ती कुठे काय करते?

Home Is Only Building Of Four Walls Without Woman

ती कुठे काय करते?


पाटील काकूंचे पहिले पुण्यस्मरण होते, त्यानिमित्ताने त्यांचे सर्व आप्तस्वकीय जमले होते. पाटील काकूंचा स्वभाव मनमिळाऊ, सतत सर्वांची मदत करणारा होता, कोणाच्याही छोट्यात छोट्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची त्यांची सवय होती. पाटील काकूंच्या घरुन कोणीही जेवण न करता जात नव्हते. 

पाटील काकूंच्या ह्याच स्वभावामुळे आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला खूप गर्दी झाली होती. जमलेल्या प्रत्येकाच्या डोळयात पाणी तरळत होते. पाटील काकूंची सर्वांना आठवण येत होती. पाटील काकूंचे दोन्ही मुलं, सुना, मुलगी, जावई, नात नातू कार्यक्रमाला हजर होते. आपल्या आईच्या हसऱ्या फोटोकडे बघून तिन्ही मुलांच्या डोळयात अश्रू आले होते.

एका महाराजांचे प्रवचन झाले, त्यांनी प्रवचनात घरातील बाईचे महत्त्व पटवून सांगितले. एका बाईमुळे त्या घराचे घरपण कसे टिकून राहते, याबद्दल महाराजांनी सांगितले.


कुमारिका असते तेव्हा

संस्कृतीचा वारसा जपते

उंबरठा ओलांडून सासरचा

आई बाबांचे नाव राखते

सासर माहेर दोन्हीकडून

मिळते शिदोरी प्रेमाने

दोन्ही घराचे घरपण

राखून ठेवते आदराने

महाराजांचं प्रवचन झाल्यावर नातेवाईकांपैकी काही जणांनी पाटील काकू कश्या होत्या? हे सांगून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शेवटचे एक महाशय काकूंना श्रद्धांजली वाहत असताना पाटील काका आपल्या जागेवरुन उठून स्टेजच्या दिशेने गेले. पाटील काकांना स्टेजकडे जाताना बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. 

पाटील काका स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन म्हणाले,

"आज तुम्ही सर्वजण आमच्या दुःखात सहभागी झालात, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुम्ही सगळेजण विचार करत असाल की स्टेजवर बोलायला का आलो असेल? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मी इथे येऊन बोललेलं पटणार नाही, पण आज जर मी काहीच बोललो नाहीतर मी सतत मनात कुढत राहील. गेल्या वर्षापासून माझ्या मनात जे साचलं आहे, ते मला एकदाचं बोलून टाकायचं आहे. माझं मन मोकळं करायचं आहे."

पाटील काकांना त्यांच्या मुलाने स्टेजवर बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. पाटील काका खुर्चीवर बसले आणि हातात माईक घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. जमलेले सर्वजण पाटील काकांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष देऊन बसले होते.


पाटील काका म्हणाले,

"आज सुलभाला जाऊन एक वर्ष झालं आहे. सुलभा असताना मला तिचं महत्त्व कधीच कळालं नाही. सुलभाने एका अर्धांगिनीच, बायकोचं, जोडीदाराचं कर्तव्य पुरेपूर निभावलं, पण मी एका नवऱ्याचं कर्तव्य कधीच निभावलं नाही, कारण एका नवऱ्याचं कर्तव्य काय असतं? हेच मला ठाऊक नव्हतं. इथं बरेच जण असतील ज्यांना नवऱ्याचं खरं कर्तव्य माहीत नसेल, बरोबर ना?

माझं मनोगत ऐकल्यावर तुमच्यापैकी काही जणांनी जरी नवऱ्याचं खरं कर्तव्य निभावलं, तर सुलभा मला माफ करेल,असं मी समजेल. माझं बोलणं ऐकण्याचा जर तुम्हाला कोणाला कंटाळा आला तर तसं सांगा. मला कोणावर माझे विचार लादायचे नाहीये.

माझं आणि सुलभाचं लग्न झालं तेव्हा ती अठरा वर्षांची तर मी चोवीस वर्षांचा होतो. सुलभाची नेटकीच बारावी झाली होती. लग्न झाल्यावर आम्ही दोघेजण पुण्यात रहायला आलो. बँकेकडून मला क्वार्टर मिळालं होतं. पुण्यात आल्यावर दुसऱ्या दिवसापासून मी बँकेत हजर झालो. सुलभाला दिवसभर एकटीला घरात कंटाळा यायचा, म्हणून तिने शिवण क्लास करण्याचा माझ्यापुढे विचार मांडला. मी तिला स्पष्टपणे नकार दिला, कारण तिने शिलाई काम करणं मला आवडणार नव्हतं. 

सुलभाने लग्न झालं त्या दिवसापासून माझ्या आवडीनिवडी जपायला सुरुवात केली होती. मी मात्र तिच्या आवडीनिवडीचा कधीच विचार केला नाही. मी वेळेच्या बाबतीत जरा जास्तच वक्तशीर होतो. मला बँकेत सकाळी १०.३० पर्यंत पोहोचायचे असायचे, शार्प १०.१५ ला मी घरातून निघायचो. घरातून निघण्याआधी मला नाश्ता करुन निघण्याची सवय होती. नाश्ता आणि डब्याला एकच पदार्थ मला कधीच चालला नाही, तसेच नाश्त्याला रात्रीची भाजी पण चालायची नाही. 

सुलभा दररोज सकाळी लवकर उठून आधी नाश्ता बनवायची आणि त्यानंतर १०.१५ ला माझ्या हातात डबा टेकवायची. माझा रुमाल, घड्याळ, पाकीट सगळं काही हातात आणून द्यायची. मी एकाच जागेवर बसून तिला सूचना द्यायचो. सुलभा एका आवाजात माझं सर्व ऐकायची.

माझा स्वभाव तापट असल्याने माझ्यापुढे कोणी बोललेलं मला चालायचं नाही. सुलभाला मराठी, हिंदी सिनेमे बघायला आवडायचे पण मला नाटक बघायला आवडायचं, म्हणून आम्ही महिन्यातून एकदा नाटक बघायला जायचो. 

दरमहिन्याला घरखर्चासाठी मी ठराविक रक्कम तिच्या हातात टेकवायचो. एका महिन्याला तिने माझ्याकडे एक्सट्रा पैश्यांची मागणी केली, तेव्हा मी तुला खूप सुनावलं होतं, तेव्हापासून तिने माझ्याकडे जास्त पैश्यांची कधीच मागणी केली नाही.

लग्नानंतर एका वर्षाने मोठ्या मुलाचा म्हणजेच अमितचा जन्म झाला. मला घरात बाळ रडलेलं आवडायचं नाही. बाळाचं कारण सांगून माझ्या कामात दिरंगाई केलेली मला आवडायची नाही. मी कधीच माझ्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं नाही. अमित लहान असताना काही दिवसांसाठी माझी आई आमच्याकडे रहायला आली होती, तेव्हा ती मला म्हणाली होती की, "अरे मनोहर ती सुलभा दिवसभर घरात राबत असते, तुला सगळ्या गोष्टी हातात लागतात. बँकेतून आल्यावर अमितला थोड्या वेळ सांभाळत जा. बाप म्हणून तुझंही काही कर्तव्य असतंच ना."

यावर मी एकदम अभिमानाने उत्तर दिले होते की, "आई मला बापाचं कर्तव्य माहीत आहे. सुलभा दिवसभर घरीच तर असते. घरातील चार कामं करणं म्हणजे ती काही मोठा गड लढवत नाही. मी दिवसभर बँकेतून थकून आलेला असतो आणि तू म्हणते की, अमितला सांभाळत जा. आई सुलभा कुठे काय करते?"

