ती भयाण रात्र..(भाग ४ अंतिम)

एका भयाण रात्रीचे गूढ.


मालविका तर आता पुरती गोंधळली होती. भर थंडीतही तिला घाम फुटला होता.

किचनमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज, टिव्हीचा आवाज आणि नंतर ती माझ्यासोबत बोलणारी व्यक्ती कोण होती?

"महिन्यातून एकदा मी इथेच असतो मुक्कामी." हे असे कोण बोलले असेल नेमके?" मालविकाचे विचारचक्र पुन्हा एकदा सुरु झाले

"मालविका, अगं काय होतंय तुला?" प्रसादही मालविकाच्या वागण्याने गोंधळून गेला होता.

काही सेकंदातच मालविकाला अचानक खूप ताप चढला. तापाच्या तंद्रीत ती काहीही बडबडायला लागली.

"कोण आहेस तू? मी काहीही केले नाही. प्लीज मला जावू दे." मालविकाची ही अशी बडबड ऐकून प्रसाददेखील खूपच घाबरला.

त्याने लगेचच डॉक्टरांना फोन लावला. प्रसादने रिक्वेस्ट केल्यावर पुढच्या पंधरा मिनिटांतच डॉक्टर आले सुद्धा. मालविकाची बडबड ऐकून तेही चक्रावलेच.

"डॉक्टर काय झालंय मालविकाला?"

"नक्कीच त्यांच्या मनात कसली तरी भीती बसलिये. त्यात त्या रात्री एकट्या होत्या. म्हणजे नेमकं काय झालंय हे दुसरं कोणालाही सांगता येणार नाही. त्यांना आता मी एक इंजेक्शन देतो. ताप उतरला की त्या येतील शुद्धीत. तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या कलेकलेने विचारुन घ्या, रात्री नेमकं काय झालं होतं?"

डॉक्टरांनी काही औषध लिहून दिली. इंजेक्शनमुळे मालविकाला शांत झोप लागली. प्रसाददेखील तिच्या शेजारी आडवा झाला.

"देवा काय झालंय मालविकाला? प्लीज यातून सुटका करा लवकर तिची. नाही पाहवत तिचा त्रास मला."

विचार करता करता प्रसादला केव्हा झोप लागली हे त्यालाही समजले नाही. दोन दिवसांचे जागरण त्यामुळे त्यालाही लगेचच झोप लागली.

साधारणपणे दोन तीन तासाने मालविकाला जाग आली. तिचे डोके भयानक दुखत होते. घड्याळात पाहिले तर नऊ वाजले होते.

"बापरे! किती उशीर झालाय. आता कधी आवरु मी सगळं?"

घाईतच मग ती उठली. नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने पडदे उघडले. पहिल्यांदा तिचे लक्ष त्या दोन दिव्यांकडे गेले.

रात्री नेमके काय झाले होते? प्रसाद गाढ झोपला होता. दोन दिवस त्याची अजिबात झोप झाली नव्हती. त्यामुळे तिनेही त्याला उठवले नाही.

मालविका उठून हॉल मध्ये आली. तिला आज खूपच विचित्र फील होत होते. किचनमधून तिने एक नजर फिरवली. सगळं काही जागच्या जागीच होतं. "मग रात्री नेमकं काय पडलं?" एकाही प्रश्नाचे उत्तर तिला मिळेल असे म्हटले वाटत नव्हते.

"प्रसाद म्हणतो, मी त्याला फोन केलाच नाही. याचा अर्थ आमचा रात्री फोन झालाच नाही."

मालविका एक एक करत सर्व घटना क्रमाक्रमाने आठवू लागली.  काय खरं नि काय खोटं? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.

मालविका बाजूला नाही हे पाहून प्रसादलाही जाग आली. तोही मग घाईतच उठला. मालविका एकटक खिडकीतून बाहेर पाहत  होती.

"गूड मॉर्निंग मालविका. बस झालं ग किती विचार करशील आता?"

प्रसादने तिचा मूड चेंज करण्यासाठी ला लाडिकपणे तिला पाठीमागून जावून मिठी मारली.

"रात्री नेमकं काय झालं सांगशील का मला?"

मालविकाने मग घडलेला सर्व वृत्तांत त्याला कथन केला. त्यावरुन एकच गोष्ट प्रसादच्या लक्षात येत होती की, हे सर्व मालविकाच्या मनाचे खेळ आहेत.

ती जे काही बोलत होती ते सर्व काही तिने स्वप्नात पाहिले असावे. पण मालविका मात्र या मतावर ठाम होती की तिने सर्व प्रत्यक्षात अनुभवले आहे.

पण मग प्रसादला तिने केलेला कॉल, प्रत्यक्षात तर झालेला नव्हताच. आणि राहिला प्रश्न किचनमध्ये काहीतरी पडल्याचा आणि टिव्हीचा आवाज यातही काही तथ्य दिसत नव्हते.

म्हणतात ना "रिकामे मन सैतानाचे घर" असेच काहीसे झाले होते मालविका सोबत. त्यात समोरच्या माधुरीने तिच्या मनात घातलेली एक अनामिक भीती हेच खरे या साऱ्याचे मूळ होते.

मागच्या वर्षी एका मध्यमवयीन गृहस्थाने त्याच फ्लॅटमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती. पण प्रत्यक्ष माधुरीने देखील ही गोष्ट स्वतः अनुभवली नव्हती. तिनेही ऐकीव गोष्टच मालविकाला सांगितली होती. प्रत्यक्ष तीही या घटनेची साक्षीदार नव्हती. त्यामुळे तसाही ह्या गोष्टीवर प्रसादचा विश्वास बसणे मुळीच शक्य नव्हते.

शेवटी काय तर आपण सतत ज्या गोष्टीचा पाठपुरावा करतो, तेच विचार आपल्या मनात खोलवर घर करुन बसतात. आणि मग ते अशा रुपाने आपला पाठलाग करतात.

पुढचे काही दिवस तरी मालविकाला एकटे सोडणे योग्य वाटत नव्हते प्रसादला. त्यामुळे काही दिवसांसाठी मालविकाला सोबत म्हणून त्याने गावावरुन त्याच्या आजीला बोलावून घेतले. कारण सध्या पूर्णवेळ तिच्यासोबत कोणीतरी असणे खूप गरजेचे होते.

खरंच मालविका सोबत जे झाले ते झाले, खरे की खोटे या गोष्टी खूप दूरच्या पण ज्यांच्यामुळे आपण रात्री सुखाची झोप घेत असतो, त्यांना देखील फॅमिली असते हे विसरुन नाही चालणार.

कोरोना काळातदेखील याचा प्रत्यय आपण सर्वांनीच घेतला. आपण सर्वजण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने सुट्टी एन्जॉय करत होतो तेव्हा हे कोरोना योद्धेच आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाज हितासाठी लढत होते.

कथेचा शेवट भरकटल्यासारखा नक्कीच वाटू शकतो, पण खरंच दिवसभर दमून भागून प्रत्येकाचे पाय हे घरट्याकडे आपसूकच वळतात. परंतु, ऑन ड्युटी असणाऱ्या माणसाचे काय? त्यालाही कुटुंब असते, भावना असतात. हे मात्र प्रत्येकाने ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. हो ना.?

समाप्त

वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवाशी तिचा काहीही संबंध जरी नसला तरी आजही अशा अनेक भयाण रात्री ऑन ड्युटी असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला भोगव्याच लागतात. स्वतःचे कुटुंब वाऱ्यावर सोडून त्याला समाज संरक्षणाचे कर्तव्य आधी पार पाडावेच लागते.

धन्यवाद

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all