ती रात्र.. मंतरलेली. भाग -८

काय असतो त्या मंतरलेल्या रात्रीची कथा?


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -आठ.

मागील भागात :-

रिद्धी नीलला त्याला भेटण्यामागचे खरे कारण सांगते आणि त्याने श्वेताला का मारले याचा जाब विचारते.

आता पुढे.


"पुरावा म्हणतो आहेस तर तसा पुरावा आहे माझ्याकडे. हा बघ." त्याच्यासमोर तिने एक फोटो ठेवला.

श्वेता आणि नीलचा तो फोटो होता. त्याच्या मिठीत ती अन तिच्या हातात त्याचे हात. तिने काढलेला तो सेल्फी पुढच्या भेटीत त्याने डिलीट केला होता, त्यापूर्वी तिने तो फोटो डेव्हलप करून ठेवलाय याची पुसटशी कल्पना देखील त्याला नव्हती.

"तुझ्या मिठीत मी,
अन
भोवती गुंतला श्वास माझा.
हातात हात घेताना
सांग सख्या,
होईल का नील श्वेताचा?"
फोटो खाली श्वेताच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या ओळी वाचत रिद्धीने त्याच्याकडे पाहिले.

"आता सांग, तुझं यावर काय म्हणणं आहे? तिने तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता आणि तू तिच्या भावनांशी खेळलास? केवळ भावनांशी नव्हे तर तिच्या जीवाशी खेळलाहेस तू नील. का वागलास असा?"


"हा फोटो तुला कुठे मिळाला?" तिच्या प्रश्नाचे उत्तर शिताफीने टाळत त्याने तिला प्रतिप्रश्न केला.


"ओके, म्हणजे तुला काहीच सांगायचे नाही तर. उलट माझ्याकडून ऐकायचे आहे, तर ऐक. माझ्या डायरीत श्वेताने तिच्या प्रेमाबद्दल जे लिहिले होते, ते वाचून मी शॉक झाले. डोक्यात काय आले माहित नाही, मी तिचे कपाट पूर्णपणे धुंडाळून काढले. मात्र हाती काहीच लागले नाही.

विचारांनी डोक्याचा नुसता भुगा झाला होता. तिच्या कपाटा पाठोपाठ मी माझे कपाट देखील रिकामे केले आणि आश्चर्य म्हणजे माझ्या जुन्या कपड्यांच्या ढिगाऱ्यात हा फोटो मला सापडला. एकदा मामी तिला भेटायला म्हणून येणार होती. कदाचित तिच्या नजरेला फोटो पडू नये म्हणून तिने असे केले असावे.

फोटो बघून माझ्या हाताला कापरे भरले. एका परपुरुषाच्या मिठीत स्वतःच्या बहिणीला मी कसे इमॅजिन करू शकणार होते? मी लागलीच माझ्या दादाला कॉल करून हे सांगितले आणि पोलिसात जाऊन तिची मिसिंग केस रिओपन करावी हेही सुचवले.

माझ्या दादाला माझे म्हणणे रुचले नाही, का? त्याचे कारण मला कळलेच नाही. तो म्हणाला की, झाले ते झाले, आता पुन्हा आपल्या घराची इज्जत वेशीवर टांगायची नाही. मला याचे आश्चर्य वाटले कारण माझ्यापेक्षा तो श्वेताशी जास्त अटॅच होता.

लहानपणापासून श्वेता आमच्या घरी वाढली. ती मामाच्या मुलीपेक्षा आमच्या घरची मुलगी होती. आईचा तिच्यावर खूप जीव होता आणि दादा? तो तर तिच्यासाठी काहीही करू शकला असता. एक बहीण म्हणून त्याच्या मनात माझ्याआधी ती होती. राखी असू दे नाहीतर भाऊबीज, त्याला तिच्याकडून आधी ओवाळून घ्यायचे असायचे. नेहमी गिफ्ट देखील माझ्यापेक्षा तिलाच भारीतले मिळायचे.

असे असताना ती गायब झाल्यावर तो खूप दुःखी असला, तरी पोलिसात जाऊन पुन्हा शोध घ्यायच्या विरोधात का होता तेच कळत नव्हते. शिवाय तिचे प्रेम किंवा ह्या फोटोबाबत घरी कोणाला कळवायचे नाही म्हणून मला शपथ देखील घातली." एक पॉज घेऊन रिद्धी थांबली.

