Jan 19, 2022
नारीवादी

तिघी बहिणी

Read Later
तिघी बहिणी

#तिघी बहिणी

यमुचं लग्न सखारामाशी लागलं नि ती शहरात रहायला आली. गावी शेतीभाती होती. सासूसासरे,दिर होता. सखारामाचे खायचे वांदे म्हणून यमुच्या सासूने यमुला त्याच्यासोबत मुंबयला धाडली.

जोडीनं रहायला मिळणार म्हणून दोघंबी खूष झाली. सखारामाने कर्ज काढून चाळीत खोली घेतली. यमुच्या रुखवतात सगळा संसार आलेला म्हणजे बघा, चार हंडे,दोन कळशा,एक टाकी,टोप,टोपावर झाकण्या,कपबशी सेट,चमचे,भांडी ठेवायचा स्टँड,ताटं,वाट्या,तांबे,जग. हे काहीच नाही..पलंग,पलंगावर ठेवायला मऊ गादी,उशा,गोदरेजचं कपाट..सगळंच. 

जावईबापू नोकरदार होता. यमुच्या वडलांनी त्याला खूष केलं होतं नि जे दिलं ते लेकच तर वापरणार होती असं यमुच्या वडलांच मत. दोन भावांच्या मागली यमु. एकुलती एक मुलगी म्हणून तिच्या आईवडिलांना तिचं जरा जास्तीच कौतुक होतं. यमुला निरोप देताना बापाचं ह्रदय हललं होतं. 

यमु सखारामासोबत नांदू लागली. तिने स्वैंपाकघर छान सजवलं. हांडे,टाकी,कळशा सगळं रचून ठेवलं. किराणा भरला. यमु नि सख्याच्या रात्री सजू लागल्या. पैलवानगडी सख्या नि नाजूक चवळीची शेंग यमु..सगळं कसं गुलाबी गुलाबी नि या गुलाबीची परिणीती गोड बातमीत झाली. यमुला चिंचा खाव्याशा वाटू लागल्या,आवळे खावेसे वाटू लागले. सख्याला तर यमुला कुठं ठेवू नि कुठं नकोसं झालं.

सख्या यमुला खूप जपायचा. कामावर जाताना तिला कुठे जड सामान उचलू नको,जास्ती दगदगीचं काम करु नको म्हणून सांगायचा. रात्री यमुच्या पोटावर हात ठेवायचा नि येणाऱ्या लेकराशी बोलायचा. यमु म्हणायची "कोण आसलं व मुलगा की मुलगी?"

सख्या म्हणायचा,"अगं देवाचं देणं ते. जे काय देईल ते आपलं. जास्ती इचार करीत नाय बसायचं."

यमुला सातवा महिना लागला नि गरगरीत पोट दिसायला लागलं तसं शेजारपाजारच्या म्हणू लागल्या,"बाई गं यमु,तुला मुलगाच व्हणार बग. पोटच सांगतय तुझं." यमु पोटावर हात फिरवून खूष व्हायची. 

यमुचे वडील येऊन तिला माहेराला घेऊन गेले. यमुविना सख्याचा दिवस कसातरी जायचा पण रात जाता जाईना. रात्री यमुला फोन करायचा. तिच्याशी बोलायचा. यमुचं आपलं एकच,"अवो इतल्या बायाबी म्हनत्याती, मुलगाच व्हनारय मला."

सख्या तिला समजवायचा पण ती आपल्याच धुंदीत असायची. दिवस भरले तसे यमुच्या पोटात कळा यायला लागल्या. लगेच हॉस्पिटलात एडमिट केलं. यमुची आई नि मामी होती सोबत. यमुला सांगत होत्या,"बाय वायच कळ काढ. झालंच..झालंच बघ." 

नर्स येऊन तपासून जात होती. पोरीला कळा सहन होईनात. घामाने डगडगली. खाटीला दोन्ही हातानी गच धरुन जोर लावला नि बाळ आलं की बाहेर. नर्सने पुसूनबिसून तिच्या दुधाला लावला. 

यमुने वाकून पाह्यलं तर मुलगी. तिचा भ्रमनिरास झाला. तिला मनापासून मुलगा हवा होता मग त्यासाठी सिझर झालं असतं तरी चाललं असतं तिला. लालगुलाबी इवल्या डोळ्यांची,इवल्या हातांची लेक चुटुचुटु दूध प्याला लागली.

 सख्याला बातमी कळली तसा लगोलग गाडीत बसला. संध्याकाळच्या इरडीला,हॉस्पिटलात हजर. सख्या आला तेव्हा यमु झोपलेली नि बाळी पाळण्यात टुकुटुकु बघत होती. सख्याने तिला उचलून घेतलं. छोटीने तिची बोटं त्याच्या ओठांवर,गालावर फिरवली. सख्याला खूप आनंद झाला. यमु उठेस्तोवर तो छोटीसी खेळता खेळता सासूबाईंशी बोलत बसला.

यमु सख्याला पहाताच जोरात रडू लागली. तिची आई म्हणाली,"काहिले रडते पोरी? अगं पोरगी झाली म्हनून रडतियास. मला तर किती आनंद झाला व्हता तू झालीस तवा. अशी रडत राह्यलीस तर दूध कुठून यायचं. दूध आटलं मग लेकराले काय भरिवनार हायस?"

सख्याने यमुला शांत केलं. म्हणाला,"देवाचं देणं हाय हे. नक्षत्रावानी लेक झालीय आपल्याला. डोळे आक्शी तुझ्या डोळ्यावानी टप्पोरे हायती नि पठ्ठीनं रंगबी तुझाच घितला. बघ कशी टकामका बघतिया. इचारतिया मले, आई काहून रडती."

छोटीचं नाव रखमा ठेवलं. छोटीच्या बारशाला यमुचे सासुसासरे,दिर सगळी आली होती. तीन महिने झाल्यावर सख्या, यमुला नि रखमाला मुंबयला खोलीवर घेऊन आला. 

यमु रखमाची देखभाल करत होतीच. कितीही म्हंटलं तरी आईच ती पण तिला हवा होता मुलगा. रखमा वर्षाची होत नाही तोवर यमु परत गर्भार राहिली. डॉक्टरांनी पाळण्यात अंतर ठेवा म्हणून.सांगितलेलं खरं. सख्यानेही तिला ते समजावून सांगितलं पण यमु हट्टाला पेटली होती. 

दुसऱ्यांदा गर्भार राहिल्यावर यमू खूष झाली. रखमेला आंघोळपांघोळ घालताना म्हणायची,"रखमे,आता तू ताई व्हनार. तुझ्या संगती खेळायले भाऊ येणार." आई इतकं लाडे लाडे बोलतेय म्हंटल्यावर रखमा खुदकन हसायची. यमु देवाजवळ रोच एकच मागणं मागायची,"देवा माझ्या पोटी पोरगा जन्माला येऊदे. बास इतकंच मागणं देवा."

पण दुसऱ्या वेळीही मुलगीच झाली. यमु परत रडली. यावेळी तिची सासू आली होती. सासूनेही तिला समजावलं,"असा खुळेपना करु नये माय. लक्षुमी आलिया नि काहून रडतेस!"

दुसऱ्या मुलीचं नाव सुषमा ठेवलं. सुषमा जन्माला आल्यामुळं रखमाला दूध मिळेना झालं. तिच्यासाठी खिमटी,शिरा असं कायकाय यमुची सासू करु लागली. सासूने चार महिने यमुला पाण्यात हात घालू दिला नाही. घरातली भांडीकुंडी, कपडे धुणं सगळं करायची शिवाय मुलींना सांभाळायची. 

सुषमा दिडेक वर्षाची होईस्तोवर यमु परत गर्भार राहिली. आता मात्र तिला मुलगा हवाच होता. तिने सगळ्या देवांजवळ प्रार्थना केल्या. तिसऱ्या वेळेलाही मुलगीच..यमुला आता वेड लागायचं शिल्लक राहिलं होतं. मुलगा हवा म्हणता म्हणता मुलींची लाईन लागली.

 तिसरीचं नाव पुष्पा ठेवलं. तिघी लेकी दिसायला देखण्या..गोऱ्यापान,टप्पोऱ्या डोळ्यांच्या,गोबऱ्या गालांच्या. सख्या नि सख्याची आई यमुला मुलं बंद होण्याचं ऑपरेशन करुन घे म्हणून विनवू लागली पण यमु ऐकायला तयार नव्हती. तीन मुलींचं काम काय थोडं! यमुची सासू तिच्या मदतीला तिच्यासोबत राहू लागली. 

यमुने तिचा हट्ट कायम ठेवला नि चौथ्या वेळा गर्भार राहिली. आताशी तिला अशक्तपणापण आला होता. दोन मुलांमधे आवश्यक तेवढं अंतर न ठेवल्याने मुलींनाही आईचं दूध हवं तसं मिळालं नव्हतं त्यामुळे त्या अशक्त होत्या.

 यमुच्या असमाधानी स्वभावामुळे व अशांत मनामुळे ती दिवसेंदिवस रोड होत चालली होती. या बाळंतपणात तिच्या पुऱ्या अंगाला सूज आली होती. बीपीही सतत वाढलेला असायचा. अंगात रक्ताची कमी होती. बाळंतपणात बाहेरुन रक्त लावावं लागलं. 

चौथ्या वेळी मात्र यमुला तिच्या इच्छेनुसार मुलगा झाला.मुलाचं दर्शन घडताच यमु फार खूष झाली. बाळाचं वजन कमी असल्याने त्याला सात दिवस कापसाच्या पेटीत ठेवलं होतं. आठव्या दिवशी यमीची नि बाळाची भेट झाली. 

