ती रात्र.. मंतरलेली. भाग -१६

उलगडू लागलेय त्या मंतरलेल्या रात्रीचे रहस्य!


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -सोळा.

मागील भागात:-
नील रिद्धीला स्वप्नासोबत जे घडले ते सविस्तर सांगतो आणि श्वेता, रिंकी व पूजाला कसे आणि का मारले हे सुद्धा सांगतो. त्यानंतर तिचीही त्याच्या ताब्यातून सुटका होणार नाही हे सांगतो.

आता पुढे.


"नीलऽऽ" त्याच्या कृतीने घाबरून रिद्धी मागे सरली.


"मला वाटलं, श्वेता तुझ्यापेक्षा जास्त भारी आहे म्हणून मी तुझ्याऐवजी तिला निवडलं. इथेच चुकलं माझं. तू तर तिच्यापेक्षा जास्त चलाख आणि हुशार आहेस." तिच्या जवळ येत तो.


"नील, प्लीज लिव्ह मी." ती त्याला गयावया करून म्हणाली.


"असं गं कसं सोडू? मला तर नुकतीच खात्री पटलीय की माझे खरे सावज तू आहेस. डिअर रिद्धी, तू काही न करता स्वतःहून माझ्या जाळ्यात अडकली आहेस. मग इतक्या सहज तुला कसे सोडू?


त्यात आता माझे सगळे सिक्रेट्स सुद्धा तुला कळले आहेत. तेव्हा तर तू माझ्यासाठी खूप मोठा धोका आहेस. मग तूच सांग तुला सोडून कसे चालणार?

आणि खरं सांगू?आज मला बघायचंच आहे, एवढया नाजूक- साजूक मुलीचा भाऊ तिची ही अवस्था बघून कसा रिऍक्ट होतोय." त्याने तिला तिथेच सोफ्यावर ढकलले.

"नील प्लीज स्टॉप. मी तुला दयेची भीक मागते." त्याची पावले तिच्याकडे वळताना बघून तिने हात जोडले.


नीलला त्याच्याशी काहीच देणे घेणे नव्हते. त्याच्या डोळ्यात एक वेगळेच भाव दाटून आले होते. जीवाच्या भीतीने घाबरलेल्या माशासारखी झालेली तिची अवस्था आणि तिच्यावर तुटून पडण्यास सज्ज असलेला तो..

तोच त्याच्या हॉलचा दरवाजा तोडण्याचा आवाज आला.

"नील, थांब. खबरदार माझ्या बहिणीला हात लावला तर." दरवाजा उघडताच विक्रांत धावत आत आला आणि नीलच्या पुढयात उभा ठाकला.


"नील, तुझा गुन्हेगार मी आहे. आम्ही सगळे आहोत. प्लीज रिद्धीला हात लावू नकोस. जी शिक्षा द्यायची असेल आम्हाला दे, पण रिद्धीला सोडून दे." विक्रांतच्या पाठोपाठ रिधान आणि अर्णव देखील आले.

विक्रांत नीलसमोर हात जोडून उभा होता. त्याचे जोडलेले हात बघून त्या दोघांनीही हात जोडले.


"नील, आमच्या चुकीमुळे आम्ही आमच्या बहिणींनी गमावले आहे. आता पुन्हा रिद्धीचा बळी नको देऊ." रिधानच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते.


"रिद्धी तू ठीक आहेस ना?" भीतीने थरथरत उभ्या असलेल्या तिच्याजवळ जात विक्रांतने विचारले. तो जवळ येताच तिने त्याच्या गालावर पूर्ण ताकदीनीशी थप्पड लगावली.


"या सगळ्याला तू जबाबदार आहेस दादा, तुझ्यामुळे हे झालंय. शी, मला तर तुला दादा म्हणायला देखील लाज वाटते आहे." तिने दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा झोकून दिला.


"बरोबर आहे तुझं. आमच्या हातून खूप मोठी चूक झालीये. त्याची माफी मागण्याची सुद्धा लायकी नाहीये गं आमची. रिद्धी, आम्ही पोलिसांसमोर आमचा गुन्हा कबूल केला आहे." तो खाली मान घालून तिच्या समोर उभा होता.


