Feb 28, 2024
डॉक्टर्स डे स्पेशल

ती एक डॉक्टर

Read Later
ती एक डॉक्टर

आरती खूप टेन्शनमध्ये होती. सकाळपासून तिचा फोन कंटिन्यू वाजत होता. मोठमोठ्या लोकांचे फोन येता होते. प्रत्येकाला काळजी होती ते मंत्र्याची आणि त्यांच्या बायकोची.
एक नामांकित राजकीय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या मंत्र्याच्या बायकोची डिलिव्हरी होती.
आतापर्यंत कुठे कुठे ट्रीटमेंट झालेली आणि केस हाताबाहेर गेल्यावर तिच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमीट केलं होतं.

आरती एक नामांकित डॉक्टर, लेडीजची कोणतीही क्रिटिकल केस आली तर तिच्याकडेच यायची. लोक अक्षरशः देव मानायचे तिला.

तिची फी जरी थोडी जास्त असली तरी गरीब असेल तर ती मदत म्हणून हॉस्पिटल कोट्यातून पण त्यांची व्यवस्था करायची. आपल्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात ती आपल्या पेशंटशी आणि पेश्याशी बिलकुल प्रामाणिक होती पण कालपासून जरा खूप अस्वस्थ.

झालं असं होतं की काल प्रदेशातल्या एका नामांकित मंत्र्याची बायको ॲडमिट झाली. नववा महिना सुरू होता आणि बीपी, शुगर खूप वाढलेलं.
काहीतरी करावं लागणार होतं पण तिने समजावून सांगूनही मंत्री नॉर्मल डिलिव्हरी करा हाच आग्रह धरून होता. तिची कंडिशन बघता सिजर करणे जास्त चांगले होते.
मंत्री ऐकायलाच तयार नव्हता, त्याच्या मते सिझेरिअनने झालेले बाळ असेल तर आईला त्याचा लळा नसतो. कळा सोसूनच बाळ जन्माला यायला हवं.
एक क्षण तर आरतीला वाटलं म्हणावं यां अशिक्षित मनुष्याला की,

'तुला तर त्या बाळाबाबत मग काही वाटायलाच नको, तू कुठे त्याला पोटात ठेवलंय आणि जन्म देतोय.'पण तिने मनाला आवर घातला.

या अशिक्षित लोकांमुळे कोणाच्या जीवाला धोका होऊ शकतो हे यांना ऐकायचंच नव्हतं. नॉर्मल डिलिव्हरी झाली, वेदना घेऊन डिलिव्हरी झाली तरच त्या आईला मुल लागतं म्हणे. ते फॉर्मवर सह्या करायला तयार नव्हते.
हे सुरू असतानाच काल रात्रीपासून त्या महिलेला इंजेक्शन देणे सुरू होते.
कळा काही येत नव्हत्या आणि शेवटी सीजर करावंच लागणार होतं.

मंत्री असला तरी त्याची बायको काही अमृत पिऊन येत नाही ना, नेत्याचा नातेवाईक असला की त्याचा जीव जाणार नाही असं होऊ शकत नाही. बदलती वस्तुस्थिती समजायला कोणी तयार नव्हतं.
नर्स कंटिन्यू तिच्या इन्स्ट्रक्शन घेऊन घेऊन उपचार करत होती आणि आता तिने स्वतः ऑपरेशनची तयारी करायला सांगितले होते. काल रात्रभर तिला घरीही जाता आले नव्हते. एका पेशंटचा जीव धोक्यात असतांना ती घरी जाऊन बिंधास्त झोपू शकणार नव्हती.

या सगळ्यात ती ऑपरेशन थिएटरकडे जात होती. मंत्री मागे धावत आला.
"डॉक्टर काही झालं तरी माझ्या मुलाला काही व्हायला नको."
"सांगता येणार नाही, बाळ आणि आई आम्ही ज्याला वाचवता येईल त्याला वाचवू, प्रयत्न दोघांनाही वाचवायचा असेल आणि तुम्ही पेशन्स ठेवा ही कंडिशन तुमच्यामुळे आली आहे."
"ते काहीही असो मॅडम, माझ्या मुलाला काही होता कामा नये." मंत्री जबऱ्या आवाजात म्हणाला.

