Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती रात्र.. मंतरलेली. भाग -१२

Read Later
ती रात्र.. मंतरलेली. भाग -१२


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -बारा.

मागील भागात.

घरून निघून गेलेली स्वप्ना एक छोटेखानी नोकरी करत होस्टेलवर राहू लागते. नील तिला त्याच्याकडे येण्यास विनवतो पण वडिलांना दिलेले वचन तिला मोडायचे नसते. दोन वर्षांचा कालावधी उलटल्यावर व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी दोघे भेटतात.

आता पुढे.

"थोड्यावेळाने माझा खांदा ओला झाल्याचे मला जाणवले, म्हणून मी तिचा चेहरा वर करून पाहिले. तिचे काळेभोर डोळे अश्रुंनी काठोकाठ भरलेले होते."


"इतके प्रेम करणारा प्रियकर जवळ असताना तिच्या डोळ्यात पाणी का आले?" गोंधळून रिद्धीने विचारले.


"क्षणभर मलाही ते कळले नाही. मला वाटलं की माझं काहीतरी चुकतंय म्हणून ती रडते आहे. माझा झालेला गोंधळ बघून ती लगेच खुदकन हसली.

म्हणाली, 'वेड्या प्रत्येक वेळी डोळ्यातून येणारे अश्रू दुःखाचे नसतात, तर आनंदाचेही असतात. तू माझ्यासाठी एवढं काही करशील असं मला वाटलं नव्हतं. नील आपली नावं आधीच जुळलेली आहेत. उद्यापासून तुझ्या नावाचे हे मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवायला कसलं भारी वाटेल रे मला.'

तिचा आनंद तिच्या डोळ्यातून बरसत होता आणि मी तिला बघण्यात गुंग झालो होतो. 'ए रडूबाई, हे सगळं तुझ्यासाठी नाही बरं, तर माझ्या होणाऱ्या बायकोसाठी आहे.' असं हसत मी तिला म्हणालो तर मलाच टपली मारत 'खुळाच आहेस' म्हणत ती परत माझ्या मिठीत शिरली.

याच खोलीत आम्ही होतो. याच बेडवर माझा हात हाती घेऊन ती माझ्या मिठीत होती. तिच्यासाठी म्हणून मुद्दाम ही दोन हृदय कोरलेली वेलवेटची बेडशीट अंथरलेली. जणू काही आमचेच हृदय एकमेकांशी गुजगोष्टी करत होते."


नीलचे सगळे बोलणे रिद्धी भारावल्यागत ऐकत होती. हळूहळू तिच्या मनात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या कडया जुळायला लागल्या होत्या.

व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्ताने सजवलेली खोली, बेडवरची ही लाल बेडशीट, कपाटातील नव्या नवरीचा साज! हे सर्व काही त्याने त्याच्या प्रेयसीसाठी केले होते. मग आता ती कुठे होती?

मनात एक प्रश्न भेडसावत असतानाच कपाटाला तिचा धक्का लागला आणि तिथले फोटोचे पाकीट तिच्या हातात पडले.

"स्वप्ना इथे आल्यावर तर तुमच्यात सगळं ठीक चालले होते ना, मग तू हे असं इतर मुलींना मारण्याचे सत्र का सुरु केलेस? स्वप्ना कुठे आहे? आणि मुख्य म्हणजे माझ्या दादाचा तुझ्याशी काय संबंध?" पाकिटातील फोटो नीलसमोर धरत रिद्धी विचारत होती.
मनात घोंघावणारा प्रश्न पुन्हा एकदा तिच्या ओठावर आला.

"पोलिसांनी तरी इतके प्रश्न विचारले नसते गं, जेवढे तू विचारते आहेस. खरं म्हणजे मला कोणाला काही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही, पण तू इतर मुलींपेक्षा निराळी भासलीस म्हणून तुझ्याशी एवढं काही शेअर केले. आता परत कसली अपेक्षा करू नकोस."

तिच्या हातातील फोटो कपाटात ठेवत तो म्हणाला. आत्तापर्यंत मृदू असलेला त्याचा स्वर अचानक करडा झाला.


"नील, मला ऐकायचे आहे हे." त्याचा हात पकडत ती म्हणाली.

"तू माझ्या दादावर आरोप केलेला ना? मी ते कसं सहन करू? तुझे तुझ्या स्वप्नावर खूप प्रेम आहे, तसेच माझेही माझ्या दादावर प्रेम आहे. प्रेम कोणाचे कोणावरही असू दे, त्यामागची पवित्र भावना महत्त्वाची असते.

