Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती रात्र.. मंतरलेली. भाग -७

Read Later
ती रात्र.. मंतरलेली. भाग -७


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -सात.

मागील भागात:-
रिद्धी तिच्या मागे गुंड कसे लागलेत हे नीलला पटवून सांगते, त्याचा मात्र तिच्यावर विश्वास बसत नाही. काय असेल सत्य? वाचा या भागात.


"आता बऱ्या बोलाने हे सांगशील का, की तू कोण आहेस आणि इथे का आलीहेस? की मी इथेच तुझी तहान शमवू?"

त्याच्या हातातील चमचमणारी सूरी तिच्या गळ्यावर परत स्पर्श करायला सरसावली.

सुरीच्या स्पर्शाने तिने डोळे गच्च मिटून घेतले.
"श्वेता.. श्वेतामुळे मी इथे आलेय." लडखडणाऱ्या जिभेने ती कसेतरी बोलत होती.
"आतातरी पाणी देशील का?" तिच्या डोळ्यात याचना होती.

नीलने बाटलीत उरलेला पाण्याचा शेवटचा घोट तिच्या ओठाला लावला. त्या घोटभर पाण्याने सुद्धा तिला तृषार्त झाल्यासारखे वाटले.

"ही श्वेता मध्येच कुठून आली? मला तू कोण आहेस हे ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे." जबरी आवाजात तो पुन्हा दरडावला.

"मी रिद्धी.. रिद्धीमा जगताप. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला आहे."

"ओह! होणारी डॉक्टर आहेस म्हणजे तू, म्हणूनच माझ्यावर स्काल्पेलने वार केलास. इंटरेस्टिंग." तो ओठ रुंदावून म्हणाला.

"आता माझ्या घरात मलाच फसवून का आलीस ते सुद्धा सांग." तो.


"श्वेतामुळे. श्वेता माझी मामेबहीण. दोन वर्षांपूर्वी तिने इथे फॅशन डिझाईनिंग कोर्ससाठी ऍडमिशन घेतली. ती इथे आली म्हणून मी माझे होस्टेल सोडून तिच्यासोबत तिच्या फ्लॅटवर शिफ्ट झाले.

खूप पटायचं आमचं. बहिणी पेक्षा मैत्रिणी जास्त होतो आम्ही. सगळं शेअर करायचे मी तिच्याशी. मला वाटायचं ती सुद्धा करत असेल. पण नाही, तिने एक गोष्ट माझ्यापासून लपवली होती. तिच्या आयुष्यात एक मुलगा आहे, ज्यावर ती खूप प्रेम करते हे तिने मला कधी सांगितलेच नाही."

तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. तिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचे होते. तो मात्र भावहीन, निर्विकार चेहऱ्याने तिचे बोलणे ऐकत होता.


"दोन महिन्यांपूर्वी एका सायंकाळी ती मस्त तयार होऊन घराबाहेर पडली. जाताना खूप आनंदी होती ती. मी विचारलं देखील तिला. तर म्हणाली, 'रिद्धी तुझ्यापासून मी कधी काही लपवलंय का? परत आले की सर्वप्रथम तुलाच सांगेल. आत्ता तेवढं काही विचारू नकोस. आय प्रॉमिस.'

तिच्या वागण्याचा मला अंदाज आला होता म्हणून मी सुद्धा जास्त विचारले नाही. तसेही तिने मला स्वतःहून सांगण्याचे प्रॉमिस केले होते, त्यामुळे विचारण्याचा प्रश्न नव्हता. मात्र बाहेर गेलेली माझी बहीण अजूनपर्यंत कधी परतलीच नाही. कुठे गेली, काय झालं.. काही काहीच माहित नाही. कोणालाच."

"सो सॅड!" दुखी होत नील म्हणाला."पण तिला शोधायचे सोडून तू इथे काय करतेस?"

"कारण ती तुझ्यासोबत गेली होती याचा पुरावा आहे माझ्याजवळ." अचानक रिद्धीचा स्वर बदलला.
मघापासून बोलत असताना ती मागच्या मागे हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, त्यात ती सफल झाली होती.

विद्युलतेने उठत तिने बाजूला बसलेल्या नीलला पूऱ्या शक्तिनीशी बेडवर ढकलले आणि बेसावधपणे त्याच्या हातून खाली पडलेली सूरी हातात घेऊन तिचे टोक त्याच्या हनुवटीवर टेकवले.