आरती दुर्लक्ष करून आत गेली. तिला आता तिचं डोकं खराब करण्यापेक्षा ऑपेरेशन महत्वाचं होतं. मंत्र्याची बायको डोळ्यात प्राण आणून बसली होती. "कश्या आहात मॅडम?"आरतीने प्रसन्न चेहऱ्याने विचारलं.
"डॉक्टर सोडवा यातून लवकर..."ती हात जोडून म्हणाली.
"मी काय करू शकते, तुमच्या नवऱ्याने सह्या दिल्याशिवाय मी तुम्हाला हातही लावू शकत नाही, तुम्ही सांगा ना तुमच्या नवऱ्याला."
" त्यांना काय सांगायचं आहे, चार वर्षं झाल्यानंतर हा पोरगा पोटात आहे. त्या माणसाला फक्त मुलगा हवा आहे. त्यालाच काय,माझं कुणालाच काही पडलेलं नाहीय.
द्या बाबा, त्याचा पोरगा त्याच्या हाती द्या आणि मला सोडवा यातून. " ती बाई तळमळीने म्हणाली.
ऑपरेशन सुरू झालं आणि सगळ्यांच्या जिवाला घोर लागला. खूप उशीर झाला होता. बाळाची नाळ आवळल्या जाऊन बाळ हिरवं निळं झालं होतं.
बाळ बाहेर काढल्यावरही बाळानी टाहो फोडला नाही. अर्धवट शुद्धीत असलेली ती डॉक्टरकडे डोळ्यात प्राण आणून बघत होती. डॉक्टरला पुढे बोलू ही न देता ती बाई म्हणाली.
" जर बाळ वाचलं नाही ना तर मलाही वाचवू नका कारण या मरण यातना सोसायची माझी आता अजिबात तयारी नाही.
"बाळ गेलं होतं या जगात यायच्या आधीच बाळाने शेवटचा श्वास घेतला होता.
ऑपरेशन थिएटरच्या बाहेर यायची सगळ्यांनाच भीती वाटत होती.
कारण मंत्र्याची माणसं बाहेर उभी होती पण सांगावं तर लागणारच होतं. आरती हिम्मत करून बाहेर निघाली.
मंत्री धावत आला.
" झाला. मुलगा झाला ना मला? " त्याने अधीरतेने विचारले.

"सॉरी आम्ही बाळाला नाही वाचू शकलो, चूक तुमची होती, तुम्ही वेळेवर सह्या केले असता तुमचं बाळ तुमच्या हातात असतं." ती चिडून म्हणाली.

" डॉक्टर, तू मारलंस माझ्या बाळाला, एकदाची बायको मेली असती तर चाललं असतं पण माझ्या वंशाचा दिवा मारलास तू, मी सोडणार नाही तुला. " म्हणत तो तिच्या अंगावर धावला.
"बघच तू आता तुझं हॉस्पिटल कसं चालतं ते? "
त्या माणसानी एकदाही बायकोची विचारपूस केली नाही आणि तो बाहेर गेला. तिने पुढची शक्‍यता लक्षात घेऊन लगेच पोलिसांना कॉल केला.
पण मंत्र्याची माणसं खवळली होती आणि त्यांनी दवाखान्याची तोडफोड सुरू केली. बाकी पेशंट अगदी जीव मुठीत घेऊन बसले होते.
मंत्र्यांनी कोणाला फोन लावले, काय झालं, कोण जाणे? थोड्यावेळात पोलीस आले मात्र मदत करायला नाही तर आरतीला अटक करायला.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होऊन आरतीला अटक झाली होती.
बाहेर मीडियामध्ये बातमी सुरू होती
'डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मंत्र्याच्या नवजात मुलाचा मृत्यू.'
जोरजोरात हेडलाईन सुरु होत्या.
'मंत्र्याच्या मुलाचा जीव वाचू शकत नाहीत तर आमच्यासारख्या सामान्य लोकांचे काय होणार?'
तिचं मन विषन्न झालं होतं. एवढे वर्षात एवढ्या लोकांचे,एवढ्या मुलांचे प्राण वाचवले होते तिने त्यापैकी आज सोबत कुणीच नव्हते.

ती मुकाट पोलिसांच्या गाडीत बसली, गाडी चालू होती तिने कुणालाच फोन केला नव्हता. तिचे मिस्टर प्रकाश एक प्रख्यात वकील होते.

त्यांना बातमी कळताच ते लगेच पोलीस स्टेशनमध्ये आले.
"आरती मला सांगायचं तर होतं, आपण काहीतरी केलं असतं."
"काय करू शकणार होतो प्रकाश आपण?
डॉक्टरने या लोकांचा जीव वाचवायचा. आपल्या प्राणाची पर्वा न करता, प्रसंगी आपल्या घराला, मुलांना सोडून आपलं कर्तव्य करायचं, एवढं शिकून एवढ्या डिग्री घ्यायच्या, स्पेशालिस्ट बनायचं आणि काय तर एक साधा दोन चार वर्ग शिकलेला मंत्री आपल्याला आपली लायकी दाखवून देतो. सगळ्या मिडीयाला हे दिसत आहे की तो मुलगा गेला पण हे कोणालाच दिसत नाहीये की त्याच्या बायकोची चार-पाच वर्षं अबोर्शन केल्यानंतर त्याला वंशाचा दिवा मिळणार होता. त्या बाईच्या जीवाच्या जीवाशी खेळून त्याला मूल हवं होतं. कुठे केल्या त्याने या गर्भलिंग चाचण्या, कुठे केले हे अबोर्शन,ते नाही दिसलं कुणालाच?"आरती चिडून म्हणाली.
प्रकाशने तिला धीर दिला.
" हे बघ आरती, या गोष्टी बाहेर येत नाहीत पण आपण चूपचाप बसून सत्य बाहेर येणार नाही ना, तू काही काळजी करू नको या सगळ्याची जबाबदारी मी घेतो आणि बघतो. "
" काही फायदा नाही सगळं वरून प्रेशर टाकतील तुझ्यावर, माझ्यावर आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनी शिकून खूप गुन्हा केला आहे. आपणही दहावी-बारावी शिकून राजकारणात उतरलो असतो, पैसा कमावला असता आणि पोलीस प्रोटेक्शन मध्ये राहिलो असतो.
डॉक्टरांची किंमत काहीच नाहीये, नेहमीच असं होतं, काही झालं की डॉक्टरांच्या जीवाबाबत, डॉक्टर लोकांना मारायला नाही वाचवायला बसले आहे हे वेळ आल्यावर विसरून जातात लोक. कितीतरी लोकांचे प्राण या डॉक्टर मुळे वाचतात पण गर्दीत बसलेल्या लोकांना आठवतो तो फक्त गेलेला शंभरमधला एक. आपला हा समाज कधीच बदलू शकत नाही. " आरती खूप डिप्रेस झाली होती.
प्रकाश सहन न होऊन तिथून निघाले त्यांनी लगेच जामिनाचा अर्ज केला. तिला जमानात मिळाली. गर्दीने तिच्या घरावर, गाडीवर दगडफेक केली तिचं घराबाहेर निघणं मुश्किल झालं.
मंत्र्याच्या प्रेशरमध्ये एक एक पुरावा नष्ट होत होता तरी त्यांनी कसेबसे पुरावे जमवले. कोर्टात केस उभी राहिली.
मंत्र्याच्या पक्षाकडून दोन तीन लोक नवीनच उभे झाले. आरतीमुळे कसे कोणाचे प्राण गेले याचे खोटे दाखले म्हणून तीन ते चार लोक उभे केले गेले होते कोर्टात.
आरतीला मानसिक रोगी ठरवल्या गेलं, पेशंटकडे लक्ष देत नाही नेहमीच अशा केसेस होतात हे सांगून बदनाम केल्या गेलं, साक्ष देत होत्या तिच्याच हाताखाली कामं करणारे नर्स, वार्डबॉय आणि नवशिके डॉक्टर.
आणि आपली मीडिया होतीच मंत्र्याच्या मदतीला.
आता सगळं हातातून निसटत आहे असं वाटत होतं.
शेवटचा दुवा होती, मंत्र्याची बायको. तिला कोणीच भेटायला जाऊ देत नव्हतं,ती कुणाला भेटू शकत नव्हती. भेटली तरी ती काहीच बोलत नव्हती.
त्या बाईचे आधीच्या बरेचसे रिपोर्ट तसेच डिलीट केल्या गेले होते. काही रिपोर्ट रातोरात बदलले गेले होते, तब्येत खराब होती असं दाखवल्या गेलं होतं.
स्वतः वकील असूनही प्रकाश काहीही करू शकत नव्हते सगळं सत्य समोर असूनही हतबल होते ते पुराव्याअभावी.
कोर्टात आरतीला वाचवू शकू की नाही या भ्रमात असतानाच अचानक कोर्टात एका बाजूला "मला काही बोलायचे आहे." हा आवाज घुमला.
मंत्र्याची बायको जी आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाला फक्त नाही मध्ये उत्तर देत होती, तिचा तो आवाज होता. मंत्र्याने तिला खाली बसायचा इशारा केला पण खाली न बसता सरळ उभी राहिली.
" माझ्या जीवाला धोका आहे पण मला सत्य सांगायचंय. "
कोर्टाने तिला परवानगी दिली.
" हा मंत्री हा एक नंबरचा हरामी माणूस आहे, बायको म्हणजे याला फक्त्त मूल जन्माला घालणारी मशीन वाटते, गर्भ राहिला की मुलगी असेल तर कर अबोर्शन हे नेहमीच चालत होतं. यावेळी मुलगा होता म्हणून माझी खूप काळजी घेत होता पण जेव्हा मला कळलं याला फक्त्त मूल हवंय मी नको तेव्हाचं मला हे मूल जन्माला येऊ द्यावंच वाटत नव्हतं कारण जसं आज माझ्या सासूला घरात कोंडलंय तसंच उद्या माझ्या मुलाने मला कोंडलं असतं. या लोकांसाठी बाईची किंमत दारातल्या पायपोसाऐवढी." म्हणत ती रडू लागली.