त्यानंतर आईने मला कधीच काही समजावण्याचा प्रयत्न केला नाही. अमित पाठोपाठ अभिषेक व अनिताचा जन्म झाला. सुलभाला तिन्ही मुलांना सांभाळून घरातील काम करणं जड जातं होतं, म्हणून तिने कामाला बाई ठेवण्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली,तर मी तिला त्यावरुन बरंच ऐकवलं होतं. सुलभा मला कधीच प्रतिउत्तर देत नव्हती. मी जे बोलेल ते मान खाली घालून ऐकून घ्यायची.

सुलभाने माहेरी गेलेलं मला आवडायचं नाही. सुलभाने माझ्यासमोर मैत्रिणींसोबत गप्पा मारलेल्या मला आवडायच्या नाहीत. मी सुलभाला माझ्या धाकात ठेवलं होतं. मुलांची नाव काय ठेवायची?त्यांना कोणत्या शाळेत घालायचं? हे सर्व मी ठरवलं होतं.

अमित आणि अभिषेक मला बघत मोठी होत गेली. मी जसं त्यांच्या आईला महत्त्व दिलं नाही, तसंच त्यांनीही कधी तिला महत्त्व दिलं नाही. मला हे समजत होतं, पण मी त्यांना कधीच याबद्दल काही बोललो नाही. मला माझ्या मुलांना माझ्याप्रमाणे घडवायचं होतं. अनिता मलाच आयडॉल मानायची, तीही daddy's girl झाली. 

हळूहळू मुलं मोठी होत गेली आणि आम्ही म्हातारे होत चाललो होतो. आमची जी प्रगती झाली ती फक्त माझ्यामुळेच हे माझं मानणं होतं. सुलभाला मी किचन मधून बाहेर येण्याची कधी मुभाचं दिली नाही. आमची तिन्ही मुलं माझ्यासोबत अभ्यास, कॉलेज, नोकरी याबद्दल बोलायचे, पण सुलभासोबत ते फक्त जेवण या विषयावरचं बोलायचे. आमच्या चौघांचं एकच मत होतं, ती कुठे काय करते? तिला काहीच कळत नाही.

माझे सर्व नातेवाईक सुलभाचं कौतुक करायचे, पण मला त्यांचं बोलणं कधीच पटलं नाही. माझं म्हणणं होतं की, मी पैसे कमावून आणतो आहे, म्हणून सुलभा माझ्या नातेवाईकांना खाऊ पिऊ घालते, तिच्या कष्टांचा मी कधीच विचार केला नाही. 

तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण सुलभाने साडी कोणती आणि कोणत्या दुकानातून घ्यायची, याचा अधिकार पण मी तिला दिला नव्हता. आमच्या नात्यातील एक अजून चक्रावून टाकणार सत्य मी तुम्हाला सांगणार आहे, अनिता झाल्यानंतर सुलभाचं वजन वाढलं होतं, बघायला गेलं तर तिला आमच्या कामांमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. सुलभाचं बेढब शरीर बघून मी तिला जवळ घेणं सोडून दिलं होतं. 

अनेकदा रागाच्या भरात मी तिच्यावर हात उचलायचो. बाहेरचा राग मी तिच्यावर काढायचो. सुलभाने ब्र शब्दाने कधी तक्रार केली नाही. सुलभा गुपचूप माझा अत्याचार सहन करत होती. मी मात्र या सगळ्याला माझा पुरुषार्थ समजू लागलो होतो.

अमितचं लग्न झाल्यावर स्वाती घरात आली, ती नोकरी करायची म्हणून तिने घरातील कामासाठी एक बाई लावून घेतली. अमितने या गोष्टीला लगेच होकार दिला. माझी परवानगी सुद्धा कोणी घेतली नाही. अमितला त्याच्या बायकोला होणारा कामाचा त्रास दिसला, पण आई गेले कित्येक वर्षांपासून तारेवरची कसरत करत होती, तिचा त्रास मात्र त्याला दिसला नाही.

