ती एक स्त्री

A story of lady who voluntarily helps other ladies of the society who are suffering from any domestic violence and other issues. Read it to know...

स्त्री:-
 
सरोज एका NGO  साठी काम करत असे. मुळात हे काम करणे हा तिने तिच्या स्वभावानुसार निवडलेला मार्ग होता. स्वतः सरोज 
आपल्या आठवर्षाच्या मुलीसोबत एकटीच राहत असे, आई वडील  हे दुसऱ्या शहरात आणि ती मुलीसोबत दुसरीकडे राहत होती. 
लग्न झाले पण  महिन्यातच तिला लक्षात आले कि आपली 
वैचारिक काय आणि भावनिक काय बैठक जुळतच नाही त्यामुळे लगेच वेगळे होण्याचा निर्णय तिने घेतला. पण तो घरी मान्य 
नसल्याने कोणाचाही आधार न घेता स्वबळावर टिकवला. 
शिकलेली होती आणि आधीच्या नोकरीचा अनुभवही होता, पण
 त्यापेक्षा काहीतरी असे करावे कि आनंद हि मिळेल आणि काही केल्याचं समाधान सुध्दा म्हणून तिने स्त्रियांसाठी काम करायला सुरुवात केली त्यासाठी तिने एक NGO  जॉईन केली. त्याच दरम्यान काम करताना एक
 स्त्री जी मरणासन्न होती ती तिची दोन  वर्षाची मुलगी सरोज ला 
सोपवून गेली. लग्नाच्या भानगडीत पुन्हा पडायचे नाही या
 विचारावर ठाम असलेल्या सरोज ने त्या मुलीलाच
आपल्या आयुष्याची सोबती म्हणून दत्तक घेतले आणि आयुष्य 
नावाचे रहाटगाडगे समाधानाने हाकायला सुरवात केली.
" ईशु , तुझा डब्बा आणि वॉटर बॉटल बॅग मध्ये ठेवली आहे. 
थोड्या वेळात तुझी शाळेची व्हॅन येईल मावशी तुला सोडतील 
आणि जातील. तू डबा नीट खा आणि शाळा सुटली कि तुझ्या डे 
केअर ला थांब, मी तुला माझं आवरले कि संध्याकाळी घ्यायला येईन तसा  फोन करेन." असे बोलून 
सरोज तिची पापी घेऊन निघाली.
नेहमीप्रमाणे गडबडीत गाडीला स्टार्टर मारला थोडं पुढे जाऊन 
लक्षात आलं की पेट्रोल भरायचं आहे तशी वळून लगेच पेट्रोल पंप गाठला आणि हवा सुद्धा  चेक करून घेतली. काही  मिनटात ती ऑफिस ला पोचली. आज काय आणि कुठे काही 
जायचे आधी काही ठरले का वगैरे सहकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. 
त्याच दरम्यान तिचा फोन वाजला , " हॅलो सरोज मॅडम बोलताय का?" पलीकडून आवाज आला .
" हो मी सरोज बोलतेय! आपण कोण बोलताय ?" ती म्हणाली.
" मॅडम माझं नाव मनोज, आमच्या बाजूच्या घरात एक ताई आहे जिचा रोज खूप छळ होताना मला जाणवले आहे. सासू असो का 
नवरा कायम बिचारीवर आरडा ओरड सुरु असते. एकटी आहे 
आणि तिच्या आई वडिलांना पण मी कधी बघितले नाहीय, जर 
तुम्ही काही मदत करू शकत असाल तर बघता का ? मी जर मध्ये गेलो तर एक पुरुष म्हणून वेगळे अर्थ निघतील."
" तुमचा पत्ता पाठवा मी बघते काय करायचं ते." म्हणून तिने फोन ठेवला.
बाजूला असलेल्या नेहा आणि अजित सोबत तिने आलेल्या फोन 
बद्दल चर्चा केली. नेहा म्हणाली "अगं, असं अचानक जाऊन कसे चालेल ? आपल्याला आधी माहिती काढावी लागेल. अजित तू त्या पत्त्यावर जा, आजूबाजूला जरा विचार माहिती कधी आणि कळवं, मग पुढे बघुयात काय करायचे ते."
" हो लगेच निघतो, सरोज तुला पत्ता आलाय का बघ."
आलेला मेसेज अजित सोबत व्हॉटसअप ला शेअर करून सरोज ने काही जुजबी सूचना दिल्या आणि 
अजित त्याच्या आजच्या मोहिमेवर गेला.
टेबल वर जी फाईल होती ती चाळत त्या केस वर थोडं काम करत सरोज नोट्स काढत बसली होती. वेळ पुढे सरकत होता, मधेच 
एकदा मावशी ला फोन करून 'ईशा' च्या बद्दल चौकशी करून नेहा, सरोज ने लंच आटोपले आणि पुन्हा कामाला लागली.  बऱ्याच वेळाने फोन वाजला, बघते तर ५ वाजायला आले होते आणि फोन अजित चा होता.
" हॅलो बोल अजित " सरोज म्हणाली.
" सरोज मॅडम, माझं काम झालय तुम्ही किती वेळ आहेत ऑफिस ला?" अजित विचारात होता .
" ६ पर्यंत आहे , तू कितीला पोचतोय ?" सरोज घड्याळ बघत 
विचारात होती.
" मी ड्राईव्ह करतोय मॅडम , ऑलरेडी निम्मा रस्ता पार केलाय 
जास्तीत जास्त ५.३० होतील ."
" ठीक आहे, मी वाट बघते " म्हणून सरोज ने फोन ठेवला.
बरोबर ५.२० ला अजित ऑफिस ला पोहचला, पाणी प्यायला 
आणि चहा चे दोन कप घेऊन सरोज च्या टेबल वर आला. " थँक्स फॉर कप "हसत म्हणाली " हां बोल काय झाले कामाचे?"
" मॅडम, ज्यांच्याबद्दल आपल्याला निरोप आला त्या मॅडम च नाव आहे पुष्पा शेंडे. त्यांच्या लग्नाला १० वर्षे झालीत पण मुलगा नाही त्यामुळे त्यांचा खूप छळ होतोय. त्यांना २ मुली आहेत. नवरा एका कंपनीत आहे नोकरीला पण तो ही खूप मारतो तिला. पूर्वी ती 
चांगल्या कंपनी मध्ये नोकरी करायची पण मुलीना कोण 
सांभाळणार या कारणाने तिने नोकरी सोडली आणि तिची दुर्दशा सुरु झाली."
" मला वाटते, तिला आधी बाहेर गाठावे, तिच्याशी बोलावे आणि 
मग काय ते पाऊल उचलावे."
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर ११ वाजता त्या 
दिलेल्या पत्त्यावर गेली, मुलींना शाळेच्या बस मध्ये सोडायला ती 
स्त्री बाहेर पडलीच होती. मुलींची बस गेल्यावर ती भाजी 
आणायला म्हणून मार्केटकडे जात असतानाच सरोज ने तिला 
गाठले.
"पुष्पा" म्हणत हाक आल्याबरोबर तिने वळून पहिले तसे एक 
अनोळखी स्त्री आपल्याला बोलावते हे तिने पाहीले आणि थांबली.
" पुष्पा, मी सरोज" स्वतःचे कार्ड देत ती म्हणाली. " मी एका NGO मध्ये आहे, काल मला एक निनावी फोन आला 
ज्यात तुमच्या वर होणाऱ्या अत्याचाराबद्दल माहिती  मिळाली. 
माझ्या सहकार्याला मी आणखी माहिती काढायला सांगितले तेव्हा कळले बरेच काही. तुम्हाला मदत करण्यासाठी मी आलेय!"
ती स्त्री चपापली आणि घाबरली लगेच पुढे चालायला लागली.
"घाबरू नकोस, तुझ्या सहमतीशिवाय काही होणार नाही, आणि 
तुझं आयुष्य नीट व्हावं जेणेकरून मुलीचं पण भविष्य सुधरावे 
म्हणून मला प्रयत्न करायचेत."
" हे बघा मॅडम, तुमचा उद्देश चांगला असला तरी मी काही कमवत नाही. माझं स्वतःच असं काही नाही. कशाच्या भरवशावर मी पाऊल उचलू?"
" आम्ही आहोत ना! आधी काय ते सगळं सांग." सरोज म्हणाली.
" आता मला उशीर होईल मॅडम, उद्या दुपारी माझ्या घरी कोणी 
नसेल तेव्हा जमेल का तुम्हाला?" पुष्पा म्हणाली.
" कार्ड वर नंबर आहे माझा, फोन कर किती वाजता त्याप्रमाणे मी येईल" म्हणून सरोज पुढील कामाला निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सरोज 12.30 वाजता  तिच्या घरी पोचली, आल्यावर तिने पाणी दिले आणि चहा 
करायला जाणार तर सरोज ने तिला बसवून घेतले " पुष्पा,  बोल अगदी मनमोकळं बोल ".
" मॅडम माझं ग्रॅड्युएशन झालं तसे, आईने लग्न लावून दिलं, वडील नसल्याने तिला जवाबदारीतून मोकळं व्ह्याच होत. एका कंपनीत मी ऑफिस असिस्टंट  म्हणून काम करत होते. अगदी नवीन 
असतानाच मला या घरातील लोकांची कल्पना आली. यांना घर 
सांभाळायला आणि यांच्या वंशाला दिवा आणायला म्हणून 
कोणीतरी हवे होते. नवरा म्हणाल तर त्याला फक्त तो म्हणेल हा कारभार असा सगळं. पण असं असता का हो? माणूस म्हणून 
मला पण जगायला नको का? घरची गरिबी त्यामुळे गप्पा राहणे 
हेच एक नशिबी होते. त्यातही पहिली मुलगी म्हंणून आकांत तांडव झाले, माझा काय दोष? आणि नियतीने बघा दुसरीही मुलगीच 
दिली. जन्माला घातले म्हणून सोडून जाता येत नाही आणि जगणे हे मरणाच्या पलीकडे. तुम्हीच सांगा दोन चांगले शब्द आणि यथायोग्य आदर या पलीकडे काय हवे असते हो स्त्रीला? पुरुषाला हवे असते शरीर पण स्त्रीला तर तो स्पर्श , तो आधार, तिला हवी असते प्रेमाची ऊब तो पण मायेचा वाटतो म्हणून तर ती सगळं सहन करते ना? 
तिने भरभरून द्यायचे मग समोरच्याने का ते समजून घ्यायचे नाही?  ती मूर्ख म्हणून हे करते का ? का हे तिचे कर्त्यव्य म्हणून गृहीत आणि पुरुषाने त्याची हुकूमत दाखवायची? 
मान्य सगळी कडे असे नसेल पण मी तर हेच अनुभवते. मग मी का आणि कशासाठी जगते ? आपला सगळं आयुष्य वाहून 
देते? का आणि का स्त्रीनेच हे सगळं भोगायचे? अहो जन्माला 
मुलगा येतो कि मुलगी हे काय स्त्री ठरवते? आणि हे एक दुसरी 
स्त्रीच समजून न घेता जा हिला हाकलून दे म्हणते यापेक्षा दुर्दैव ते काय! " रडत रडत पुष्पा सगळं बोलत होती.
" मला माहेर नाही ! आई राहते मामाकडे, माझा होता तो पैसे 
काढून घेतलं, दागिने स्वतःकडे घेतले आता मी कफल्लक झाले.
एकही तास माझ्या आईला इथे बोलावता येत नाही, राहण्याची तर गोष्ट फार पुढची.   वडिलांच्या आधाराशिवाय माझ्या मुली कशा वाढतील म्हणून हे 
सगळं सहन करतेय, उद्या मी मेली तर हा दुसरं लग्न करेल आणि हाल तर माझ्या मुलींचे होतील ना.  रोज दारू पितो आणि मारतो पण,  सांगू कोणाला?"
सरोज हे सगळं ऐकत होती. स्त्री नावाचं समाजातील सत्य, ज्यावर जग चालतंय पण तिची किंमत या पुरुष प्रधान संस्कृतीत किती? आज पुष्पा, काल मी, उद्या 
आणखी कोणी हे चक्र कधी आणि कसे संपणार? आदिशक्ती 
जिला म्हणतात ती स्त्री घर, बाहेर, मुलं, संसार, नातेवाईक सगळं 
नेटाने करते पण तिच्या भावना कोण समजतंय? एक ना हजार विचार सरोज ला सतावत होते.
"पुष्पा, तुला आम्ही मदत करू, तुझी तयारी आहे का लढायची? आज तू हिम्मत दाखवलीस तर उद्या मुली सुद्धा सुखाने जगातील नाहीतर हे बघून आणि हे असेच असते असं समजून उद्या त्याही हेच आयुष्य प्राक्तन म्हणून स्वीकारतील. बोल काय म्हणतेस?"
सरोज च बोलणं ऐकून " मॅडम मी तयार आहे, मला माझ्यापेक्षा 
माझ्या मुलींचे भवितव्य महत्वाचं आहे." म्हणत पुष्पा नकळत सरोज च्या गळ्यात पडली. तिला काय आणि कसे 
करायचे याची कल्पना देऊन सरोज तिकडून निघाली जड अंतःकरण घेऊन म्हणा किंवा समाधान घेऊन म्हणा. 
त्यावेळेस स्वतःमध्ये जी ताकद तिला जाणवत होती तिचा उपयोग तिला पुष्पा सारख्या आणखी कितीतरी स्त्रियांना त्यांच्यातल्या स्त्रीशक्तीला जागवण्यात करायचा
होता, त्यासाठी मनोमन आभार मनात समोरच्या गणपतीला 
नमस्कार करून ती समाधानाने निघाली.
दुसऱ्या दिवशी पुष्पाचा नवरा ऑफिस ला जाण्याच्या आधी दारावर 3 पोलीस आले. सोबत त्यांचे साहेब होते. साहेबांनी आल्या आल्या तिच्या नवऱ्याचे मानगूट घट्ट पकडले आणि जोरदार आवाजात जरब दिली, "दारू पिऊन बायकोला त्रास देतोस काय रे! चल आता चौकीत, काढतो तुझी सगळी दारू"
नवरा घाबरून नाही नाही म्हणत असताना, एका लेडी ऑफिसर ने पुष्पाच्या सासू ला पण पकडले.
दोघांची वरात निघालेली अख्या सोसायटी ने पहिली.
पुष्पा धाय मोकलून रडत असताना सगळ्या लोकांच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती होती पण त्याचवेळीस मागून एक भक्कम हात तिच्या खांद्यावर ठेवला गेला.
"सरोज मॅडम" ती हात जोडून एवढेच म्हणू शकली कारण तिला माहिती होते या भक्कम हाताच्या मागे एक आश्वासक साथ होती आणि एक समाधानी जाणीव सुद्धा की, ती सुद्धा कोणीतरी असल्याची. आदिशक्ती चे एक रूप असल्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक 'सक्षम स्त्री' असल्याची!
©®अमित मेढेकर