ती रात्र.. मंतरलेली. भाग -१४

होईल का उलगडा त्या मंतरलेल्या रात्रीचा?


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -चौदा.
मागील भागात :-

अतिप्रसंगातून सामोरे गेलेल्या स्वप्नाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू होतो. मात्र गुन्हेगार पकडले जात नाही. त्यामुळे नील वैफल्यग्रस्त होतो.

आता पुढे.

"एके दिवशी गळ्याला फास लावून आत्महत्या करायच्या नादात असताना अचानक अंतर्मनातून आवाज आला, स्वप्ना तर गेली तू का असा वागतोस? तिच्या मारेकऱ्यांना शोधून काढू शकत नाहीस तर तुझ्या प्रेमाचा काय उपयोग? किती विश्वासाने ती तुझ्यासोबत आली होती आणि तू काय केलंस? ना तिला वाचवू शकलास आणि ना ही तिला न्याय मिळवून देऊ शकलास.

मृत्यूला कवटाळलेस तर तुझी समस्या कदाचित सुटेल पण त्यानंतर कुठलीच स्वप्ना कोणत्याच नीलवर विश्वास ठेवू शकणार नाही.

माझं अंतर्मन मला सांगत होतं आणि मी ढसाढसा रडत होतो. तेव्हाच स्वतःला वचन दिले जोपर्यंत त्या गुन्हेगारांचा शोध लागणार नाही, तोपर्यंत आत्महत्येसारखे पुळचट विचार मनात आणणार नाही.

त्यानंतर मी स्वतःच लढायचे ठरवले, अन्यायाविरुद्ध, त्या न पाहिलेल्या अपराध्यविरुद्ध! तिथेही अपयशच हाती लागले. ज्याला मी मारले होते त्याचा मास्क खाली घसरल्यामुळे त्याचा पुसटसा चेहरा मला दिसला होता. बाकी दोघांच्याबद्दल काहीच धागेदोरे हातात नव्हते.

त्यानंतर मी शांतपणे बसून विचार केला. न्यायासाठी लढणार होतो, पण जीला न्याय मिळवून देणार तीच या जगात नव्हती. मग काय हवं होतं मला? न्याय की बदला? आता बदल्याच्या आगीने मी होरपळलो होतो."
त्याच्या डोळ्यात परत एकदा खुनशी भाव जागे झाले होते.


"तू स्वतःला सावरलेस ते चांगलेच झाले पण आगीच्या बदल्यात होरपळताना तीन निष्पाप मुलींच्या जीवाची समिधा का दिलीस? नील, अशाने तुझ्यात आणि त्या अपराध्यामध्ये काय अंतर उरले? तूही अपराधीच झालास की." त्याच्यावर नजर रोखून रिद्धी म्हणाली.

"एखाद्या अपराध्याची व्याख्या काय करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी माझ्या स्वप्नाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा विडा उचलला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद.. कशाचाही उपयोग करेन. मला त्याचे काहीही पडले नाहीये." तिचा हात झिडकारत तो म्हणाला.

"असं कसं नील? दोषी असणाऱ्याला शिक्षा व्हायला हवी पण त्यामध्ये एखाद्या निष्पाप जीवाला कसली शिक्षा, त्याचा काय दोष?"


"जे झाले त्यात माझ्या स्वप्नाचा तरी कुठे काही दोष होता? ती देखील निष्पाप होती ना? तिने माझ्यावर प्रेम केले याची केवढी मोठी शिक्षा तिला भोगावी लागली? तेव्हा कोणी तिचा विचार केला नाही. आता मलाही कोणाचा विचार करण्याची गरज वाटत नाही." तो त्वेषाने उठून उभा राहिला.


"नीलऽऽ"

"रिद्धी, प्लीज, मला तुझे काहीच ऐकायचे नाहीये आणि सहानुभूती तर अजिबात नकोय." खोलीचा दरवाजा आपटत तो हॉलमध्ये येऊन बसला.

******

"कॉफी?" वाफाळलेल्या कॉफीचा मग त्याच्यासमोर ठेवत रिद्धीने तिचा कप हातात घेतला. तो चिडून बाहेर आला तेव्हा तिने स्वयंपाकघरात जाऊन दोघांसाठी कॉफी केली. कदाचित याने त्याचा राग शांत होईल असे तीला वाटले.


