ती कुठे काय करते भाग २

Give Respect To Wife

ती कुठे काय करते भाग २


पाटील काका त्यांचं मनोगत सांगत होते,


"माझं आणि सुलभाचं लग्न झालं तेव्हा ती अठरा वर्षांची तर मी चोवीस वर्षांचा होतो. सुलभाची नेटकीच बारावी झाली होती. लग्न झाल्यावर आम्ही दोघेजण पुण्यात रहायला आलो. बँकेकडून मला क्वार्टर मिळालं होतं. पुण्यात आल्यावर दुसऱ्या दिवसापासून मी बँकेत हजर झालो. सुलभाला दिवसभर एकटीला घरात कंटाळा यायचा, म्हणून तिने शिवण क्लास करण्याचा माझ्यापुढे विचार मांडला. मी तिला स्पष्टपणे नकार दिला, कारण तिने शिलाई काम करणं मला आवडणार नव्हतं. 

सुलभाने लग्न झालं त्या दिवसापासून माझ्या आवडीनिवडी जपायला सुरुवात केली होती. मी मात्र तिच्या आवडीनिवडीचा कधीच विचार केला नाही. 


मी वेळेच्या बाबतीत जरा जास्तच वक्तशीर होतो. मला बँकेत सकाळी १०.३० पर्यंत पोहोचायचे असायचे, शार्प १०.१५ ला मी घरातून निघायचो. घरातून निघण्याआधी मला नाश्ता करुन निघण्याची सवय होती. नाश्ता आणि डब्याला एकच पदार्थ मला कधीच चालला नाही, तसेच नाश्त्याला रात्रीची भाजी पण चालायची नाही. 


सुलभा दररोज सकाळी लवकर उठून आधी नाश्ता बनवायची आणि त्यानंतर १०.१५ ला माझ्या हातात डबा टेकवायची. माझा रुमाल, घड्याळ, पाकीट सगळं काही हातात आणून द्यायची. मी एकाच जागेवर बसून तिला सूचना द्यायचो. सुलभा एका आवाजात माझं सर्व ऐकायची.


माझा स्वभाव तापट असल्याने माझ्यापुढे कोणी बोललेलं मला चालायचं नाही. सुलभाला मराठी, हिंदी सिनेमे बघायला आवडायचे पण मला नाटक बघायला आवडायचं, म्हणून आम्ही महिन्यातून एकदा नाटक बघायला जायचो. 


दरमहिन्याला घरखर्चासाठी मी ठराविक रक्कम तिच्या हातात टेकवायचो. एका महिन्याला तिने माझ्याकडे एक्सट्रा पैश्यांची मागणी केली, तेव्हा मी तुला खूप सुनावलं होतं, तेव्हापासून तिने माझ्याकडे जास्त पैश्यांची कधीच मागणी केली नाही.


लग्नानंतर एका वर्षाने मोठ्या मुलाचा म्हणजेच अमितचा जन्म झाला. मला घरात बाळ रडलेलं आवडायचं नाही. बाळाचं कारण सांगून माझ्या कामात दिरंगाई केलेली मला आवडायची नाही. मी कधीच माझ्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं नाही. अमित लहान असताना काही दिवसांसाठी माझी आई आमच्याकडे रहायला आली होती, तेव्हा ती मला म्हणाली होती की, "अरे मनोहर ती सुलभा दिवसभर घरात राबत असते, तुला सगळ्या गोष्टी हातात लागतात. बँकेतून आल्यावर अमितला थोड्या वेळ सांभाळत जा. बाप म्हणून तुझंही काही कर्तव्य असतंच ना."


यावर मी एकदम अभिमानाने उत्तर दिले होते की, "आई मला बापाचं कर्तव्य माहीत आहे. सुलभा दिवसभर घरीच तर असते. घरातील चार कामं करणं म्हणजे ती काही मोठा गड लढवत नाही. मी दिवसभर बँकेतून थकून आलेला असतो आणि तू म्हणते की, अमितला सांभाळत जा. आई सुलभा कुठे काय करते?"


त्यानंतर आईने मला कधीच काही समजावण्याचा प्रयत्न केला नाही. अमित पाठोपाठ अभिषेक व अनिताचा जन्म झाला. सुलभाला तिन्ही मुलांना सांभाळून घरातील काम करणं जड जातं होतं, म्हणून तिने कामाला बाई ठेवण्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली,तर मी तिला त्यावरुन बरंच ऐकवलं होतं. सुलभा मला कधीच प्रतिउत्तर देत नव्हती. मी जे बोलेल ते मान खाली घालून ऐकून घ्यायची.

सुलभाने माहेरी गेलेलं मला आवडायचं नाही. सुलभाने माझ्यासमोर मैत्रिणींसोबत गप्पा मारलेल्या मला आवडायच्या नाहीत. मी सुलभाला माझ्या धाकात ठेवलं होतं. मुलांची नाव काय ठेवायची?त्यांना कोणत्या शाळेत घालायचं? हे सर्व मी ठरवलं होतं.


अमित आणि अभिषेक मला बघत मोठी होत गेली. मी जसं त्यांच्या आईला महत्त्व दिलं नाही, तसंच त्यांनीही कधी तिला महत्त्व दिलं नाही. मला हे समजत होतं, पण मी त्यांना कधीच याबद्दल काही बोललो नाही. मला माझ्या मुलांना माझ्याप्रमाणे घडवायचं होतं. अनिता मलाच आयडॉल मानायची, तीही daddy's girl झाली. 


हळूहळू मुलं मोठी होत गेली आणि आम्ही म्हातारे होत चाललो होतो. आमची जी प्रगती झाली ती फक्त माझ्यामुळेच हे माझं मानणं होतं. सुलभाला मी किचन मधून बाहेर येण्याची कधी मुभाचं दिली नाही. आमची तिन्ही मुलं माझ्यासोबत अभ्यास, कॉलेज, नोकरी याबद्दल बोलायचे, पण सुलभासोबत ते फक्त जेवण या विषयावरचं बोलायचे. आमच्या चौघांचं एकच मत होतं, ती कुठे काय करते? तिला काहीच कळत नाही.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all