भाग दोन.
"माणुसकीच्या नात्याने? आणि ओळख नाही असं का म्हणतोस? एखाद्याला ओळखायला एक क्षणही पुरेसा असतो. एवढया वेळापासून आपण सोबत आहोत पण तू कणभरही माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. तुला ओळखायला हे पुरेसं नाहीये का?" अश्रू पुसत ती म्हणाली आणि त्याने करकचून ब्रेक दाबला.
"काय झाले?" रिद्धीच्या मनात परत भीती दाटली.
"प..प..पोलीस." क्षणात त्याचे हृदय जोराने धडधडायला लागले.
"तू पोलिसांना घाबरतोस?" रिद्धीच्या चेहऱ्यावरची भीतीची लहर गायब होऊन हास्याची झालर उमटली.
"नाकाच्या रेषेसमोर चालणारी साधी सरळ माणसे पोलिसांना घाबरतात." तो.
"मी आहे ना, डोन्ट वरी. फक्त मी जे बोलेल त्याला हो ला हो कर." इतकावेळ स्वतः घाबरलेली ती आता त्याला धीर देत होती.
तिचा आत्मविश्वास बघून त्याची भीड जरा चेपली. खरं तर तिच्या ओठावरच्या हास्यानेच त्याला हायसे वाटले होते.
"बाहेर या." कारच्या खिडकीच्या काचावर टकटक करत करड्या आवाजात पोलीसाची हाक कानावर येताच दोघे बाहेर आले.
"काय मिस्टर? एवढया रात्रीचे कुठून येताय?" रिद्धीमाच्या शरीरावरून एक नजर फिरवत त्याने विचारले.
"बाहेरून. हॉटेलिंग केलीय आणि आता मस्त लॉंग ड्राइव्ह करून येतो आहोत." तो काही बोलेल त्यापूर्वी रिद्धीमा स्मित करून उत्तरली.
"मी प्रश्न तुम्हाला नाही, यांना विचारला."
"त्यांची बायको या नात्याने मी उत्तर देतेय." ती म्हणाली तसे बाजूला उभ्या असलेल्या त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. ती असे काही बोलेल हे त्याला अनपेक्षित होते.
"बायको? अंगावर तर लग्नाची एकही लक्षण दिसत नाहीयेत." पोलीस.
"हा मोबाईल घ्या आणि आमच्या घरी फोन करून विचारा. माझ्या सासूबाईंशी बोललात की आपोआप खात्री पटेल. बरोबर ना नील?" त्याच्या खिशातून मोबाईल काढून पोलिसाच्या हाती देत ती म्हणाली.
"हो, अगदी बरोबर." आतापर्यंत गप्प असलेला तो तिच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला. मनात थोडा अस्वस्थ झाला होता पण ते त्याने चेहऱ्यावर येऊ दिले नाही.
त्या पोलिसालकाकांना काय वाटले कुणास ठाऊक? त्यांनी तो मोबाईल तिच्या हातात परत दिला.
"ठीक आहे, जा तुम्ही. आजचा दिवस चांगला नाही म्हणून तुम्हाला अडवले. कोण खरं बोलतोय, फोन खोटं यावर विश्वास ठेवायला कधीकधी आम्हा पोलिसांना देखील कठीण जाते."
"थँक्यू काका आणि कोण म्हणतंय आजचा दिवस चांगला नाहीये? आज तर प्रेमाचा दिवस आहे. घरी जाताना तुमच्या बायकोसाठी एखादे गुलाबाचे फुल घेऊन जा. ती खूश होईल. हो ना रे नील?" शेवटचे वाक्य बोलताना तिने मुद्दामच त्याचा हात हातात घेतला.
"ऑफकोर्स. शेवटी बायकांना खूश राहायला काय लागतं? नवऱ्याचे प्रेमच ना?" तिला जवळ घेत तो.
"बरं, जाऊयात आपण. सासूबाई वाट बघत असतील. थँक यू काका. गुडनाईट." त्या पोलिसाला विश करत ती आत येऊन बसली त्याबरोबर नीलसुद्धा सुद्धा आत आला.
*****
"कोण आहेस तू? आणि काय गं, तुला माझं नाव कसं माहिती?" थोडे अंतर पार झाल्यावर त्याने कारला पुन्हा ब्रेक लावत विचारले.
"तुला माझ्यावर संशय येतोय?" रिद्धीच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.
"हे बघ, तुझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर 'स्वप्नील' असे तुझे नाव लिहिले आहे. त्या पोलीस काकाच्या हातात मोबाईल देताना मला ते दिसले आणि मग मी तुला मुद्दाम प्रेमाने 'नील' बोलले, यात माझी काय चूक?
आपल्याला पोलिसांनी काही उलटे सुलटे प्रश्न विचारू नयेत म्हणून मी हे सगळं बोलले. तुझा अजूनही विश्वास नसेल तर मी उतरते इथेच आणि तू मला केलेल्या मदतीबद्दल थँक यू सो मच." रडतच तिने दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली.
"रिद्धी, रिद्धी आय एम रिअली सॉरी. माझ्या ते लक्षातच आले नाही. चल बस कारमध्ये."
"नाही नको. तुला परत काहीतरी गैरसमज व्हायचा आणि मग तू पुन्हा मला ओरडशील. त्यापेक्षा मी एकटी जाईन इथून."
"तू असं काहीही करणार नाहीस, चल बस लवकर." तो कार सुरु करत म्हणाला. त्याच्या धारदार आवाजापुढे माघार घेत ती आत येऊन बसली.
"मी स्वप्नील मोरे, वय वर्ष तीस. आईसीआई बँकेच्या शाखेत नुकताच मॅनेजर पदावर बढती होऊन आलोय. सिंगल आहे. घरी एकटाच असतो. बरोबरीला तुझ्या सासूबाई वगैरे कोणीच नाहीत." नाकाच्या सरळ रेषेत कार चालवत तो गंभीर आवाजात बोलत होता.
"सॉरी. तेव्हा जे सुचलं ते बोलून गेले." ती ओशाळून म्हणाली. गस्तीवर असलेल्या पोलिसांपुढे तिने दोनदा 'सासूबाई' हा शब्दप्रयोग केल्याचे आठवले.
"उतरा." तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता एका पॉश बिल्डिंगच्या पार्किंग एरियात कार पार्क करून तो म्हणाला.
"घर आलंय." ती तशीच मठ्ठ बसून होती तेव्हा पुन्हा वरचा स्वर लावून तो बोलला त्यावर ती पटकन बाहेर आली.
ती त्याच्या मागोमाग चालली होती. चालताना पायांना त्रास होत होता.
"आह!" वेदनेने कळवळली ती. त्या आवाजाने त्याचे लक्ष तिच्या पायाकडे गेले.
तिच्या पायात सॅन्डल, शूज काहीच नव्हते. अंगठ्याच्या बाजूला सुकलेल्या रक्ताचे डाग तेवढे त्याला स्पष्ट दिसत होते.
तिचा हात पकडून स्वप्नील तिला लिफ्टपर्यंत घेऊन गेला. लिफ्टने दोघे वरती आले.
तिचा हात पकडून स्वप्नील तिला लिफ्टपर्यंत घेऊन गेला. लिफ्टने दोघे वरती आले.
'आठवा मजला.' मनातल्या मनात रिद्धीने ते पाठ केले. मुद्दामच त्याला बटण दाबताना तिने बघितले होते.
"हा माझा फ्लॅट. आत ये." लॅच उघडत तो.
"घरी कुणीच नसतं का?" धास्तीने तिने विचारले.
"तुझ्या सासूबाई इथे राहत नाहीत, आणि मी सिंगल आहे हे मघाशी बोललो ना तुला?" तिच्याकडे एक विखारी कटाक्ष टाकत तो म्हणाला.
त्या नजरेने ती पुरती घाबरली. एवढ्या मोठया फ्लॅटमध्ये त्याच्यासोबत रात्रीची ती एकटीच, ही कल्पना तिला करवत नव्हती. भीतीने श्वास पुन्हा वाढू लागला होता.
काय होईल पुढे? रिद्धी ठीक राहील ना? वाचा पुढच्या भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा