ती रात्र.. मंतरलेली. भाग -११.

काय असेल त्या मंतरलेल्या रात्रीचे रहस्य?


ती रात्र.. मंतरलेली.
भाग -अकरा.

मागील भागात :-
नील रिद्धीला स्वप्नाबद्दल सांगत असतो. स्वप्नाचे वडील तिला फसवून तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत करायचे ठरवतात. स्वप्ना मात्र भर मंडपात लग्नाला नकार देते.

आता पुढे.


"थँक गॉड! तिने नकार दिला ते बरेच झाले. आपल्या प्रेमाला सोडून ती दुसऱ्या मुलाबरोबर कशी राहू शकली असती ना?" एक सुस्कारा सोडून रिद्धी म्हणाली.

तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून नीलच्या ओठावर पुसट हसू उमटले. त्या हास्यात मात्र केवळ एक विषण्णता झळकत होती.


"तुला सांगू रिद्धी, आता असे वाटते तिने नकार द्यायला नको होता गं. जगात ती कुठेही असती तरी ती आहे या एका गोष्टीचा मला आनंद तरी असता ना?"


"म्हणजे ती या जगात नाहीये? म्हणजे ती नाहीच आहे का? माय गॉड! तिच्या वडिलांनी ऑनर किलिंग सारखा काही प्रकार तर केला नाही ना?" विचारताना रिद्धीच्या आवाजात कंप निर्माण झाला होता.

"ऑनर किलिंग.. स्वतःच्या पोटच्या गोळ्याची हत्या! नाही गं. तशी त्यांना गरजच पडली नाही. भर मांडवात तिने लग्नाला नकार दिला आणि त्याचवेळी त्यांनी तिच्याशी नाते तोडले. तिचा आणि त्यांचा काही संबंध उरला नाही हे जाहीर करून टाकले. ही एक हत्याच होती ना गं? एकमेकांप्रती असलेल्या भावनांची हत्या. त्या घरात तिच्यासाठी कोणतेच स्थान उरले नव्हते. असे होणार हे तिला ठाऊक असावे कदाचित, म्हणून त्या गोष्टीचा जास्त बाऊ न करता तिने आपले सामान पॅक केलेली बॅग घेतली आणि तो मंडप सोडला.


एक रात्र तिच्या मैत्रिणीकडे घालवून स्वप्ना इथे आली, याच शहरात. आठवड्याभरानंतर स्वतःसाठी एक छोटेखानी नोकरी आणि होस्टेलची व्यवस्था झाल्यावर तिने मला हे सर्व कळवले. त्यापूर्वी मी या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होतो. मला त्रास होऊ नये म्हणून तिने आधी सांगायचे टाळले होते."


"मग तुला कळल्यावर काय केलेस तू? तिला लगेच तुझ्याकडे घेऊन यायचे होतेस ना?" रिद्धी अगदी त्याच्या मनातील बोलत होती.


"हो, तेच करायचे होते मला. जिच्यासोबत अख्खे आयुष्य घालवायचे होते ती या अवस्थेत असताना तिच्यापासून मी कसे वेगळे राहू शकणार होतो?" बेडवरून उठत नील म्हणाला.

"वेडी होती स्वप्ना. आणि तिच्या प्रेमात मीही तिच्याइतकाच वेडा होतो. मी तिला घ्यायला येणार हे कळताच तिने मला आमच्या वचनाची आठवण करून दिली. तिच्या वडिलांनी तिचा विश्वास तोडला असला तरी त्यांना दिलेले वचन तिला मोडायचे नव्हते. वचन पूर्ततेसाठी आणखी चार महिन्यांचा अवधी शिल्लक होता. हे चार महिने एकमेकांना भेटायचे नाही याची शपथ तिने मला घातली.

तिला वचन मोडायचे नव्हते आणि मला तिचे मन. दिड वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही एकमेकांपासून दूर होतो. आणखी हे चार महिने सही. त्यानंतर मात्र क्षणभर देखील मी तिला स्वतःपासून दूर करणार नव्हतो. तिला रडत रडत फोनवर मी हे ठणकावून सांगितले होते. तेव्हा किती हसली होती ती. एक पुरुष असून मी रडतोय याचे तिला हसू आले होते.

तीच मला म्हणाली, 'नील तुला काय, मलाही तुझ्यापासून दूर रहायचे नाहीये. चार महिने संपले की मी तुझ्याजवळ असेन, कायमस्वरूपी. केवळ तुझी स्वप्ना बनून.'

