Login

ती रात्र.. मंतरलेली. भाग -१३

काय असेल त्या मंतरलेल्या रात्रीचे रहस्य?


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -तेरा.

मागील भागात :-

दोन वर्षांच्या विरहानंतर भेटलेले स्वप्ना आणि नील तो दिवस एकत्र घालवतात. रात्री डिनरनंतर लॉंग ड्राईव्ह वर गेलेले दोघे उद्याच्या स्वप्नात मग्न असतात.

आता पुढे.

'नील फक्त आजची रात्र, त्यानंतर उद्यापासून आपण दोघं कायम सोबत असू.' असे म्हणत अनपेक्षितपणे तिने माझ्या ओठावर तिचे ओठ टेकवले.

त्या मखमली ओठांचा पहिल्यांदा झालेला तो स्पर्श!
माझ्या ओठावर तिच्या ओठांची अलगद मोहर उमटली, तोच एक प्रकाशझोत तिच्या चेहऱ्यावर पडला आणि आम्ही बाजूला झालो."


"तेवढ्या रात्री तिथे कोण आले होते?" रिद्धीने भीतभीत विचारले. बऱ्याच वेळानंतर तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले होते.

"बाईकच्या हेडलाईटचा तो प्रकाश होता." तो पुढे बोलू लागला.

"त्या प्रकाशामुळे आम्ही बाजूला झालो. तसेही आता आम्हाला निघायचे होते. दहा वाजत आले होते. होस्टेल वरून स्पेशल परमिशन घेऊन स्वप्ना इतकावेळ बाहेर होती पण आता तिला सोडून देणे आवश्यक होते.


एकापाठोपाठ दोन बाईक आमच्या नजरेसमोरून पुढे गेल्या. परतीच्या प्रवासाला म्हणून मी माझी बाईक पलटवत होतो तोच ते बाईकस्वार आमच्या जवळ येऊन थांबले. थांबले म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला घेरले. त्यांची घाणेरडी नजर स्वप्नाच्या शरीरावर स्थिरावली होती.

'ओये लैला मजनू, जंगल में मंगल मना रहे हो?'

'जरा हमे भी तो चान्स मारने दो..'

त्यांचा गलिच्छ आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. एकाचा हात स्वप्नाच्या ओढणीकडे सरसावत होता तसे मी पुढे येत त्याच्या कानशिलात लगावली. ती माझी होणारी बायको आहे आणि तिच्यापासून दूर राहायचं हे सांगत असतानाच एकाने माझ्यावर मागून हल्ला केला.

'नीलऽऽ' स्वप्नाच्या किंकाळीचा अस्पष्ट आवाज माझ्या कानापर्यंत पोहचत नाही तोच मी ग्लानी येऊन खाली पडलो.


शुद्ध आली तेव्हा क्षणभर मला काहीच आठवले नाही आणि मग स्वप्नाचा विचार येताच तसाच धडपडत तिचा शोध घेऊ लागलो. एका झाडामागे माझी स्वप्ना निपचित पडली होती. तिच्या अंगावरचे कपडे ठीकठिकाणी फाटले होते. तिच्यासोबत काय घडले असावे याची मला कल्पनाही करवत नव्हती.


मी तिला आवाज दिला, कसेबसे उठवून बाईकवर बसवले. तिच्या ओढणीने तिला माझ्या पाठीशी बांधून घेत हॉस्पिटल गाठले.

तिथे गेल्यावर पोलीस केस, त्यांचे उलटे सुलटे प्रश्न. उपचाराला प्रतिसाद न देणारे स्वप्नाचे निपचित पडलेले शरीर.. नुसता सैरभैर झालो होतो मी.

काही वेळाने पंधरा तारखेची सकाळ उजाडली. त्या दिवाशी आम्ही लग्नगाठ बांधणार होतो. त्याच दिवशी शेवटचा श्वास घेऊन माझी स्वप्ना मला कायमची सोडून गेली."

