Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती रात्र.. मंतरलेली. भाग -१०

Read Later
ती रात्र.. मंतरलेली. भाग -१०
ती रात्र.. मंतरलेली.
भाग -दहा.

मागील भागात :-
नीलला कळून चुकते की त्याने रिद्धी ऐवजी श्वेताला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याचे त्याला वाईट वाटते आणि मग सहज हाती लागलेले सावज म्हणून तो रिद्धीच्या अंगावर चालून जातो.

आता पुढे.

तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून तो ते भाव निरखत होता. हेच तर हवे होते त्याला. जीवाच्या आकांताने दयेची भीक मागणारी ती आणि जिंकल्याच्या अविर्भावात समोर असलेला तो. तिच्या चेहऱ्यावरच्या भावाने तर तो असाच अर्धा विजयी झाला होता.


रिद्धीने डोळे मिटून घेतले. आसवांच्या थेंबाची माळ तिचा गालावरून घरंगळत खाली येऊ लागली होती. तिचा तो चेहरा बघून त्याच्या हाताची पकड ढिली झाली. आपले दोन्ही हात बाजूला करून त्याने तिला बेडवर झोकून दिले.


"मी कॉलेजमध्ये असताना मला स्वप्ना भेटली. अगदी स्वप्नवत. ती आयुष्यात आली आणि विराण वाळवंट असलेले माझे जगणे अचानक आल्हाददायक झाले. तिच्या प्रेमाच्या गारव्याने माझ्या मनात देखील प्रेमाचा अंकुर फुटायला लागला होता." रिद्धीला बेडवर तसेच झोकून नील पाठमोरा होऊन बोलत होता.


"आपल्याच स्वप्नाच्या जगात जगत असताना आयुष्यभर एकमेकांना कधी न सोडण्याच्या आणि कायम साथ देण्याच्या आम्ही आणाभाका घेतल्या होत्या. लग्न करून आम्हाला आमचा संसार थाटायचा होता. तिला खूश ठेवण्यासाठी माझ्याच्याने जेवढे काही होऊ शकेल ते करण्याची ताकद माझ्यात होती.


ग्रॅज्युएशन कम्प्लिट झाल्यावर स्वप्नाने आमच्याबद्दल तिच्या घरी सांगितले. सोबत मीही होतो. सुरुवातीला तिच्या घरून फारसा विरोध झाला नाही, पण जेव्हा त्यांना कळले की मी एक अनाथ मुलगा आहे, तेव्हा त्यांनी सरळ सरळ नकार दिला.


स्वप्ना मात्र तिच्या मतावर ठाम होती तेव्हा त्यांनी थोडी माघार घेतली. माझ्याकडे दोन वर्षांचा अवधी देऊन आपल्या पायावर उभे झाल्याशिवाय एकमेकांना भेटायचे नाही अशी गळ घातली.


दोन वर्ष तिच्याशिवाय जगणे ही कल्पना मला असह्य झाली होती पण स्वप्नाने मला सावरले. तिच्या वडिलांवर तिचा विश्वास होता आणि त्याही पेक्षा जास्त विश्वास माझ्यावर होता. दोन वर्षात मी चांगल्या नोकरीवर लागेल आणि स्वतःहून तिच्या घरी लग्नाची मागणी घालायला येईन असे माझ्याकडून वचन घेऊन ती माझ्या मिठीत आली."

आत्तापर्यंत रिद्धी स्वतःला सावरून उठून बसली होती. नील अजूनही पाठमोराच उभा राहून बोलत होता.


"दोन वर्षापासून आम्ही रिलेशन मध्ये होतो पण आजवर एकमेकांना साधी मिठी सुद्धा मारली नव्हती. त्या दिवशी मारलेली ती पहिली मिठी आमच्या विरहाच्या सुरुवातीची मिठी असेल असे आम्हाला वाटलेही नाही. तिला वचन देऊन मी तसाच माघारी निघालो.


त्यानंतर नशीब आजमावयला म्हणून मी इथे आलो. तसा हुशार होतोच. त्या हुशारीच्या बळावर वर्षाभरात नोकरीला लागलो. आता फक्त दुराव्याचा एक वर्ष तेवढा उरला होता. त्यानंतर मी माझ्या स्वप्नाला कायमचे माझ्याजवळ ठेवण्यासाठी तिच्या घरी तिला मागणी घालायला जाणार होतो."


"प्रेमात मन कसं पाखरू होऊन जातं नाही?" बोलता बोलता तो रिद्धीकडे वळला. ती काही न बोलता केवळ त्याचे म्हणणे ऐकत होती.


