ती रात्र.. मंतरलेली! भाग -९

काय असेल त्या मंतरलेल्या रात्रीचे रहस्य?


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -नऊ.

मागील भागात :-

श्वेताचा शोध घेण्यासाठी म्हणून रिद्धी नीलच्या घरी आलेली असते. तिच्या अचानक गायब होण्यामागे नील जबाबदार आहे असे तिला वाटतं असते. श्वेताबद्दल ऐकत असताना आपले खरे सावज ती नसून रिद्धी आहे हे नीलच्या ध्यानात येते.
आता पुढे.

"म्हणजे मला विक्रांतच्या बहिणीला मारायचे होते, त्याच्या खऱ्याखुऱ्या बहिणीला. पण चुकून मी श्वेताला त्याची बहीण समजलो आणि तू समोर येऊनही तुझ्याकडे दुर्लक्ष केले. शीट! तुझ्यामुळे त्या श्वेताचा नाहक बळी गेला." तो डोक्याला हात लावून बसला.


"तुला मला मारायचे होते? पण का? आणि विक्रांतदादाला तू कसा ओळखतोस?" रिद्धीच्या चेहऱ्यावर भीतीची लहर उमटली. त्याच्या जाळ्यात तिच्याऐवजी चुकीने श्वेता अडकली, हे तिच्या आकलनापलीकडे होते.


"विक्रांत, रिधान आणि अर्णव याच तिघांनी गुंड बनून तुझ्या पाठी लागण्याचे नाटक केले ना?" तिच्या प्रश्नाला सरळ उत्तर न देता नीलने तिला विचारले.


"हो. यापैकी विक्रांत हा माझा दादा, तर रिधान आणि अर्णव त्याचे मित्र आहेत. तू या तिघांना कसा ओळखतोस?" तिच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी आली होती.


"ज्यांनी माझे आयुष्य नरक बनवले, मला जगण्यासाठी कोणते कारणच ठेवले नाही, अशा त्या तिघांना मी कसे विसरू?"

"काही काय बोलतोस? माझ्या दादाबद्दल असे काही बोललेले मी सहन करणार नाही. तो कसा आहे हे मी चांगल्याने जाणते." तिच्या गव्हाळ नाकावर राग जमा झाला.

"एवढा विश्वास?" तो कुत्सित हसला.


"हो, दादा आहे तो माझा. स्वतःपेक्षा त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे."


"हाच विश्वास किंबहुना यापेक्षाही जास्त विश्वास ठेवून 'ती' माझ्यासोबत आली होती. मी तिच्यासोबत असेन तर जगातील कोणतीच शक्ती तिचे काही बिघडवू शकणार या वेड्या आशेवर या घरात ती पाऊल टाकणार होती." अचानक त्याच्या आवाजात निर्माण झालेली आर्द्रता तिला जाणवायला लागली.


"कोण? श्वेता?" तिने हाताच्या बोटांना एकमेकांत अडकवत घाबरत विचारले.


"स्वप्ना.. स्वप्ना तिचे नाव. एकमेकांवर आमचं खूप प्रेम होतं. तू म्हणालीस ना, की अनाथ असलेला मी, मला काय नात्यांची किंमत कळणार म्हणून? तसं नसतं गं. उलट अनाथ लोकं नात्यांसाठी आसूसलेली असतात.

प्रेमाचा कुठूनही थोडासा ओलावा जरी मिळाला ना तरी त्या नात्यात स्वतःला गुंतवत जातात. प्रेम ही भावना त्यांनी कधी अनुभवली नसते, त्यामुळे त्यांनाच त्यांची खरी किंमत कळते." बोलता बोलता डोळ्यातील ओल त्याने अलगद टिपला.

तो नेमके कोणाबद्दल हे बोलतोय तिला फारसे कळत नव्हते. त्याच्या डोळ्यातील भाव मात्र सच्चे भासत होते.

"मघाच्या फोटोतील मुलींचे नावे तर वेगळी घेतली होती. श्वेताबरोबर पूजा आणि रिंकी म्हणाला होतास ना तू? मग ही स्वप्ना कोण? कुठे आहे ती? की तिलाही ठार मारलेस?" तिने हिम्मत करून विचारले.

एरवी तिच्या या व्यक्तव्यावर तो चिढला असता, पण या घडीला तो एका वेगळ्याच दुनियेत रममाण झाला होता.

