भाग -सहा.
मागील भागात :-
कपाटात शोधाशोध करताना रिद्धीला तीन मुलींचे फोटो सापडतात. त्या मुलींच्या चेहऱ्यावर फुली मारलेल्या असतात. ते बघून ती घाबरते तोच आत येऊन नील तिला सुरीच्या धाकाने खुर्चीवर बांधून ठेवतो.
कपाटात शोधाशोध करताना रिद्धीला तीन मुलींचे फोटो सापडतात. त्या मुलींच्या चेहऱ्यावर फुली मारलेल्या असतात. ते बघून ती घाबरते तोच आत येऊन नील तिला सुरीच्या धाकाने खुर्चीवर बांधून ठेवतो.
आता पुढे.
"नील, मी किती विश्वासाने तुझ्यासोबत आले होते, तू आपला वाटायला लागला होतास मला आणि तूच मला मारणार?" त्याही अवस्थेत शब्दाच्या जाळ्यात अडकवण्याचे तिचे प्रयत्न सुरु होते.
"किसको समझे हम अपना
कल का नाम है एक सपना
आज अगर तुम जिंदा हो,
तो कल के लिए..
कल के लिए माला जपना.. "
कल का नाम है एक सपना
आज अगर तुम जिंदा हो,
तो कल के लिए..
कल के लिए माला जपना.. "
तिच्यासमोर दुसऱ्या खुर्चीवर बसत तिच्या नजरेला नजर भिडवत तो गुणगुणायला लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा खुनशी भाव अधिक गहिरा झाला होता.
"माझ्यावर विश्वास ठेवून तू इथे आलीस की माझा विश्वासघात करून तुला मुद्दामहून इथे आणायला मला भाग पाडलंस?" त्याच्या नजरेतील जरब तिला हूडहुडी भरायला पुरेशी होती.
"मी का विश्वासघात करेन तुझा? याआधी मी तुला कधी भेटले सुद्धा नाहीये." तिच्या थंडगार ओठातून कसेबसे शब्द बाहेर पडत होते.
"नीट बघ माझ्याकडे, मी तुला मूर्ख वाटतोय का गं? एका निर्जन ठिकाणी तू धावत येऊन माझ्याशीच धडकतेस काय आणि मला मदतीचा हात मागून मग माझ्याच घरी येतेस. हे सगळं योगायोगाने घडायला तुला ही काय एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटतेय का?" त्याची करडी नजर तिच्यावर रुतून बसली होती.
"नील, तू विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस, पण खरंच असं घडलं होतं. त्यावेळी नेमकं काय झालं ते तुला मी सांगते. आज व्हॅलेंटाईन्स डे. प्रेमीयुगलांचा दिवस. माझी रूममेट तिच्या बॉयफ्रेंड्ससोबत फिरायला गेली होती, रात्रीची परत येणार नव्हती. मी रूमवर एकटीच होते, कारण माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. कधी या फंदात पडलेच नाही मी.
एकटी असल्यामुळे मलाही स्वयंपाकाचा कंटाळा आला होता. थोडा चेंज म्हणून आणि स्वतःला वेळ द्यावा म्हणून मी मुद्दामच शहराबाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये गेले. अनावधानाने मोबाईल रूमवरच विसरले. जेवणानंतर उशीर होतोय हे लक्षात येताच मी तिथून निघाले. कॅब बुक करायला म्हणून पर्समधून मोबाईल काढायला गेले तेव्हा माझ्या ध्यानात आले की मी चक्क मोबाईल विसरून आलेय.
वाट बघूनही रिक्षा मिळेना, तेव्हा मग मी पायीच निघाले. त्या घडीला रनिंग रिक्षा शोधण्यापलीकडे माझ्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता.
रस्त्याने चालताना सतत कोणीतरी पाठलाग करतोय असे वाटत होते. मी मनातून जराशी घाबरले होते तोच ते तिघे अचानक माझ्या समोर उभे राहिले. त्यांच्यापासून वाचायला म्हणून मी वाट मिळेल तशी पळायला लागले आणि सरळ रस्त्याने जाण्याऐवजी आडवाटेने जंगलाच्या दिशेने कशी लागले, कळलेच नाही. पुढे अचानक तुला धडकले.
तुझ्याशी बोलताना ते गुंड कुठे गायब झाले कुणास ठाऊक, पण भीती मात्र तशीच होती. तू मदत करशील असं वाटलं मला. कदाचित स्त्रियांकडे असणाऱ्या सिक्थ सेन्समुळे त्यावेळी तुझ्यासोबत असणे मला सेफ वाटले असेल. रूमवर जाऊन एकटीने राहायची हिंमत उरली नव्हती म्हणून तुझ्यासोबत तुझ्या घरी आले." ती हुंदके देऊ लागली.
रिद्धी सांगत होती तोवर नील केवळ तिच्या डोळ्यात पाहत होता. कदाचित ती किती खरे बोलते आहे याची कसोटी घेत होता तो. या वेळात त्याने पापण्यांची उघडझाप देखील केली नव्हती.
तिचे बोलणे संपले, तरी त्याने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सूरी हातात घेऊन समोर बसलेला तो, त्याच्या निडर डोळ्यातील ती घाबरेल असे भाव. त्यात इतकावेळ बोलत असताना त्याची तिच्या चेहऱ्यावरून न हललेली नजर.. तिचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता.
"पाणी.. पाणी मिळेल प्यायला?"
"पाणी हवेय? अरे विसरलोच मी. पाणी पाजण्यासारखे पुण्य नाही म्हणतात. घे की, पी मनसोक्त." तिच्यासमोर बाटली धरत नील म्हणाला.
"माझे हात बांधले आहेत, सोडतोस का प्लीज?" तिने कासावीस होत विचारले.
"नो डिअर, माझ्यावर विश्वास ठेवून आलीस ना इथवर? मग मी असताना तू तुझ्या हाताने का पाणी प्यायचे? मी पाजून देतो की. चल, आ कर बघू." तिच्या ओठाजवळ बाटली नेत तो तिच्या खुर्चीच्या हातावर बसला.
तिने थरथरलेल्या ओठांनी 'आ' केला. त्याने हळूच बाटलीचे झाकण उघडून पाण्याची धार तिच्या ओठावरून बाजूला फरशीवर उडवली.
पाण्यासाठी तिचा कासावीस झालेला जीव. खाली पाणी सांडत असताना तिच्या ओठांना झालेल्या दोनचार थेंबाचा स्पर्श, तेवढेच काय ते पाणी तिच्या वाटेला आले. खाली सांडलेल्या पाण्याकडे तडफडणाऱ्या माशाप्रमाणे ती नुसती बघत राहिली.
"शीट! किती गं पाणी वाया गेले? बाटलीत दोन घोट तेवढे उरलेत." स्वतःच्या ओठाला बाटली लावत तो म्हणाला. एक घोट घेऊन त्याने बाटली बाजूला ठेवली आणि मग तिच्या खांद्यावर हात ठेवून आरामात बसला.
"तुला काय वाटलं? तू मला काहीही ऐकवशील आणि मी विश्वास ठेवेन? तसे विश्वास ठेवावा असे क्षणभर वाटलेही मला. पण जेव्हा तू त्या पोलिसाला सांगितलेस की तू तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत लॉंग ड्राइव्ह वरून येते आहेस, तेव्हाच माझ्या ध्यानात आले की काहीतरी गोम आहे.
तुझ्या बोलण्यावर तो पोलीस विश्वास ठेवतो काय आणि आपल्याला सहज सोडून देतो काय, आश्चर्यच आहे नाही?
नवऱ्यासोबत लॉंग ड्राइव्हवरून येणाऱ्या त्या बायकोचे पायात साधी चप्पल नाहीये, पाय रक्ताने माखले आहेत आणि तिच्या अंगावरचा ड्रेसदेखील ठिकठिकाणी फाटलेला आहे हे तीक्ष्ण नजर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येऊ नये, कमालच ना?"
नील तिच्या कानात इतक्या जवळून बोलत होता की की तिच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला.
"आता बऱ्या बोलाने हे सांगशील का, की तू कोण आहेस आणि इथे का आलीहेस? की मी इथेच तुझी तहान शमवू?"
त्याच्या हातातील चमचमणारी सूरी तिच्या गळ्यावर परत स्पर्श करायला सरसावली.
नीलला वाटतेय तसे रिद्धी खोटे बोलतेय का? असे असेल तर मग काय आहे तिचे सत्य? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा