Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती रात्र.. मंतरलेली. भाग-१५

Read Later
ती रात्र.. मंतरलेली. भाग-१५

ती रात्र.. मंतरलेली.
भाग -पंधरा.

मागील भागात :-

स्वप्नाच्या अशा अघटित मृत्यूमुळे नील पूर्णपणे खचलेला असताना एक दिवस एक तरुण त्याच्या बँकेत येतो. त्याच्या आवाजावरून त्या रात्रीच्या तीन तरुणांपैकी हा एक आहे हे तो ओळखतो.
आता पुढे.


"चान्सच नाही. तो चेहरा, तो आवाज माझ्या डोक्यात इतका घट्ट रुतून बसलाय की गैरसमजाला तिथे थाराच उरत नाही. त्या तिघातील एक म्हणजे विक्रांत होता हे शंभर टक्के खरे होते."

"मग तू पोलिसात जायचे होते ना."

"पोलीस? छ्या! हा डाव आता मला माझ्या पद्धतीने खेळायचा होता. त्यासाठी मी प्लॅन आखायला सुरुवात केली होती."

"कोणता प्लॅन?"

"बँकेच्या फॉर्ममध्ये श्वेताची सर्व माहिती भरलेली होती. त्यावरून तो तरुण कोण आहे हे जाणून घ्यायचे होते. मी तिचे फेसबुक अकॉउंट सहज शोधले आणि त्यातून त्याची माहिती मिळाली.

विक्रांत जगताप! श्वेताचा दादा. त्याच्या अकॉउंट वरून त्याच्या मित्रांना देखील शोधणं सहज शक्य झाले. वर्षभरापूर्वीचा व्हॅलेंटाईन्स डेचा त्या त्रिकुटाचा फोटो एकमेकांना टॅग करून त्यांनी सोशल मीडिया वर टाकला होता. त्याची मी फोटोकॉपी काढून ठेवली."
तिच्यापुढे त्यांचा फोटो ठेवत नील म्हणाला.


"रिधान. श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद. पोरींना छेडणे त्याचा छंदच होता. त्याच्या जोडीने विक्रांत आणि अर्णव देखील त्यात सामिल झाले. अर्णव खेड्यातील गडी. रिधानच्या शान शौकतीला भुलून त्याचे अनुकरण करायला त्याला आवडे. स्वतः अभ्यास करून परीक्षेत रिधानला मदत करायची आणि त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे उकळायचे. त्याचे साधे सोपे गणित होते.

विक्रांत कॉलेज शिकायला म्हणून इथे आला आणि या दोघांच्या संगतीत तोही बिघडला. हुशार असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्याचा काहीच लॉस झाला नव्हता. तिघेही इंजिनियर झाले होते. कोणी पैशाच्या जोरावर तर कोणी हुशारीच्या.

आता तिघेही एकत्र नसले तरी अंगात खुमखूमी आली की एकमेकांना भेटायला नेहमी तयार असत. तसेच ते तीन वर्षांपूर्वी देखील भेटले होते.

त्या तिघांबद्दल सगळी माहिती माझ्याकडे उपलब्ध होती पण आता मला ते तिघेही नको होते."

लिफाफ्यात तो फोटो परत व्यवस्थित ठेवत त्याने त्यावरून हात फिरवला.


"का?" तिच्या डोळ्यात पाणी जमा होत होते.


"या तिघांना मी टार्गेट केले असते तर मला मनस्तापाशिवाय काहीच मिळाले नसते. पैशाच्या जोरावर ते काहीही विकत घेऊ शकले असते. अगदी पोलीस आणि कायदासुद्धा.


म्हणून मग मी दुसऱ्या वाटेने जायचे ठरवले. त्यांचा वीक पॉईंट शोधून काढला आणि कधी नव्हे ते दैवाने मला इथे साथ दिली. तीन मित्र, त्यांच्या सवयी सारख्या आणि त्यांचा वीकपॉईंट देखील एकच. त्यांच्या बहिणी.


बाहेरच्या मुलींशी कसेही वागले तरी त्यांचे स्वतःच्या बहिणीवर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे मी या नात्यावर घाला घालायचे ठरवले. ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता ती कायमची दुरावली तर किती यातना होतात हे मला दाखवून द्यायचे होते. दुसऱ्यांच्या मुलींना खेळणे समजून खेळताना स्वतःच्या बहिणीशी कोणी तसेच खेळले तर तो त्रास काय असतो ते जाणवून द्यायचे होते.

सगळ्यात पहिले मी पूजाला जाळ्यात ओढले. पूजा.. अर्णवची बहीण. तिलाही त्याच्यासारखीच पैश्यांची ओढ. दोन तीन महागडे गिफ्ट्स आणि प्रेमाचे नाटक. माझ्या फाशात अडकायला तिला फारसा वेळ लागला नाही.

