ती खेळकर की जबाबदार भाग 1

ती खेळकर असून ही वेळेवर जबाबदार बनते

ती खेळकर की जबाबदार भाग 1

©️®️शिल्पा सुतार

सकाळचे दहा वाजले होते. मीना फोनवर बोलत होती. आईचा फोन होता त्यामुळे नेहमी प्रमाणे एक तास झाला तरी फोन सुरू होता. दर दोन दिवसांनी एवढ एक तास या काय बोलत असतिल? असा विचार करून आजी म्हणजे मीनाच्या सासुबाई आत जावून बसल्या.

"श्रुती काय करते आहे ग? " मीनाची आई विचारत होती.

"आई श्रुती अजून झोपलेली आहे." श्रुती मीनाची कॉलेजला जाणारी लाडकी लेक होती.

"बघ ना दहा वाजले आई. मला ना तिची काळजीच वाटते. ती अजिबात उठत नाही. आवरत नाही. सुट्टी आहे म्हणून काय झालं? उशिरा म्हणून जास्तीत जास्त नऊला उठलं तरी ठीक आहे. हे अस अकरा साडेअकराला उठायचं. त्या नंतर काही काम करायच नाही. केलेलं खायचं. परत मोबाईल हातात धरून बसायच. संध्याकाळपर्यंत लोळतच राहायचं. संध्याकाळी तिचे बाबा आले की मग त्यांच्याबरोबर ही खुश असते. असं चालतं. पुढे जावून या मुलीला काही येणार आहे की नाही? मला तर खूपच काळजी वाटते. " मीना भराभर सांगत होती.

" अग अभ्यास करत असेल ती रात्री. उशिरा झोपली असेल." आईने तिची बाजू घेतली.

" ते ठीक आहे आई. पण तरी ही आम्ही पण करायचो ना रात्रीचा अभ्यास. तू तर आम्हाला सात वाजे नंतर झोपू द्यायची नाही. " मीना बोलली.

" हो ग तो काळ वेगळा होता. आपल्या घरी आहे तो पर्यंत करेल आराम. लग्न झाल्या नंतर किंवा नोकरी लागली की कसल आरामात रहायला मिळणार आहे तिला. "

मीना आश्चर्य चकित झाली. " अरे वाह आई तुझे विचार बदलले. "

हो. त्या हसत होत्या." हुशार आहे तुझी श्रुती. काळजी करू नकोस."

" काळजी करण्या सारखी परिस्थिती आहे. श्रुती तिची रूम आवरत नाही की काही पसारा आवरत नाही. " मीनाला तो मुद्दा आठवला.

"करेल ग सगळं. जबाबदारी अंगावर पडल्यावर होतं."

" आई तुला तर कधीच श्रुतीत काही चूक दिसत नाही. तुझी लाडकी आहे ना ती. पण नंतर कंप्लेंट आल्यावर समजेल. " मीना बोलली.

"कधी उलटून बोलते का ती? " आई विचारात होती.

" नाही."

" तुझा अपमान करते का? "

" नाही."

"तु म्हणेल ते करते ना. ऐकते ना सगळं? "

" हो पण दोन तीन दा सांगाव लागत. "

" ते चालत ग. आईकडे आरामात असतात मुली. अजून लहान आहे ती शिकते आहे. लग्नाला उशीर आहे. तोपर्यंत समजदार होतात मुली. " आई बोलत होती.

"माझ्या बाबतीत बरं तुला हे वाटलं नाही. मला अगदी आठवी नववीतच पोळ्या करून बघ. भाजी करून बघ अशी करत होती. सगळं शिकवल मला. "

"हो. चांगल झाल की मग. "

" त्यामुळे माझं त्याच्यामुळे काही अडलं नाही. पण इथे माझी मुलगीच माझं काही ऐकत नाही. मला घाबरत नाही." मीना बोलली.

" आता जमाना बदलला आहे. जुनं ते गेलं. आता कुक मिळतात. नवरे समजून घेतात. तुमच्या वेळी होतं का तसं? आमच्या वेळीही नव्हतं. तुझे बाबा किती तापट स्वभावाचे होते. आता वयामानाने जरा शांत झाले. " आई आठवण करून देत होती.

" हो ते बरोबर आहे आई. हे तर अजूनही घरात विशेष मदत करत नाही. पण आपल्याला कशावरून समजून घेणारा जावई मिळेल? " मीना अजूनही काळजीत होती.

"अगं या मुली नोकरी करतात. त्यांना पगार इतका असतो. नाही वेळ मिळत त्यांना. समजून घेतात घरचे. "आई बोलली.

" पण निदान स्वतःच पोट भरायला पाहिजे एवढंच स्वयंपाक यायला नको का? आणि आळस ही झटकायला हवा. "

" तो येतो माझ्या श्रुतीला. जाऊ दे आता तू चिडचिड कमी कर. ती सुट्टीची आजच्या दिवस घरी आहे. कॉलेज सुरू झालं की परत ती बिझी होते. " आई बोलली.

हो. चल मी आवरते. मीनाने फोन ठेवला.

🎭 Series Post

View all