मीरा दोन महिन्याने माहेरी आली होती .ऑफिस मुळे आता माहेरात येणंजाणं कमी झालं होतं तिचं. मीरा उच्च पदावर कार्यरत होती त्यामुळे सर्व जबाबदारी कटाक्षाने स्वत पार पाडत होती, मुळात तिला प्रत्येक काम व्यवस्थित लागायचे, कामाच्या बाबतीत तिला हलगर्जीपणा अजिबात खपत नसे. लहानपणापासूनच सवय होती तिला परफेक्शनिस्ट होती मीरा. कोणतेही काम, कोणतीही गोष्ट असो ती मनाचं समाधान झाल्याशिवाय पुढे जायचीच नाही. लेकीला पाहून तिची आई सुखावली होती. तिच्या आईने खास तिला आवडतात म्हणून पुरणपोळ्या केल्या होत्या. रात्री सर्व घरातले झोपायला गेले .मीराच्या आणि आईच्या गप्पा सुरू झाल्या. अंगणात बसल्या होत्या माया लेकी. कितीतरी दिवसाच्या गप्पा सुरू झाल्या.
आई ::अगं किती गुंतवून घेतल आहे स्वतःला मीरा??? थोड स्वतःसाठी जगाव की काय आपलं काम, कामाचा व्यापातच असते . मीरा अग आई मला माझं काम खूप आवडत. तु मला रात्री बाराला जरी उठवल तरीसुद्धा मी हसत हसत करेल. त्यात मला आनंद मिळतो .
आई :बरं ठीक आहे लग्नाला तीन वर्ष झाली ,आता मुलांचा विचार करा की तुम्ही दोघं.
मीरा: नको आई आम्हाला नाही हवे अपत्य
आई :नको अपत्य?? अशी काय बोलते ??तीन वर्ष झाली की आता किती वेळ हवा तुम्हाला ??
मीरा: अग आई नको म्हणजे आम्हाला मुलं नाहीच पाहिजे. आताही नाही,नंतरही नाही.
आई: अरे देवा काय बोलते आहे असे. काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या मध्ये जावईबापू मध्ये? काही असेल तर आपण ट्रीटमेंट करू की, किती उपाय आहे त्या सर्व गोष्टींसाठी.
आईला मध्येच मीराने थांबवलं आणि बोलली
मीरा: आई थांब जरा माझ्यामध्ये आणि यशमध्येही कसलाच प्रॉब्लेम नाही. सर्व काही व्यवस्थित आहे पण मुळात आम्ही दोघांनी ठरवलं आहे की आम्हाला मूल नकोच.
आई :अगं पण का? मीरा का नको? आई होणं सर्वात मोठ सुख असते. अप्रतिम असतो तो अनुभव.त्याशिवाय स्त्री जन्म अधुराच असतो मीरा.
आई :मला तुझ पटल नाही हे ,का तुला असे वाटते ?बघ आई जर मुलाला जन्म दिला नाही तर माझं जीवन अधुर राहणार?आई स्त्रीमध्ये एका नव्या जीवाला जन्म देण्याची शक्ती देवाने बहाल केली आहे ,हे जरी खरं असलं तरी ते प्रत्येक स्त्रीवर अवलंबून असते मुलं होऊ देणे अथवा नाही.. काही स्त्रिया कितीही प्रयत्न करून या सुखापासून वंचित राहतात ते ही मी पाहिल आहे. पण खरच स्त्री जन्म फक्त आणि फक्त त्याच्यासाठी असतो का??
आई :मीरा मला तर ना तुझं कळतच नाही बघ. दोन पुस्तकं जास्त शिकली की सर्वच नियम मोडीत काढायला निघालीस तू आता.
मीरा: इथेच तर चुकतो आपण.. नियम कोणी बनवले?? कसले नियम?? स्वतंत्रपणे जन्माला येणाऱ्या माणसाला नियमाच्या साच्यात का बसवावे?? जे नियम समाजाने ठरवलेले आहे जर त्यामुळे एखाद्याचे मानसिक खच्चीकरण होत असेल तर का पाळावे ते नियम?? आज किती तरी स्त्रिया आई होऊ शकत नाही तेव्हा हाच समाज तिला वांझोटीचा शिक्का लावतो. म्हणजे ती आई होऊ शकत नाही तर तिला सर्व सामान्यप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही का? का तिला अशी वागणूक दिली जाते.. आई माझ्या सारखी व्यक्ती जर स्वखुशीने आईपण नाकारत असेल, तरीसुद्धा या समाजाची भीती. समाज काय म्हणेल ?हा सर्वस्वी यश आणि माझा निर्णय आहे मुलं होऊ द्यायचं की नाही.. आम्हाला मुलं झाली नाही तीन वर्ष झाले, याचा अर्थ असा नाही की आमच्यात काही दोष आहे. हे आमचे आयुष्य आहे. आम्हाला मूल होऊ द्यायची की नाही तो आमचा प्रश्न आहे. लोक काय म्हणतील? लोक काय विचार करतील? ह्याला घाबरून मी आमचा निर्णय बदलणार नाही.मी नाही जात लोकांच्या खाजगी आयुष्यत डोकवायला तसे कोणीही माझ्या आयुष्यत न आलेले बरे..ह्या स्पष्ट मताची आहे मी.
