ती एक चूक..(भाग २)

बायको आणि आईच्या भांडणात नेहमी त्याचे मरण होते.


"हे बघ नेहा कधीतरी माझाही विचार कर अगं. आपला नवरा दिवसभर घराबाहेर असतो. निदान रात्री घरी आल्यावर तरी शांतता मिळेल, या एका आशेने पाऊले घराकडे वळतात. पण आता सायंकाळ झाली की मनात धस्स होते बघ. आज काय मुद्दा असेल भांडणाचा? असा विचार करुन पाऊले जागेवरच थबकतात."

"हे सगळं ना तुम्ही तुमच्या आईला जावून सांगितलं तर बरं होईल. कारण प्रत्येक वेळी भांडणाची सुरुवात त्या करतात."

"नेहा अगं टाळी कधी एका हाताने वाजत नाही हे विसरु नकोस तू."

"नाही, बरोबर आहे तुमचं. मुळात मी तुमच्या तोंडी का लागतीये तेच कळत नाही मला. आता पुढे काहीही बोलू नका, तुमच्या भावना अगदी बरोबर पोचल्यात माझ्यापर्यंत. तुम्हा माय लेकाला माझाच त्रास होतो. मी कशीही वागले तरी फिरुन फिरुन सगळे खापर माझ्याच माथी फोडणार तुम्ही. हे काही नवीन नाहीये माझ्यासाठी."

"अगं बाई तुला एकटीलाच नाही मी दोष देत. आईही चुकते बऱ्याचदा. मी नाही कुठे म्हणतो. पण एकीने तरी मला समजून घ्यावं ही एवढीच अपेक्षा असते माझी. माझ्या माघारी घरात नेमकं काय घडतं? हे थोडीच ना मला माहिती असतं. तू तुझ्या परीने कधी कधी आई आईच्या परीने एकमेकींच्या चुका मला सांगत असता. अरे कधीतरी माझ्याही मनाचा विचार करा ना. तिकडे ऑफिसमध्ये चार लोकं मलाही मानतात. पण तुम्ही दोघींनी मात्र माझा अगदी कचरा करुन टाकलाय."

"याचा सरळ सरळ एकच अर्थ निघतो, मी आल्यापासूनच हे सर्व सुरु झालंय. हो ना?"

"आता तुला जर तेच ऐकायचे आहे तर ऐकच आज, हो लग्न झाल्यानंतरच हे सगळं सुरु झालंय. आधी मनासारखे वागण्याची मुभा तरी होती. पण आता तेही करु शकत नाही. कारण एकतर बायको तयार असते जाब विचारायला नाहीतर मग आई. प्रत्येक जण आपापल्या परीने आपापले म्हणणे खरे करत असतो इथे. त्यामुळे माझे अस्तित्व काय? हा माझा मलाच प्रश्न पडतो आजकाल. तुम्ही बायका बोलून, आरडाओरडा करुन, रडून मोकळ्या होता. पण आम्ही पुरुष मात्र यापैकी एकही गोष्ट करु शकत नाही याचीच खंत वाटते."

"तुम्हीही बोला मग, करा आरडाओरडा मी कुठे नाही म्हटलं. पण निदान घरात तरी डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टी बारकाईने पाहा एकदा. तरच तुमच्या लक्षात येईल, घरात नेमकं काय सुरु असतं ते?"

"जावू दे ग नेहा, माझा बोलून काही उपयोग होईल असं वाटत नाही मला. बेस्ट वे, मी बाहेर जावून झोपतो. तुझं चालू दे आरामात. ओके...? बाय, गुड नाइट."

"हो नेहमीसारखाच पळ काढण्यात तुम्ही एक्स्पर्ट आहातच. आयत्या वेळी माघार कशी घ्यायची? हे कोणी तुमच्याकडून शिकावे."

"तुला जे समाजायचे ते समज. मी चाललो."

नेहाच्या बडबडीला कंटाळून आकाश बाहेर हॉलमध्ये झोपायला निघून गेला.

नेहा मात्र बराच वेळ शून्यात नजर लावून तशीच बसून राहिली.

"नाही आता खूप होतंय. दरवेळी ऐकून घेते म्हणून आता पाणी डोक्यावरुन जायला लागलंय."

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशला बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेले पाहून सासू पुन्हा सुरु होते,

"ज्या बायकोला आपल्या नवऱ्याची किंमत नाही ती बायको काय कामाची ?"

सासूला तर वादासाठी कोणताही मुद्दा पुरेसा होता. सून मात्र शांत बसून ऐकून घ्यायची खरी पण नंतर तुमची आई अशी नि तुमची आई तशी, म्हणत त्याला टॉर्चर करण्याची एक संधी सोडत नव्हती.

थोडक्यात काय तर दोघीही अगदी तोडीस तोड होत्या. पण मधल्या मध्ये आकाश भरडला जात होता. हे मात्र दोघींनाही समजत नव्हते.

क्रमशः

आता पुढे काय होणार? बायको आणि आई यांच्यामध्ये आकाशची भूमिका काय असेल? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all