ती,न उमगलेली...!

"Jon astil re he?? barach mar lagala Ashe Hanna...!davakhanyat nyave label...!"ek Jan bolala.


कथेचे नाव - ती, न उमगलेली..!
विषय -स्त्रीमन समजून घेणे खरंच कठीण आहे का?
फेरी -  राज्यस्तरीय लघुकथा 

"आई ,आज मी  सुटी घेतलीय . आज संध्याकाळी बाहेर जाऊया ना आपण दोघी ,आज खूप शॉपिंग करू,मस्त भटकू, बाहेरच काहीतरी छान खाऊ अन् मग घरी परत." अंशू आईचा हात हातात घेत अन् तिला गोल गोल फिरवत बोलली.

"आज काही विशेष वाटते.खूपच आनंदात दिसते स्वारी आज." अवनी

" विशेष म्हणजे काय,फारच विशेष आहे आजचा दिवस माझ्यासाठी!!  माझ्या लाडक्या ममा चा आज वाढदिवस आहे." अंशुजा

"अरे,मी तर पार विसरूनच गेले होते की माझा पण वाढदिवस असतो."अवनी भावूक होत बोलली.

"सॉरी ममा,आजवर झाला नाही कधी तो साजरा पण आता तुझी लेक आपल्या पायावर उभी झाली आहे,यापुढे तो नेहमीच साजरा होईल." अंशू अवनी च्या गळ्यात हात घालत बोलली.

"अंशू कशाला गं हे सारं?? आपण घरीच अगदी साधेपणाने साजरा करू. खरं सांगू का ,खरं तर याची पण गरज नाही गं!!" अवनी 

"आई, आजवर मी तुझं सारं ऐकून घेतलं पण आता मात्र मी काही तुझं ऐकणार नाही."

अंशू चा एकंदर आविर्भाव पाहून अवनी काही बोलली च नाही.

संध्याकाळी अवनी ला अगदी मनाप्रमाणे तयारी करायला लावून दोघीही मायलेकी मनसोक्त फिरल्या, एकमेकींसाठी  मनसोक्त शॉपिंग केली, हॉटेल मध्येच  ऑर्डर देऊन मागवलेला केक कापला,दोघींच्याही आवडीच्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारत दोघींनीही मनासारखा दिवस घालवला.

खरंतर एवढ्या वर्षांनी असा वाढदिवस साजरा करायला अवनी च्या जीवावर आलेलं पण लेकीचे मन जपण्यासाठी तिच्या आनंदात ती ही सहभागी झाली होती.

दोघीही आता परतीच्या मार्गाला लागल्या होत्या. अवनी बुक केलेल्या ओला ची वाट बघत उभी होती.
तेवढ्यात अतिशय कोलमडलेल्या अवस्थेत रस्त्याच्या त्या पलीकडल्या बाजूला कुणीतरी पडलेलं दिसलं तिला.
नुकतेच कोणीतरी त्यांना डॅश मारून पसार झाले होते. अवनी नको नको म्हणत असतांनाही अंशू तिथे गेलीच.

तोवर पालथे पडलेल्या व्यक्तीला कुणीतरी सरळ केले आणि त्या व्यक्तीचा चेहरा बघून अंशू गारठलीच..!  

"कोण असतील रे हे?? बराच मार लागला आहे यांना. ..! दवाखान्यात न्यावे लागेल....!" एकजण बोलला.

"अरे,पोलिसांना इन्फॉर्म करा आधी..!"

कुणीतरी पोलिसांना फोन केला. समोरच्या व्यक्तीची ओळख पटवायचा सारे प्रयत्न करत होते पण ओळख पटत नव्हती. तेवढ्यात अवनी गोंधळलेल्या अवस्थेतून भानावर आली.
"मी ओळखते यांना, प्लीज मदत करा ना यांना दवाखान्यात न्यायला." अंशू

तेवढ्यात पोलिसांची गाडी आली, पाठोपाठ ,ॲंबुलन्स सुद्धा. त्या व्यक्तीला आत ठेवण्यात आले. 

"कोणी ओळखते का यांना??" पोलिसांनी जरा करड्या आवाजात च विचारले.

"हो हो मी ओळखते यांना." अंशू बोलली

"मॅडम चला तुम्ही पण गाडीत." पोलिस बोलले.

अवनी अजूनही दुरूनच भांबावल्या सारखी सारे बघत होती.

अंशू तिच्याजवळ येऊन तिला सोबत घेऊन गेली.

"अगं पण तिकडे कुठे नेतेस मला?? ,आपण का जायचे त्यांच्यासोबत, आपला काय संबंध तिथे??" अवनी ची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती.

"आई मी सांगते सविस्तर सगळं ,तू बैस आधी गाडीत." अंशू

 गाडी हॉस्पिटल ला पोचली. पाठोपाठ दोघी मायलेकी सुद्धा पोचल्या. स्ट्रेचर वर  असलेल्या पेशंट चा चेहरा पहिला अन् अवनी ला काय रिअँक्ट करावं ते कळेचना!!!

"देवा,तुला मी सुखी असलेली पाहवत नाही कां रे???"
आता कुठे सगळं स्थिर स्थावर झालेलं तर हे नवीनच पुढ्यात वाढून ठेवलस..!" अवनी मनातल्या मनात आक्रंदत होती. 

आईच्या चेहऱ्यावर असलेले संमिश्र भाव बघून अंशूला तिला काय सांगावं ते कळत नव्हतं..!

"आई मला एवढंच कळतं आता त्यांना आपल्या आधाराची गरज आहे अन् माणुसकी जपायला तूच शिकवलंस ना मला...!" अंशू

एका वाक्यातच लेकीने निरुत्तर करून टाकले तिला.

तपासल्या नंतर डॉक्टर सांगत होते, "संपूर्ण शरीराला आणि डोक्याला भरपूर मार आहे.खूप ब्लीडिंग झालं आहे,खूप नाजूक कंडीशन आहे यांची. ब्लड सुद्धा अरेंज करावं  लागेल आणि यांचा ग्रुप तर ओ निगेटिव्ह आहे."

सगळ्या गोष्टी चिंतेत भर घालणाऱ्या होत्या.

त्या व्यक्तीच्या मोबाईल वरून अंशू नी त्यांच्या घरी कॉल केले पण सगळं सांगूनही कुणीच काहीच रिस्पॉन्स दिला नाही. सगळंच अगदी पेचात घालणारं होतं. आता अंशुलाच  पूर्ण   सिच्युएशन सांभाळायची होती.


या सगळ्या प्रकरणाचा ताण अवनी वर पडणार होता म्हणून अंशू ला अजूनच वाईट वाटत होतं पण निरुपाय होता.

अखेर ऑपरेशन यशस्वी रित्या पार पडलं .पेशंट ICU मधे असल्याने आता तिथे थांबायची गरज नव्हती. पण सुटी झाल्यावर त्यांना न्यायचे कुठे हा प्रश्नच होता.


"काय झालं बेटा,काळजीत दिसतेस??" ब्रेकफास्ट चिवडणाऱ्या अंशुला अवनी  बोलली.


" आई उद्या त्यांना सुटी होणार आहे.त्यांना कुठे ठेवायचं? हा एक मोठा प्रश्न आहे माझ्या समोर!!!" अंशू


"काळजी करू नको,घेऊन ये त्यांना घरी. मनाची पूर्ण तयारी केली आहे मी!" अवनी


"आई हे तू बोलते आहेस??" अंशू

"हो बेटा हे मीच बोलते आहे,केवळ तू दाखवलेल्या माणुसकीच्या नात्याखातर....!" एवढं बोलून अवनी आत निघून गेली.


अंशू चे ऑफिस अन् नवी नोकरी असल्याने ती ऑफिस ला गेली होती अन् अवनी मात्र सुटी काढून पेशंट ची राखण करत होती.

वेदनाशामक औषधे घेऊन त्याच अमलात असलेल्या त्या व्यक्तीकडे अगदी त्रयस्थपणे बघतांना अवनी च्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ तरळत होता.

"अवनी ,तुझ्या नवऱ्याचं ऑफिस मधल्याच एका बाईशी लफडं सुरू आहे." मधु तिची मैत्रीण तिला फोनवर सांगत होती.


"नाही ग मधु ,ते तसे नाहीत." अवनी

"अगं ती नवऱ्याच्या प्रेमाची बेगडी ढापणं काढ तरी डोळ्यावरून अन् खुलेपणी डोळे उघडून बघ सारे.एकदम विश्वास नको ठेऊ माझ्यावर पण काही दिवस त्याच्या वर्तणुकीत असलेले बदल टिपून मग काय ते ठरव." मधु

विश्वास बसत नव्हता तिला पण नेमके काय सुरू आहे याचा शाहनिशा करणे जरुरी होते.

त्याच्या लेकिवर असलेले त्याचे प्रेम तर अबाधित च होते पण आज डोळस पणे विचार केल्यावर त्याची तिच्या बाबतीत असलेली ओढ कमी होत चालली आहे हे तिलाच जाणवायला लागलं होतं.

तिच्या स्पर्शासाठी,तिच्या प्रेमासाठी सदैव आसुसलेला नवरा अचानक तिला टाळत असल्याचे तिलाच जाणवू लागले होते.

कदाचित दुसरी काही चिंता पण असू शकते?? त्याच्याशी एकदा बोलायलाच हवं.

संध्याकाळी त्याच्या आवडीचा मेनू बनवून अन् अगदी त्याला आवडते तशी अवनी तयार झाली होती.अगदी आतुरतेने त्याची वाट बघत...!

दहा वाजून गेले पण त्याचा पत्ताच नव्हता. लेक कंटाळून शेवटी जेऊन झोपून गेली .

रात्री उशिरापर्यंत तो आला. बाहेरून च जेऊन आल्याचं सांगून सरळ झोपायला गेला. त्याच्यासाठी तयार झालेली ती, त्याच्या आवडीच्या अन्नाचा घरभर दरवळणारा सुवास काहीच ना त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचलं,  ना नाकापर्यंत ,ना ही मनापर्यंत...!

पोट भरलेल्या माणसाला पंच पक्वान्न सुद्धा फिकी वाटतात हेच खरं...! अन् एकदा का बाहेरच्या अन्नाची चटक लागली की घरचं पक्वान्न ही
 मिळमिळीत लागते हे ही खरं...! याचा अक्षरशः प्रत्यय घेत होती ती..!

दुसऱ्या दिवशी लेक शाळेत गेल्यावर न राहवून तिने जाब विचारलाच...! 

"खूप दुःखी आणि विधवा आहे ती. पोटी एक पोर आहे. ती नव्यानेच नोकरी वर रुजू झाली होती. नवरा जाण्याचं दुःख अन्  नवीन नोकरी ,तिला मदतीची गरज आहे हे ओळखून मी तिची मदत केली. माझ्याही नकळत माझे मन तिचे दुःख पाहून तिच्याकडे ओढले जायचे. एक दिवस भावना अनावर झाल्या अन् न घडायचे ते घडून गेले. अन् आता तर मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही अवनी...!" तो


हे सगळं ऐकतांना हादरलीच होती ती, धरणी पोटात घेईल तर बरं असं तिला वाटत होतं.

"वाह रे नवरा..!!!!! ऑफिस मध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या बाईचं दुःख त्याला  विदीर्ण करते अन् तिच्या साठी हा वेडा होतो ??अन् जिच्याशी सात फेरे घेऊन लग्न केलं , जिनी आपलं सगळं याच्या अन् याच्या कुटुंबाच्या सुखासाठी स्वतः ला वाहिलं तिला यामुळे काय वाटेल??? असा साधासा विचार सुद्धा  या माणसाच्या मनाला शिवला नाही. कुणासाठी करते मी हे सगळे?? कुणासाठी स्वतः चे जीवन वाया घालवत आहे मी...???" तिचं मन मूकपणे आक्रंदत राहिलं..!