"त्या पाखरासारखा मी उडत होतो, इकडून तिकडे, तिकडून इकडे. नोकरीचे बऱ्यापैकी पैसे साचले होते. मी एकटाच, त्यामुळे कसली जबाबदारी अंगावर नव्हती. पै पै जमा करून काही पैसे साठवले. ते पैसे आणि थोडे लोन घेऊन हा फ्लॅट खरेदी केला.


हा फ्लॅट म्हणजे माझं स्वप्नच. माझ्या स्वप्नाचे घर, आमच्या दोघांच्या स्वप्नाचे घर. जिथे ती गृहलक्ष्मीच्या पावलांनी प्रवेशणार होती. या मुक्या भिंतीना बोलते करणार होती. घराला घरपण आणणार होती. किती किती कल्पनेत मी रंगून गेलो होतो. त्याच कल्पनेत कित्येक वेळा लग्न करून तिला या घराचा उंबरठा ओलांडून आत घेऊन आलो होतो." बोलता बोलता तो थोडा थांबला. जणू काही पुन्हा एकदा त्याच कल्पनेत फिरून आला.


"पुढे काय झाले?"

तो थांबला तसे उत्सुकतेने रिद्धीने विचारले. त्याच्या कथेत तिला आवड निर्माण व्हायला लागली होती. ती इथे कशासाठी आली हे थोडया वेळासाठी ती विसरून गेली होती.

"कल्पनाच ती, कल्पना कधी सत्यात उतरताना बघितले आहेस का?" त्याने तिच्याकडे बघून परत नजर दुसरीकडे वळवली.

काही वेळापूर्वी आपल्या जीवावर उठणारा, एका वेगळ्याच नजरेने पाहणारा नील खरा की त्याच्या स्वप्नाच्या आठवणीत व्याकुळ झालेला नील खरा, तिला थांग लागत नव्हता.

"आम्ही आमच्या वचनावर ठाम होतो. येणारा प्रत्येक दिवस अन मावळणारी प्रत्येक रात्र आमच्या हिशोबात जमा होत होती. सरणारा एकेक क्षण आमच्या भेटीची उत्कंठता वाढवणारा होता.

नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. दोन वर्षांची मुदत देणाऱ्या तिच्या वडिलांनी अचानक त्यांचा शब्द फिरवला आणि तिच्यासाठी एक श्रीमंत स्थळ शोधून काढले.

स्वप्ना त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या सुखाची त्यांना पर्वा असणे स्वाभाविक होते पण तिचे खरे सुख कुठे आहे हे त्यांना कधी कळलेच नाही. अचानक घातलेला लग्नाचा घाट आणि आणि घरात सुरु झालेली लगीनघाई यामुळे माझी स्वप्ना गोंधळून गेली. ज्या वडिलांवर विश्वास ठेवून ती माझ्यापासून दोन वर्ष दूर रहायला तयार झाली होती त्याच वडिलांनी तिचा विश्वासघात केला होता."

"व्हाट? ही मोठी माणसे अशी कशी वागू शकतात? तुझी स्वप्ना किती दुखावली असेल ना?" त्याला मध्ये प्रश्न करण्यापासून रिद्धी स्वतःला रोखू शकली नाही.


"हम्म. तिच्या वडिलांचे ते वागणे तिच्या फार जिव्हारी लागले. त्यावर काय करावे तिला सुचत नव्हते. वडिलांनी दिलेला शब्द आणि त्यांनीच त्यापासून फिरवलेली पाठ. ती अगतिक झाली होती. मला तर यातले काहीच ठाऊक नव्हते.

शेवटी खूप विचार करून ती लग्नाच्या मंडपात उभी तर राहिली पण मंगलाष्टके सुरु होताक्षणीच तिने तिच्या मनातील घुसमट बाहेर काढली आणि सर्वांची माफी मागत तिने त्या लग्नाला नकार दिला."

"थँक गॉड! तिने नकार दिला ते बरेच झाले. आपल्या प्रेमाला सोडून ती दुसऱ्या मुलाबरोबर कशी राहू शकली असती ना?" एक सुस्कारा सोडून रिद्धी म्हणाली.

तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून नीलच्या ओठावर पुसट हसू उमटले. त्या हास्यात मात्र केवळ एक विषण्णता झळकत होती.

पुढे स्वप्नाचे काय झाले असेल?
कळण्यासाठी वाचत रहा, ती रात्र.. मंतरलेली.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//