Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

थ्रील

Read Later
थ्रील


"आभाळ फाटलंय, वादळवाऱ्यात सहलीचं हे कसलं खूळ रश्मी?," पप्पा रागावले.

"पावसाळ्यात ट्रेकिंग जाम थ्रीलिंग असतं पप्पा," रश्मी हट्टीपणाने बोलली.

"कशाचं थ्रिलिंग? काही कळतं का तुम्हा पोरांना...आणि कुठला ग्रुप आहे हा इतक्या प्रचंड पावसात ट्रेकिंगला नेणारा? मला नंबर दे जरा मी बोलतो आणि त्यांनाही समजावतो..."

"नाही पप्पा, असं अजिबात करायचं नाहीस तू, कुणाच्याच आईबाबांची काहीच हरकत नाही आहे, सगळे कूल आहेत एकदम, तुझ्यासारखे नाहीत, नाही
नाही नाही करत असतोस तू सारखा," रश्मी चिडून रडवेली होत म्हणाली.

"थ्रीलचा अर्थ तरी कळतो का तुम्हा पोरांना?असले जीवघेणे उद्योग म्हणजे थ्रील नव्हे...
मनाने ठरवलं तर साध्या छोट्या गोष्टींमध्येही थ्रील गवसेल बघ..."

रश्मी रुसून बसली होती. पप्पा बोलतच होता.

"झाडं लावण्यात आनंदाचं थ्रील, अडलेल्यास मदत करतांना समाधानाचं थ्रील, अगदी आईला स्वयंपाकघरात मदत करताना नाविन्याचं थ्रील सापडेल, फक्त तसा दृष्टिकोन हवा..."
"तुमच्या जीवघेण्या थ्रिलसाठी मी अजिबात परवानगी देणार नाही, हा विषय इथेच संपला," पप्पा कठोर झाला होता.

हिरमुसल्या रश्मीने तिची ट्रेकिंग पास तिच्या मैत्रिणीला, पूनमला दिली.

दोन दिवसांनी ट्रेकिंगची बस रवाना झाली होती. रश्मीने पूनमला फोन केला.

"काय यार रश्मी, तू सगळी मजा मिस करते आहेस. आमची अगदी धमाल सुरू आहे बस मध्ये, ट्रेकिंगला तर फारच मज्जा येणार आहे. सगळ्यांची मस्त गट्टी जमली आहे, गाणी, गप्पा, हसणे, चिडवणे अशी धमाल मस्ती सुरू आहे...
खरंतर तू मला पास दिलीस त्याबद्दल थँक्स डिअर... तुझ्यामुळेच आज मी इतकं एन्जॉय करू शकते आहे पण तेवढंच तुला मिस करते आहे गं, तू असायला हवी होतीस आमच्यासोबत..."

नंतर 5 मिनिटे अश्याच सगळ्या गप्पा करून पूनमने फोन बंद केला.

रश्मीच्या डोळ्यांत पाणी होते की तिला एन्जॉय करायला मिळाले नाही.

ती उदास होऊन खोलीत बसली होती.

"पप्पा ना अगदी ओल्ड फॅशन्ड झाला आहे आजकाल. नवीन जमानातल्या नवीन गोष्टी त्याला आवडतच नाहीत. बाकीच्यांचे आईबाबा कसे जमान्यासोबत चालणारे आहेत, पण आमच्याकडे मात्र आनंदीआनंदच आहे सगळा....
बरं, प्रत्येक गोष्टीसाठी यांची परवानगी आवश्यक नाहीतर अजून ओरडा बसणार," असे उलटसुलट विचार रश्मीच्या मनात येत होते.

तेवढ्यात पप्पाने तिला ओरडून आवाज दिला, "रश्मी, हे बघ, काय न्यूज आली आहे टी व्ही वर, बाहेर ये पटकन.."

रश्मीने बघितले तर टी व्ही वर ब्रेकींग न्युज झळकत होती...'जोरदार पावसामुळे दरड कोसळून ट्रेकिंग ग्रुपची बस दरीत...सगळे ठार झाल्याची संभावना...'

