Feb 29, 2024
नारीवादी

ती कुठे काय करते भाग १

Read Later
ती कुठे काय करते भाग १
ती कुठे काय करते भाग १

पाटील काकूंचे पहिले पुण्यस्मरण होते, त्यानिमित्ताने त्यांचे सर्व आप्तस्वकीय जमले होते. पाटील काकूंचा स्वभाव मनमिळाऊ, सतत सर्वांची मदत करणारा होता, कोणाच्याही छोट्यात छोट्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची त्यांची सवय होती. पाटील काकूंच्या घरुन कोणीही जेवण न करता जात नव्हते. 
पाटील काकूंच्या ह्याच स्वभावामुळे आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला खूप गर्दी झाली होती. जमलेल्या प्रत्येकाच्या डोळयात पाणी तरळत होते. पाटील काकूंची सर्वांना आठवण येत होती. पाटील काकूंचे दोन्ही मुलं, सुना, मुलगी, जावई, नात नातू कार्यक्रमाला हजर होते. आपल्या आईच्या हसऱ्या फोटोकडे बघून तिन्ही मुलांच्या डोळयात अश्रू आले होते.
एका महाराजांचे प्रवचन झाले, त्यांनी प्रवचनात घरातील बाईचे महत्त्व पटवून सांगितले. एका बाईमुळे त्या घराचे घरपण कसे टिकून राहते, याबद्दल महाराजांनी सांगितले.

कुमारिका असते तेव्हा
संस्कृतीचा वारसा जपते
उंबरठा ओलांडून सासरचा
आई बाबांचे नाव राखते
सासर माहेर दोन्हीकडून
मिळते शिदोरी प्रेमाने
दोन्ही घराचे घरपण
राखून ठेवते आदराने
 
महाराजांचं प्रवचन झाल्यावर नातेवाईकांपैकी काही जणांनी पाटील काकू कश्या होत्या? हे सांगून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शेवटचे एक महाशय काकूंना श्रद्धांजली वाहत असताना पाटील काका आपल्या जागेवरुन उठून स्टेजच्या दिशेने गेले. पाटील काकांना स्टेजकडे जाताना बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. 
पाटील काका स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन म्हणाले,
"आज तुम्ही सर्वजण आमच्या दुःखात सहभागी झालात, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुम्ही सगळेजण विचार करत असाल की स्टेजवर बोलायला का आलो असेल? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मी इथे येऊन बोललेलं पटणार नाही, पण आज जर मी काहीच बोललो नाहीतर मी सतत मनात कुढत राहील. गेल्या वर्षापासून माझ्या मनात जे साचलं आहे, ते मला एकदाचं बोलून टाकायचं आहे. माझं मन मोकळं करायचं आहे."
पाटील काकांना त्यांच्या मुलाने स्टेजवर बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. पाटील काका खुर्चीवर बसले आणि हातात माईक घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. जमलेले सर्वजण पाटील काकांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष देऊन बसले होते.

पाटील काकांनी बोलायला सुरुवात केली,
"आज सुलभाला जाऊन एक वर्ष झालं आहे. सुलभा असताना मला तिचं महत्त्व कधीच कळालं नाही. सुलभाने एका अर्धांगिनीच, बायकोचं, जोडीदाराचं कर्तव्य पुरेपूर निभावलं, पण मी एका नवऱ्याचं कर्तव्य कधीच निभावलं नाही, कारण एका नवऱ्याचं कर्तव्य काय असतं? हेच मला ठाऊक नव्हतं. इथं बरेच जण असतील ज्यांना नवऱ्याचं खरं कर्तव्य माहीत नसेल, बरोबर ना?

माझं मनोगत ऐकल्यावर तुमच्यापैकी काही जणांनी जरी नवऱ्याचं खरं कर्तव्य निभावलं, तर सुलभा मला माफ करेल,असं मी समजेल. माझं बोलणं ऐकण्याचा जर तुम्हाला कोणाला कंटाळा आला तर तसं सांगा. मला कोणावर माझे विचार लादायचे नाहीये."

पाटील काका नवऱ्याच्या कोणत्या कर्तव्यांबद्दल बोलायचं आहे? हे पाटील काकांचं मनोगत ऐकल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. पाटील काकांचं मनोगत आपण पुढील भागात बघूया….

©®Dr Supriya Digheईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//