ती नवऱ्याने टाकलेली. भाग -१

खरंच घटस्फोटीत स्त्री असणे चुकीचे असते का?
ती.. नवऱ्याने टाकलेली!
भाग -१.

"तिच्याकडे बघितलंस? कशी नटून आली आहे?"

"हो ना. मेकअप काय? दागिने काय? अगदी तोऱ्यातच दिसतेय."

"ब्लॉऊज बघितला? स्लीव्हलेस! शोभतं का या वयात?"

"कसलीतरी नोकरी करते असं ऐकलंय."

"या वयात? कठीण आहे बाबा."

" पण आहे कोण ही?" पुन्हा एकीची चर्चेत उडी.

"साळवेंची दामिनी हो."

"अच्छा! म्हणजे तीच का?"

"हो तीच. नवऱ्यानं टाकली तरी बाईचा तोरा काही कमी होत नाही हो."

एकमेकींना टाळी देत त्यांच्या हास्याची कारंजी उडू लागली.


एका लग्नसमारंभातला हा संवाद. चार बाया एकत्र आल्या की त्यांच्यात दुसऱ्याच एका स्त्री बद्दल किती आणि काय बोलू असं होऊन जातं. आज या बायकांना आयतीच संधी चालून आली, कारणही खास होतं.. दामिनी. वय वर्षे पन्नास! या वयात ती एवढं नटून लग्नाला आली हेच त्यांच्या दृष्टीने काहीतरी वेगळे होते.

त्यांचा संवाद दामिनीच्या कानावर नको म्हणत असतानाही पडलाच. त्यातही ते 'नवऱ्याने टाकलेली' हा शब्दप्रयोग तिला नाही म्हटलं तरी खटकलाच. आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नव्हता.


"माझ्याचबद्दल बोलताय ना?" न राहवून त्यांच्याकडे जात ती म्हणाली. तशा त्या बायका जरा चपापल्या. तिला आवाज गेला होता तरी ती अशी डायरेक्ट येऊन बोलेल असं कुणाला वाटलं नव्हतं.


"ते हे.. आम्ही अशाच बोलत होतो." पहिली कशीबशी सावरत म्हणाली.

दामिनी तिच्याकडे बघून तुच्छतेने हसली.

"ए, हसतेस काय गं? आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललो. काय करशील तू?" दुसरीत अजून जोश होताच.


"तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोललात पण जिच्याबद्दल बोललात तिला काय वाटलं असेल याचा विचार तुमच्यापैकी एकीच्या तरी मनात डोकावला का?" दामिनी.

"मग असं वागायचंच कशाला? हे असं नटणं, मुरडणं शोभतं का तुम्हाला?" एकमेकांना साथ देण्यास त्या कुठेच कमी पडत नव्हत्या.


दामिनी त्यांच्यातच खुर्ची ओढून बसली.

"हो. शोभतं मला. येतांना आरसा बघूनच तर मी आले. ही साडी, हे दागिने, ह्या बांगडया.. सारं सारं काही शोभते मला. मेकअप सुद्धा मी बऱ्यापैकी करते."
तिने एक पॉज घेतला.

"नवरा सोबत नाही म्हणून मी नटू नये असा काही नियम आहे का?"

तिच्या प्रश्नाने बाकीच्या बायकांचा चेहरा खर्रकन उतरला.
त्या तिला काही उत्तर देणार का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
******

🎭 Series Post

View all