तीन झुंजार सुना भाग ९

श्रीपत पाटलांच्या सुना सर्व विरोध मोडून काढतात.

                तीन झुंजार सुन

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य           डॉ. अनंत बिजवे

                                Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपत रावांची बायको

प्रताप                          श्रीपत रावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपत रावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपत रावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपत रावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांचीआई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

भाग ९

भाग ८  वरून पुढे वाचा .................

एक दिवस संध्याकाळी, वर्षा आणि विदिशा दोघी जणी शेतावरच्या घरी आल्या. दोघींचे चेहरे गंभीर होते.

“तुमच्या चेहऱ्यांवरून असं वाटतंय की नक्की काहीतरी गंभीर विषयावर बोलायला तुम्ही आल्या आहात. काय झालंय ?” सरिता म्हणाली.

“कारणही तसंच आहे वहिनी.” वर्षा बोलली. “आम्ही इथे आल्याचं त्या दोघांना माहीत नाहीये. आम्ही आपले मार्केट ला जातो आहोत, असं सांगून निघालो.”

“असं लपून छपून येण्याचं काय कारण ?” - सरिता

“कारण आता आमचे नवरे जे काही करायच्या मागे आहेत, ते, त्यांना तुम्हा लोकांना काही कळू न देता करायचं आहे म्हणून. आणि आम्ही तेच सर्व तुमच्या कानावर घालायला आलो आहोत. आता बाबांच्याच हातात आहे सर्व.” विदिशा म्हणाली. 

“काय झालंय ते तर सांगा.” सरीताला अजूनही काही थांग पत्ता लागत नव्हता. 

“शेत बटाई ने कसायला द्यायचा विचार आहे. त्या बाबत बोलणी चालू आहेत. दोघांनाही आता शेतात कष्ट करायचा कंटाळा आला आहे. आणि म्हणून हा उपद्व्याप करताहेत. दोघांनाही कष्ट करायचे नाहीयेत. नुसतं बसून खायचं आहे.” वर्षा अतिशय चिडून बोलत होती. तीचा संताप तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. विदिशाचीही प्रतिक्रिया काही वेगळी नव्हती.

सरिता, अवाक् होऊन हे सगळं ऐकत होती. तिचं डोकं बधिर झालं होतं.

“वहिनी, आई, बाबांना बोलवा ना.” वर्षा म्हणाली.

पण त्यांचा आवाज ऐकून आई, बाबा दोघंही बाहेरच्या हॉल मधे आलेच. म्हणाले “ काय पोरींनो, काय विशेष ?”

त्यांना सर्व सांगितल्यावर ते म्हणाले की

“अगदी नेमकी हीच शंका वासुदेवरावांनी बोलून दाखवली होती. आणि आता पहा तसंच घडतंय.”

“बाबा, तुम्ही त्या वेळी आम्हा दोघींचा हवाला दिला होता. पण आम्ही हरलो हो, खूप भांडणं झाली आमची, समजावण्याचा खूप प्रयत्न केला, अगदी जीव तोडून सांगितलं आम्ही, पण पालथ्या घड्यावर पाणी.” आणि वर्षा आणि विदिशा दोघी ही रडायला लागल्या. म्हणाल्या “तुमच्या विश्वासाला पात्र नाही ठरू शकलो आम्ही.”

श्रीपत राव विचार करत होते. ही दोघंही पोरं नाकर्ती निघाली याच्या पेक्षा दोन्ही व्याही आता काय म्हणतील याचाच ते विचार करत होते. सरिता गप्प बसली होती. ती पण विचारात गढून गेली होती. तेवढ्यात कार थांबल्याचा आवाज आला आणि निशांत आणि विशाल दोघंही आत आले. या दोघींना पाहिल्यावर निशांत म्हणाला, म्हणाला कसला, जवळ जवळ ओरडलाच. 

“तरी मला शंका आलीच होती, की तुम्ही दोघी इथे येण्याचा आगाऊ पणा करणार म्हणून. काय जरूर होती इतक्या घाई घाईने येऊन सांगण्याची ? अजून कशाचा कशाला पत्ता नाहीये आणि तुम्ही राईचा पर्वत करता आहात.”

तो ज्या आवेशाने वर्षा आणि विदीशावर ओरडत होता, ते काही बाबांना रुचलं नाही. ते जारबेच्या सुरात बोलले. “निशांत, मी इथे बसलो आहे. निदान माझ्या समोर तरी आवाज जरा मर्यादे मध्ये ठेवा.”

“बाबा तुम्हाला माहीत नाही, या दोघी किती भांडतात आमच्याशी ते. आम्ही काही म्हंटलं की यांना त्यात खोटच दिसते. आत्ता सुद्धा सांगितलं होतं की नुसती बोलणी चालू आहेत. अजून ठरलं काहीच नाहीये.” निशांतनी आपली बाजू सांगितली.

“अरे तुमचं love marriage आहे ना, मग आता भांडणं कसली ? प्रेमळ भांडणं म्हणतात तशी की काय ?” बाबांनी थट्टेचा  सुर लावला.

“बाबा थट्टा नकोय. या दोघींना भांडायला काहीही कारण लागत नाही.” – विशाल.

“पण आत्ता या वेळेस काय कारण झालं भांडणाला ?” – बाबा.

“बाबा आम्ही येणारच होतो तुम्हाला डीटेल मधे सांगायला पण या दोघींनाही धीर नाही. त्या आल्या धावत धावत. खरं म्हणजे इतकं panic व्हायचं काहीच कारण नाहीये.” निशान्त जरा तक्रारीच्या सुरातच बोलला.

“त्यांचं सोड. तुमच्या बायका आहेत त्या. त्यांना काळजी वाटली म्हणून त्या आल्या. पण आता तुम्ही आलाच आहात, तर सांगा काय भानगड आहे ते.” – बाबा.

“अहो बाबा, भानगड वगैरे काही नाहीये. आम्ही विचार करतो आहे, की शेती आता बटाई

ने कसायला देऊ म्हणून. त्याचीच बोलणी चालली आहेत एक दोघांबरोबर. जर मना

सारखं Proposal आलं तर विचार करू. एवढंच.” – निशांत. 

“एवढंच ?” बाबा आश्चर्य दाखवत म्हणाले.

“हो. अजून काही नाही.” – निशांत.

“शेतीचा कारभार सांभाळल्या जात नाहीये का ?” – बाबा.

“बाबा, दादाची गोष्ट वेगळी होती. त्याला शेतीतलं खूप कळत होतं आणि इंट्रेस्ट पण होता. आम्ही गेली सहा वर्ष काम करतो आहे पण अजूनही आम्हाला शेतीत इंट्रेस्ट येत नाहीये. त्या पेक्षा शेती दुसर्‍याला कसायला दिली, तर धान्य, आणि एक फिक्स रक्कम घरात येईल. चिंता आणि उस्तवारी असणार नाही आणि आम्ही काही वेगळा धंदा सुरू करू शकू. शेवटी काय आहे ? पैसेच तर मिळवायचे आहेत ना. ते मिळवण्याचे बरेच दुसरे मार्ग पण आहेत, त्याचा विचार करू.” निशांतनी एक भाषणच दिलं.

“हं, बराच विचार केलेला दिसतोय, good idea, मग त्याची काही रूपरेषा आखली असेलच, चांगलंच आहे. कळू दे आम्हाला पण.” – बाबा.

“नाही, अजून तसं काही ठरत नाहीये, पण आम्ही दोघं पूर्ण विचार करूनच नवीन धंद्यात उतरू.” – निशांत.

“हूं, म्हणजे सध्या शेती कसायला देणं, हाच, एक कलमी कार्यक्रम आहे तुमचा.” – बाबा.

“नाही, ही सुरवात आहे. धंद्यात उतरण्याची पहिली पायरी आहे.” – विशाल म्हणाला. 

“म्हणजे ही पायरी चढल्यावर दुसऱ्या पायरीचा विचार करायला सुरवात करणार.”- बाबा.

हो, म्हणजे तसंच. थोडा वेळ मिळेल ना, शेतीचा भुंगा मागे असणार नाही. जरा मेंदूला शांतता मिळेल. तेंव्हा शांत पणे विचार करता येईल.” – निशांत.

हा सगळा संवाद वर्षा आणि विदिशाच्या गळी उतरत नव्हता. विदिशाने सरितेच्या खांद्याला स्पर्श करून हळूच म्हंटलं की वहिनी, तुम्ही बोला न काही तरी, “तुम्हाला तरी पटतेय का हे सर्व ? आणि बाबा पण इतकं शांत पणे ऐकून का घेताहेत ?

“काही कल्पना नाही, पण आपण मधे कसं बोलणार ? बघूया, मला असं वाटतंय की बाबा त्यांच्या कडून गोड बोलून सगळं काढून घेताहेत. आणि नंतरच काय तो निर्णय घेतील.” सरितानी तिला काय वाटतं ते सांगितलं.

