Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती रात्र.. मंतरलेली.भाग -५

Read Later
ती रात्र.. मंतरलेली.भाग -५


ती रात्र.. मंतरलेली
भाग -पाच.
मागील भागात :-

नीलने रिद्धीला झोपायला दिलेली खोली लाल फुग्यांनी सजलेली असते, ते बघून रिद्धी संभ्रमात पडते. रात्री एका भयानक स्वप्नातून जाग आल्यावर झोप येत नसल्यामुळे ती खोलीत काही शोधाशोध सुरु करते तेव्हा तिला कपाटात नववधूचा साज आणि लाल साडी दिसते.
आता पुढे.

त्या साड्यांत एक साडी जरा जास्तच भारी असलेली. लाल रंगाची, सोबत भरजरी लाल ओढणी, बांगड्या, एक छोटेसे मंगळसूत्र, काही दागिने. जणू काही होऊ घातलेल्या एखाद्या नव्या नवरीचा तो साज.
हे सगळे बघून रिद्धी चक्रावली.

'कुणासाठी हा सगळा साज शृंगार? इथे तर नीलला सोडून कोणीच राहत नाही. मग हे सगळे कोणासाठी?'


'काय आहे हे सगळं? या कपाटात आणखी काय काय दडलंय?'

एका वेगळ्याच उत्सुकतेने ती ते कपाट हुडकू लागली. नीलच्या बँकेच्या कागदपत्रांशिवाय तिच्या हाती काही लागले नाही. एक सुस्कारा सोडत तिने कपाट बंद करायचा विचार केला त्याचवेळी अचानक तिथून एक लिफाफा खाली पडला. तो उचलत असताना त्यातून काही फोटो बाहेर आले आणि तिने कुतूहलाने ते बघायला हातात घेतले.


तीन फोटो. तीन वेगवेगळ्या मुलींचे. फोटोतील मुली निराळ्या असल्या तरी तिन्ही फोटोत त्यांना जोडणारे एक साध्यर्म होते. प्रत्येक फोटोतील मुलीच्या चेहऱ्याभोवती एक वर्तुळ आखून त्यावर फुली मारली होती.


ते फोटो बघून रिद्धी पुन्हा घाबरली. कपाटात दिसलेले नववधूचे साहित्य आणि आता हे मुलींचे फोटो. तेही असे फुली मारलेले.

'म्हणजे हा नील मुलींशी लग्न करून त्यांना मारत असावा का? की आणखी काही? या मुली आहेत तरी कोण?' विचार करून डोके बधीर झाले होते. हा नील म्हणजे काहीतरी रहस्य आहे याची जाणीव तिला व्हायला लागली होती.


एक आवंढा गिळून फोटो आत ठेवताना त्यातील एका फोटोवर तिची नजर स्थिरावली आणि इतका वेळ दुर्लक्षित झालेली गोष्ट तिच्या लक्षात आली.


या फोटोतील मुलीच्या चेहऱ्यावर देखील फुली मारली होती. त्यामुळे तिला चेहरा स्पष्टपणे ओळखू आला नव्हता. पण फोटोतील ठिकाण तिला ओळखीचे वाटत होते. कालीमातेच्या मंदिराबाहेरचा तो फोटो होता.


रिद्धीच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलू लागले होते. तिने तो फोटो परत निरखून पाहिला आणि तिला त्या मुलीच्या मागच्या पायरीवर उभ्या असलेल्या दुसऱ्या मुलीचा अस्पष्ट असा चेहरा दिसला. तिच्या हृदयाची स्पंदने आता वाढीला लागली होती. कारण त्या फोटोत अस्पष्ट दिसणारी ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतः होती. फोटोतील मंदिर तिच्या गावचे होते, यात कसलाच संशय नव्हता आणि आता तिला स्वतःची ओळख देखील पटली होती.


'म्हणजे जी मुलगी समोर उभी आहे, आणि जिच्या चेहऱ्यावर फुली मारली आहे ती..? ती श्वेता आहे का?' नको तो विचार डोक्यात आला तशी ती मटकन खाली बसली.

'श्वेता? हो श्वेताच ही. नीलने काय केलेय श्वेतासोबत? आणि का? त्याने मला ओळखले असेल का? माझ्या सोबत पण तेच करायचे म्हणून मला इथे घेऊन आला असावा का?' पुन्हा भीतीने वाढलेला श्वास, पुन्हा हृदयाची वाढलेली धडधड.. कसेबसे हातातील लिफाफा कपाटात ठेवायला ती उठली.


