Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

ती दुर्गा

Read Later
ती दुर्गा

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : एक दुर्गा अशीही
     
                                  ती दुर्गा 

स्त्री म्हणजे आदिशक्ती. ती दुर्गा आणि तीच सरस्वती. ती लक्ष्मी आणि तीच भवानी. कोणत्या रूपाबद्दल बोलायचं नक्की? सारीच रूपं मनात भरणारी आहेत. ही वाक्यं त्या देवीमातेबद्दल असो किंवा मग आपल्यातच वावरणाऱ्या स्त्री बद्दल, त्यांच्या खरं असण्याचा प्रत्यय नेहमीच येतो. सुंदर, प्रेमळ, लोभस, निरागस, मायेचा झरा भासणारी ती प्रसंगी चंडिकेचा अवतार ही धारण करते. 
ती, रोज कित्येक जबाबदाऱ्या पार पाडत असते. घर-संसार असो किंवा मग ऑफिस आणि इतर कामं, सगळ्या गोष्टी ती उत्तमरित्या निभावून नेते. लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, गृहलक्ष्मी, दुर्गा, चंडिका साऱ्याच देवींचं साक्षात दर्शन अगदी घरातच होऊ शकतं. अर्थात आपला दृष्टिकोन तसा ठेवला तर! कारण कसं असतं ना, इतर ठिकाणी समानतेचा डंका वाजवणाऱ्या किंवा मग अन्यायाविरुद्ध आवाज वाढवला पाहिजे म्हणणाऱ्या प्रत्येक घरात 'ती' ला किंमत दिली जातेच असं नाही. सत्य कटू असतं म्हणतात ते कदाचित याचसाठी.
नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसांत आपल्याला देवीच्या विविध रूपांचं दर्शन होतं. आणि या विविध रूपांची स्त्रीसोबत केलेली एकप्रकारची तुलना सुद्धा हमखास पाहायला मिळते. पण हाच विचार इतर दिवशी प्रत्येकाच्या आचारविचारांत दिसून येतो का? 

तिला जेव्हा काही जमत नाही तेव्हा तुला कसं जमणार हे, हे तुझं काम नव्हे, अशी वाक्यं बोलणारेच जेव्हा ती त्या सर्व बाबतीत पारंगत असते तेव्हा नाक मुरडतात. तिला बोलण्यात देवीचा दर्जा देणारे बरेचदा प्रत्यक्षात मात्र तिला काडीमात्र किंमत देत नाहीत. याला काय म्हणावं, भक्ती की दिखावा? त्या देवीचा सुद्धा जागर पूजेसाठी अट्टहास नसावा, रोजच्या आचरणात ती'ची योग्य ती आब राखली तरी तिचं समाधान होणारच. श्रद्धा हवी पण त्याला आचरणातील कपटाची जोड नको. उत्सवाच्या वेळी पूजनीय असणारी ती, त्यानंतर मात्र दुय्यम स्थानावर गणली जाते. कदाचित हे सुद्धा कमी असावं, म्हणून स्त्रीभ्रूणहत्येचा उदय झाला. आणि दुर्दैवाने आज एकविसाव्या शतकात वावरतानाही हे दृश्य पहायला मिळत आहे. अर्थ राहतो का या पूजेला? 

अत्याचार सहन करावा तर ती अबला, पण आवाज वाढवला अन् प्रतिउत्तर दिलं तर मात्र आगाऊपणाचा ठप्पा माथी मारणार. हाच तो अजब दुनियेचा गजब न्याय! सक्षमीकरण हवं म्हणताना तिच्या पुढे जाण्यावर मात्र बरेचदा आक्षेप घेतला जातो, मग तो स्पष्ट शब्दात व्यक्त केलेला असो किंवा मग अस्पष्टपणे दाखवलेली नाराजी असो. नव्या पिढीला, नव्या जीवाला जन्म देणारी ती, स्वतःच्या जीवासाठी मात्र कितीतरी वेळा हतबल झालेली दिसते. 

ती'ला मनस्वी मानणारे सुद्धा आहेतच. असं म्हणतात की पुरुषाला स्त्री नेहमीच प्रेरणादायी वाटलेली आहे. आणि तिचं अस्तित्व स्विकारून तिचा योग्य तो आदर सुद्धा केला जातो. परंतु पुरुषप्रधान संस्कृतीत आजही कुठेतरी स्त्रीचं स्थान दुय्यमच आहे. पिंजरा जरी सोन्याचा असला तरी तो असतो तर पिंजराच! एकाएकी बदल होत नाहीत, पण बदलांना वाव देण्यासाठी प्रयत्नांची जोड तर हवीच ना?

स्त्री स्वतः जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी तिच्या प्रत्येक रूपाला योग्य तो न्याय देईल तेव्हाच ती समाजाच्या काही निरर्थक बेड्यांमधून स्वतःला मुक्त करू शकते. स्वतःच्या सौंदर्याने भुरळ घालणारी ती, अवहेलना झाल्यास महामायेच्या रूपात प्रलयही आणू शकते. मूर्तीसमोर नतमस्तक होताना आपल्या घरातही तिचं स्वरूप अस्तित्वात आहे याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. 

शांत, माया देणारी, कुटूंबाला वाढवणारी अन् जोडणारी महत्त्वाची कडी असणारी ती गरज पडल्यास दुर्गावतार नक्कीच धारण करू शकते. फक्त रौद्ररूप धारण करणारीच नव्हे, तर योग्य अयोग्याची जाण ठेवून त्यानुसार वागणारी सुद्धा दुर्गा असूच शकते.  चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने सामोरं जाणारी पण दुर्गा असते आणि अर्थातच वाईटाचा शेवट करणारीही दुर्गा असते. रौद्रावतारानी चूकीच्या गोष्टी भस्म करणारी जशी दुर्गा असते तशीच स्वतःच्या सौम्य वागणुकीनी समोरच्याला बदलायला लावणारीही दुर्गा असते.
तिच्या साऱ्याच स्वरूपांना शतशः प्रणाम.
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//