Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती रात्र.. मंतरलेली. भाग -१८(अंतिम भाग)

Read Later
ती रात्र.. मंतरलेली. भाग -१८(अंतिम भाग)
ती रात्र.. मंतरलेली.
भाग -अठरा.(अंतिम भाग.)


"मी सांगते तुम्हाला." सर्वांचा झालेला गोंधळ बघून श्वेता पुढे बोलू लागली.


"सोशल मीडियावरून सगळ्यांची माहिती काढल्यावर नीलने माझ्याशी संपर्क साधला. बँकेतील मॅनेजर म्हणून मीही त्याच्याशी एक दोनदा बोलले होते.

एकदा कॉलेजच्या रस्त्यात एका मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला मी दम दिला नेमके तेव्हाच नीलने मला पाहिले आणि मग तिथल्या जवळच्या कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. आधीची थोडीफार ओळखी असल्यामुळे मी देखील नकार न देता त्याला भेटले.

आमचे थोडे बोलणे झाल्यावर त्याने डायरेक्ट मुद्यात हात घातला आणि एक स्टोरी मला ऐकवली. ती स्वप्नाची स्टोरी होती, ज्यात तिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या तीन गुन्हेगारांना शोधण्यासाठी त्याला माझी मदत हवी होती. या कामात माझी मदत होईल तर मला आनंदच होता पण त्याने मला का निवडले हा प्रश्न होता.

त्यानंतर त्याने मला खरे कारण सांगितले. स्वप्ना त्याची होणारी बायको आणि गुन्हेगार माझा दादा आणि त्याचे मित्र होते. या गोष्टीवर माझा विश्वास बसला नाही. कारण विक्रांतदादाबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम होते."
डोळ्यातील पाणी बाहेर न येऊ देता तिने आवंढा गिळला.


"मी नीलला सरळ सरळ नकार दिला तेव्हा त्याने स्वप्नाच्या घरचा आणि होस्टेलचा पत्ता मला दिला. तिथे जाऊन अशी कोणी मुलगी अस्तित्वात होती का एवढंच बघायला सांगितले.

मी ती रात्र अक्षरशः तळमळत काढली. माझ्या दादावरचा माझा विश्वास आणि नीलच्या डोळ्यातील सच्चेपणा यात कोणाला निवडावे कळत नव्हते. भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी मी खरं शोधून काढण्याचे ठरवले. स्वप्नाच्या घरी आणि तिच्या होस्टेलवर जाऊन आल्यावर नीलच्या बोलण्यात खोटेपणा नाही हे कळत होते, पण स्वतःच्या दादाला गुन्हेगार समजण्याला मन धजावत नव्हते.


नीलला साथ द्यावी की नाही या द्विधा अवस्थेत असताना मला अचानक अमृता ताईची आठवण झाली. इन्स्पेक्टर अमृता माझ्या एका मैत्रिणीची बहीण आहे. त्यावेळी तिचा चार्ज दुसऱ्या जिल्ह्यात होता.


नील आणि मी तिला भेटलो. तिनेही इतर पोलिसांप्रमाणे पुरावा मागितला, जो नीलकडे नव्हता. पण त्याच्याकडे एक प्लॅन होता. पूजा आणि रिंकीला त्याच्या जाळ्यात ओढून त्यांना गायब करण्याचा. आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर हे तिघे सैरभैर होतील आणि स्वतःच गुन्हा कबूल करतील अशी वेडी आशा त्याला होती.


कोणाला इजा न करण्याचे वचन घेऊन अमृता ताईने त्याला परवानगी दिली. त्याच्यावर तिची नजर असणार होती त्यामुळे तो कोणाचे बरेवाईट करणार नव्हता. पण मुळात तो त्या वृत्तीचा मुलगाच नव्हता.


पूजा आणि रिंकीला आपल्यासोबत घेऊन त्याच्या एका जवळच्या मित्राच्या फ्लॅटमध्ये त्यांची व्यवस्था केली. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला. त्या कुठे कनेक्ट होऊ शकत नव्हत्या पण त्यांची सगळी उत्तम सोय केल्या गेली. मधल्या काळात अमृता ताई आणि मी सुद्धा त्यांना भेटलो. आपल्या रक्ताच्या भावाबद्दल सत्य कळल्यानंतर त्यांची अवस्था माझ्यासारखीच झाली होती पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजू शकते, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला साथ दिली.


