ती रात्र.. मंतरलेली. भाग -१७

उलगडेल का त्या मंतरलेल्या रात्रीचे रहस्य?
ती रात्र.. मंतरलेली.
भाग -सतरा.

मागील भागात:-
रिद्धीला वाचवायला म्हणून विक्रांत, रिधान आणि अर्णव आत येतात. ते त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देतात.
आता पुढे.

"पोलीस तपासात श्वेताचा काही शोध लागला नाही. तेव्हा तिच्यासोबत काय झाले असावे याचा आम्हाला अंदाज आला होता." विक्रांत पुढे बोलू लागला.

"त्या मुलाने तुझ्या ऐवजी श्वेताला आपल्या ताब्यात घेतले याचे दुःख करायचे की तू सहीसलामत आहेस याचा आनंद मानायचा हेच कळत नव्हते.

आणि मागच्या आठवड्यात तुला श्वेताचा एका मुलासोबत असलेला फोटो, तिच्या प्रेमाची कबुली असलेले लिखाण दिसले. तू पोलिसात जाऊया म्हणून मला म्हणालीस. तेव्हा खूप घाबरलो होतो मी. तू समोर आलीस तर तो तुलाही सोडणार नाही याची जाणीव मला झाली. मी रिधान आणि अर्णवला याबद्दल सांगितले. आमच्या हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे आधीच तीघीजणींचे काय झाले हे कळले नव्हते त्यात पुन्हा तुझा नंबर लागला असता.


हे चक्र कुठेतरी थांबायला हवे होते. आज बहिण, उद्या पुन्हा घरातील इतर मंडळी.. नुसत्या विचारानेच थरकाप उडाला. आम्ही दोन दिवसापूर्वी आम्ही एकमताने पोलिसात जाऊन गुन्हा कबूल करायचे ठरवले.


आमच्या बहिणींचे नेमके काय झाले हे आम्हाला जाणून घ्यायचे होते. म्हणून पोलिसांनी आमची कोठडी दोन दिवसासाठी रद्द करून त्यांच्या प्लॅनमध्ये आम्हाला सहभागी करुन घेतले.


ज्या ठिकाणी नील होता त्या ठिकाणी तुझ्यामागे गुंड बनून लागण्याचे आम्ही नाटक केले. पुढे सगळे काही प्लॅननुसार घडले. तू नीलसोबत इथे आलीस आणि श्वेता, पूजा आणि रिंकीच्या गायब होण्यामागचे रहस्य उलगडले."
विक्रांतबरोबर रिधान आणि अर्णवच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत होते.

त्या अश्रूमध्ये पश्चाताप होता, गुन्ह्याची कबुली होती आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना गमवाण्याचे दुःखही होते. नीलला हेच तर हवे होते.


"आता जे सांगायचे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर सांगा. हवालदार यांना घेऊन चला." हेड कॉन्स्टेबलने इशारा करताच हवालदार आदेश पाळण्यासाठी समोर आला.


"एक मिनिट अंकल." इतका वेळ विक्रांतचे बोलणे ऐकत असलेली रिद्धी पुढे सरसावली.


"या तिघांना तर त्यांच्या गुन्ह्याची सजा मिळेलच पण याचे काय? याने तर तीन निरपराध मुलींचा जीव घेतला आहे मग यालाही शिक्षा व्हायला हवी ना?" नीलकडे बघत रिद्धी म्हणाली. मघाच्या त्याच्या वागण्याने ती मनातून अजूनही घाबरली होती.


"शिक्षा ही केवळ गुन्हेगाराला होत असते आणि नील गुन्हेगार नाहीये." प्रवेशद्वाराजवळून एक करारी आवाज कानावर आला तसे सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या.

खुद्द इन्स्पेक्टर अमृता दारात उभी होती.

"जयहिंद मॅडम." हवालदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला अभिवादन केले.


"जयहिंद." त्याच करारी आवाजात उत्तर देत ती आत आली. विक्रांत, रिधान आणि अर्णववर तिची करडी नजर फिरताच ते तिघे लज्जेने मान खाली घालून उभे राहिले.

