सीट पकडायचो. ते दिवस माझ्या आयुष्याचे सर्वात सुंदर दिवस होते. एकेदिवशी सरांनी कितीतरी घरात स्त्रियांना कसे पुरुषांच्या उष्ट्या ताटलीत जेवावे लागते याबद्दल सांगितले. तेव्हा अनामिका गंभीर झाली. आमच्यात जे बोलणे झाले त्यात तिच्या बोलण्यावरून जाणवले की तिच्या मनात पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीबद्दल राग आहे. जणू स्त्रियांना मिळालेली अपमानास्पद वागणूक तिने फार जवळून पाहिली होती. उच्चवर्णीय इतर जातीच्या लोकांना कसे पाणी पाजवतात याचे जेव्हा सरांनी उदाहरण दिले तेव्हाही तिचा असाच प्रतिसाद होता. मी मात्र या सर्व घटना फक्त वाचलेल्या ऐकलेल्या होत्या. याउलट अनामिकेने समाजाची काही कटू वास्तविकता जवळून पाहिल्या होत्या. एकेदिवशी तिचे काही दिवस क्लास मिस झाले. मी माझी क्लासनोट तिला दिली. त्यात मी माझ्या हाताने लिहिलेले एक पत्र लपवले. त्या पत्रात मी माझ्या सर्व भावना उतरवल्या. त्या दिवशी मी खूप अस्वस्थ होतो. काय होणार ? कसे होणार ? माझ्याकडे तिचा नंबर होता. पण त्यावर मी कधीच मेसेज पाठवला नाही. कारण मी जेव्हा नंबर मागितला तेव्हा तिने कशाला हवा असे विचारले होते. ते मला आवडले नव्हते. मी अभ्यासाचे आणि क्लासेसचे कारण दिले तेव्हा तिने लगेच नंबर दिला. पण मी कधीच त्या नंबरवर मेसेज केला नाही. नंतर ते कागदही फाडून फेकले. त्या पूर्ण रात्री मी झोपू शकलो नाही. हजारो प्रश्न मनात काहूर माजवत होते. दुसऱ्या दिवशी मी चातक पक्ष्याप्रमाणे तिची वाट पाहत होतो. पण तिची एक मैत्रीण माझ्याजवळ आली.

" अनामिकेने मला हे रजिस्टर तुला द्यायला सांगितले आहे. " ती मुलगी म्हणाली.

" अनामिका नाही आली ?" मी विचारले.

" ती तर काल रात्रीच गावाकडे गेली. तिने रूम सोडली. " ती मैत्रीण म्हणाली.

ती मैत्रीण तिची रुममेट होती. अनामिकेने तिच्यासोबत माझी एकदा ओळख करून दिली होती. ती मैत्रीण निघून गेली. मी त्या क्लासनोटमध्ये माझे लपवलेले पत्र काढले. ते पत्र भिजलेले होते. त्यावर अनामिकेने आपल्या हातांनी लिहिलेले होते.

" आपल्यावर कुणाचा तरी क्रश आहे , आपल्यावर कुणी प्रेम करते ही भावना किती सुखावह आहे ना ? माझ्या घरात फार कडक वातावरण आहे. मला कोचिंग करण्याची परवानगी भेटली हीच फार मोठी गोष्ट आहे. बाबांनी माझे लग्न ठरवले आहे. घरचे लव्हमॅरेज कधीच स्वीकारणार नाहीत म्हणून मी कधीच मनात प्रेमभावनांची पालवी फुटू दिली नाही. तुझ्या वागण्याबोलण्यातून तुझ्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत हे कळायला वेळ लागला नाही मला. पण तरी मी तुझ्यासोबत मैत्री केली. कारण भावी आयुष्यात कुण्या परपुरुषासोबत मैत्री करायची कधीच संधी भेटणार नाही हे मला ठाऊक होते. दुसरे , तुझ्यावर खूप विश्वास होता. तू कधीच मर्यादा ओलांडणार नाहीस , जबरदस्ती करणार नाहीस ठाऊक होते. तू खूप निर्मळ मनाचा आहेस. तसाच रहा. जी तुझी बायको होईल ती खूप भाग्यवान असेल. तुझ्यात पुरुषी अहंकार जाणवला नाही कधीच. स्त्रीला पतीकडून दोनच गोष्टी हव्या असतात. प्रेम आणि आदर. तू त्या दोन्ही देऊ शकतोस. आपल्या वाटा वेगळ्या आहेत. गावाकडे जात आहे. यापुढील आयुष्याचे निर्णय माझा पतीच घेईल. कोचिंगही संपत आले आहे. घरचेही त्याचेच वाट पाहत होते. चल बाय. काळजी घे. "

मी ते पत्र वाचून खूप रडलो. ते पत्र मी आजपर्यंत सांभाळून ठेवले आहे. अनामिकाशी पुन्हा कधी कसलाच संपर्क झाला नाही. आज अनामिका कुठे असेल , काय करत असेल माहिती नाही. जर तिचा पती जुन्या विचारांचा असेल तर मुलेबाळ सांभाळत , संसार सांभाळत ती जगत असेल. जर पती प्रगतीशील विचारांचा असेल तर कदाचित नोकरीही करत असेल. तिच्या विचारांना प्रोत्साहन भेटत असेल किंवा तिच्या स्वतंत्र मतांचा आदर केला जात असेल ? नुसते सौंदर्यच नाही व्यक्तिमत्त्वही देखणे होते तिचे. कितीतरी पुरुष स्त्रियांच्या देहावर मोहित होतात. जेव्हा देहाच्या आत लपलेल्या हृदयावर मोहित होतील , ते हृदय जिंकायला शिकतील तेव्हा ती स्त्री त्या पुरुषाला ईश्वरतुल्य बनवते. मी सुरुवातीला अनामिकेच्या सौंदर्यावर जरी मोहित झालो पण नंतर तिच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू उलगडत गेले माझ्यासमोर. अनामिका म्हणजे फक्त सौंदर्य नव्हती तर खूप काही होती. पण नियतीने तिला अधिक समजून घ्यायची मला संधीच दिली नाही. तेवढा वेळच भेटला नाही. हा माझा अविस्मरणीय अनुभव होता एका अपूर्ण प्रेमकहाणीचा. काही प्रेमकथेचे सौंदर्यच अपूर्णता असते.

दास्तान-ए-इश्क बहुत पढ़ी
पर कभी कुछ नहीं सीखा
जिसकी चाहत दिलमें बढ़ी
वो किस्मत में नहीं था लिखा !


©® पार्थ धवन
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//