तुला तुझ्या स्वप्नाच्या प्रेमाची शपथ, काय खरे आहे ते मला कळू तरी दे." तिच्या आवाजात देखील जरब होती.

"कारण प्रश्न केवळ आरोपाचा नाही तर विश्वासाचा आहे आणि माझा माझ्या विक्रांतदादावर प्रगाढ विश्वास आहे."

तिचे बोलणे ऐकून तो मोठयाने हसला.

"नको गं इतका विश्वास ठेवू. कारण एकदा का विश्वासघाताची झळ मनाला लागली ना की त्यातून बाहेर पडणे खूप वेदनादायी असते."


"नील तू विसरू नकोस, मी तुला तुझ्या प्रेमाची शपथ घातली आहे." त्याच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली.


"कोणत्या प्रेमाची शपथ? कुठेय ते प्रेम? ते प्रेमच तर माझ्याकडून हिसकावून घेतलेय, तेही तुझ्या दादाने आणि त्याच्या साथीदाराने." त्याच्या हाताच्या शिरा फुगल्या होत्या. रागाने डोळ्यात नुसता अंगार धूमसत होता.

"नील?"

"तुला ऐकायचे ना? मग ऐक. त्या रात्री काय झाले होते ते मी तुला सांगतो."
तिच्या दंडाला पकडून बेडवर बसवत तो म्हणाला.

"या इथेच आम्ही आमच्या संसाराची स्वप्न रंगवत बसलो होतो. बोलता बोलता दिवस कसा मावळतीला लागला कळलेच नाही. त्या दिवसाचा आमचा फूल टू प्लॅन तयार होता. दुपारी टॉकीजमध्ये मुव्ही, नंतर हॉटेलमध्ये डिनर. मग मी तिला होस्टेलवर सोडणार होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रजिस्टर्ड लग्न करून रीतसर कायमस्वरूपी ती इथे येणार होती.


पण प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटेल तशी कुठे घडणार असते? आमची सायंकाळ इथेच सरत आली होती त्यामुळे मुव्हीचा प्लॅन रद्द करावा लागला. जेवायला म्हणून आम्ही बाहेर गेलो. जेवण, आईस्क्रीम आणि त्यानंतर लॉंग ड्राईव्ह!


स्वप्नाचा हट्ट म्हणून आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो. तो संपूर्ण दिवस मला ती म्हणेल तसा जगायचा होता. आम्ही कुठे गेलो होतो, तुला ठाऊक आहे? आम्ही गेलो ती तीच अंधारलेली वाट, ते तेच आडवळण, अन तेच जंगल.. जिथे तू मला धडकली होतीस." रिद्धीकडे त्याने एक कटाक्ष टाकला.


"आम्ही दोघं माझ्या बाईकवर होतो. ती गुलाबी रात्र, हवाहवासा हलकेच बोचणारा गार वारा, आकाशातील शीतल चांदणे आणि माझ्या बाजूला असलेला माझा चंद्र!

आम्ही हातात हात घेऊन तसेच चांदणे न्याहाळत बसलो होतो. माझ्या खांद्यावर टेकलेले तिचे डोके, हाती घेतलेले एकमेकांचे हात, बाकी सगळं निःशब्द!

त्या मंतरलेल्या रात्रीचे ते मंतरलेले क्षण होते. ते क्षण पुढे सरकूच नयेत, ती रात्र तेवढ्यातच थांबावी असा मोह मला झाला. काही वेळाने तिनेच त्या मंतरलेल्या क्षणातून मला जागे केले आणि आता निघायला हवे असा आग्रह धरला.

मला मात्र ती सोबत हवी होती. तिला होस्टेलला सोडून एकटेच परत फ्लॅटवर येणे माझ्या जीवावर येत होते. तिला माझ्या मनाची अवस्था कळत होती, कारण तिलाही कुठे माझ्यापासून वेगळे व्हायचे होते?

'नील फक्त आजची रात्र, त्यानंतर उद्यापासून आपण दोघं कायम सोबत असू.' असे म्हणत अनपेक्षितपणे तिने माझ्या ओठावर तिचे ओठ टेकवले.

त्या मखमली ओठांचा पहिल्यांदा झालेला तो स्पर्श!
माझ्या ओठावर तिच्या ओठांची अलगद मोहर उमटली, तोच एक प्रकाशझोत तिच्या चेहऱ्यावर पडला आणि आम्ही बाजूला झालो."

काय झाले असेल पुढे? कळण्यासाठी स्टे ट्यून्ड!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//