त्याने नकार दिला तरी मी माझ्या परीने तिचा आणि त्याआधी तुझा शोध घ्यायचे ठरवले. तुझे नाव आणि चेहऱ्याच्या मदतीने फेसबुकवर शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग अचानक आठवले की तिने डायरीत बँकेचा उल्लेख केला होता.

या आठ दिवसात शहरातील लहानमोठया सगळ्या बँका पालथ्या घातल्या. शेवटी एका बँकेत तुझा पत्ता लागला पण तू तिथला जॉब सोडल्याचे समजले. मॅनेजरपदी प्रमोशन होऊन तू आईसीआई बँकेत रुजू झाला होतास. मी मुद्दाम तिथे येऊन तुझ्याबद्दल थोडी विचारपूस केली आणि श्वेताला आवडणारा मुलगा तूच आहेस हे पटल्यावर स्वतः पोलिसांची मदत घ्यायचे ठरवले."


"ओह! अगदी छोटीशी नाजूक मुलगी वाटलीस गं तू मला. पण तू तर खूप हुशार निघालीस. स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी जे केलेस त्या बद्दल कौतुक वाटते तुझे." नील तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला.


"मला तुझं कौतुक नकोय. श्वेताला का मारलंस याचे उत्तर हवेय."


"तुझ्या त्या प्लॅनमध्ये असणारे गुंड खरोखरचे होते की इमॅजिनरी?" त्याचा तिला परत प्रश्न.


"इमॅजिनरी नाही, खरीखुरी जिवंत माणसं होती ती. तुझा सगळा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी दादाला कॉन्टॅक्ट केला. त्यांचे काय बोलणे झाले माहित नाही पण दादाने श्वेताचा शोध घेण्यासाठी आम्हाला मदत करण्याचे ठरवले. त्याने त्याच्या दोन मित्रांनासुद्धा बोलावून घेतले. त्या तिघांनी गुंड म्हणून काही दूर माझ्या पाठीमागे धावण्याची भूमिका केली होती.

कसेही करून आम्हाला आज तुझा खरा चेहरा समोर आणायचा होता. त्यामुळे पोलीस सतत तुझे लोकेशन ट्रेस करत होते. रात्री आठ वाजल्यापासून दोन तास झाले तरी तू त्या जंगलात एकाच ठिकाणी आहेस हे कळल्यावर तुला तिथेच गाठायचे ठरवले, आणि खरंच आमचा प्लॅन सक्सेस झाला.

माझ्या पायाची जखम, माझा फाटलेला ड्रेस, तुला झालेली माझी धडक हे सगळं आमच्या प्लॅनचा एक भाग होता. तुला धडकून तुझ्या घरी येणे आणि तुझ्याकडून तुझा कबुलीजबाब ऐकणे एवढीच काय ती माझी भूमिका. तू मात्र माझ्या भूमिकेला योग्य न्याय देऊन मला काळजीने घरी घेऊन आलास आणि मग मलाही ही भूमिका जगायला मजा येऊ लागली." ती स्फूट हसून म्हणाली.


"म्हणजे, या वेळी माझा निशाणा चुकीचा लागला म्हणायचा." तिला एकसारखे निरखत तो म्हणाला.

"म्हणजे?" रिद्धी.


"म्हणजे मला विक्रांतच्या बहिणीला मारायचे होते, त्याच्या खऱ्याखुऱ्या बहिणीला. पण चुकून मी श्वेताला त्याची बहीण समजलो आणि तू समोर येऊनही तुझ्याकडे दुर्लक्ष केले. शीट! तुझ्यामुळे त्या श्वेताचा नाहक बळी गेला." तो डोक्याला हात लावून बसला.


"तुला मला मारायचे होते? पण का? आणि विक्रांतदादाला तू कसा ओळखतोस?" रिद्धीच्या चेहऱ्यावर भीतीची लहर उमटली. त्याच्या जाळ्यात तिच्याऐवजी चुकीने श्वेता अडकली, हे तिच्या आकलनापलीकडे होते.


नील म्हणतोय तसे त्याला रिद्धीला मारायचे होते का? ती स्वतःहून समोर आल्यावर काय करेल तो?
वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all