Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती रात्र.. मंतरलेली. भाग -४

Read Later
ती रात्र.. मंतरलेली. भाग -४
ती रात्र.. मंतरलेली.
भाग -चार.

मागील भागात :-

गुंडांपासून वाचायला म्हणून रिद्धी नील सोबत त्याच्या घरी येते. घरात कोणी स्त्री नसतानाही नीटनेटके घर बघून तिला आश्चर्य वाटते. तो तिला चेंज करायला ड्रेस देतो तर तो तिच्या मापाचा असतो. त्याचे कोडे तिला उलगडत नाही. झोपायला म्हणून बेडरूमजवळ गेल्यावर तिथला नजारा बघून ती अवाक होते.
आता पुढे -

'हॅपी व्हॅलेंटाईन्स डे!' बेडला लागून असलेल्या भिंतीवर आकर्षक रंगात लिहिले होते. खोली जागोजागी लाल रंगाच्या फुग्यांनी सजलेली होती. भिंतीवर लाल फुगे, बेडवर अंथरलेली लाल रंगाची हृदयाचे आकार कोरलेली बेडशीट, आतून येणारा गुलाबाचा मंद सुगंध!

तिच्या अंगात कापरे भरले. 'कोण आहे हा? याने ही खोली का सजवलीय? आणि तिथे मला का पाठवतोय?'

आत जायचे सोडून ती त्याच्याकडे आली. कानात हेडफोन घालून डोळे मिटलेल्या त्याला तिची चाहूल लागली नाही. तिचा आवाजदेखील कानात आला नाही. तो काही बोलत नाही बघून तिने त्याचा हेडफोन मोबाईलपासून वेगळा केला.

'गुमनाम है कोई
बदनाम है कोई..'

मोबाईलच्या स्पीकर मोडवर येत असलेला गाण्याचा आवाज आणि डोळे उघडले तर हातात मेणबत्ती घेतलेली, केस मोकळे सोडलेली, पांढऱ्या अनारकलीतील ती. नील छातीवर हात ठेवून उठून बसला.

"काय गं मला घाबरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहेस का?" तिला तसे बघून क्षणभर घाबरला तो.


"जस्ट शट अप. ही असली गाणी मला आवडत नाही. आणि तू मला काय समजलास रे? मदत हवी म्हणून मी तुझ्यासोबत आलेय तर तू मला चक्क त्या कॅटेगरीची समजलास काय?" चेहऱ्यावर भीतीपेक्षा राग उमटला होता.

तो तिच्याकडे नुसता पाहत राहिला, ती काय बोलतेय त्यापेक्षा कशी बोलतेय, मेणबत्तीच्या प्रकाशत उजळून दिसणारे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव.. सगळं निरखत होता तो.

रिद्धीने त्याचा हात पकडला आणि त्याला बेडरूमसमोर उभे केले.

"काय आहे हे? हे असलं सगळं सजवून या खोलीत का पाठवलेस मला? मी तुला तशी मुलगी वाटले?"

"तुला मी आधीच सांगितलंय की माझ्या घरात माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही. तू कशी मुलगी आहेस ते मला माहित नाही, पण तुलामी तसला मुलगा दिसतोय का?" तिचा हात झिडकारत तो.

"इथे झोपायचे असेल तर झोप नाहीतर जा उडत." तिच्या बोलण्याने त्यालाही राग आला होता.

त्याचा तो अविर्भाव पाहून ती गुमान आत गेली. धाडकन दरवाजा बंद करून तिने एक लांब श्वास घेतला.

'..किसको खबर
कौन है वो
अनजान है कोई..'
बाहेर त्याच्या मोबाईलवरचे गाणे ऐकू येत होते.

मेणबत्ती टेबलवर ठेवून तिने बेडवर अंग टाकले. मऊशार गादीचा स्पर्श होताच तिच्या शीणलेल्या शरीराने मनातील भीतीवर मात करून निद्रेदेवीला जवळ केले.

किर्रर्र अंधार, घनदाट झाडी आणि मागे धावणारे तीन गुंड. त्यांच्या हातातील चकाकणारा सुरा आणि समोर \"वाचवा\" म्हणून ओरडत पळणारी ती. तेवढ्यात त्यातील एकाने तिचा हात पकडला आणि दुसरा सुऱ्याने वार करणार तोच रिद्धी उठून बसली.