"नील, मी तुझ्याशी सहानुभूतीने वागत नाहीये. जे घडले ते खूप वाईट होते. पण तू जे करतो आहेस ते चुकीचे आहे." त्याला समजवण्याचे तिचे प्रयत्न सुरुच होते.


"एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वार!" कॉफीचा घोट घेत तो अगदी शांतपणे म्हणाला.


"प्रेम तर संपलेय. आता युद्ध सुरु झाले आहे आणि या युद्धाच्या चक्रव्हूहातून आता कोणाचीही सुटका नाही, तुझी सुद्धा."


इतकावेळ त्याच्याशी बोलल्यावर तिची भीड चेपत आली होती तोच त्याच्या बोलण्याने पुन्हा तिच्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली.


तिथून उठत त्याने ड्रेसिंग टेबलच्या कप्प्यातून दोन पाकीट काढले आणि तिच्यासमोर ठेवले.

"हे काय?"

"तूच बघ." त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ वलय निर्माण होऊ लागले.

ते पाकीट हाती घेऊन त्यातील एकेक फोटो तिने बाहेर काढले.

"विक्रांत दादा, रिधान, अर्णव.." ती फोटो बाहेर काढत चकित होऊन बघत होती.

त्यानंतरचे फोटो बघून तिला घेरी यायची बाकी राहिली.
विक्रांत आणि श्वेता, रिधान आणि रिंकी तर तिसऱ्या फोटो अर्णव आणि पूजाचा होता.

"हे.. हे काय आहे?" तिच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला.


"ओळखले नाहीस? थांब मी तुझी ओळख करून देतो. हा तुझा विक्रांत दादा आणि हे त्याचे मित्र.
ही विक्रांतची लाडकी बहीण श्वेता, जी कदाचित तुझ्यापेक्षा जास्त लाडकी होती. ही रिंकी, रिधानची स्वीट सिस्टर आणि ही अर्णवची बहीण पूजा." तिच्याजवळ सरकत तो म्हणाला.


"तुला काय म्हणायचं आहे? स्वप्नाची जी अवस्था झाली ती विक्रांत दादा आणि त्याच्या मित्रांनी केली?" तिने डोळे मोठे करून विचारले.


"ऑफकोर्स! तुझ्या हे आत्ता डोक्यात येत आहे का?" तो छद्मी हसून म्हणाला.


"तू चुकीचे बोलतो आहेस. विक्रांत दादा असे करणे शक्य नाही." रिद्धी थरथरत होती.


"ए, तुला बोललो ना? मला चूक बरोबर हा हिशोब करायचाच नाहीये. मला फक्त बदला हवा आहे." तिच्या गळ्यावर हाताचा विळखा घालत तो म्हणाला.


"स्वप्नाच्या आठवणीत मी वर्षभर झुरत होतो. त्यानंतर प्रतिशोधच्या तहानेने मी व्याकुळ झालो. स्वतःला सावरत कुठून काय हाती लागते याचा शोध घेत होतो.


अचानक एके दिवशी बँकेत एका तरुणाचा आवाज कानावर आला आणि माझे कान टवकारले. तोच आवाज जो त्या रात्री स्वप्नाबद्दल गलिच्छ दर्जाचे बोल बोलले होते. तो आवाज माझ्या कानात तसाच रेंगाळत होता.

त्या तरुणाचा चेहरा बघण्यासाठी मी उतावीळ झालो असताना त्याचा चेहरा माझ्या नजरेस पडला.
त्या रात्री मास्क खाली घसरल्यावर मला दिसलेला ओझरता चेहरा माझ्यापुढे स्पष्टपणे दिसत होता. तोच चेहरा, तोच स्पष्ट आवाज..!"


"कोण होता तो?" श्वास रोखून रिद्धी.


विक्रांत.. तुझा लाडका दादा. आणि त्याच्यासोबत त्याची लाडकी बहीण श्वेता! तब्बल वर्षभरानंतर मला हवी असलेली व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर होती."

"नील, तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा."

"चान्सच नाही. तो चेहरा, तो आवाज माझ्या डोक्यात इतका घट्ट रुतून बसलाय की गैरसमजाला तिथे थाराच उरत नाही. त्या तिघातील एक म्हणजे विक्रांत होता हे शंभर टक्के खरे होते."

"मग तू पोलिसात जायचे होते ना."

"पोलीस? छ्या! हा डाव आता मला माझ्या पद्धतीने खेळायचा होता. त्यासाठी मी प्लॅन आखायला सुरुवात केली होती."
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all