"तिला फोटोत बंधिस्त करायची काय गरज? माझ्या हृदयात कायम वसलेली आहे ती." तो उगाचच हसला. काळजातील वेदना चेहऱ्यावर उमटू नये म्हणून केलेला प्रयत्न असावा कदाचित.

"ती नेहमी मला म्हणायची, नील तू कितीही नाकारलेस तरी मी कायम तुझ्यासोबत आहे. वेड्या, अरे सुरुवातीपासून तुझ्या नावातच तर मी आहे. 'स्वप्नील स्वप्न-नील.' असे असताना आपण दोघे कधी वेगळे होऊच शकत नाही. नील केवळ स्वप्नाचा आहे आणि ही स्वप्ना नीलची." तो बोलत होता.


"इतकं प्रेम होतं तुमचं, मग श्वेताला का फसवलंस?" तिच्या आवाजाला कातरतेची किनार लागली.


"अचानक आमच्या प्रेमाला ग्रहण लागलं. तेही तुझ्या भावामुळे आणि त्याच्या मित्रांमुळे. मग ते ग्रहण सुटायला बळी तर द्यावे लागणारच होते ना?" श्वेताचा उल्लेख झाला तसे डोळ्यातील राग पुन्हा उफाळून आला.

त्याच्या अचानक वाढलेल्या आवाजाने ती घाबरून अंग चोरून बसली.

"सॉरी, चूक झाली माझी." तिला तसे बघून त्याने कानाला हात लावले.

"श्वेताच्या बाबतीत चुकलोय मी. ती चूक मला दुरुस्त करायची आहे. सोशल मीडियावर विक्रांतसोबत मला तिचेच जास्त फोटो दिसले आणि मला वाटलं की तीच त्याची सख्खी बहीण आहे. पण तू आता स्वतःहून इथे आलीहेस, तर मला नव्याने तुझा बळी द्यावा लागेल." घाबरून बसलेल्या तिच्या चेहऱ्यावरून त्याने हात अलगद फिरवला.


"माझं काही बरंवाईट केलेस तर बाहेर पोलीस आहेत हे विसरू नकोस. ते तुला सोडणार नाहीत." त्याच्या डोळ्यात जमा झालेला खुनशी भाव बघून तिच्या अंगाला कापरे भरले होते. त्याच्या त्या स्पर्शाने तिला एक किळसवाणी शिसारी भरली.


"मी मरणाला भीत नाही हे बहूतेक मी तुला सांगितलेय. तसेही जगण्यासाठी माझ्याजवळ काही कारण उरलेय तरी कुठे? आणि इतक्या सहजतेने तू माझ्या हाती लागली आहेस मग या सावजाला सोडणार तरी कसे?"

नीलचे ओठ अगदी तिच्या ओठाजवळ होते. त्याच्या उष्ण श्वासाने तिचे हृदय जोरात धडधडत होते. त्याच्या डोळ्यातील ते भाव बघून तिच्या भेदरलेल्या नजरेत असहाय्यता दाटून आली होती.


"नील प्लीज, सोड मला." तिने अगतिक होत त्याला दूर लोटण्याचा असफल प्रयत्न केला.


"हीच भीती, हीच अगतिकता, हाच असहाय्यपणा तिनेही अनुभवला असेल ना? तेव्हा त्या नराधमांना तिच्या भावनांची जराही जाणीव झाली नसेल का गं?" रिद्धीला आणखी स्वतःजवळ खेचत तो म्हणाला.


"नील.." स्फूट स्वरात ती कळवळली. त्याने तिचा घट्ट पकडलेला हात आणि त्याच्या जवळ येण्याने बंद पडत चाललेले श्वास, एका निपुण शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या गरीब हरिणीसारखी तिची अवस्था झाली होती.


तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून तो ते भाव निरखत होता. हेच तर हवे होते त्याला. जीवाच्या आकांताने दयेची भीक मागणारी ती आणि जिंकल्याच्या अविर्भावात समोर असलेला तो. तिच्या चेहऱ्यावरच्या भावाने तर तो असाच अर्धा विजयी झाला होता.


रिद्धीने डोळे मिटून घेतले. आसवांच्या थेंबाची माळ तिचा गालावरून घरंगळत खाली येत येऊ लागली होती. तिचा तो चेहरा बघून त्याच्या हाताची पकड ढिली झाली. आपले दोन्ही हात बाजूला करून त्याने तिला बेडवर झोकून दिले.

काय होईल पुढे?
कळण्यासाठी वाचत रहा, ती रात्र.. मंतरलेली.

:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all