झोपेच्या आधीन होत नाही तोच भयंकर अशा स्वप्नाने तिला जाग आली होती. स्वप्न कुठे, काही वेळापूर्वी हेच तर तिच्यासोबत घडणार होते. ते तीन गुंड खरेच तिच्या मागे लागले होते. वाटेत नील भेटला नसता तर आत्ता पडलेल्या स्वप्नाप्रमाणे ती सूरी नक्कीच तिच्या गळ्यावरून फिरली असती.


लांब श्वास घेत तिने डोळे उघडले. खोलीत आता उजेड पसरला होता. कदाचित लाईट आले असावेत.

"पाणी.." घशाला कोरड पडली होती आणि तिचा आवाज जणू घशात अडकला होता.

आजूबाजूला कुठेच पाणी दिसले नाही. ती हळूच खाली उतरली. खोलीबाहेर जायचे त्राण उरले नव्हते तरी पाण्यासाठी तिने हलकेच दरवाजा उघडला. हॉलमध्ये नजर फिरवली तर नील सोफ्यावर झोपला होता. कानात हेडफोन तसेच. त्याला बघून तिला थोडा धीर आला.

स्वयंपाकघरात जाऊन ती घटाघटा पाणी प्यायली आणि परत खोलीत येऊन बेडवर बसली. पाय लटपट कापत होते. लाईट बंद करून झोपण्याची हिंमत होत नव्हती.
छातीवर हात ठेवून तिने पुन्हा लांब लांब श्वास घ्यायला सुरुवात केली.

'काम डाऊन रिद्धी. ऑल इज वेल, ऑल इज वेल.' स्वतःला सामान्य स्थितीत आणण्याचे तिचे प्रयत्न चालू होते.

पाच एक मिनिटात तिला थोडे बरे वाटू लागले. डोळ्यावरची झोप मात्र उडाली होती.

डोळे उघडून तिचे खोलीचे निरीक्षण करणे चालले होते. ही खोलीदेखील हॉलसारखीच होती, नीटनेटकी. उलट आणखी जास्त आवरलेली.

'भिंतीवरचे व्हॅलेंटाईन्स डे चे डेकोरेशन त्यानेच केले का? आणि का केले असेल? कोण आहे त्याची व्हॅलेंटाईन? त्याची कोणी गर्लफ्रेंड असावी का?

छे! तो तर म्हणाला होता की तो सिंगल आहे. मग आजच्या दिवशी एखाद्या मुलीला इथे आणून त्याला हा दिवस साजरा करायचा होता का?' तिच्या मनात असंख्य प्रश्नांची शृंखला निर्माण झाली.

'नाही. तसा नाहीये तो, नाहीतर माझ्याशी इतका चांगला का वागला असता? मनात आणले असते तर कदाचित माझा फायदा देखील घेऊ शकला असता. पण त्याने माझ्याकडे त्या नजरेने साधे पाहिलेसुद्धा नाही.' त्याचा करारी चेहरा नजरेसमोर आणत ती स्वतःशी बोलत होती.

'हा नील म्हणजे एक गहण कोडं आहे. जितके त्याचा विचार करतेय, त्यात गुंतल्यासारखे होत आहे.' ती विचार करत येरझारा घालायला लागली.

तिथल्या तिथे फिरता फिरता तिची नजर कपाटाकडे गेली. मनात एक विचार घेऊन तिने ते कपाट उघडले. त्या कपाटात आणखी काही ड्रेसेस होते, कदाचित तिच्याच मापाचे असलेले. सोबत तीन चार साड्यादेखील.

त्या साड्यांत एक साडी जरा जास्तच भारी असलेली. लाल रंगाची, सोबत भरजरी लाल ओढणी, बांगड्या, एक छोटेसे मंगळसूत्र, काही दागिने. जणू काही होऊ घातलेल्या एखाद्या नव्या नवरीचा तो साज.
हे सगळे बघून रिद्धी चक्रावली.

'कुणासाठी हा सगळा साज शृंगार? इथे तर नीलला सोडून कोणीच राहत नाही. मग हे सगळे कोणासाठी?'


रिद्धीला पडलेला प्रश्न तुम्हालाही पडलाय ना?
उत्तर मिळण्यासाठी स्टे ट्यून्ड!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//