ती चांदणभेट ...

Ti Chandanabhet is a poem written by me which describes a meeting wherein loved ones meet to confess their feelings to each other , on a beautiful starry evening in a romantic place. Chandana, romance, prem, preet, sanj, ratarani, ayushya, man, mann

ती कुंद शांत सांजवेळ
नभी मुक्त चांदणखेळ...
वारा नाचरा अवखळ
मंद रातराणीचा दरवळ...

उठे तरंग पाण्यावर
गुंजारव हा कानावर...
हंसयुगुल मग्न शुभ्र
उडे तुषार अंगावर...

अशा धुंद शामलवेळी...
डोळ्यात दाटलेली
आस त्याच्या मनीची...
वाट तिच्या भेटीची

ये ना ग, तो विनवितो
लडिवाळ हट्ट करतो...
समजून आस त्याची
तीर तिज मनी धावतो...

सखे, किती पाहू ग वाट...
नको शांत राहूस आज
सगळे आयुष्य माझे
दिले तुझ्या प्रेमास आज...

या एकट्या जीवाचा
होशील का सहारा...
मम उधाण सागराचा
होशील का किनारा...

ए, शब्दांत बोल काही...
तू कानात सांग काही
मनात काय तुझिया...
दे नात्यास नाव काही

लपविता तिने आर्तता
ठेवूनि मुखावर शांतता...
कळले द्विधा मन तिचे
ठेवितसे मनी तो दृढता...

नयनात एक आसू ...
ओठात किंचित हसू
समजून प्रियेस नीट...
मनकल्लोळ न दे दिसू ...

हृदयातली किणकिण...
मंजुळ अशी रुणझुण...
लाजून दूर ती बघता
गाली लालीचे आंदण...

या सागराची सरिता...
तुझ्या जीवनाची कविता...
या स्वप्निल डोळ्यातील
स्वप्नही मीच आता...

नभी चांदण्यांची नक्षी...
चंद्रास ठेविते साक्षी...
समजून घे सखया
गाली फुले गुलबक्षी...

अनामिक ती थरथर...
शहारा अंगी सरसर
मोरपीस जणू सुंदर...
जागती भाव अलवार

निःशब्द भाव नयनांत
गुंफून हात हातात...
हरवून एकमेकांत
सरली ही चांदणरात ...

गोड अशा स्वप्नांत...
सरली ही चांदणरात ...

© Swati Amol Mudholkar