ती रात्र.. मंतरलेली. भाग -१

रिद्धीला कुठे घेऊन जाईल मंतरलेल्या रात्रीचा प्रवास?
ती रात्र.. मंतरलेली.
भाग एक.

"हेऽऽल्प, प्लीऽऽजऽऽ" त्या किर्रर्र अंधारात ती धापा टाकत होती.

रस्ता तसा आडवळणाचा, मुख्य वाटेपासून कुठेतरी आत वळलेला. समोर दाट वनराजी. या अंधारात कुठून प्रकाशाचा एखादा किरण मिळेल या आशेने ती पाय नेतील तिकडे धावत होती.

जीव वाचवण्याची धडपड.. सगळं संपत आल्याची चाहूल.. अन त्यात जीवाच्या आकांताने फुटलेला तिचा आवाज. तो आवाजही आता विरत चालला होता. तिच्या पायातील त्राण गळत आले होते.

कशीबशी एकेक पाऊल उचलत ती समोर जात होती. पायातील वहाणा केव्हाच साथ सोडून गेलेल्या. वाटेतील एक दोनदा दगडांना ठेचकाळून पाय रक्ताने माखलेले.

पुढे गेल्यावर त्या अंधारात समोर तिला एका पुरुषी आकृतीचा भास झाला. कदाचित भासच तो, कदाचित सत्यही. काही मदत मिळेल या आशेने त्याही अवस्थेत ओठावर हास्य उमटले. रक्ताळलेल्या पायांना ओढत ती कसेबसे त्या आकृतीपर्यंत पोहचली आणि आदळली त्याला. म्हणजे तिचा भास नव्हता तो. खरेच तिथे कोणीतरी होते.


"प्लीज मला मदत करा. मी खूप मोठ्या संकटात आहे." पाठमोऱ्या त्याचा हात पकडण्याच्या प्रयत्न करत तिने याचना केली.

तिच्या स्पर्शाने अन हतबल आवाजाने पाठमोरा तो तिच्याकडे वळला. तिचा तोल जाईल तोच त्याने तिला सावरले.

"कोण आहेस तू?" त्याच्या गंभीर स्वराला काळजीची किनार उमटली.

"रिद्धी.. रिद्धीमा.." तिचे वाढलेले श्वास आता आत अडकत चालले होते.

"ते गुंड.. माझ्या पाठीशी लागलेत. म्हणून मी पळतेय. प्लीज मला मदत..." बोलता बोलता तिचा श्वास थांबला आणि त्याच्या हातातच ती कोसळली.

"हेय, हॅलो. रिद्धी, रिद्धीमा, कोण गुंड? कुठे आहेत?" त्याने परत काळजीने विचारले.

ती मात्र काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्याने तिच्या नाकाजवळ हात नेला आणि सुटकेचा निःश्वास सोडला. तिचा प्रतिसाद नसला तरी श्वास सुरु होता. त्याने तिला आपल्या हातात उचलून घेतले आणि बाजुला उभ्या असलेल्या त्याच्या कारचा दरवाजा उघडून कसेबसे आत बसवले.


कारमध्ये सुरु केलेल्या लाईटच्या हलक्या प्रकाशात त्याने तिच्याकडे निरखून पाहिले. जवळपास वीस-बावीस वर्षांची ती तरुणी. अगदीच गोरीपान नसली तरी गव्हाळ वर्णाची ती. कोरीव भुवया, डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या, टोकदार नाक, हनुवटीवर छोटासा तीळ. चेहऱ्यावर भीती आणि धावल्यामुळे घामाचे थेंब जमा झालेले. अन त्या घामेजलेल्या चेहऱ्यावर विखूरलेल्या केसांच्या एकदोन बटा चिकटलेल्या.

तिचे ते रूप बघून त्याच्या काळजात काहीतरी रुतल्यासारखं वाटले.

"ए, रिद्धी, वेक अप." जवळ असलेल्या बाटलीतील पाण्याचे शिंतोडे तिच्या चेहऱ्यावर उडवत तो म्हणाला.

पाण्याच्या माऱ्याने तिचे डोळे उघडले खरे, चेहऱ्यावरची भीती कायम होती.

"प्लीज मला सोडून जाऊ नकोस. ते गुंड माझं काहीतरी बरंवाईट करतील. मला खूप भीती वाटतेय." तिने त्याचा हात घट्ट पकडला.

"रिलॅक्स मी आहे ना आता? तुला काहीही होणार नाही. मात्र त्याआधी आपल्याला इथून निघावे लागेल, ओके? धीर धर. घाबरू नकोस."
त्याच्या आश्वासक शब्दांनी रिद्धी थोडी सावरली. भीती मात्र तशीच.

"मी तुझा हात पकडून बसले तर चालेल ना तुला?" श्वासाची लय नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत ती.

"अगं, हात पकडशील तर मी ड्राइव्ह कसा करणार ना?" तिच्या प्रश्नावर त्याला हसू आले.

"हं? मग मी दंड पकडते." असं म्हणून लागलीच त्याच्या दंडावर तिने पकड घट्ट केली.

तिच्या घामेजलेल्या हाताचा तो ओलसर स्पर्श. त्या स्पर्शात काहीतरी वेगळेपण होते. आधाराची गरज, की हक्क? की विश्वास की आणखीनच काहीतरी वेगळे? त्याला काय वाटले कुणास ठाऊक, त्यानेही आपल्या दुसऱ्या हाताने तिच्या हातावर हलकेच थाप दिली आणि मग कार चालवायला सुरुवात केली.


कार मुख्य रस्त्याला लागेपर्यंत कोणीच कोणाशी बोलले नाही. आत एसीचा थंड वारा आणि एक निरव शांतता. बस्स! आणखी काही नाही. तिची भिरभिरणारी नजर मात्र रस्ताभर इकडेतिकडे फिरत होती, न जानो ते गुंड परत समोर आले तर?

"रिद्धी, आपण शहरामध्ये प्रवेश करत आहोत. आता तू माझा दंड सोडू शकतेस." तो म्हणाला तसे तिने ओशाळून चटकन आपले हात बाजूला केले.

"सॉरी माझ्या लक्षात आले नाही." चेहऱ्यावरच्या केसांना बाजूला करत ती म्हणाली.

"इट्स ओके. तुला कुठे सोडू ते सांग म्हणजे मग मी घरी जायला मोकळा." समोर बघतच तो म्हणाला.

क्षणभर ती काहीच बोलली नाही हे बघून त्याने तिच्याकडे नजर टाकली. तिच्या टपोऱ्या डोळ्यातून दोन मोती घरंगळत गालावर आले होते.

"काय झाले? तू का रडते आहेस?" त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

"तू मला असा सोडून जाऊ नकोस ना. सध्यातरी माझे जवळचे असे कोणीच नाहीये. त्यात ते गुंड मागे लागलेत. प्लीज मला आजची रात्र तुझ्या घरी येऊ देशील? सकाळ झाली की माझी मी निघून जाईन." तिचा चेहरा दीनवाणा झाला होता.

"अगं पण असं काही ओळख नसताना तुला माझ्यासोबत कसे घेऊन जाऊ?" तो.

"माणुसकीच्या नात्याने? आणि ओळख नाही असं का म्हणतोस? एखाद्याला ओळखायला एक क्षणही पुरेसा असतो. एवढया वेळापासून आपण सोबत आहोत पण तू कणभरही माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाहीस तुला ओळखायला हे पुरेसं नाहीये का?" अश्रू पुसत ती म्हणाली आणि त्याने करकचून ब्रेक दाबला.

"काय झाले?" रिद्धीच्या मनात परत भीती दाटली.

"प..प..पोलीस." क्षणात त्याचे हृदय जोराने धडधडायला लागले.

कोण आहे ही रिद्धी? का तिच्या मागे गुंड लागलेत? आणि 'तो' तरी कोण आहे? पोलिसांना बघून तो का घाबरलाय? ती त्याला जाळ्यात अडकवू पाहतेय की तोच तिला गळाला लावतोय?
अनेक प्रश्नांची शृंखला निर्माण करणारा हा भाग. पुढे हळूहळू उकल होईलच. स्टे ट्यून्ड!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.

🎭 Series Post

View all