"काय शोधते आहेस?" पाठीवर झालेला एक थंड स्पर्श आणि सोबत कानाच्या अगदी जवळून आलेला आवाज. ती घाबरून मागे वळली. समोर नील उभा होता, डोळ्यात खुनशी भाव घेऊन.


"तू.. तू आत कसा आलास?" भेदरलेल्या नजरेने तिने विचारले.

"माझ्याच घरात मी कुठेही वावरू शकतो, एवढं तरी कळते ना तुला?" तिला आपल्या जवळ ओढत तो म्हणाला.

"पाणी पिऊन परतल्यावर दाराला आतून कडी घालायला तू विसरलीस, हे आठवते का?" तिच्या चेहऱ्यावर फुंकर घालत तो छद्मी हसला.

"सोड मला." त्याला स्वतःपासून ढकलत दूर करण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.

"माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरातील वस्तुंना हात लावल्यावर मी तुला असाच सोडेन, असं गं कसं तुला वाटलं?" त्याने तिला परत स्वतःजवळ खेचले आणि दुसऱ्या हाताने तिच्या जवळील फोटो ओढून घेतले.

"अरेच्चा! म्हणजे माझ्याबद्दल तुला सगळं कळलं तर?" फोटो बघत असताना त्याच्या हाताची पकड जरा ढिली झाली आणि तीच संधी साधत तिने तिच्या ड्रेसमध्ये लपवलेल्या स्काल्पेलने त्याच्या हातावर वार केला.

"आह!" त्याच्या हाताची पकड ढिली असली तरी तिच्यावर नजर होती त्यामुळे त्याने तो वार वरच्यावर झेलला पण रक्ताची एक चिरकांडी उडालीच.

"इतके लहान हत्यार घेऊन इथे आलीहेस तू?" तिच्या हातातील स्काल्पेल खाली पाडत तो हसला. "हत्यार कशाला म्हणतात माहितीये? याला." सोबत असलेली सूरी त्याने तिच्या गळ्याजवळ नेली.

"हे हत्यार कसे चालवायचे ना, ते आता मी तुला सांगतो."

"नाहीऽऽ" तिने डोळे गच्च बंद केले.

"नील, प्लीज मला मारू नकोस. मी.. मी काहीच केलं नाही. फक्त ते भीती वाटली म्हणून स्काल्पेल हातात घेतले. प्लीज सोड ना रे." ती त्याला आर्जव करत होती.


"हातात सापडलेल्या सावजाला असा सहज कसा सोडणार?" तिला तिथल्या खुर्चीवर त्याने ढकलले आणि तिथे असलेल्या एका दोरीने तिला बांधायला सुरुवात केली.

"नील सोड मला, मी खरंच काही केलं नाही." ती गयावया करत म्हणाली.

"हे कशासाठी ते तुला कदाचित माहितीच असेल." त्याने तिच्या गालाखाली एक सनकण हाणली.

"यापुढे मला क्रॉस करण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत."

"मी तुला का क्रॉस करू? तुला तर मी ओळखत देखील नाही. तूच सांग तू आहेस तरी कोण? तुझा माझा काय संबंध?"

"मी कोण?" तो खळखळून हसला.

"मी नील. एक सीरिअल किलर. हे फोटो बघितलेस ना? ही रिंकी, ही पूजा, ही श्वेता.. तिघींनाही मी यमसदनी धाडलंय. आता पुढचा नंबर तुझा."
त्याने तिच्या गळ्यावर हातातील सूरी अलवार टेकवली.


"नील, मी किती विश्वासाने तुझ्यासोबत आले होते, तू आपला वाटायला लागला होतास मला आणि तूच मला मारणार?" त्याही अवस्थेत शब्दाच्या जाळ्यात अडकवण्याचे तिचे प्रयत्न सुरु होते.

"किसको समझे हम अपना,
कल का नाम है एक सपना
आज अगर तुम जिंदा हो,
तो कल के लिए..
कल के लिए माला जपना.. "

तिच्यासमोर दुसऱ्या खुर्चीवर बसत तिच्या नजरेला नजर भिडवत तो गुणगुणायला लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा खुनशी भाव अधिक गहरा झाला होता.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//