तिच्या साक्षीने आरती निर्दोष सुटली.
शेवटी सत्य जिंकलं होतं पण त्या पाच सहा महिन्यात आरतीला झालेला मनस्ताप, त्या जेलमध्ये काढलेल्या दोन रात्री. आणि घराचं झालेलं नुकसान हे भरून निघणारं नव्हतं.

तिला शेवटी एकच वाटत होतं,

'का झाले मी डॉक्टर?'पण मग तिलाच वाटलं,

'जसं लोकांना शंभर चांगल्या गोष्टी न दिसता एक चुक दिसली तसं मलापण आता मी दुरुस्त केलेले, वाचवलेले नव्यांनव न दिसता एकटा मंत्री का दिसतोय? मी असं खचून चालणार नाही कारण मी वसा घेतलंय लोकांना वाचवायचा. सूर्य जसा उगवणे सोडू शकत नाही तसं मी माझं कर्तव्य सोडू शकत नाही.'


डॉक्टर नेहमीच आपल्याला वाचवायचा प्रयत्न करतात. काही डॉक्टर अपवाद असले तरी, पण काही झालं तर डॉक्टर, हॉस्पिटल याचं नुकसान करणं कितपत योग्य आहे?
कोरोना काळात याच डॉक्टरांनी जीव मुठीत घेवून लोकांचे प्राण वाचवलेत, आपलं घरदार सोडून बिचारे रस्त्यावर राहिले. कितीतरी डॉक्टर लोकांनी आपले प्राण गमावले.

त्यामुळे म्हणावं वाटतं एका डॉक्टरच्या वतीने...

मी बरा असेल, नसेल
तू तुझी काळजी घे
मी घरी येईल, नाही येणार
तू माझ्या मुलांची काळजी घे...

रोज बघतो मरताना कितीतरी
भास होतात माझाच आप्त जणू
रोज मृत्यू बघतो उघड्या डोळ्यांनी
पण मेला तो संपला असं कसं म्हणू...

विश्वासाने लोक मला देव समजतात
मी माणूस आहे हे विसरून जातात
अपयश येतं जेव्हा हाताला
तेव्हा सरळ मारायला उठतात...

ओरडून सांगावं वाटत त्यांना
डॉक्टर हा देव नसतो हो
आणि असला जरी देवं तरी
मृत्यू शास्वत सत्य असतं हो...
मृत्यू शास्वत सत्य असतं हो...


आरती पून्हा नव्या जोमाने सज्ज झाली आपलं कर्तव्य बजावायला...

समाप्त....ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//