ती आणि समुद्र

Ek premkatha... Jagavegli

समुद्रकिनऱ्यावरील मावळतीचा थंड गार वारा चेहऱ्यावर झेलत ती गहन विचारांत गुंतलेली. सगळं शांत – सुन्न, डोक्यात कसलेच विचार नाहीत पानं मनात भावनांचा कल्लोळ. वाऱ्यावर डोलणारी माडांची झाडं, झावळ्यांची सळसळ आणि किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या लाटांचा मंद आवाज. ह्या जगात असूनही अनंताची अनुभूती करून देणारा… मन शांत करण्यासाठी आणि ध्यानमग्न होण्यासाठी हा तिचा सोबती.
कित्येकदा ती ह्या किनारी अशी संध्याकाळच्या वेळी आली होती, कितीतरी प्रश्नांची उत्तरे तिला ह्या लाटांचा गर्जनेत मिळाली होती. जणू तो समुद्र तिच्याशी हितगुज करतोय. अथांग असूनही कधी तिला त्याचा दडपण वाटल नाही उलट तिचं चित्त शांत होत असे त्याच्या सानिध्यात. सगळ्यात असूनही कशातच नसणे म्हणजे काय हे तिला पहिल्यांदा इथेच उमगले. ह्याच सख्याच्या संनिध्यात तिच्या कित्येक चिंता, दुःख, प्रश्न फक्त त्याच्या अस्तित्वाने काही काळापुरते का होईना पण नाहीसे व्हायचे. तिचं आणि त्याच एक वेगळाच नातं निर्माण झालेलं अलौकीक असं.

पण आज तो तिच्या सादेला प्रतिसाद देत न्हवता, लांब कुठेतरी जाऊन रुसून बसलेला. तिला काही सुचेनासे झाले. ती त्याला साद देत देत कितीतरी वेळ चालत राहिली ओल्या वाळुवरून. पण तरीही तिला त्याची गाज आज ऐकू येत न्हवती. आणि एक क्षणात त्याने तिला चहूबाजूने घेरून टाकले. अजस्त्र लाटांवर हिंदकळत ती हात पाय मारत राहिली. तो तिला भेटला होता पण आजचं त्याच रूप तिला अनोळखी होत. तो खवळला होता, खूप ताकदवान झाला होता. त्याला ना तिची काळजी होत ना तिच्या सोबत केलेल्या हितगुजांची. तो अक्राळ विक्राळ बनून तिला या वाटेवरुन येता लाटेवर बाहुलीसारख खेळवत होता. काही वेळ हा खेळ खेळल्यावर ती बेशुद्ध होऊन त्याच्या खोल आणि गूढ अंतरांगाशी एकरूप झाली. तिच्या एकुलत्या एक सख्या ने तीचा विश्वासघात केला होता आणि तिने त्याला शोधण्यासाठी आपले प्राण गमावले होते. 

दोन दिवसांनी पेपरात बातमी छापून आली. “ओहोटीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने भरतीच्या लाटांमध्ये अडकून तरुणीचा मृत्यू.”  ती सुखात होती कारण तिने तिच्या आयुष्याचे शेवटचे क्षण तिच्या प्रिय सख्यासोबत घालवले होते.