रश्मी थरथर कापत रडायला लागली. पप्पा पण सुन्न झाला होता.

"पप्पा, काय झालं हे.."म्हणत रडत रडत ती त्याच्या कुशीत शिरली. त्याक्षणी दोघांच्याही मनात एकच विचार होता की त्या बसमध्ये रश्मी असती तर....

त्या विचारानेच थरकाप उडाला होता, घटनेचे दुःख तर होतेच.

"तुझं बरोबर होतं पप्पा, या वातावरणात ट्रेकिंगचा हट्ट नको होता. तू जाऊ नाही दिलेस म्हणून मी वाचली. तू सगळ्यांना सांगितले असतेस तर हे असलं काही घडलंच नसतं, सगळे सुखरूप असते....आणि पूनम...." तिची आठवण येताच रश्मी रडायला लागली.

"मीच कारणीभूत आहे पप्पा, मी जर ती पास पूनमला दिलीच नसती तर आज तिचे प्राण वाचले असते....माझ्यामुळे तिचा जीव गेलाय," रश्मीला अश्रू आवरणे कठीण झाले होते.

"तुझा दोष नाही रश्मी, तुझा उद्देश वाईट थोडीच होता. जो झाला तो एक अपघात आहे, दैवयोग आहे. माझ्या किंवा तुझ्या म्हणण्याने, वागण्याने कुणाचं आयुष्य कमी अथवा जास्त होऊ शकत नाही बेटा.
स्वतःला दोष नको देऊस...."

"हं मी एक मात्र करू शकलो असतो, जसा तुझ्या बाबतीत कठोर झालो होतो तसच कठोर होऊन सगळ्यांनाच थांबवायला हवं होतं मी , कदाचित अपघात टळला असता....."

पूनम ची आठवण येऊन रश्मी अजूनच रडायला लागली आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला.
बघते तर काय...'पूनम कॉलिंग'...

तिचा विश्वासच बसेना.
फोन उचलण्याचा तिचा धीरचं होत नव्हता.
थरथरत्या हाताने तिने फोन उचलला.

"रश्मी...," पूनम रडत बोलत होती आणि रश्मी चकित झाली.
"पूनम तू?...तू...तू तर बसमध्ये होती ना...," रश्मीला काहीच सुचत नव्हते.

पूनमचा आवाज ऐकून तिला आनंद झाला होता. तिच्या मैत्रिणीचे प्राण वाचले होते. पण कसे?

"रश्मी...तुझे आभार कसे मानू," पूनम रडत रडत बोलत होती.

"तुझ्या फोनमुळे माझे प्राण वाचले गं. तुझा फोन आला तेव्हा समोर काहीतरी अडचणींमुळे रस्ता बंद होता म्हणून आमची बस उभी होती. सिग्नल प्रॉब्लेम मुळे मला तुझे बोलणे क्लीअर ऐकू येत नव्हते म्हणून मी बस मधून खाली उतरले, थोडं दूर जाऊन तुझ्याशी बोलत होते.

नेमकी तेव्हाच ट्राफिक सुरू झाली आणि ड्रायव्हर काकांनी पटकन गाडी पुढे घेतली...मी थांबा थांबा असं ओरडत पळतच निघाले तेवढ्यात दरड कोसळून अपघात झाला...माझ्या डोळ्यासमोर बस दरीत कोसळली,"

सांगता सांगता पूनमला अश्रू अनावर झाले होते तर रश्मीची सुद्धा तीच परस्थिती होती.

अपघातात गेलेल्या मित्रमैत्रिणींसाठी वाईट तर वाटत होतेच पण दोघीही दैवयोगाने बचावल्या होत्या, रश्मी न जाऊन आणि पूनम जाऊन सुद्धा!

दोघींनीही देवाचे आभार आणले आणि सोबतच उद्गारल्या ,

"काळ आला होता पण वेळ आली नव्हती!"

© डॉ समृद्धी अनंत रायबागकर, अमरावती

कथा: थ्रील
विषय: काळ आला होता पण वेळ आली नव्हती
कॅटेगरी: राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
टीम: अमरावती

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//