अंशू चे तिच्या बाबावर असलेले प्रेम तोडायचे नाही म्हणून त्याही परिस्थितीत ती रेटत राहिली.
स्वत:च्या च्या पायावर उभी राहायला नोकरी शोधली.
अन्  ठिगळं लावून स्वतः च्या संसाराची छिद्र झाकू लागली.

त्याच्यापासून तर ती केव्हाच दूर गेली होती,मनाने अन् तनानेही. नातं उरलं होतं ते फक्त मंगळ सूत्रा पुरते अन् जगापुरते....!

पण हे सुख सुद्धा त्या स्त्री ला बघवले नाही. त्याच्यावर तिची एवढी मोहिनी पडली होती की एका बेसावध क्षणी घटस्फोटाची नोटीस तिच्या हातात पडली होती. 

बिनशर्त त्यावर सही करून ती घराबाहेर पडली होती ती कायमचीच..!

ती अन् तिची लेक एवढेच तिचे आता विश्व उरले होते. परिस्थतीमुळे लेकही शहाणी झाली होती.

लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी मात्र त्याने पेलली होती. तिने मात्र त्याची पोटगी साफ नाकारली होती.


 ओढवलेली परिस्थिती,समाज साऱ्यांशी एकटीच संघर्ष करत निर्भिडपणे सामोरे गेली होती ती!!! 
लोकांच्या  सहानुभूतीच्या खोट्या वल्गना आणि चर्चांपासून सुद्धा तिने जाणीवपूर्वक स्वतः ला आणि लेकीला दूर ठेवले होते.तिला वडीलांशी फोनवर बोलण्याची मुभा सुद्धा तिने दिली होती पण त्यातही स्वतः चा स्वाभिमान जपायला तिने लेकीला पुरेपूर शिकवले होते. 


लेकही आता परिस्थिती अन् तिची तगमग समजू लागली होती. जोमाने अभ्यास करून अनेक स्कॉलरशिप तिने मिळवल्या होत्या  ज्या तिच्या शिक्षणाला सहाय्यभूत होत होत्या.बारावी नंतर वडिलांची अनास्था लक्षात घेत वडिलांनी दिलेली मदत सुद्धा तिनी नाकारली होती. स्वतः चे संपूर्ण ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करणे तिने सुरू केले होते. जवळपास वर्षाआधी लागलेली रिझर्व बँकेच्या मॅनेजर ची नोकरी पत्करून सुद्धा पुढच्या भविष्याचा वेध घेत स्पर्धा परीक्षा देतच होती ती. आताही UPSC ची एक परीक्षा पास करून दुसऱ्या फेरीच्या तयारीला लागली होती ती...!
आईच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊन तिच्या विराण आयुष्यात नंदनवन फुलवायचे होते तिला...! 


सगळे सुरळीत सुरू असताना या प्रकरणाने मात्र जीवनात भूकंप आल्यागत झाले होते.


नेमक्या त्या दोघी तिथे असतांनाच त्याचा  ॲक्सिडेंट  झाला होता अन् माणुसकीच्या नात्याखातर अन् एक बाप म्हणूनही तिची लेक त्यात  गुरफटली गेली होती.अवनी मात्र मनाने पूर्ण अलिप्त होती. कोरड्या सहानुभूती शिवाय तिच्या मनात कोणत्याच भावना उमटल्या नव्हत्या ना जिव्हाळा ,ना द्वेष..!!!


औषधाचा अंमल उतरताच त्याला जाग आली होती. समोर अवनीला बघून त्याला अजूनच अवघडल्या सारखे झाले.त्याला काय हवे नको तिने जातीने बघितले.
 
न बोलताच तिचे सारे काही करून जाणे त्याला भूतकाळात घेऊन जायचे अन् तिच्यावर त्याने केलेल्या अन्यायाने त्याचेच मन विदीर्ण व्हायचे .तिचे अबोल असणे तर त्याहून बोचायचे...! अंशू सुद्धा जेवढ्यास तेव्हढेच बोलायची.

