ती रात्र.. मंतरलेली. भाग -३

एका मंतरलेल्या रात्रीची कथा


ती रात्र.. मंतरलेली.
भाग - तीन

मागील भागात :-

गुंडापासून पासून वाचायला पळणारी रिद्धी नीलला आदळते. तो तिला त्याच्या घरी घेऊन येतो. त्याच्या घरात तो एकटाच राहतो हे कळल्यावर त्याच्यासोबत एकटीने रात्र काढायची या भीतीने ती घाबरते.

आता पुढे.

"तुझ्या सासूबाई इथे राहत नाहीत, आणि मी सिंगल आहे हे मघाशी बोललो ना तुला?" तिच्याकडे एक विखारी कटाक्ष टाकत तो म्हणाला.

त्या नजरेने ती पुरती घाबरली. एवढ्या मोठया फ्लॅटमध्ये त्याच्यासोबत रात्रीची ती एकटीच, ही कल्पना तिला करवत नव्हती. भीतीने श्वास पुन्हा वाढू लागला होता.

"इथे बैस." हॉलमधील बल्ब चालू करत तो म्हणाला.

स्वतःला सावरत ती सोफ्यावर बसली. नील आत जाऊन काहीतरी शोधत होता.

तो आत गेल्यावर भिरभीरणाऱ्या नजरेने तिने आजूबाजूला पाहिले. सुसज्ज आणि नेटनेटका हॉल. एकदम व्यवस्थित आवरलेला. या घरात एखादी स्त्री राहत नसावी याची पुसटशी कल्पनाही कोणी केली नसती, इतकी स्वच्छता. हॉलच्या मधोमध झुलत असलेला झुंबर, खाली सुंदरसा गालिचा अंथरलेला. मन एकदम प्रसन्न व्हावे अशा रंगाने भिंती रंगवलेल्या.

थोडया वेळापूर्वी मनात दाटलेली भीती अचानक गायब झाली आणि चेहऱ्यावर प्रसन्नतेचे हसू उमटले. अवघडून बसलेली ती आता मस्त सोफ्याला रेलून बसली.

"आह!" पायांच्या बोटांना काहीतरी चुरूचरू झोंबले तसे वेदनेने तिने पायाकडे पाहिले. नील तिच्या जखमी बोटांना डेटॉल लावून स्वच्छ करत होता.

"काय करतोस? तू डॉक्टर आहेस का? असं जखमेवर डायरेक्ट कोणी डेटॉल ओततं का?" पाय बाजूला घेत ती म्हणाली.

आत्ता कुठे चेहरा हसरा झाला होता, आता परत त्यावर वेदना उमटली होती.

"ए, आवाज खाली करून बोलायचं. हे माझं घर आहे. तुला त्रास होतोय म्हणून मी मदत करायला गेलो, तर उलट माझ्यावरच ओरडतेस? तू तरी डॉक्टर आहेस का?" डोळ्यात खुन्नस घेऊन तिच्याकडे बघत तो म्हणाला.

"हो, आहे मी डॉक्टर. मला माहिती आहे जखम कशी स्वच्छ करायची ते." रिद्धी त्याला अकड दाखवत म्हणाली.

"बाथरूम कुठे आहे ते कळेल का मला? आधी पाण्याने पाय धुते." ती डेटॉलची बॉटल हातात घेत उठली.

नीलने तिला बोटानेच बाथरूमकडे इशारा केला. "बोर्डवरची डावी बटण गिझरची आहे. गरम पाणी घे, बरं वाटेल." त्याच्या स्वरात जरब असली तरी तिला त्यात काळजी जाणवली.

काही न बोलता ती बाथरूमकडे गेली. गुंडापासून वाचायला ती कुठवर धावली होती कुणास ठाऊक? गरम पाणी बघून आपले पाय जास्तच दुखताहेत हे तिला जाणवायला लागले आणि बादलीभर गरम पाण्यात ती पाय बुडवून बसली. पायांना कसे एकदम रिलॅक्स वाटत होते.

"ठक ठक.." पाचएक मिनिटे झाली असावीत तोच दारावर आवाज आला आणि ती दचकली.

"रिद्धी,तुझ्यासाठी ड्रेस आणलाय, तो चेंज करून घे."

त्याच्या आवाजाने तिने स्वतःकडे पाहिले. तिच्या अंगावरचा ड्रेस दोन तीन ठिकाणी फाटला होता. तिच्या तर हे लक्षात देखील आले नव्हते आणि त्याच्या नजरेने मात्र लगेच हेरले होते.

तिने दरवाजा उघडला. मान खाली घालून त्याच्याकडून कपडे घेतले आणि लगेच दरवाजा बंद करून टाकला. जर तो जबरदस्तीने आत आला तर?

गरम पाणी, दुसरे कपडे.. सगळे बघून तिला आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. तसेही अंगात शीण होताच, आंघोळीने तिला बरे वाटले असते.

पांढऱ्या रंगाचा एक सुंदर अनारकली ड्रेस. त्यावर सोनेरी बुट्यांची डिझाईन आणि गडद लाल अशी किनार. ड्रेस बघून तिला आनंद झाला. शुभ्र रंग म्हणजे तिचा 'ऑल टाइम फेवरेट कलर' होता. ड्रेस अंगात अगदी व्यवस्थित बसला, जणू काय मुद्दाम तिच्या मापाचा घेतला असावा.

'मी याच्यासोबत येणार आहे हे याला ठाऊक होते का? माझ्या मागावर आहे का हा? की त्या गुंडासोबत हा मिळालेला असेल? अगदी परफेक्ट फिटिंगचा ड्रेस याच्याकडे कसा आला?'


मनात धुमाकूळ घालणाऱ्या प्रश्नांनी तिच्या घशाला कोरड पडली. पुढे काय वाढून ठेवले आहे याचा विचार करत थरथरत्या हाताने दाराची कडी काढायला जाणार तोच अचानक बाथरूममध्ये अंधार पसरला.

"आँऽऽ.." तिची किंकाळी बाहेर आली.

"दरवाजा उघड. मी आहे इथे." नील दारावर थाप देत होता.

"मला अंधाराची भीती वाटते. ती आतून स्फुन्दत म्हणाली.

"अगं लाईट गेलेत. येतील काही वेळाने. बाहेर ये."

तिने हिंमत करून दरवाजा उघडला आणि पुन्हा एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. तो अगदी दारासमोर मेणबत्ती घेऊन उभा होता.

"तुला घाबरण्या -ओरडण्या शिवाय काहीच येत नाही का गं?" तिचा जाणारा तोल सावरत त्याने तिला स्वतःकडे खेचले.

एका हातात मेणबत्ती, दुसऱ्या हातात ती. तिच्या केसातून निथळणारे पाण्याचे थेंब, डोळ्यातील भेदरेलेले भाव. भीतीने हलणारे ओठ अन हनुवटीवरचा तो तीळ.. मेणबत्तीच्या उजेडात तिचे सौंदर्य आणखीनच बहरून आले होते. तो एकटक तिच्याकडे पाहत होता आणि तिसुद्धा. तिचे श्वास वाढले होते.

"असे हातात पकडून मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. स्वतःच्या पायाने चालत आलीस तर बरं होईल."

त्याच्या नजरेत हळूहळू तिला हरवायला होत असतनाच त्याने तिला सरळ उभी करत आपला हात काढून घेतला आणि हॉलमधल्या टेबलवर मेणबत्ती ठेवून सोफ्यावरचा टॉवेल तिच्याकडे फेकला.

"केस पुसून घे नाहीतर थंडी बाधेल." सोफ्यावर पाय पसरून बसत तो.

ती त्याच्याकडे बघत केस पुसत होती.

"तुला काही खायचंय?" त्याच्या प्रश्नावर तिने नकारार्थी मान हलवली.

"मग आतल्या रूममध्ये जाऊन झोपू शकतेस." कानात हेडफोन घालून त्याने डोळे मिटले.

त्याच्याशी बोलण्यात काही अर्थच नव्हता. ती आत जायला निघाली. कधी सकाळ होते आणि कधी इथून बाहेर पडते असे तिला झाले होते. मोठ्या हिमतीने तिने टेबलवरची मेणबत्ती हातात घेऊन ती खोलीच्या दिशेने पाय टाकले.

आत गेले की दरवाजा गच्च बंद करून टाकायचा आणि सकाळ झाल्याशिवाय उघडायचे नाही हे एव्हाना तिने डोक्याला पटवून दिले होते. पण मेंदूचे म्हणणे हृदय प्रत्येकवेळी कुठे ऐकत असते?

तिने खोलीचे दार उघडले आणि आतील नजारा अवाक होऊन पाहतच राहिली.


काय होते त्या खोलीत असे? वाचा पुढील भागात
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.

🎭 Series Post

View all