ती अखेरची भेट!

अंतिम भेट त्या दोघांची.. निस्वार्थ प्रेम करणाऱ्या कलियुगातीत राधाकृष्णाची..
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा 

कथेचे शीर्षक - ती अखेरची भेट! 

कथेचा विषय - स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो? 

_______________________________________________


                  आज त्या दोघांची शेवटची भेट होती कारण आज ते दोघेही नाईलाजाने ब्रेकअप करणार होते. ब्रेकअप करण्यामागे देखील एक कारण होते ते असे की, तो प्रियकर जरी तिचा असला तरी तिचा जोडीदार होऊ शकणार नव्हता. तो अर्थात कियांश देशपांडे आणि ती म्हणजे राधिका सावंत. ही कथा आहे कियांश आणि राधिकाची, कलियुगातील राधाकृष्णाची! 

" राधे, मला नाही गं माझ्या या वेड्या राधेऐवजी कुणा रुक्मिणीशी अर्थात त्या वैभवीशी संसार थाटायचा. माझं केवळ तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम आहे. खरं सांगतोय अगं, मी नाईलाजाने जरी तिच्याशी संसार थाटत असलो ना तरी माझ्या राधेची जागा कुणीच कधी घेऊ शकणार नाही. हो, संसारात रममाण व्हावेच लागेल मला पण तो निव्वळ एक नाईलाज असेल गं माझा. " तो काकुळतीने तिच्याशी बोलत होता. 

" ए कान्हा, ऐक ना... मला नको ना रे तू स्पष्टीकरण देऊस. मला माहीत आहे रे सगळं. मला माहीत आहे, तुझं माझ्याप्रती असणारं प्रेम म्हणून तुझ्या प्रेमावर संशय घेऊन मला आपल्या नात्यावर अविश्वास नाही दाखवायचा. 

                  कान्हा, तुझी मनस्थिती ठाऊक आहे मला आणि म्हणूनच मी जराही आक्षेप घेत नाहीये कारण ही परिस्थिती नियतीने योजलेली आहे, विधिलिखित आहे. आपण तर अनभिज्ञ होतो ना रे! आपण तर रममाण होतो एकमेकांच्या सोबतीने स्वप्न विणण्यात, आपण तयार होतो एकमेकांचा कधी आधार तर कधी सावली व्हायला, आपण आनंदी होतो एकमेकांचा एकांत आणि सहवास व्हायला, आपण मग्न होतो एकमेकांच्या मिठीत शिरून फक्त नि फक्त प्रेम वर्षावात ओलेचिंब भिजण्यात! 

                  रुसवेफुगवे, थोडे अंतर, थोडा दुरावा, थोडे गैरसमज कधी ना कधी आपल्या नात्यात थाप देतील पण तरीही आपलं प्रेम शाश्वत राहील, एवढंच काय ते आपल्याला ठाव होते. आपण तर मुळात कधी साधा विचारही केला नव्हता की, आपल्याला विरह सोसावा लागेल.

                 वेड्या, तू मला दुखावण्याचा साधा विचारही करत नाही कधी, याची खात्री मलाही आहे रे! म्हणूनच तू तुझी बाजू माझ्यापुढे मांडण्याचा नको ना प्रयत्न करू कारण स्वतःपासून तू मला मुद्दाम वेगळं नाही करतोय, तुझा नाईलाज आहे; हे कळायला मी एवढीही बेअक्कल नाही ना! " ती आलेला हुंदका गिळून त्याची समजूत घालत होती. खचलेल्या कियांशला राधिका स्वतःचं बळ एकवटून धैर्याने उभे करू पाहत होती. 

" राधे, अशी कशी गं तू? अजूनही तू माझी बाजू घेत आहेस? तुझ्यासारखी प्रेयसी आयुष्यात असणे अशक्यप्राय! खरंच, तुझ्याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे गं! " तो तिच्या डोळ्यात आरपार बघत भावनाविवश होऊन बोलला. 

" वेड्या, माझ्या कान्हा! भाग्यवान तर मीही आहेच की, कारण या वेड्या राधेला उमजून घेणारा मनकवडा कान्हा तिला प्रत्यक्षात प्रियकर म्हणून लाभला ना! " तिनेही लगेच त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून ती बोलली. तो अलगद गालातल्या गालात हसला अन् परत त्याने त्याचा चेहरा निर्विकार करून घेतला. 

तो कोरड्या आवाजात अगदी निर्विकार चेहरा ठेवून अन् शुन्यात नजर घालून म्हणाला, " राधे, शेक्सपियर म्हणून गेला आहे की, नावात काय आहे? पण खरं पाहता नावातच सारे आहे, असं नाही का वाटत तुला? " 

" कान्हा, काय बोलतोयस तू? हे मध्येच नावाबद्दल काय घेऊन बसला आहेस? " ती न कळून बोलली. 

" बरोबर तेच बोलतोय गं! " तो कुत्सितपणे हसून म्हणाला. 

" पण मला कळेल असं बोलशील का? " ती त्याचा अंदाज घेत बोलली. 

" वेडी राधा, अगं मला हेच म्हणायचंय की, आपल्या दोघांची नावे बघ ना! तू राधा आणि मी? मी कान्हा? " हे बोलताना त्याचा घसा कोरडा पडला होता. 

" कान्हा नको ना असे काही विचार करू. " तिचे डोळे परत एकदा पाणावले. 

" राधे! मला खरंच माहीत नव्हतं गं, राधाकृष्णाचं नाव धारण करून जन्माला आलेलो आपण प्रत्यक्षात राधाकृष्णाचे नशीबही धारण केलेले असेल. मी कियांश अर्थात कलियुगातील कान्हा अन् तू अर्थात राधिका कलियुगातील राधा होशील, असं कधी वाटलंच नव्हतं गं राधे! " तो खूप भावूक झाला होता अन् बोलता बोलता परत त्याचा ताबा सुटला आणि तो रडू लागला. 

" ए कान्हा, नको ना रे असं बोलू. शांत हो ना! " खरंतर तिला स्वतःला सावरणे कठीण जात होतं पण तरीही ती स्वतःच्या भावना लपवून त्याला सांभाळत होती. 

" राधे, गुन्हेगार आहे ना मी तुझा? तुला कितीतरी स्वप्न दाखवून एका क्षणात सगळ्यांची राखरांगोळी केली. नाते जोडण्याआधी तू मला आधीच सुचवले होते की, कदाचित अशीही परिस्थिती येऊ शकते. त्यावेळी मीच तुला म्हटलं होतं, मीच तुला आधार दिला होता आणि आश्वासनही दिले होते की, आपण घेऊ सगळं सांभाळून! पण आज मीच माझ्या कुटुंबियांच्या हट्टापुढे माघार घेतोय. मला माफ कर राधे, माफ कर! " तो एकाएकी दोन्ही गुडघ्यांवर बसला आणि दोन्ही हात जोडून तिची माफी मागू लागला. 

ती लगेच त्याच्या पुढ्यात बसली आणि त्याचे हात हातात घेऊन म्हणाली, " कान्हा, नको ना तू खचून जाऊ. तूच असा खचून गेला तर कसं चालणार? तू काही चुकीचं केलेलं नाही रे! स्वप्न आपण दोघांनीही पाहिली होती ना? हो, क्षणात होत्याचे नव्हते झाले पण त्यात नाही ना रे तुझी चुकी कोणतीच... 

                  तुझ्या आईवडिलांनी कुणाला तरी दिलेल्या वचनाला तू पाळतोय. तुझ्या आईवडिलांच्या वचनाखातर आपल्या नात्यातून तू माघार घेतोय अन् मला म्हणून तुझा आणखी आदर वाटतोय. आजच्या या युगात कोण रे असं आईवडिलांना वा त्यांच्या वचनाला मान देतं? पण तू तसा नाही. तुझं माझ्यावर नक्कीच प्रेम आहे पण तुझं तुझ्या आईवडिलांवरही प्रेम आहे म्हणून तू तुझ्या आईवडिलांशी कृतघ्न झाला नाहीस. 

                  कान्हा, म्हणूनच तर राधेसाठी खास आहे ना! कारण तुझ्याऐवजी कुणी दुसरा प्रियकर असता तर नक्कीच तो मला पळवून घेऊन गेला असता, माझ्यासवे संसार थाटला असता, आईवडिलांकडे पाठ फिरवली असती पण तू असं काही एक न करता, मला अंधारात न ठेवता आईवडिलांखातर आपल्या नात्याला कलाटणी देत आहेस. आपल्या नात्याला विराम देऊन विरह भोगायला तयार आहेस. हा असा निर्णय घ्यायला खरं सामर्थ्य लागतं. 

                   या निर्णयामुळे नक्कीच त्रास होतोय रे मला पण खरं सांगू, तू माझी निवड असल्याचा अभिमानही आहे कारण तू माझा प्रियकर जरी झाला तरी आईवडिलांशी जुळून असलेली नाळ तोडण्याचा कृतघ्नपणा तू केला नाहीस. 

                 जगासाठी हे टिपीकल बेवफाई वगैरे असू शकेल पण मला ठाऊक आहे की, यात नितळ प्रेम आहे एका मुलाचे त्याच्या आईवडिलांप्रती! या विरहयातना न केवळ राधा तर कान्हाही भोगतोय, यापासून मी अनभिज्ञ नाहीच! " ती त्याच्या डोळ्यात बघून मंद हसून बोलली पण त्याने नजर वळवून घेतली कारण अद्याप तो पश्चात्तापाच्या अग्नीत होरपळत होता. 

तिने अचूक हेरले अन् त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन नजरेला नजर भिडवून बोलली,

" किती ना रंगवले होते स्वप्न अनेक
जसे तू मला राणी सरकार, 
तर मी तुला राजे बोलणार.. 
जेव्हा मी तुला लाडाने,
'अहो ऐकलंत का?' म्हणणार, 
तेव्हा तेव्हा तू हक्काने
'ऐकतोय ना बायको' बोलणार! 

जरी सप्तपदी वा मंगळसूत्राने 
नात्यात बांधल्या गेलो, 
तरी आपल्यातली मैत्री
निरंतर आयुष्यभर जपणार.. 
मी तुझ्यासाठी अन् तू ही फक्त 
माझ्यासाठीच कविता करणार.. 

पण झाले ते सर्व स्वप्नांचे चित्र धुसर 
क्षणातच होत्याचे नव्हते सुद्धा झाले.. 
असो... 
आयुष्य हे असंच असतं कान्हा, 
अविश्वसनीय! 
काय घडेल याचा थांगपत्ता नसणारं... 

म्हणजे आपल्याच बाबतीत बघ ना, 
आपल्याला जरी व्हायचं होतं 'शिवगौरी'
पण नियतीमुळे जगतोय,
विरहातली प्रीत निराळी राधाकृष्णाची.. 

पण खरं सांगू, वास्तवाला नाकारण्यात
जराही तथ्य नाही रे, 
ज्या नियतीपुढे सच्चे राधाकृष्णदेखील नमले
तर मग या विधिलिखितापुढे 
कलयुगातील आपण दोघे निव्वळ साधे प्रेमी युगुल
तरी अपवाद कसे ठरणार ना... 

पण आताशा मला त्याचीही तक्रार नाही
कारण आपण समाजमान्य बंधनात
जरी अडकलो नसलो तरी, 
हृदयबंध आपले आधीच जुळलेय ना... 

तू माझ्या अन् मी तुझ्या हृदयात आहे, 
आणखी काय अपेक्षा करणार ना.. 
म्हणून प्रश्न सारे माझे मिटले कधीचेच
आता फक्त निस्सीम प्रेम करणेच
आहे मी निवडलेले.. "

" राधे, काय करतेस? " ती काय करतेय हे माहित असूनही तो हळूच म्हणाला. 

" आणखी काय करणार कवितेशिवाय? म्हणून तेच करतेय मी. " ती हलकेच हसून म्हणाली. 

" का? " त्याने विचारले. 

" का म्हणून काय विचारतोस रे? सहजच करतेय मी कविता. आवडतं ना मला कविता करायला म्हणून! " ती मंद हसून उत्तरली. 

" पण खरं सांगू? " त्याने नजर चोरून विचारले. त्यावर तिने हुंकार भरला अन् तो पुढे बोलू लागला. 

" मला नाही गं आवडत आता तू कविता केलेली! " तो काकुळतीने म्हणाला. 

" अरे पण का? असं का बोलतोयस तू? विसरलास का? तू खरं तर याच कवितांमुळे माझ्या प्रेमात पडला होतास ना? " तिने गोंधळून त्याला विचारले. 

" हो गं राणी, पण.. " तो बोलता बोलता अचानक थांबला. 

" पण काय माझ्या राजा? " ती म्हणाली पण सध्या तर ती त्याच्या मनाचा गोंधळ जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. 

" पण हेच की, आधीच्या तुझ्या कवितेत असणारे शब्द ते सारे हवेहवेसे वाटायचे मला कारण त्यात आपलं नातं होतं, आपलं प्रेम होतं. पण आताशा या कवितेत आपलं नातं आहे, प्रेमही आहेच गं! पण आता या प्रेमात नियतीने आणलेला खंड अन् त्यातून आपल्या प्रेमाला दृष्ट लावणारा विरह प्रत्येक शब्दांतून ओसंडून वाहतोय. त्यामुळेच ती कविता लिहिताना तुला होणारा तो असह्य त्रास नाही गं बघवत मला.. म्हणून नको ना लिहत जाऊ तू कविता... " त्याने तिला आवेगाने मिठी मारून त्याचे मन मोकळे केले आणि डोळ्यांचा बांधही सैल केला. तिनेही त्याच्या मिठीत लगेच स्वतःला स्वाधीन केले. 

त्याला मिठी मारूनच त्याच्या पाठीवर हलकीच थाप देऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न करत ती त्याची समजूत घालत म्हणाली, " त्रास कसला राजा? प्रेम केलंय मी तुझ्यावर! या प्रेमाची पाऊलवाट फक्त गुलाबांनी सजलेली असेल हे गृहीत धरलेच नव्हते मी कधी..

                  हो, क्षणात होत्याचे नव्हते झाले रे! पण असो.. ठीक आहे मी! कारण, जिथे गुलाब तिथे काटेही असणारंच ना? अन् मुळात तू ज्याला त्रास म्हणतोय, तो त्रास नाहीच मुळी! त्या फक्त सुखद वेदना आहेत. फक्त नि फक्त सुखद वेदना! ज्या मला कायम हव्या आहेत सोबतीला अन् मी त्या सुखद वेदना जपणार आहे, अगदी आयुष्यभरासाठी! आणि हा माझाच निर्णय आहे, बरं का! "

तो लगेच तिच्या मिठीतून बाहेर आला आणि तिचा चेहरा ओंजळीत घेत त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी अन् कंठ दाटलेल्या स्वरानेच विचारले, " राधे, कसं गं जमतं तुला? "

" उत्तर खूप सोपं आहे कान्हा.. " ती तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणी स्मित हास्याने लपवून बोलली. 

" हो, तर तेच सांग ना.. खरंच कसं जमतंय तुला? हे अश्रू लपवून, व्याकुळ मन कणखर करून माझ्यासाठी हे असं खोटं हसू मिरवायला कसं जमतंय? " तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला. 

" फक्त तुझ्या प्रेमामुळे कान्हा! " ती म्हणाली. 

तिचे उत्तर ऐकून त्याने लगेच तिला मिठीत घेतले पण मनात हळूच पुटपुटला, " स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो? " तिच्या निस्सीम प्रेमामुळे तो खरंतर व्याकुळ अन् निशब्द झाला होता ती मात्र फक्त मंद हसत होती, त्या स्पर्शाला अनुभवत होती कारण तो स्पर्श शेवटचा होता अन् म्हणून तो स्पर्श तिला आयुष्यभरासाठी साठवून घ्यायचा होता.

                  दुसरीकडे अलगद त्याच क्षणी पावसानेही हजेरी लावली जणू त्यांच्या अंतिम भेटीत अख्खी सृष्टीही मन मोकळे करून धाय मोकलून बरसत होती. 

समाप्त. 

©®
सेजल पुंजे. 
०५-०८-२०२२.
टीम नागपूर.