दोघींच्या अशा गायब होण्याने विक्रांत दादा घाबरला होता हे मला कळत होतं. त्यामुळे नीलचे आरोप खोटे नाहीत यावर विश्वास बसू लागला होता. या दोघींनतर रिद्धीचा नंबर आहे हे दादाने ओळखले होते. मनात खूप अस्वस्थ झाला होता पण तरीही पोलिसात जाऊन गुन्हा कबूल करण्याचे त्याच्यात धाडस आले नव्हते.


शेवटी आम्ही आमच्या प्लॅनची शेवटची खेळी खेळली. रिद्धीऐवजी मी गायब झाले. रिद्धीच्या डायरीत माझ्या प्रेमाबद्दल लिहून ठेवले आणि मुद्दाम नीलसोबत फोटो काढून तिच्याच कपाटात ठेवले.


माझी बहीण माझ्यावर किती प्रेम करते ते मला माहित होते. माझ्या गायब झाल्यानंतर ती आकाशपाताळ एक करून मला शोधण्याचा प्रयत्न करणार हे मला ठाऊक होते, त्यासाठीच मी पुरावा मागे सोडला होता.

त्यानंतर पुढे काय झाले हे सगळ्यांना ठाऊक आहे."


"म्हणजे श्वेता, तुम्ही सगळ्यांनी माझा केवळ वापर केला? तुझ्यासाठी मी किती सैरभैर झाले होते? स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे आले.
आणि नील तू सुद्धा मला ओळखत असूनही असा अनोळखी सारखा वागला?" तिच्या डोळ्यात पाणी आले होते.

"रिद्धी मला तुला हर्ट करायचे नव्हते. श्वेताचे प्रोफाइल चेक करताना तुझे फोटो मला दिसले आणि माझी स्वप्ना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली ती सुद्धा तुझ्या सारखीच होती, नाजूकशी. त्यामुळे तुला त्रास व्हावा किंवा तू आमच्या कटात सामिल व्हावे अशी इच्छा नव्हती. पण गुन्हेगार आपला गुन्हा कबूल करत नव्हते म्हणून नाईलाजाने मला तुला आमच्या जाळ्यात अडकवावे लागले.

माझ्या बँकेत माझी माहिती काढायला आलेली तू, त्या अनोळखी वाटेवर मला धडकलेली तू.. तुझ्या डोळ्यात केवळ श्वेतासाठीचे प्रेम मला दिसत होते. ते प्रेम तेच जे मी स्वप्नावर केले होते. तू म्हटले होतेस ना की मी अनाथ आहे म्हणून मला नाती कळत नाही?


नाही गं. प्रेमाची नाती कळतात मला. म्हणूनच कोणाला त्रास होऊ नये याची काळजी मी घेत होतो. तुला छळताना आणि घाबरवताना मलाही खूप वेदना होत होत्या. पण तसे केल्याशिवाय यांनी तुझ्यासमोर आपला गुन्हा कबूल केला नसता, म्हणून मी तसा वागलो. आय एम रिअली सॉरी." नील तिच्यासमोर कान पकडून उभा होता. डोळ्यातून आसवं खाली ओघळत होती.

"आय एम आल्सो सॉरी नील. मी तुला खूप चुकीचे समजले." रिद्धीने रडतच आवेगाने त्याला मिठी मारली.

"श्वेता म्हणते तशी खरंच तू वेडी आहेस." त्याने तिला हलकेच थोपटले तशी ती खुदकन हसली.


पोलीस गुन्हेगारांना घेऊन गेले. दुसऱ्या सकाळी पूजा आणि रिंकी त्यांच्या घरी पोहचणार होत्या. रिद्धी श्वेताजवळ होती. या क्षणी सर्वांच्या डोळ्यात स्वप्नाची लढाई जिंकल्याचे अश्रू होते.


आतल्या खोलीत जाऊन नीलने हलकेच कपाटातील त्या लाल ओढणीवरून हात फिरवला. त्या स्पर्शात त्याला स्वप्ना भेटली होती. नकळत त्याच्या डोळ्यातील मोती त्या ओढणीवर विसावला होता.

****समाप्त.****
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//