“हं, असेल तसंच असेल.” विदिशाची सरिताच्या बोलण्यावर प्रतिक्रिया.

“तुमची काय अपेक्षा आहे जो शेती कसायला घेईल त्यांच्या कडून ?” – बाबा.

“काय आहे, तुम्ही आणि दादा होता तेंव्हाची गोष्ट वेगळी होती, आता आम्हाला फारसं काही जमत नाही. त्यांच्या मुळे आम्ही त्यालाच ऑफर मागितली आहे.” – निशांत.

“बरोबर आहे, पण काही तर आकडा तुमच्या डोक्यात असेल ?” – बाबा.

“आमच्या मनात २० लाख वर्षाचे असा आकडा आहे.” – निशांत.

“आणि जो हे कबूल करेल त्याला तुम्ही शेती देणार, बरोबर ना ?” – बाबा.

“हो.” निशांत म्हणाला.

बाबांनी आता सरितेकडे बघून, जणू काही तिचं मत विचारताहेत या अर्थानी भुवया उडवल्या, सरिता समजली. ती समोर आली. म्हणाली

“२० लाख मिळाले तर हा तुमचा निर्णय पक्का आहे का ?” – सरिता.

“वहिनी, तू कशाला विचारते आहेस ? जे काही असेल, त्यात तुला तुझा हिस्सा मिळेलच. तू कशाला काळजी करते आहेस. तसंही तुला शेतीतलं काय कळतंय ?” – निशांत.

“भाऊजी, मला काय कळतंय हा प्रश्नच नाहीये. तुम्हाला २० लाख मिळाले तर तुम्ही काय करणार आहात हा प्रश्न आहे.” – सरिता. 

“हो. पण तू का विचारते आहेस ? तू करते का शेती ? तू देणार आहेस का आम्हाला तेवढे पैसे ?” निशांतनी उगाचच सरिताला खिजवलं.

“हो. मी घेते हा challenge. तयार आहात ? बाबा आहेतच माझ्या बरोबर.” – सरिताचा ठामपणे होकार.

“नाही. आम्ही तयार नाही. बाबांना या वयात आता त्रास देण्याची आमची इच्छा नाहीये. तू राहुच दे. उगाच काहीतरी बोलू नकोस.” – निशांत.

“आमची पण तयारी आहे. सरिता वहिनी जर हा challenge घेणार असतील तर आम्ही पण तिच्या बरोबर आहोत. वहिनी, आम्ही येऊ तुमच्या बरोबर शेता मधे काम करायला.” – विदिशानी पण सरीताला साथ दिली.

“आरशात तोंडं बघा एकेकाची. शेतात राबायचं म्हणजे काय चेष्टा आहे का ?” – विशाल.

“तुम्हाला कंटाळा आलाय ना ? आरामच करायचा आहे ना ? मग तुम्ही आराम करा, आम्ही सोनं पिकवू.” वर्षा बोलली.

“हेss, यांच बघा, उचलली जीभ आणि लावली टाळूला. शेंबूड पुसता येत नाही नाकाचा, आणि म्हणे शेती करणार, उगाच मूर्खासारखी काही बडबड करू  नकोस.” -निशांत

“वर्षा तू थांब. मी बोलते आहे ना. हे बघ निशांत, मी दिलेली ऑफर तुम्हाला मान्य आहे का ?” सरिताने विचारलं.

“नाही.” – निशांत.

“का ? कारण कळू शकेल ?” - सरिता.

“तुला जमणार नाही. अग आम्हालाच झेपत नाहीये तिथे तू काय करणार ? संगळ्यांचीच उपासमार व्हायची. त्या पेक्षा नकोच हा उपद्व्याप.” – निशांत.

“मग मला तुमचा हा शेत बटाई ला देण्याचा निर्णय मान्य नाही.” – सरिता ठामपणे म्हणाली.

“काय ? तू असं कसं करू शकतेस. आम्ही सर्व विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. आणि आता त्यात बदल संभवत नाही. आणि तसंही आम्ही तुला विचारलंच नाहीये. तू आमच्या मधे पडूच नकोस.” आणि असं बोलून दोघेही जणं तावातावाने बाहेर पडले. जाता जाता, वर्षा आणि विदिशाला उद्देशून म्हणाले “ तुम्ही पण या, आम्ही बाहेर थांबलो आहोत. उगाच इथे थांबण्याची जरूर नाहीये.”

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद

🎭 Series Post

View all