त्या घरात त्याच्या  येण्याने एक अनामिक कोंडी निर्माण झाली होती....!

आता तो स्थिर स्थावर झाला होता. आज त्याने स्वतः हूनच अवनी शी बोलायचे ठरवले....
"अवनी मला माफ कर मी गुन्हेगार आहे तुझा. तुझ्या वाटेत सदैव काटे पेरूनही तू माझ्यावर नेहमी फुलांची पखरणच करत राहिलीस.मी  तुला,तुझ्या प्रेमाला  कधी समजूच शकलो नाही, एक पत्नी तर सोडच पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा मी तुला न्याय देऊ शकलो नाही.
जिच्या साठी मी माझ्या मायेची माणसं सोडली तिचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतेच. फक्त स्वतः चा स्वार्थ अन् माझा पैसा एवढंच हवं होतं तिला. ती जाळं फेकत गेली अन् मी त्यात गुरफटत गेलो. आज संपूर्ण रिकामा माणूस समजून खड्यागत फेकून दिलं त्या मायलेकांनी मला...!
आज स्वतः वर वेळ येताच मला तुझ्या दुःखाची तीव्रपणे जाणीव झाली. मी माफीच्या लायक नाही पण मला माफ कर अवनी...!

"मी हे सारं कधीचीच विसरलेय,तुम्ही गुन्हेगार आहात त्या निष्पाप जीवाचे,अंशुचे...! तरीही माझ्या संस्कारांना जागत तिने जी माणुसकी दाखवली ना म्हणून मी तुम्हाला घरात घेतलं.पण यापुढे तुमचं काय करायचं याचा निर्णय फक्त अंशू घेईल. मला अजून काही बोलायचं नाही."

 आज लवकर घरी आलेल्या अंशुच्या कानावर त्या दोघांचा संवाद पडला होता.आईची अलिप्तता अन्  सोसलेल्या आघातांच्या झळा तीने जवळून अनुभवल्या होत्या. त्यामुळे आई दुखावली जाणार नाही असाच निर्णय घ्यायचा तिने ठरवले होते.


"जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कधीच पाठीशी नव्हते बाबा, ना शरीराने ना मनाने..!माझी आईच माझे सर्वस्व आहे ,माझी आई अन् बाबा दोन्ही!! त्या दिवशी तुम्हाला तिथे पाहिल्यावर मी सुद्धा झटकून देऊ शकले असते पण माझ्या आईने दिलेली कर्तव्याची जाणीव मला तसे करू देईना म्हणून पुढचे सारे मी कर्तव्य अन् माणुसकीच्या नात्याने केले. आता तुम्ही बरे झालात, आता तुमचा आणि आमचा मार्ग वेगळा...!
उपचारांच्या पैशाची चिंता करू नका ,ते मी दिलेत अन् यापुढेही कधी गरज लागली तर जरूर सांगा. ही लेक नेहमीच तत्पर असेल कर्तव्य म्हणून!!! आम्ही दोघी आमच्या विश्वात आनंदी आहोत,तुम्ही आता तुमच्या मार्गाने जाऊ शकता." अंशू 

अंशू चा सडेतोड निर्णय बघून तो वरमला होता,लगेच तिथून तो निघाला होता..!

खरंच किती अनाकलनीय होते ना त्याच्यासाठी तिला समजणे..!तीन स्त्रिया त्याच्या जीवनात आलेल्या ,ज्या त्याला कधी समजल्याच नव्हत्या...,अन् समजल्या असत्या तर कदाचित चित्र वेगळे असते...!

मी माझ्या परीने कथेचा शेवट केला आहे. तुम्हाला काय वाटते. अवनी आणि अंशू चा निर्णय योग्य की अयोग्य जरूर सांगा तुमच्या कॉमेंट्स मधून.

©® मुक्ता बोरकर - आगाशे