ती केक खात होती

.
आज तिचा वाढदिवस होता आणि म्हणून ती केक खात होती. केक खात असताना तिच्या नेत्रांमधून आसवे गळत होती. ही आसवे का पडत असावी ? कारण जगातले सर्व वैभव , ऐश्वर्य तिच्या पायाशी लोळण घालत होते. मग तिला दुःख तर कशाचे होते ? कधीकधी सर्व काही मिळूनही आयुष्यात एक अपूर्णता राहते. तिच्या आयुष्यातही अशीच एक अपूर्णता होती.

***

काही वर्षापूर्वी तिच्या नेत्रांना अश्रू माहीत नव्हते. श्रीमंती नव्हती तेव्हा घरी. चाळीत घर होते. कष्टाळू पण महत्वाकांक्षी नवरा , दोन लहान मुले असे तिचे छोटेसे कुटुंब होते. पती खूप प्रेम करायचा तिच्यावर. तीसुध्दा मोठ्या चिकाटीने आणि मन लावून संसार करायची. कधीही कसलीच तक्रार करत नव्हती. पतीने एकदिवस त्याच्या बॉससोबत भांडण केले आणि नोकरी सोडली. त्याला आता स्वतःचा वेगळा व्यवसाय थाटायचा होता. पण खिश्यात पैसे नव्हते. नोकरी सोडल्यावरही ती काही बोलली नाही. तिने स्वतःचे दागिने गहाण ठेवून रक्कम उभा केली. तिच्या आईची शिकवणच होती की पतीमागे खंबीरपणे उभे राहायचे. त्याचे डोळे पाणावले. तुझा प्रत्येक दागिना सोडवून आणेल असे वचन दिले त्याने. मग व्यवसाय सुरू झाला. तिनेही दुसरीकडे नोकरी पकडली. व्यवसायात कुठे कमीजास्त झाले तर ती स्वतःच्या पगारामधून काही रक्कम त्याला मदत म्हणून द्यायची. त्याचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. लक्ष्मीने घरात प्रवेश केला. घरात श्रीमंती आली.

***

आता तिने मुलांना जिल्हापरिषदच्या शाळेतून काढले आणि कॉन्व्हेंट शाळेत टाकले. पतीने सांगितले होते की श्रीमंत राहायचे असेल तर श्रीमंतांसारखे वागावे लागेल. म्हणून तिनेही मुलांना आईऐवजी " मॉम " म्हणून हाक मारायला सांगितली. ती किटी पार्टीज करू लागली. आधी भाजीवाल्यासोबत भांडणारी ती आता मॉलमध्ये अनावश्यक शॉपिंग करू लागली. पतीच्या पावलांवर पाऊले ठेवून ती पुढे सरकत होती. इंग्रजीत बोलणे , पार्टीत पतीसोबत जाणे हे नित्याचेच झाले होते. यादरम्यान मुलांकडे दुर्लक्ष झाले. संस्कार देणे राहूनच गेले. पतीचे त्याच्या पीएसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला हे कळले. खूप वाईट वाटले. माहेरी आईवडील हयात नव्हते. भावाकडे सर्व सांगितले.

" ताई , भाऊजी इतके श्रीमंत झाले आहेत मग असले छोटेमोठे शौक तर असणारच ना. भाऊजी माझ्या स्टार्टअपला मदत करणार आहेत. तू प्लिज नाते नको तोडू. नाहीतर आमचे नाते बिघडेल. इतका पैसा आहे तर मजा कर ना. " तिचा भाऊ म्हणाला.

***

तिचा मुलगा ड्रग्सच्या आहारी गेला होता. हिने खूप रागावले. पतीला मात्र या सर्व गोष्टी तरुण वयात नॉर्मल असतात असे वाटत.

" मॉम , तुझ्याकडे वेळ कुठे होता माझ्यासाठी ? पार्टी करण्यामध्येच तू बिझी होती नेहमी. माझ्या एकटेपणात या ड्रग्सनेच मला साथ दिली आणि मला व्यसन लागले त्याचे. जस तुला आणि डॅडला श्रीमंती मिरवण्याचे लागले आहे. " मुलगा तिला म्हणाला.

मुलीला एक बॉयफ्रेंड होता.

" मला सांगितलेदेखील नाहीस. " ती मुलीला म्हणाली.

" मॉम , जेव्हा घरी प्रेम भेटत नाही तेव्हा माणसे बाहेर प्रेम शोधतात. आणि या घरात खूप जण आहेत जे खूप काही लपवत असतात. सोशल मीडियावर फॅमिली फोटो टाकली म्हणून काय रियल लाईफमध्येही फॅमिली बनत नाही. " मुलगी म्हणाली.

***

तिला पतीसोबत नाते तोडणे जमले नाही. पण खटके रोज उडत. दिवसभर भांडणे होत पण रात्री मेकअप लावून ती पार्टीत पतीसोबत " बेस्ट कपल " असल्यासारखे दाखवत.

" तुला काय कमी ठेवली आहे ग मी ? शॉपिंगसाठी पैसे देतो. हवी तेवढी ज्वेलरी तुझ्यासाठी विकत घेतो. त्याबदल्यात थोडी मजा केली मी तर तुला काय प्रॉब्लेम आहे ?" तिचा पती म्हणाला.

त्याला कळलेच नाही की तिला त्याचे पैसे नकोत तर त्याचा सहवास , त्याचे प्रेम हवे होते.

" मग मीही परपुरुषासोबत झोपले तर तुला काही प्रॉब्लेम नसेल ना ?" तीही एका फटक्यात बोलली.

पतीने हे ऐकताच तिला जोरात थोबाडीत मारली. तो निघून गेला. तिचे गाल गरम झाले. कानात किर्रर्र आवाज घुमू लागला. मग नेत्रांमधून आसवे गळू लागली. एक वेळ होता जेव्हा तिच्या वाढदिवशी तो गजरा घेऊन यायचा आणि तिला विलक्षण कौतुक वाटायचे. तेव्हा घर छोटे होते म्हणून माणसे जवळ होती. एकमेकांबद्दल मनात प्रेम होते. आता घर मोठे झाले आणि माणसेही दुरावली. आजही रात्री कदाचित तो मोठी पार्टी अरेंज करेल. तिला डायमंड नेकलेस गिफ्ट म्हणून देईल. पण तिला कंटाळा आला होता या दिखाव्याचा. किटी पार्टीत कुणीतरी सुचवले होते की नैराश्य आले की चॉकलेट केक खायचे. आज ती तेच करत होती. आरश्यासमोर उभी राहून , नेत्रातून आसवे गाळत तोंडात चॉकलेट केकचा एक एक घास टाकत होती. ती केक खात होती , दुःख विसरून आरश्यात खोटेच हसण्याचा प्रयत्न करत होती.

समाप्त