वर्षभरापूर्वी याच प्रेमदिनी तिला आमच्या प्रेमाची शपथ घालून इथे बोलावून घेतले. ती देखील वेडीच. एका सोन्याच्या चैनचे आमिष काय दाखवले, घरच्यांना सोडून माझ्याकडे पळत आली.

तिला बिचारीला तरी काय ठाऊक? इथे आल्यावर ती कधीच परत जाऊ शकणार नाही ते? एका शिकाऱ्याच्या हाताला लागलेले सावज तो सहजासहजी सोडेल का?"

रिद्धीकडे बघून त्याने त्याच्या ओठावरून जीभ फिरवली तसा तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.


"नंतर नंबर होता रिंकीचा. रिधानची नाजूक बहीण रिंकी. आलिशान आयुष्य जगत असलेल्या रिंकीला पैशांची भुरळ कधीच नव्हती. पैशाने श्रीमंत असली तरी डोक्याने जरा मंद होती. तिच्यापुढे एकदोनदा बिचारा गरीब मुलगा म्हणून काय गेलो, तिला माझ्याबद्दल फारच कणव वाटायला लागली.

ती कणव प्रेमात बदलण्यासाठी मला फारशी मेहनत करावी लागली नाही. दोन महिन्यातच ती माझ्या साझ्यात आली. तिच्यासाठी दोनचार कविता लिहिल्या की पोरगी जे म्हणेन ते करायला तयार.

माझ्याकडे कायमची येताना एक छदामही सोबतीला आणू नकोस म्हणून सांगितले. तर तिला वाटले, हेच ते खरे प्रेम ज्याच्या शोधात ती आजवर होती. अंगावरच्या कपड्यानिशी ती माझ्यासोबत यायला एका पायावर तयार झाली.


तिच्या नाजूक मानेवरून सूरी चालवताना कसली भारी फीलिंग मला आली होती म्हणून सांगू?" डोळ्यात विखारी भाव घेऊन त्याने रिद्धीकडे नजर टाकली.


"शेवटचा मासा म्हणजे श्वेता! तिच्यामुळे मी या सर्वांना हेरू शकलो, त्यामुळे तिचा नंबर मी शेवटी टाकला. खरंतर सुरुवातीला जरा गोंधळ उडाला होता. विक्रांतच्या रक्ताच्या बहिणीला जाळ्यात ओढावं की त्याचा जीव की प्राण असलेल्या त्याच्या मामेबहिणीला?" तिच्याकडे त्याने कटाक्ष टाकला तशी रिद्धी पुरती हादरली.


"म्हणजे? तू मला आपण भेटण्यापूर्वी पासून ओळखत होतास?" तिने थरथरत विचारले.


"येस माय डिअर." तिच्या गालावरून त्याने अलवार बोट फिरवले.


"तू सोशल मीडियावर नसलीस म्हणून काय झाले? श्वेताच्या अकाउंटवरून कित्येकदा मी तुला भेटून आलोय." त्याचे हसणे तिला भीतीदायक वाटू लागले.


"एक सांगू? तशी तू काही फारशी मला आवडली नाहीस. श्वेतामध्ये जे होतं ते तुझ्यात नाहीये. तिच्यातला तो स्पार्क, इंटलीजन्सी.. आय लाईक द्याट! तिच्याकडे मी खेचला जात होतो. तीही माझ्याकडे आकर्षित होत होती. अर्णवच्या पूजासारखी ती श्रीमंतीकडे धावणारी नव्हती की रिधानच्या रिंकीसारखी ती मंद बुद्धीची देखील नव्हती.

या खेळात तिला डील करताना मला जाम मजा आली. खरंच! कोणत्याही खेळात बरोबरीचा खेळाडू असेल तर तो खेळ मस्त रंगतो. हा खेळ तर प्रेमाचा होता. माझ्या प्रेमात पडायला त्या दोघींपेक्षा वेळ लागला खरा, पण नंतर ती माझ्यासाठी पार वेडी झाली.

तब्बल चार महिने घेतल्यानंतर आत्ता कुठे दोन महिन्यापूर्वी ती माझ्या हाती लागली. प्रेमलीलेत रंगवत असताना जेव्हा तिला तिच्याच रक्ताच्या रंगात रंगविले ना, तेव्हा तुझी शपथ, एक असुरी आनंद मला झाला होता."

रिद्धीच्या ओठावरून बोट फिरवत तो म्हणाला तेव्हा तोच असुरी आनंद त्याच्या डोळ्यात झळकत होता.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.

*****

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//