"असे कसे मॅडम? याने तीन मुलींचा खून केलाय. स्वतःच त्याचा गुन्हा सुद्धा त्याने कबूल केला आहे. तुमचा विश्वास नसेल तर हे घ्या. यात सगळं रेकार्ड होत आहे ते चेक करा." तिच्या ड्रेसच्या आतल्या बाजूला लावलेला छुपा कॅमेरा काढून अमृताच्या हाती देत रिद्धी म्हणाली.

"मला माहितीये सगळं. या चार भिंतीच्या आत तुझ्यात आणि नीलमध्ये काय बोलणे सुरु होते हे या तिघांसह आम्ही सगळ्यांनी ऐकले आहे. तेव्हाच तर नील तुझ्याशी काही बरेवाईट करेल या भीतीने कसला विचार न करता हे तिघे आत आले." अमृता तिच्याकडे बघून स्मित करत म्हणाली.

"मॅडम, याने श्वेता, रिंकी आणि पूजाचा बळी दिलाय हे का कळत नाहीये तुम्हाला?" रिद्धी रडवेली झाली होती.


"रिद्धी, प्रत्येकवेळी आपण जे ऐकतो, अनुभवतो ते खरे असतेच असं नाही. तुझ्याबाबतीत देखील तेच झाले आहे."

"म्हणजे?"

"म्हणजे आता सगळ्या रहस्यावरून पडदा उघडण्याची वेळ आली आहे." अमृता तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

ती काय बोलतेय हे रिद्धीच्या डोक्यावरून जात होते.

"श्वेताऽऽ कम इनसाईड." रिद्धीचा गोंधळ ओळखून दरवाज्याकडे बघत अमृताने आवाज दिला. तिच्या आवाजाने श्वेता आत आली आणि तिच्या पाठोपाठ रिंकी आणि पूजादेखील.


"श्वेता? तू.. तू जिवंत आहेस?" रिद्धी धावत जाऊन तिला बिलगली. तिच्या चेहऱ्यावरून ती सारखी हात फिरवत रडत होती.


"पूजा, रिंकी.. तुम्ही देखील ठीक आहात?" आश्चर्य, आनंद. सगळ्या भावना तिच्या चेहऱ्यावर पसरल्या होत्या. त्या दोघींना तिने मिठी मारली.


"रिद्धी शांत हो अगं. आम्ही अगदी ठीक आहोत. आम्हाला काहीही झाले नाहीये." श्वेता तिला कुरवाळत म्हणाली.

"मी किती घाबरले होते माहित आहे का? या नीलने मला काही केले असते तर?" तिच्या मिठीत घट्ट शिरत ती म्हणाली.

"प्रत्येक पुरुष हा विक्रांतदादा किंवा त्याच्या मित्रासारखा ना? जिच्यावर प्रेम केले त्या स्वप्नाला सुद्धा नीलने तिच्या इच्छेविरुद्ध कधी स्पर्श केला नव्हता तो तुला कशी काय इजा करणार?

तो तुझ्याशी जे वागत होता ते सगळं खोटं होतं, तू घाबरायला हवीस आणि हे तिघे इथे यायला हवेत यासाठी." तिच्या डोक्यावरून हात फिरवत श्वेता विक्रांत आणि त्याच्या मित्रांकडे बघून म्हणाली.


"याने तुला त्याच्या जाळ्यात फसवले आणि तरी तू त्याच्या बाजूने बोलते आहेस?" रिद्धीच्या डोळ्यात अजूनही पाणी होते.


"नाही गं राणी. हे जाळे याने एकट्याने नव्हे तर आम्ही दोघांनी मिळून विणले होते आणि यात आम्हाला साथ लाभली होती, ती इन्स्पेक्टर अमृता मॅडम यांची."

ती काय बोलतेय याचा अजूनही रिद्धीला मेळ लागत नव्हता. तिथे उपस्थित असलेले हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार देखील श्वेताकडे आश्चर्याने पाहत होते. हे कोणते जाळे होते ज्याची त्यांनाही कल्पना नव्हती.

तुम्हालाही हा प्रश्न पडलाय ना? उत्तर वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.

🎭 Series Post

View all