"खूप शहाणा समजतोस ना स्वतःला? आता बाजू तुझ्यावर उलटली आहे. श्वेताच्या गायब होण्यानंतर आम्ही पोलीस केस केली, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आठ दिवसांपूर्वी मी माझी डायरी बघत असताना त्यात तिने रखडलेल्या ओळी मला दिसल्या. ज्यात ती तुझ्यावर प्रेम करते असं लिहिलेलं होतं आणि सोबत तुझे नावसुद्धा.

काय केलेस तू माझ्या श्वेताला?" तिच्या आवाजाची तिव्रता वाढली होती.

"तुझ्या डायरीत माझं नाव लिहिलंय म्हणजे पुरावा होत नाही ना? कुठल्या लॉजिकने तू हे बोलतेस? आणि ए बाई, जरा सांभाळून. नाहीतर खरंच तुझ्या हातून ती सूरी चालेल आणि नाजूक अशा तुझ्यावर माझ्या मर्डरची केस लागेल." उठण्याच्या प्रयत्नात तो म्हणाला.

"तसे झाले तरी मला काही फरक पडणार नाहीये. श्वेतासोबत काय घडले ते जाणून घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाही." त्याच्या छातीवर दाब देत तिने त्याचा उठण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

"रिद्धी, तू अजून लहान आहेस. या फंदात न पडलेले बरे." त्याचा स्वर अचानक कमालीचा सौम्य झाला होता.

"असं कसं फंदात पडू नको? ती मला सोडून गेल्यापासून नुसती सैरभैर झाले आहे मी. तिच्याशिवाय आयुष्य शून्य झालंय माझं.

मिस्टर नील तुम्हाला आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचे अचानक निघून जाणे याचे दुःख काय कळणार? अनाथाश्रमात वाढलेला तू, तुला रे काय नात्यांची किंमत कळणार?" त्याच्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवत ती म्हणाली तसा आंतरिक वेदनेने तो विव्हळला.


"नात्यांची किंमत ज्यांच्याजवळ नाती नसतात त्यांना जास्त असते, डॉक्टर मॅडम. तुम्हाला नाही कळणार ते." त्याच्या डोळ्यात एकाच वेळी अंगार आणि अश्रू जमा झाले होते. तिच्या हाताला झिडकारत तो उठून बसला.

"एवढं आहे तर का मारलंस श्वेताला? तिला एकटीलाच नाही तर आणखी इतर दोन मुलींचा देखील तू जीव घेतला आहेस, हे तूच मघाशी कबूल केलंस. ही मृत्यूंची शृंखला कशासाठी निर्माण केलीस? का त्या निष्पाप जीवांना आपल्या सापळ्यात ओढलेस?" त्याच्या जखमेवर मीठ चोळत तिने विचारले.

"त्या सापळ्यात आता तूही आली आहेस हे विसरू नकोस. तुला देखील त्यांच्यासारखे यमसदनी धाडायला मला वेळ लागणार नाही." तिला ढकलत त्याने सुरीवर परत त्याचा कब्जा मिळवला.

"मला मारणार आहेस तू? इम्पॉसिबल!" ती हसली. तिच्या ओठावर छद्मी हसू उमलून आले होते. जणू काही मरणाची भीती अचानक गायब होती.

"तू माझ्या केसांनाही धक्का लावणार नाहीस हे माहितीये मला. पोलीस माझ्यासोबत मिळालेले आहेत हे तुला ठाऊक आहेच. तुझ्यामुळे मला जरासे खरचटले ना, तरी तुझी अवस्था काय होईल याचा अंदाज तू लावू शकतोस.

तिथे चौकात भेटलेले पोलीस काका माझ्या प्लॅनचा हिस्सा होते हे तू बरोबर ओळखलेस. मी तुझ्यासोबत सेफ आहे की नाही हे बघायला ते तिथे उभे होते. मला काही केलेस तर तू सुद्धा वाचणार नाहीस."
त्याच्या हातून बाजूला होत ती आरामात खुर्चीवर बसली.

"इथे वाचायचे कुठे आहे मला आणि मरणाची भीती उरलीये तरी कोणाला?" तो तिच्याकडे बघून खिन्न हसला.

"आणि श्वेताला मीच मारलंय याचा ठोस पुरावा तरी कोठे आहे तुझ्याजवळ? हे जे सगळं तू लॉजिकली बोलते आहेस ना, त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पोलिसांना अशा रचलेल्या कथा नव्हे तर पुरावे हवे असतात, केवळ पुरावे."

बोलताना त्याच्या डोळ्यात अचानक अश्रू जमा झालेले बघून रिद्धीही चक्रावली.


नीलने खरंच श्वेताला मारले असेल का? आणि का मारले असेल? कळण्यासाठी, स्टे ट्यून्ड!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//