आई: पुन्हा एकदा विचार कर, तुमच्या म्हातारपणी कुणीतरी हवंच की तुम्हाला आधार देणारं.शेवटचं पाणी पाजनारे .
मीरा :आई हेच असताना म्हातारपणी आधार हवा म्हणून कित्येक जोडपी मुलं होऊ देतात . पण आई आज अनेक जोडपी पहिली आहे म्हातारपणीच निराधार झाले आहे .सत्य आणि कटू परिस्थिती आहे. आई माझ्या बाजूचे मनीष काका एकटेच राहायचे .मुलगा गेला बाहेरगावी ,तिथेच लग्न करून सेटल झाला . मुलगी होती ती सुद्धा लक्ष देत नव्हती. सांग ना काय उपयोग या दोन मुलांचा. रोज रडायचे पोरांसाठी. बापाला विसरली ती पोरं..कसेबसे दिवस काढत होते. धड चालताही येत नव्हते.
दृष्टी अधू झाली होती. आम्ही सोसायटीतले त्यांना रोज जेवण देत होतो. खान पिन, त्यांची औषध-पाणी आम्ही पाहत होतो. रात्रभर जागायचे,रात्रभर जागेच राहायचे झोपसुद्धा नव्हती येत त्यांना. मुलं येतील या आशेने जगत होते .पण नाही कोणी आलं नाही. त्याची जबाबदारी कोणालाही घ्यायची नव्हती .शेवटी अंथरुणाला खिळले, फार भयानक अवस्था झाली होती त्यांची.
(आईच्या डोळ्यात पाणी आले) आई तुला ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले,पण मनीष काकांनी अनुभवलं ते दुःख ,त्रास ,विवंचना .खूप त्रास व्हायचा त्यांना त्या अवस्थेत पाहून. आम्हा सर्वांना जेवढे जमेल तेवढे आम्ही केलं . मुलांच्या भेटीसाठी आतुर झालेला चेहरा आजही आठवतो मीच माझ्या हाताने त्यांना शेवटचं पाणी पाजलं.त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला माझ्याकडे एक नजर टाकली आणि शेवटचा श्वास घेतला...गेले ते शेवटी ...मुलांना निरोप देऊन सुद्धा कोणी आले नाही. मनीष काका गेल्यावर दोन वर्षाने मुलं आली पण घरावर हक्क दाखवण्यासाठी.आज पर्यंत केस चालू आहे घरासाठी ....
मनीष काका गेले तेव्हाच ,मी ठरवलं माझा प्रत्येक श्वास आता फक्त आणि फक्त मनीष काका सारख्या अनेक वडीलांसाठी आयांसाठी . ज्यांना खरंच आपली गरज आहे त्यांच्यासाठी माझं आयुष्य.कदाचित मी आई झाले तर मला माझ्या ध्येयावर लक्ष नाही देता येणार, म्हणून मी यशलासुद्धा माझा निर्णय बोलले यशला ते योग्य वाटला. आई मी खूप लकी आहे ,यश मला समजून घेतो आणि हो खूप चांगला मित्र आहे जो पतीचा रूपात माझ्या आयुष्यात आला. तो एक चांगला मुलगासुद्धाही आहे आई-बाबांची खूप काळजी घेतो हा . खरंच माझ्या सारखी या जगात सुखी कोणी नाही.
आई :खरंच ग मीरा खूपच थोर विचार आहेत तुझे मी खूप नशीबवान आहे तुझ्यासारखा मुलीला जन्म दिला.
मीरा: आई खूप बरं वाटतं सर्व आजी-आजोबा यांच्यासोबत वेळ घालवायला. मला खरंच खूप आनंद भेटतो .आई स्त्री जन्म जर आई झाल्याशिवाय अपूर्ण आहे, तर मग माझं जीवन कधीच पूर्णत्वास गेले . कारण मी अनुभवते आहे आई त्या प्रत्येक क्षणात आईपण जे आजी-आजोबा देत आहेत मला. त्यांच्या शेवटचा काळ माझ्यातल्या आईसोबत सुंदर करायच आहे .हेच माझे ध्येय आहे आयुष्याचे.
आईने मिरच्या डोक्यावरून हात फिरवला ...खूप आशीर्वाद दिले...
रात्रीचे तीन वाजले होते मीरा आई दोघी झोपी गेल्या. अचानक मीराच्या आईला जाग आली आणि तिने पाहिलं आपल्या लेकीतल लपलेलं आईच रूप ,जी जन्म न घालताच आज कित्येकांची आई झाली होती.......खरच मिराचे जीवन सार्थकी लागले होते... ती जगावेगळी आई झाली होती...
समाप्त...
अश्विनी पाखरे ओगले
❤️मनातलं मनापासून❤️
लेख आवडल्यास लाईक,कंमेंट आणि शेअर नावासाहित शेअर करायला हरकत नाही...
लेख आवडल्यास नक्की फॉलो करा मला.