ती एक चूक..(भाग ४)

बायको आणि आईच्या भांडणात नेहमी त्याचे मरण होते.


आकाशने मग बाबांच्या आवडीचे जेवण ऑर्डर केले. दोघेही क्षणभर घराला विसरले. आज कितीतरी दिवसांनी मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटत होते दोघांनाही.

"बाबा, पण आता पुढे काय?"

"पुढे काय म्हणजे? जायचंच नाही घरी?"

"बाबा, हे असं वागून कसं चालेल ओ?"

"अरे म्हणजे काय, कळू दे ना त्यांनाही. आपल्याशिवाय त्या काय करु शकतात? तेच पहायचंय मला आता. अरे तुला काय मलाही खूप कंटाळा आलाय रे रोजच्या त्याच त्याच कटकटीचा. घर कसं आनंदाने बागडणारं हवं, घरात आल्यावर सारा थकवा, क्षीण काही सेकंदात दूर व्हायला हवा. पण आपल्याकडे सर्वच उलट आहे रे. काय करावं मलाही सुचत नाही?"

"खरंय तुमचं बाबा. मी देखील रोज याच आशेने ऑफिसमधून निघतो, पण घरी आल्यावर मात्र ह्या दोघींची दोन दिशेला असलेली तोंडे पाहिली की, असं वाटतं उगीच आलो की काय घरी? जेवायला ताटावर बसावं म्हटलं तर त्याआधीच भांड्यांचा खणखणाट कानी पडतो. त्यानंतर मग घशाखाली घास उतरणेही मुश्किल होते ओ. आणि रात्री सुखाची झोप तरी मिळेल म्हटलं तर बायकोचे सासूपुराण संपायचे काही नावच घेत नाही."

"अगदी बरोबर बोललास बघ."

"कधी कधी ना बाबा असं वाटतं की लग्न करुन जी चूक केली ना मी ती कदाचित नसती केली तर आज हे हाल झालेच नसते."

"अरे बाबा हीच तर जीवनकहाणी असते प्रत्येकाची. शादी का लड्डू जो खाए वो पछताये और जो ना खाए वो भी पछताये."

आता तर दोघाही बाप लेकाला हसूच आवरेना. दोघांनीही आज एकमेकांजवळ अगदी मनसोक्त आपापली मने मोकळी केली होती. दोघांनाही खूपच हलके वाटत होते.

एकतर वेळेत घरी जायचेच नाही आणि गेले तरी दोघींकडूनदेखील काही गोष्टी वदवून घ्यायच्या. कारण आता दोघींनाही कुठेतरी थांबवणे खूपच गरजेचे होते. नाहीतर एक सभ्य आणि सुशिक्षित कुटुंब उद्ध्वस्त व्हायच्याच मार्गावर होते.

नेहमीच जर एकमेकींमध्ये  चुकाच काढायचे ठरवले तर एक ना एक दिवस मग चुकांचा डोंगर उभा राहील. आणि सध्या तरी तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. दोघीही एकमेकींना समजून घ्यायचेच नाही, या मतावर जणू ठामच होत्या. एकमेकींमधील चांगल्या गोष्टी जणू दोघींनाही दिसतच नव्हत्या. त्यामुळे रोजच होणाऱ्या वादांनी आता बऱ्यापैकी बाळसे धरले होते.

आकाश आणि त्याच्या बाबांनी दोघींनाही वठणीवर आणण्यासाठी  खूप सारे प्रयत्न करुन झाले होते. पण आता यावर काहीतरी ठोस निर्णय घेणेही तितकेच गरजेचे होते. कारण सारे काही सुख असूनही घरात काडीचेही समाधान नव्हते.

"छोटे कुटुंब सुखी कुटुंब" ही सुखी कुटुंबाची परिभाषा त्यांच्या बाबतीत मात्र दूरदूरपर्यंत कुठेच लागू होत नव्हती. ना सासू सुनेला समजून घ्यायची तयारी दाखवत होती ना सून सासूला.

आकाश सकाळी काहीही न खाता पिता ऑफिसला निघून गेला. त्यानंतर त्याचे बाबाही घरातून अचानक गायब झाले. तिकडे नेहा आणि तिची सासू मात्र पुरत्या घाबरल्या होत्या. दोघेही बापलेक फोनही उचलत नव्हते.

सकाळची दुपार व्हायला आली तरी दोघांचाही काहीही तप्पास नव्हता. आता करायचे तरी काय? दोघींनाही समजत नव्हते. या सर्वाला दोघीही तितक्याच जबाबदार होत्या. पण दोघींमध्येही इतका इगो ठासून भरलेला होता की अजूनही त्या स्वतःची चूक मान्य करण्याचे धाडसच करत नव्हत्या.

डोळ्यांतील अश्रूंनी मात्र त्यांची सीमा केव्हाच ओलांडली होती. मनातून त्यांना कितीही वाटत असले की आपण चुकलो तरी ओठ मात्र ही गोष्ट मान्य करायला तयारच नव्हते.

हे दोघेही आपल्या रोजच्या कटकटीला कंटाळून असे वागत आहेत. हे माहिती असूनसुद्धा "आपण आपले वागणे बदलले पाहिजे," या गोष्टीची जाणीव दोघींनाही होतच नव्हती.

कसाबसा दिवस सरला. आता सगळीकडे अंधार देखील पसरला होता. आकाशच्या आईने त्याच्या बाबांच्या सर्व मित्रांना एव्हाना फोन करुन त्यांची चौकशी केली. पण ते कुठेही सापडले नाहीत. तिकडे आकाशनेही काहीच रिप्लाय न केल्याने नेहादेखील खूपच काळजीत होती.

क्रमशः

हा एवढा मोठा धडा घेवून तरी बदलेल का दोघी सासू सुनेचे वागणे? आकाश आणि त्याचे बाबा नक्की घरी परततील का? जाणून घ्या पुढील भागात.

©®कविता वायकर

🎭 Series Post

View all