ती भयाण रात्र..(भाग २)

एका भयाण रात्रीचे गूढ.


"अजून पुढचे तीन तास तरी प्रसाद काही घरी येणार नाही. तोपर्यंत देवा काय करू मी?" अचानक झालेल्या आवाजाने तर मालविका खूपच घाबरली होती. बेडरुममधून किचनपर्यंत जाण्याची देखील तिच्यात आता हिम्मत नव्हती.

त्या आवाजाकडे तिने पूर्णतः दुर्लक्ष केले नि तिने  मनातल्या मनात स्वामींचा जप सुरु केला.

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." स्वामींच्या या एका वाक्याने तिच्या मनात नवी ऊर्जा संचारली. तरीही विचारांना ताब्यात ठेवणे तिला शक्य नव्हते.

थोड्याच वेळात जोरजोरात टिव्हीवर बातम्या सुरु असल्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू येत होता. हॉलच्या दिशेनेच हा आवाज येत होता. आधी किचन मध्ये काहीतरी पडले आणि आता हा टिव्हीचा आवाज.

"नेमकं काय होतंय मला? माधुरी ताईंना फोन करु का? आज तसेही त्यांचे मिस्टर पण नाहीयेत घरी. त्यांच्याकडे जावू शकते मी झोपायला.

मालविकाने समोरच्या माधुरीला फोन करायला म्हणून फोन हातात घेतला. "पण नाही नको, अचानक असा फोन केल्यावर त्याही घाबरतील. त्यात मुले पण झोपली असतील त्यांची. उगीच आपल्यामुळे कोणाला त्रास नको." असे म्हणत तिने पुन्हा फोन बाजूला ठेवला.

"अरे पण तसेही माधुरी ताईंपर्यंत पोहोचू शकतच नाही मे. कारण प्रसाद बाहेरुन लॉक करुन गेलाय. ओ गॉड, प्लीज हेल्प मी."

प्रसाद नेहमी नाईट राऊंडसाठी बाहेर जाताना दाराला बाहेरुन लॉक करुन जायचा. कारण मध्यरात्री आल्यावर मालविकाची झोपमोड नको व्हायला तसेच चुकून तिला गाठ झोप लागली  आणि तिने दरवाजा उघडलाच नाही तर रात्री बाहेर तरी कसे आणि किती वेळ थांबणार? या भीतीने मग प्रसाद लॉक करुन जायचा. 

प्रसादची नुकतीच बदली होवून तो नवीन ठिकाणी रुजू झाला होता. बदली होताच मालविकाशी लग्न होवून तो तिला घेवून  त्याच्या नोकरीच्या ठिकाणी शिफ्ट झाला. त्यामुळे मालविकासाठी देखील सर्वच नवीन होते. तिलाही आता प्रसादच्या ऑन ड्युटीची जणू सवयच झाली होती. पण त्याच्या माघारी घरात मात्र बऱ्याचदा ती एकटीच असायची.

तशी मालविका अत्यंत बिनधास्त लेडी. पण का कोण जाणे याआधी सतत कुणी ना कुणी अवतीभोवती असण्याची तिला सवय होती. लग्नानंतर आता तिने पूर्णपणे मनाची तयारीही केली होती. प्रसादसोबत लग्न ठरले तेव्हाच त्याने तिला या सर्व परिस्थितीची कल्पना दिली होती. तिनेही त्यामुळे सर्व परिस्थिती आनंदाने स्वीकारलीही होती. 

आता प्रत्यक्ष जेव्हा तिच्यावर ही अशी वेळ आली होती तेव्हा मात्र तिचा तिलाच राग येत होता. कारण लग्न झाल्यापासून तिला संसाराचा म्हणावा तसा आनंद घेताच येत नव्हता. दिवस दिवसभर प्रसाद घराबाहेर. ना जाण्याची वेळ ठरलेली ना येण्याची. त्यातही नाईट ड्युटी ही ठरलेलीच. कामाच्या टेन्शनमुळे प्रसाद घरातही फ्री राहत नव्हता. एकतर सतत कोणत्या ना कोणत्या विचारांत गुंतलेला असायचा किंवा मग झोपलेला. ही अशी काय ते मालविकाची लग्नानंतरची लाईफ होती.

"आज आपला हक्काचा माणूस स्वतःची फॅमिली अशी वाऱ्यावर सोडून जगासाठी रात्रीचा दिवस करत आहे. पण एवढे करुन सुद्धा लोकं पुन्हा त्यांनाच नावे ठेवायला तयारच असतात. एकदा सुद्धा त्यांच्या मनात हा विचार येत नसेल का, हे लोक जेव्हा दिवस रात्र असे बाहेर असतात तेव्हा त्यांच्या फॅमिलीचे काय होत असेल?"

नुसत्या विचारानेच मालविकाच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली.

"प्रसाद यार येना लवकर. इथे काय सुरु आहे हे, काहीच कळत नाहीये?"

न राहवून तिने मग प्रसादला फोन लावला.

"अरे! हिने का फोन केला अचानक ते पण इतक्या उशिरा?"

"हा बोल मालविका."

झालेला सर्व प्रकार तिने त्याला कथन केला.

"रिलॅक्स रिलॅक्स. अजिबात घाबरु नकोस.अगं तुझ्यासारखी स्ट्राँग लेडी अशी घाबरल्यावर कसे होणार? अगं तू मनातील भीती आधी काढून टाक बरं. आणि तसेही मी काय आजच असा बाहेर आलोय का? आठवड्यातले तीन दिवस तर रेग्युलर नाईट राऊंड असतोच ना मला. मग तेव्हा तर एकटीच असतेस की घरात."

"इतर वेळी ठीक आहे रे पण आज काय आहे माहिती आहे ना तुला?"

"अगं तसं काही नसतं ग राणी. आता दर आमावस्येला आम्ही बाहेर असतोच ना, आम्हाला नाही अशी भुतं बितं दिसत कधी."

"अरे पण तुला माहितीये ना आपल्या या घरात मागच्या वर्षी कुणीतरी आत्महत्या केली आहे ती. मला समोरच्या माधुरी ताईंनी सांगितले होते. त्यात तुलाही हाच फ्लॅट मिळाला.q "

"शहाणी असशील ना तू तर त्या बाईचे काही ऐकत जावू नकोस बरं. मग हे असं नको त्या वेळी काहीही आठवत राहतं. आणि हे बघ आज नेहमीपेक्षा एक दिड तास तरी जास्त थांबावं लागेल बाहेर. जवळपास पहाटे साडे पाच सहा होतील यायला. त्यामुळे बी स्ट्राँग."

"बरं चल ठेवतो मी, अचानक लाईट गेल्या आहेत इकडे. बाय बाय बाय."

"आता तिकडेही कशा काय लाईट गेल्या असतील.?"

डोक्यात विचारचक्र सुरू असतानाच अचानक आलेल्या आवाजाने मालविका पुरती गोंधळली.

"काय मग मॅडम, झाला का नवऱ्याला फोन करुन? डोन्ट वरी, घाबरु नका. मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. तसाही महिन्यातून एक दिवस मी इथेच असतो मुक्कामी."

"को.. को.. कोण आहे? का मला त्रास देताय?"

क्रमशः

खरंच कोणाचा आवाज असेल तो? आता एकटी मालविका कशी सामना करेल आलेल्या परिस्थितीचा? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all