ती इथे आल्यापासून दिवसातून रोज आम्ही फोनवर बोलायचो. त्या बोलण्याची, तिच्या आवाजाची, तिच्या रागवण्याची, तिच्या हसण्याची जणू सवयच झाली होती मला. आम्ही शरीराने वेगळे असलो तरी मनाने केव्हाचेच एकत्र आलो होतो."

"इंटरेस्टिंग." तो बोलत असताना रिद्धी मध्येच म्हणाली आणि नीलची नजर आठवून जीभ चावली. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे बोलायला लागला.

"सारे काही सुरळीत चालले होते. फक्त हे दिवस सरण्याची आम्हाला वाट होती आणि तेही संपत आले होते.

चौदा फेब्रुवारी.. व्हॅलेंटाईन्स डे! प्रेमाचा दिवस, प्रेमी युगलांचा दिवस. माझ्या व्हॅलेंटाईनला इथे घेऊन येण्यासाठी मी हाच दिवस निवडला होता. त्या दिवशी तिला दिलेले वचन संपणार होते आणि त्याच दिवशी सरळ कोर्टात जाऊन लग्नगाठ बांधून तिला माझी अर्धांगिनी बनवून या आमच्या घरात आम्ही जोडीने प्रवेश करणार होतो. मात्र स्वप्नाने याला सरळ नकार दिला."

"का?" रिद्धी अधीरतेने म्हणाली.

"दोन वर्षांच्या विरहानंतरचा तो आमचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे होता ना, म्हणून. वेडीच होती ती. लग्नापूर्वीचा शेवटचा प्रेमादिवस म्हणून तिला हा दिवस अगदी यादगार करायचा होता. त्यामुळे मग लग्नाचा मुहूर्त आम्ही एक दिवसाने पुढे ढकलला.

आयुष्यात एवढं भरभरून प्रेम करणारी ती एकटीच तर होती. तिचे म्हणणे मी कसे डावलणार होतो?" त्याच्या प्रेयसीच्या आठवणीने नीलचे डोळे भरून आले.


बोलायचे थांबून त्याने रिद्धीचा हात घट्ट पकडला. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती कावरीबावरी झाली. त्याच्या तर हे गावीही नव्हते. यावेळी मनात फक्त आणि फक्त त्याची स्वप्ना होती.

रिद्धी काही बोलणार तोच नील तिला खेचून कपाटासमोर घेऊन गेला. तिला काही कळायच्या आत तिचा हात सोडून त्याने ते कपाट उघडले.

"हे ड्रेसेस, या साड्या.. बघितल्यास?" तिच्याकडे पाहून तो म्हणाला.

"माझ्या होणाऱ्या बायकोसाठी खरेदी केल्या होत्या. ही लाल साडी, ही लाल ओढणी, या बांगड्या, हे दागिने आणि हे मंगळसूत्र.." बोलता बोलता त्याचा स्वर पुन्हा भिजला.

"स्वप्नाला यातलं काहीच माहिती नव्हतं. जेव्हा तिला चौदा तारखेला मी इथे घेऊन आलो, तेव्हा हे सगळं बघून ती चकित झाली होती. ही ओढणी तिच्या डोक्यावर मी ओढून बघितली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पसरलेला लालिमा आणि इतक्या दिवसाच्या विरहानंतर दाटून आलेले हळवेपण दोन्ही भावना एकत्र येऊन ती माझ्या मिठीत विसावली.

माझ्या मिठीत. तिच्या नीलच्या मिठीत. विश्वासाने. आपला आपल्या प्रेमावर किती विश्वास असतो ना? माझ्यासाठी ती तिचे घरदार, आईवडील सर्वांना सोडून आली होती. त्या विश्वासाला, तिच्या प्रेमाला मला तडा जाऊ द्यायचा नव्हता. डोळे मिटून मी तिच्या मऊशार केसात हात फिरवत राहिलो. आमच्या भावानांना एकमेकांप्रती पोहचायला शब्दांची गरज उरली नव्हती.

थोड्यावेळाने माझा खांदा ओला झाल्याचे मला जाणवले, म्हणून मी तिचा चेहरा वर करून पाहिले. तिचे काळेभोर डोळे अश्रुंनी काठोकाठ भरलेले होते."


"इतके प्रेम करणारा प्रियकर जवळ असताना तिच्या डोळ्यात पाणी का आले?" गोंधळून रिद्धीने विचारले.


तुम्हालाही पडलाय ना प्रश्न? उत्तर जाणून घ्यायला वाचा पुढील भाग.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all