"हे आधीच केले असते तर तीन निरपराध जीवांना त्यांचे प्राण गमवावे लागले नसते."

काही वेळापूर्वी रस्त्यात नीलची कार अडवणारे पोलीसकाका आत येत म्हणाले. "हवालदार या तिघांच्याही हातात बेड्या घाला."

हवालदाराने तिघांच्या हातात बेडया घालताच रिद्धी हुंदके देऊन रडू लागली.


"दादा, तुझ्यामुळे श्वेताचा बळी गेला आणि आज मीसुद्धा जिवंत राहिले नसते. तू असा का वागलास?" तिचे रडणे थांबता थांबत नव्हते.


"श्वेताचा शोध घ्यायला म्हणून मी पोलिसांच्या या प्लॅन मध्ये सामिल झाले. मला वाटलं तूसुद्धा त्याच उद्देशाने मला मदत करायला तयार झाला आहेस, पण तसे काहीच नव्हते. तुझे हात तर आधीच एका निष्पाप जीवाच्या रक्ताने माखले होते." तिचा हुंदका पुन्हा बाहेर पडला.


"मला तुला गमवायचे नव्हते गं रिद्धी. श्वेता माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर माझी काय अवस्था झाली माझे मला माहित. पुन्हा तेच दुःख माझ्या वाटेला नको होते." डोळ्यात पाणी घेऊन विक्रांत म्हणाला.


"मागच्या व्हॅलेंटाईनला पूजा अचानक गायब झाली तेव्हा धक्का तर सगळ्यांनाच बसला होता. पण काही दिवसांनी हेच आपल्या बहिणीसोबत देखील घडेल असं वाटलं नव्हतं.

त्यानंतर चार महिन्यापूर्वी रिधानची बहीण रिंकी घरातून निघून गेली आणि मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला की हा योगायोग नक्कीच नाहीये. कोणीतरी मुद्दाम आम्हाला टार्गेट करतो आहे. हे कोण करत असेल ते कळत नव्हते. आमच्या तिघांशी दुष्मनी असणारी एकच व्यक्ती असे करू शकते असा अंदाज आला. मात्र ती कोण असेल हे कळत नव्हतं.

स्वप्ना प्रकरणाला दोन वर्ष उलटून गेली होती. आमच्या डोक्यातून ते केव्हाच निघून गेले होते. पण रिंकी आणि पुजाच्या गायब होण्याने समजले की कोणीतरी आमचा बदला घेऊ बघतो आहे. अचानक अर्णवला दोन वर्षांपूर्वीचा किस्सा आठवला. कदाचित त्या मुलीचा बॉयफ्रेंड हे करत असावा या विचाराने आमच्या पायाखालची जमीन सरकली.

पोलिसांची मदत घ्यावी असे खूपदा मनात यायचे. काय म्हणून तक्रार नोंदवावी ते कळत नव्हते कारण अर्णवच्या मनातील विचार खरा ठरला असता तर आमचेही पितळ उघडे पडले असते.

रिद्धी मला तुला गमवायचे नव्हते. कुण्या मुलाच्या प्रेमात वगैरे तू पडली नाहीस ना, त्याच्यासोबत निघून जाणार नाहीस ना याचाच मी सारखा विचार करत असायचो. त्यात श्वेताला विसरूनच गेलो. कारण ती माझी रक्ताची बहीण नव्हती. तिला तो किडनॅपर आपल्या ताब्यात घेणार नाही याबाबत मी निश्चिन्त होतो आणि एक दिवस अचानक श्वेता गायब झाली.

हे अगदीच अनपेक्षित होते. हा जो कोणी आहे तो खूप हुशार आणि तेज बुद्धीचा आहे हे स्पष्ट झाले होते." विक्रांत नीलकडे बघून म्हणाला.

नील तसाच एका ठिकाणी सर्व ऐकत उभा होता. भावविरहित डोळ्यांनी, शांत आणि निश्चल!
:

क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all