कालांतराने अभिषेक व अनिताचं लग्न झालं. मी रिटायर झालो. अमित व अभिषेक आपापल्या फ्लॅटमध्ये स्वतंत्र रहायला निघून गेले. सुलभा मात्र पहिल्या दिवसापासून जी कामं करत होती, शेवटपर्यंत ती तिचं कामं करत राहिली. जसं माझं वय झालं होतं, तसं तिचंही वय झालं असेल, याचा मी कधीच विचार केला नाही. मला थोडा काही त्रास झाला की, मी डॉक्टरकडे जाऊन शरीराच्या तपासण्या करुन घ्यायचो, पण कधीतरी सुलभाची तपासणी करुन घ्यावी असं मला कधीच वाटलं नाही.

सुलभा जाण्याच्या आठ दिवस आधी मला म्हणाली होती की, "आता तुम्हाला तुमची थोडीफार काम करता आली पाहिजे. मी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे का? एखाद्या दिवशी मी अचानक गेल्यावर तुम्हाला सगळं जड जाईल. आपली मुलं, सुना तुम्हाला सांभाळतील, पण ते सगळं तुमच्या हातात देणार नाही. तुम्हाला तेव्हा खूप जड जाईल. माझी किंमत पण तेव्हाच कळेल. तसंही आजवर मी काहीच केलं नाही, असं तुमचं म्हणणं आहे. तुमची मुलंही तुमच्यासारखीच निघाली. एखादा फोन करुन माझी साधी चौकशी करत नाहीत. माझ्या आता हे सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे. देवाने मला असंच चालत बोलत असताना उचलावं म्हणजे पावलं."

मी सुलभाच्या या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सुलभा जाण्याच्या दोन तास आधी म्हणजे सकाळी ५ वाजता ती मला झोपेतून उठवत म्हणाली,

"अहो माझ्या छातीत खूप दुखत आहे. मला कसंतरी होत आहे."

मी झोपेतच म्हणालो,

"तुला ऍसिडिटी झाली असेल. उठून जरा शतपावली करुन ये, म्हणजे बरं वाटेल."

सुलभा वेदनेने विव्हळत उठली आणि हॉलमध्ये जाऊन बसली. मी साडेसहाच्या दरम्यान उठलो, ब्रश केला आणि चहा आणण्यासाठी म्हणून तिच्या नावाने आवाज देऊ लागलो. माझ्या आवाजाला काहीच उत्तर न आल्याने मी रागात बडबड करत तिच्याजवळ गेलो, तर ती निपचित खुर्चीत बसलेली होती. सुलभा आपल्या सगळ्यांना सोडून गेली होती. 

(बोलता बोलता पाटील काकांचा कंठ दाटून आला होता)

जाण्याच्या क्षणी सुद्धा मी तिचं ऐकलं नव्हतं. सुलभा गेली त्या दिवसापासून माझ्या घरातील जिवंतपणा नाहीसा झाला आहे. एवढं मोठं मी घर बांधलं होतं, पण ते जिवंत सुलभामुळे होतं. मला सकाळी सात वाजता चहाचा कप हातात लागायचा, आता आठ वाजतात, तरी चहा मिळत नाही. कोणाला काही मी बोलू शकत नाही. मी सुलभाचा गुन्हेगार आहे. मी तिला नेहमी गृहीत धरत गेलो, तिला एक माणूस म्हणून कधीच महत्त्व दिले नाही.

इथे जमलेले लोकं हे केवळ सुलभासाठी आले आहेत, ह्याची कल्पना मला आहे. मी अहंकारी असल्याने मी कोणालाच महत्त्व दिले नाही. तुमच्यापैकी जर कोणी आपल्या बायकोसोबत असं वागत असेल तर प्लिज तसं वागू नका. आपल्या बायकोला, अर्धांगिनीला महत्त्व द्या. मी आज जसा हतबल झालो आहे, तसं कोणीही होऊ नका. तुमची बायको म्हणजे तुमच्या घराची लक्ष्मी असते, तिलाही मन असतं. ती खूप काही करते. 

ती कुठे काय करते? या प्रश्नाचं उत्तर माझ्या आयुष्यातील ती गेल्यावर मिळाले."

©®Dr Supriya Dighe