ती कुठे काय करते भाग ३(अंतिम)
माझे सर्व नातेवाईक सुलभाचं कौतुक करायचे, पण मला त्यांचं बोलणं कधीच पटलं नाही. माझं म्हणणं होतं की, मी पैसे कमावून आणतो आहे, म्हणून सुलभा माझ्या नातेवाईकांना खाऊ पिऊ घालते, तिच्या कष्टांचा मी कधीच विचार केला नाही.
तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण सुलभाने साडी कोणती आणि कोणत्या दुकानातून घ्यायची, याचा अधिकार पण मी तिला दिला नव्हता. आमच्या नात्यातील एक अजून चक्रावून टाकणार सत्य मी तुम्हाला सांगणार आहे, अनिता झाल्यानंतर सुलभाचं वजन वाढलं होतं, बघायला गेलं तर तिला आमच्या कामांमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. सुलभाचं बेढब शरीर बघून मी तिला जवळ घेणं सोडून दिलं होतं.
अनेकदा रागाच्या भरात मी तिच्यावर हात उचलायचो. बाहेरचा राग मी तिच्यावर काढायचो. सुलभाने ब्र शब्दाने कधी तक्रार केली नाही. सुलभा गुपचूप माझा अत्याचार सहन करत होती. मी मात्र या सगळ्याला माझा पुरुषार्थ समजू लागलो होतो.
अमितचं लग्न झाल्यावर स्वाती घरात आली, ती नोकरी करायची म्हणून तिने घरातील कामासाठी एक बाई लावून घेतली. अमितने या गोष्टीला लगेच होकार दिला. माझी परवानगी सुद्धा कोणी घेतली नाही. अमितला त्याच्या बायकोला होणारा कामाचा त्रास दिसला, पण आई गेले कित्येक वर्षांपासून तारेवरची कसरत करत होती, तिचा त्रास मात्र त्याला दिसला नाही.
कालांतराने अभिषेक व अनिताचं लग्न झालं. मी रिटायर झालो. अमित व अभिषेक आपापल्या फ्लॅटमध्ये स्वतंत्र रहायला निघून गेले. सुलभा मात्र पहिल्या दिवसापासून जी कामं करत होती, शेवटपर्यंत ती तिचं कामं करत राहिली. जसं माझं वय झालं होतं, तसं तिचंही वय झालं असेल, याचा मी कधीच विचार केला नाही. मला थोडा काही त्रास झाला की, मी डॉक्टरकडे जाऊन शरीराच्या तपासण्या करुन घ्यायचो, पण कधीतरी सुलभाची तपासणी करुन घ्यावी असं मला कधीच वाटलं नाही.
सुलभा जाण्याच्या आठ दिवस आधी मला म्हणाली होती की, "आता तुम्हाला तुमची थोडीफार काम करता आली पाहिजे. मी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे का? एखाद्या दिवशी मी अचानक गेल्यावर तुम्हाला सगळं जड जाईल. आपली मुलं, सुना तुम्हाला सांभाळतील, पण ते सगळं तुमच्या हातात देणार नाही. तुम्हाला तेव्हा खूप जड जाईल. माझी किंमत पण तेव्हाच कळेल. तसंही आजवर मी काहीच केलं नाही, असं तुमचं म्हणणं आहे. तुमची मुलंही तुमच्यासारखीच निघाली. एखादा फोन करुन माझी साधी चौकशी करत नाहीत. माझ्या आता हे सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे. देवाने मला असंच चालत बोलत असताना उचलावं म्हणजे पावलं."
मी सुलभाच्या या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सुलभा जाण्याच्या दोन तास आधी म्हणजे सकाळी ५ वाजता ती मला झोपेतून उठवत म्हणाली,
"अहो माझ्या छातीत खूप दुखत आहे. मला कसंतरी होत आहे."
मी झोपेतच म्हणालो,
"तुला ऍसिडिटी झाली असेल. उठून जरा शतपावली करुन ये, म्हणजे बरं वाटेल."
सुलभा वेदनेने विव्हळत उठली आणि हॉलमध्ये जाऊन बसली. मी साडेसहाच्या दरम्यान उठलो, ब्रश केला आणि चहा आणण्यासाठी म्हणून तिच्या नावाने आवाज देऊ लागलो. माझ्या आवाजाला काहीच उत्तर न आल्याने मी रागात बडबड करत तिच्याजवळ गेलो, तर ती निपचित खुर्चीत बसलेली होती. सुलभा आपल्या सगळ्यांना सोडून गेली होती.
(बोलता बोलता पाटील काकांचा कंठ दाटून आला होता)
जाण्याच्या क्षणी सुद्धा मी तिचं ऐकलं नव्हतं. सुलभा गेली त्या दिवसापासून माझ्या घरातील जिवंतपणा नाहीसा झाला आहे. एवढं मोठं मी घर बांधलं होतं, पण ते जिवंत सुलभामुळे होतं. मला सकाळी सात वाजता चहाचा कप हातात लागायचा, आता आठ वाजतात, तरी चहा मिळत नाही. कोणाला काही मी बोलू शकत नाही. मी सुलभाचा गुन्हेगार आहे. मी तिला नेहमी गृहीत धरत गेलो, तिला एक माणूस म्हणून कधीच महत्त्व दिले नाही.
इथे जमलेले लोकं हे केवळ सुलभासाठी आले आहेत, ह्याची कल्पना मला आहे. मी अहंकारी असल्याने मी कोणालाच महत्त्व दिले नाही. तुमच्यापैकी जर कोणी आपल्या बायकोसोबत असं वागत असेल तर प्लिज तसं वागू नका. आपल्या बायकोला, अर्धांगिनीला महत्त्व द्या. मी आज जसा हतबल झालो आहे, तसं कोणीही होऊ नका. तुमची बायको म्हणजे तुमच्या घराची लक्ष्मी असते, तिलाही मन असतं. ती खूप काही करते.
ती कुठे काय करते? या प्रश्नाचं उत्तर माझ्या आयुष्यातील ती गेल्यावर मिळाले."
समाप्त
©®Dr Supriya Dighe