बाळाला घरी आणलं. रखमा,सुषमा,पुष्पा तिघी बहिणी छोट्या बंधुराजाला पाहून खूष झाल्या. बाळाचं बारसं थाटामाटात केलं. दोन्हीकडच्या नातेवाईकांना,चाळीतील रहिवाशांना बुंदीच्या लाडवाचं जेवण घातलं. बाळाचं नाव विजय ठेवलं.

मुली एकापाठोपाठ एक शाळेत जाऊ लागल्या. त्यांच्यापाठोपाठ काही वर्षांत विजयही शाळेत जाऊ लागला. सासू आता येऊनजाऊन असायची. घरात यमू,सख्या नि त्यांची चार मुलं. यमुने लेकींना चांगल वळण लावलं होतं. तसंच वळण तिने लेकालाही लावलं. भावंडांत धाकटा,मुलगा म्हणून त्याला डोक्यावर चढवलं नव्हतं.

मुली आईला घरकामात मदत करायच्या. थोड्या मोठ्या झाल्या तशा धुणंभांडीलादी सगळं लेकी आपला अभ्यास सांभाळून करु लागल्या. यमुचीही तब्येत सुधारली होती. फावल्या वेळात ती शिवणकाम करु लागली. तिच्या मुलींचे फ्रॉक,ड्रेस शिवायची. ते पाहून त्यांच्या मैत्रिणीही तिच्याकडून ड्रेस शिवून घेऊ लागल्या. सख्याचं आपलं,आपलं काम नि आपण असा स्वभाव होता. 

मोठी मुलगी रखमा,एमए बीएड झाली. ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापिका म्हणून लागली. दोन नंबर सुषमा, बीकॉम झाली. बँकेच्या परीक्षा देऊन एका सरकारी बँकेत  नोकरीला लागली. पुष्पाला खेळाची आवड होती. ती कब्बडीपट्टू होती. 

विजय अकरावीत होता. त्याला थोडं अस्वस्थ वाटायचं,कुशीत दुखायचं पण त्याने ते अंगावर काढलं. त्याचं कॉलेज,खेळ सगळं नियमित चालू होतं. एकदा जास्तच दुखू लागलं. इतकं की तो कळवळू लागला.

 शहरातल्या नामवंत डॉक्टरकडे सख्या व यमू विजयला घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी केली.  
रिपोर्ट घेण्यासाठी सखा गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याला समजावून सांगितलं की त्याच्या मुलाच्या,विजयच्या दोन्ही किडन्या निकामी होत आल्यात. किडनी रिप्लेसमेंटशिवाय पर्याय नाही. 

सखा व यमुच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. विजयला डायलिसिसवर ठेवलं होतं. यमु व सखा दोघंही हॉस्पिटलमध्येच असायचे. तिघी मुली घर सांभाळायच्या. हॉस्पिटलमध्ये डबे घेऊन जायच्या. 

यमुने तिची किडनी मुलाला देण्याचा निश्चय केला. डॉक्टरांनी यमुच्या सगळ्या टेस्ट केल्या. मुत्रपिंड प्रत्यारोपणाची तारीख ठरवण्यात आली पण त्याआधी दोन दिवस, विजय देवाघरी गेल्या. बहिणींना ही बातमी कळताच त्या बेशुद्ध पडल्या. शेजाऱ्यांनी त्यांना सावरलं. 

रात्री एम्ब्युलन्समधून विजयचं शव त्याच्या घरी आणलं तेव्हा बहिणींनी एकच आकांत केला. यमु तर सुन्न झाली होती. चाळीतली सारी लहानथोर खाली जमा झाली होती. इतकंच काय,चाळीतला मोती कुत्राही जमिनीला तोंड लावून बसून होता. काय कळतं ना मुक्या प्राण्यांना. 

यमुला सोबत म्हणून तिची सासू आता त्यांच्या घरी राहू लागली पण तीही आता म्हातारी झाली होती. एखाद्या कोनात बसून असायची. यमु घराबाहेर पडायची बंद झाली. तिच्याच दु:खात बुडून रहायची पण मुलींनी तिला पुन्हा माणसात आणलं.

एकेका मुलींची लग्न झाली. यमुला सुविद्य,सुशील जावई मिळाले. तिन्ही मुली आईवडिलांची काळजी घेतात. आलटूनपालटून माहेरी जात असतात. सुट्टीला त्यांच्यासोबत रहातात. कमी वाटते ती फक्त विजयची. यमुचा प्रत्येक क्षण विजयच्या आठवणीत जातो. बहिणींचीही तीच तर्हा. रक्षाबंधन,भाऊबीजेला तर त्यांना प्रकर्षाने विजयची आठवण येते. 

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now