बोलता बोलता थांबला तो. त्याचे शब्द जड झाले होते. गळ्यात उमाळा दाटून आला होता. त्याच्या हातावर झालेल्या टपोऱ्या थेंबाच्या स्पर्शाने त्याने बाजूला पाहिले. रिद्धीच्या डोळ्यातून अश्रुंची धार लागली होती.


"तू का रडतेहेस? मला असल्या सहानुभूतीची गरज नाहीये गं." तो घसा खाखरत म्हणाला.


"आय एम सॉरी नील. स्वप्नाबद्दल काय झाले होते हे खरंच मला ठाऊक नव्हते." रिद्धीने तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. तिच्या हुंदक्याच्या आवाजाने त्याच्याही गालावर दोन थेंब येऊन विसावले.


"नील, तू पोलीस कंम्प्लेंट करायला हवी होतीस ना? स्वप्नाबद्दल जे घडले ते वाईट होते पण तिला न्याय मिळवून देणे तुझे काम होते." अश्रू पुसत ती म्हणाली.


"तुला काय वाटते, मी हे केले नसेल? तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो तेव्हाच ती पोलीस केस झाली होती. त्यांच्या प्रश्नांच्या माऱ्याने मी वैतागून गेलो होतो. मुख्य बाब बाजूलाच राहिली आणि नाही नाही त्या गोष्टींना सामोरे जावे लागले. माझ्या स्वप्नाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडत होते आणि मी केवळ हतबल झालो होतो.

हिंमत करून मी तिच्या घरी हे कळवले. त्यांची प्रतिक्रिया मात्र अगदी थंड होती. ज्या दिवशी तिने माझ्यासाठी घर सोडले त्याच दिवशी त्यांनी तिला त्यांच्या मनातून काढून टाकले. त्यांच्यासाठी ती केव्हाची हे जग सोडून गेली होती. आणि आता तिच्यासोबत नाव जोडून त्यांना त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगायची नव्हती."

"स्वतःच्या मुलीबद्दल ही भावना? त्यांनी किमान एकदा तरी तुझी बाजू ऐकून घ्यायला हवी होती."


"त्यांनी तिला त्यांच्या जगातून वजा केले होते, आता त्यांना परत बदनामी नको होती.

केसमध्ये दम नाही म्हणून पोलिसांनी ते प्रकरण बंद करायचे ठरवले. स्वप्ना 'त्या' कॅटेगरीची मुलगी असेल म्हणून तितक्या रात्री ती बाहेर जंगलासारख्या एरियात गेली असावी, नाहीतर सभ्य लोक तिकडे का जातील? असा सवाल त्यांनी मला केला. कदाचित मीच तिला फसवून तिथे आणले असेल आणि तिच्याशी वाईट कृत्य केले असेल हा कयास देखील त्यांनी बांधला.

स्वप्ना आणि माझ्यावर नको ते आरोप झाले. रागाच्या भरात तेथील इन्स्पेक्टरच्या अंगावर मी हात टाकला आणि परिणामी मला जेलमध्ये जावे लागले. ज्यांच्यामुळे हे झाले ते समाजात उघड्या कपाळाने फिरत होते आणि न्यायासाठी धडपडणारा मी आतमध्ये सडत होतो.

बाहेर आलो तेव्हा माझे जग बदलले होते. मरणाला जवळ करावे असे वाटत होते. तसे जगायचे तरी कोणासाठी होते? प्रेमाची पाखरण करणाऱ्या एकमेव व्यक्तीला मी कायमचे गमवून बसलो होतो. माझी अवस्था वेड्यागत झाली होती. फक्त आत्महत्या करावी वाटत होती. वैफल्याने मला ग्रासले होते."

"नील?" रिद्धीने त्याच्या हातावर हात ठेवला. त्याच्या बोलण्याने तिचे अंतर्मन ढवळून निघाले होते.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all