ती गेली तेव्हा

एक अधुरी प्रेमकथा

ती गेली तेव्हा...



आज सकाळपासूनच मळभ दाटून आले होते.. येणार येणार म्हणत सगळे ज्याची वाट बघत होते तो मात्र येत नव्हता.. आशिष सकाळपासून गप्प गप्प होता.. त्याचे गप्प राहणे हा घरातल्यांसाठी इशाराच होता.. घरात सगळेच मूकपणे काम करत होते.. त्याच्या मुलीला मधूनच बोलावेसे वाटे.. ते ती आईच्या कानात जाऊन बोलत होती आणि मग दोघी मायलेकी याला ऐकू न जाईल अशा आवाजात हसत होत्या.. त्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले.. आज त्याची काही बोलण्याचीही इच्छा नव्हती.. तो तसाच बाहेर पडला.. तोच पावसाला सुरूवात झाली. त्याने गाडी काढली आणि तो निघाला त्याच्या ठरलेल्या जागेवर.. जाताना त्याने ऑफिसमध्ये कळवले.. कळवायची गरज नव्हती कारण पाऊस पडताच क्षणी ऑफिसला तो येणार नाही हे समजले होते.. किती तरी वर्षांचा त्याचा तो परिपाठ होता.. आशिष समुद्रावर पोचला.. एका बाजूला समुद्राला आलेले उधाण दुसरीकडे वरून बरसणारा पाऊस.. आशिष गाडीत बसूनच ते अनुभवत होता.. समुद्राकडे बघत असतानाच त्याला ती दिसली.. एका हातात छत्री आणि दुसर्‍या हाताने बॅग आणि ओढणी सांभाळायची कसरत करणारी.. त्याने परत तिच्याकडे पाहिले.. नवी नवरी असावी बहुतेक. हातात चुडा होता. गळ्यात नाजूकसे मंगळसूत्र, कपाळावर लहानशी टिकली.. बसस्टॉपवर उभे राहून तिने फोन काढला.. आशिष पाऊस विसरून तिच्याकडे बघत राहिला.. फोनवर बोलता बोलता ती हसली.. अगदी "तिच्यासारखी..." जिला विसरण्यासाठी तो इथे आला होता..

      सावनी.. त्यांच्या ग्रुपची शान.. इनमिन तीस जणांचा वर्ग.. त्यातही चारपाच मुली.. आणि त्या मुलींची हि लीडर.. याउलट आशिष.. अत्यंत अबोल.. सतत पाठी राहणारा.. पण न बोलता सगळ्यात असणारा.. सावनी आशिष सोडून बाकी सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलायची.. पण तो समोर आला कि मात्र मिटून जायची.. त्याला अनेकदा वाटायचे कि तिला धरून हलवावे आणि विचारावे, का नाही तू माझ्याशी मोकळेपणाने बोलत? पण ते त्याच्या स्वभावातच नव्हते. दिवस जात होते.. आधी एकमेकांना अनोळखी असलेले ते सगळेच एकमेकांचे जिवलग झाले होते.. सावनी आणि आशिष सोडून.. प्रत्येक पावसाळ्यात ग्रुपने एकतरी पावसाळी पिकनिक काढायची असे दरवर्षी ठरायचे.. पण काहीना काही व्हायचे आणि पिकनिक कॅन्सल व्हायची.. 

" मित्रांनो, यावर्षी तरी जाऊना पिकनिकला?" सावनी काकुळतीला येऊन म्हणाली..

" का? या वर्षीच का?" सीमाने विचारले..

" असे काय करतेस ग? हे आपले शेवटचे वर्ष.. परत कुठे कसे भेटू कोणाला माहित?" सावनी आशिषकडे बघत म्हणाली..

" या वर्षी नक्की जाऊ.. मी गाडी बुक करतो.. जेवण अरेंज करतो.." कधी न बोलणारा आशिष पटकन बोलून गेला.

" मग या बुधवारी नक्की जाऊ.." यश म्हणाला.

" बुधवारी? असा मधला दिवस?" 

" हो.. अरे मधल्या दिवशी गर्दी कमी असते.. मनसोक्त मजा करता येईल." सगळ्यांना ते पटले आणि सगळे उत्साहाने तयारीला लागले.. पिकनिकचा दिवस, आशिषच्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय दिवस.. पहाटे लवकरच सगळे जमले. गणपती बाप्पाचा गजर करून गाडी निघाली.. सकाळी लवकर उठल्यामुळे सगळे अर्धवट झोपेत होते. कोणीही कोणाच्याही बाजूला बसले होते. त्यात सावनी आशिषच्या बाजुला बसली.. वार्‍याने उडणारे तिचे केस, तिने वापरलेल्या परफ्युमचा वास आशिषला मोहवून जात होते.. हा प्रवास संपूच नये असे त्याला वाटत होते.. दोघेही बोलत नव्हते पण डोळ्यांना डोळ्यांची भाषा उमजत होती.. मध्ये चहा प्यायला गाडी थांबली तेव्हा सावनी सीमाशेजारी बसायला जात होती. पण आशिषच्या नजरेतली अजिजी तिने ओळखली आणि ती परत तिथे येऊन बसली.. आता सगळे जागे झाले होते.. थट्टामस्करी, अंताक्षरी जोरात सुरू झाली होती.. ड्रायव्हरही या सगळ्यात सामील झाला आणि त्या नादात त्याला स्पीडब्रेकर दिसला नाही.. गाडीला जोरात धक्का बसला. सगळे एकमेकांवर आदळले.. सावनीही जोरात आशिषवर आपटली.. तिचा तो पहिला स्पर्श.. अंगात चारशे चाळीसचा करंट गेल्यासारखे वाटले त्याला.. पावसाला सुरुवात झाली होती.. मधूनच येणारे ढग.. बाजुने वाहणाऱ्या ओढ्यांची कमीजास्त होणारी पातळी आणि सोबतीला हवीहवीशी व्यक्ती.. सावनी सुद्धा आता त्याच्या सोबत चालत होती.. मधूनच पाय घसरला तर त्याचा आधार घेत होती.. गरमागरम मक्याचे कणीस खाताना, एकच चहा दोघात पिताना दोघेही सातव्या आसमानात होते.. 

" तुला एक सांगू?" आशिषने सावनीला विचारले.. दोघे पाच मिनिटे चालून येतो असे सांगून ग्रुपमधून बाहेर पडले होते.. 

" बोल.." ती एक जंगली फूल बघत म्हणाली..

" मला या आधी पाऊस कधीच आवडला नव्हता.."

" का रे? मला तर खूप आवडतो.. तो विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट.. पावसाचे पाणी पिऊन तृप्त झालेली धरती.. पाण्याने न्हालेली झाडे.. सगळं कसे स्वच्छ होऊन जाते. तृप्त होऊन जाते.. असा का बघतोस माझ्याकडे?" सावनीने आशिषला विचारले..

" माझेच चुकले.. तुला पाऊस आवडलाच पाहिजे.. मला कळलेच नाही.."

" म्हणजे रे?" सावनीने निरागसपणे विचारले.

" जिच्या नावातच सावन आहे तिला पाऊस आवडणारच.."

" हट्... " सावनी लाजत म्हणाली..

" एका प्रश्नाचे उत्तर देशील?" आशिषने तिच्या डोळ्यात बघत विचारले.. तिने नजरेनेच होकार दिला.

" माझी होशील कायमची?"

" सांगायला पाहिजे? " नकळत सावनीच्या गालावर लाली चढली.

" त्याशिवाय कसे कळणार मला?" 

" काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात.."

" पण काही गोष्टी ऐकण्यात सुख असते.." 

" सावनी, आशिष काय करताय? चला लवकर. हॉटेलमध्ये जायचे आहे. भूक लागली आहे.." यशने दोघांना बोलावले.. 

" याचे उत्तर आज मला हवेच आहे.." तिथून निघताना आशिष पुटपुटला..

सावनी त्याला ठेंगा दाखवून पळून गेली.. निघेपर्यंत सावनी परत त्याच्या जवळ आलीच नाही.. दुरून फक्त चिडवत राहिली. परतताना दोघे परत शेजारी बसले होते.. पण जाताना जी अनोळखी भावना होती ती मात्र आता नव्हती..

" मला थोडा वेळ देशील ना? मी कॉलेज संपल्यावर लगेच नोकरी शोधीन आणि तुला लग्नाची मागणी घालायला येईन.." आशिषने सावनीला विचारले.. तिने फक्त हसून त्याच्या हातावर थोपटले.. ते पिकनिकवरून घरी आले.. दुसर्‍या दिवशी दमले होते म्हणून कोणीच कॉलेजला आले नाही. पण सावनी परत कधीच आली नाही. तिच्या कोणातरी नातेवाईकांचा अपघात झाला म्हणून ती गावी गेली ती परत आलीच नाही.. तिचा मोबाईल आउट ऑफ कव्हरेज एरियामधून बाहेर आलीच नाही.. ती पेईंग गेस्ट म्हणून रहात असलेल्या ठिकाणी विचारले तर त्यांनाही जास्त सांगता आले नाही.. आशिष वेडापिसा झाला होता.. काय करावे ते त्याला समजत नव्हते.. त्याने कसातरी सावनीच्या फॉर्ममधला पत्ता मिळवला. त्या पत्त्यावर यशला घेऊन तो पोचला.

तो एका मोठ्या वाड्याचा पत्ता होता.

घाबरत जाऊन दोघांनी त्याचा दरवाजा वाजवला..

" कोण पाहिजे?" आतून आवाज आला..

" सावनी इथे राहते का?"

" आपण कोण?" एका भारदस्त व्यक्तीने विचारले.

" आम्ही तिचे कॉलेजचे मित्र. ती अचानक निघून गेली.. तिचा फोनही बंद आहे म्हणून विचारायला आलो.."

" अहो त्यांना आत तरी बोलवा." एक बायकी आवाज आला..

" या या.. बसा ना.."

" काका सावनी?" आशिषने अधीरपणे विचारले.

" सावनीचे लग्न झाले.." काकांनी हसत उत्तर दिले.

" काय? " आशिषच्या डोळ्यासमोर तारे चमकले.

" हो.. नाहीच म्हणत होती. पण माझ्या दूरच्या बहिणीचा मुलगा परदेशातून आला होता.. आम्हाला तो पसंत होता. त्यांना सावनी पसंत होती. मग का थांबा? पण हिची भुणभुण सुरू होती परिक्षा होईपर्यंत थांबा. कारण सांगायला तयार नव्हती. मग घेतले बोलावून खोटे बोलून. दिले लग्न लावून.."

" अहो पण तिच्या मनाचा विचार?" यशने विचारले. 

" माझ्या मुलीचे भले मला कळत नाही का?" काकांचा आवाज बदलत चालला होता. तेवढ्यात काकू आतून चहा चिवडालाडू घेऊन आल्या.

" घ्यारे मुलांनो. लग्नाला बोलावता आले नाही.. लाडू तरी घ्या.."

त्यानंतर आशिषला यशने कसे घरी आणले त्याला काहीच आठवत नव्हते. पण आशिष आतून पार तुटून गेला होता.. कोणीतरी प्रेमाच्या झोक्यावरून विरहाच्या आगीत ढकल्यासारखे त्याला वाटत होते. त्यानंतर ना सावनी परत कधी त्याला दिसली ना तिची काही बातमी कळली. एका दिवसाचे प्रेम देऊन ती जणू गायब झाली होती. आपल्या आईबाबांसाठी तो परत उभा राहिला.. शिक्षण पूर्ण केले.. लग्न केले. कुटुंबावर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली पण तो पाऊस मात्र मनातून नाही घालवू शकला.. 

       आज परत ते आठवताना त्याच्या डोळ्यातून पाणी वहायला लागले.. ती बसस्टॉपवरची मुलगी निघून गेली होती.. तो हि निघाला.. परत त्याच्या आयुष्याकडे.. त्याच्या बायकोला मुलीकडे , सकाळच्या अबोल्याची भरपाई करायला..



दूर कुठेतरी आपल्या खिडकीतून हात बाहेर काढून सावनी पावसाचे पाणी हातात झेलत होती..



सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई