तीन झुंजार सुना भाग २२

आता ध्येय पुरती कडे पद्धतशीर वाटचाल सुरू झाली.

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

भाग २२        

भाग २१  वरून पुढे वाचा .................

आता उत्तर द्यायला वर्षा सरसावली “निशांत, तुला जी भीती वाटते आहे, ती अनाठायी आहे. एक तर आता जगात आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता सर्वांच्याच लक्षात आली आहे. गेली १००० वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता म्हणून आयुर्वेदामधे संशोधनाला खिळ बसली होती, पण आता हळूहळू ते पुन्हा सुरू झालं आहे. आणि माझा विश्वास आहे की आता यापुढे जगात आयुर्वेदाला पर्याय असणार नाहीये. त्यामुळे काहीतरी विपरीत घडेल, आणि आपल्याला पारंपरिक शेतीकडे वळण्याची वेळ येईल, असं आम्हाला वाटत नाही.”

“तू एवढं खात्रीपूर्वक सांगते आहेस, पण याला आधार काय आहे ? मला तर हे तुमचं स्वप्नरंजन वाटतंय. नाही वर्षा, हे आम्हाला मान्य नाहीये. आपण दरीत कोसळण्याची वाट नाही पाहू शकत. तुम्ही संकटाला आमंत्रण देता आहात.” निशांतनी चिडून म्हंटलं. वहीनींच्या ऐवजी, वर्षा आणि विदिशाच गड सांभाळत होत्या, त्यामुळे त्याचा अहंकार उसळी मारून वर आला होता.

वातावरण उगाचच तापतंय असं  बघून सरितानी सूत्र आपल्या हातात घेतली. म्हणाली  “निशांत, अरे, असा चिडू नकोस. हे बघ, आम्ही नागपूरला ज्या कंपनीला आपली पिकं विकातो, त्यांनीच आम्हाला सांगितलं की आपल्या मालाची क्वालिटी खूपच चांगली आहे. आणि आता या मालाची डिमांड पण खूप वेगाने वाढते आहे. नागपूरला बैद्यनाथ आहेच आणि आता पतंजली पण सुरू होतेय, तेंव्हा आपण उत्पन्न वाढवायला हवं असं ते म्हणत होते. गेल्या वर्षी आपण फक्त मुसळी आणि अश्वगंधा हीच पिकं घेतली, आता त्यांच्याच सांगण्यावरून या वर्षांपासून भृंगराज आणि गुग्गुळ पण लावणार आहे.”

“पण वहिनी, हा बाजार किती मोठा आहे यांची आपल्याला कल्पना नाहीये, उद्या त्या नागपूरच्या कंपनीने आपला माल घ्यायचं नाकारलं किंवा कमी भाव दिला, तर आपल्याला दुसरं कुठलं पीक घेता येणार नाही. परिस्थितीने जर असं वेगळं वळण घेतलं तर आपण काय करणार आहोत ?” निशांतनी आपली शंका बोलून दाखवली.”

“निशांत,” वर्षा बोलली “ असं काहीही होणार नाही. आम्ही जे सांगतो आहे ते काही नागपूर पुरतंच मर्यादित नाहीये. आता ते राष्ट्रीय धोरण झालेलं आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना आता जाहीर झाल्या आहेत. आपण ज्या औषधी वनस्पती लावल्या आहेत, त्याला आता केंद्र सरकारच्या योजनां मार्फत जवळ जवळ ५० ते ७५ टक्के सबसिडी मिळते आहे. आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याची सुरवात पण केली आहे. आणि आता इंटरनेट असल्या मुळे आपला माल नक्कीच पडून राहणार नाही. आपल्या मालाची क्वालिटी उत्तम असल्याने त्याला भाव पण चांगलाच मिळेल याची खात्री आहे.”

आता विशाल बोलला. “एवढं सगळं आहे! तुम्ही बराच अभ्यास केलेला दिसतो आहे. पण हे सगळं तुम्ही केलं केंव्हा ? आणि ही सगळी माहिती तुम्हाला कशी मिळाली ?”

“अरे विशेष काही नाही, एकदा जागा हेरून, खोदकाम करायचं ठरवलं की खनिज संपत्ति लागतेच हातात. फक्त खोदकाम करण्याचे कष्ट घ्यावे लागतात. ते आम्ही अथक केलं. बस.” विदिशांनी परस्पर उत्तर दिलं.

आता निशांत आणि विशालची बोलती जवळ जवळ बंदच झाली होती. पण निशांत अजूनही आपला हेका सोडायला तयार नव्हता, हार मानायला तयार नव्हता. म्हणाला    “तरीपण मला वाटतं की जरा पुनर्विचार करावा. काय बाबा तुम्हाला काय वाटतं ?”

“सात आठ वर्षांपूर्वी प्रतापनी पण ह्या लागवडीचा विचार केला होता” इतका वेळ नुसते ऐकत असणाऱ्या, बाबांनी आता बोलण्यात भाग घेतला. “पण तुमच्या लग्ना मुळे हा विषय बाजूला पडला आणि मग राहूनच गेलं. तुम्ही दोघंही चिंता करू नका. माझ्या सुना योग्य तेच करताहेत. खूप कष्ट घेतले पोरींनी. मला अभिमान वाटतो त्यांचा.”

“निशांत,” आता विशाल बोलला. “बाबा बरोबर बोलताहेत. मला पटलं आहे की आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे कष्ट या लोकांनी उपसले आहेत. तूच बघ न, आपण २५ एकर शेती कसायला दिली आणि आपल्या हातात किती आले ? फक्त १० लाख. आणि या लोकांनी केवळ ५ एकरात सोनं पिकवलं. आणि तब्बल १८ लाखांच उत्पन्न घेतलं. आपण आता मान्य करायला पाहिजे की या बायका, हवेत बोलत नाहीयेत. बाकी तू ठरव, मला तर वहिनी म्हणतात ते बरोबरच वाटतंय.”

“हूं, आता सगळेच तसं म्हणताहेत तर मी पण होकार देतो.” निशांतनी सपशेल शरणागती पत्करली.

“आणि निशांत,” वर्षा बोलली. “आठव जरा वर्षभरापूर्वी आपण वहिनींना चॅलेंज दिला होता की ५ एकर कसून दाखव, आणि यशस्वी झाली तर पूर्ण ३० एकर घे. नाही जमलं तर पूर्ण शेती रावबाजीला देवू, म्हणून. आठवतंय का ? मग आता जर वहिनी यशस्वी झाल्या आहेत, तर तू एवढी खुसपटं का काढतो आहेस ?”

आता निशांत जवळ खुसपट काढण्या सारखं  काहीच नव्हतं. तो हसला आणि म्हणाला की “ नाही मी अडवत नाहीये, मला जरा काळजी वाटत होती म्हणून तसं बोललो. पण आता लक्षात आलं आहे की तुम्ही जे करता आहात ते पूर्ण विचारांती करता आहात. आम्ही दोघेही तुमच्या बरोबर आहोत.”

आता बाबा म्हणाले. “ चला सर्व प्रश्नांची तड लागली. रावबाजीचा प्रश्न सुद्धा मिटला. आता आज आपण आपल्या सर्व लोकांबरोबर संध्याकाळ मजेत घालवू. चांगली मेजवानी करू. मग उद्या पासून आहेतच न संपणारी कामं.”

ती संध्याकाळ मग सगळ्यांची छान गेली. मजूर लोकांना पण बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी, सरिताने सर्व मजुरांना कामं वाटून दिली आणि ती बाबांना म्हणाली की “बाबा, थोडं बोलायचं होतं.”

“अग मग बोल की” बाबा म्हणाले.

“रावबाजी काही चूप बसणारा माणूस नाहीये. आता आपल्या शेतात आपण महागडी रोपं  लावणार आहोत, आणि त्यांची व्याप्ती आता ३० एकरांवर जाऊन पोचणार आहे. तेंव्हा जरा विचार पडतो आहे.” – सरिता.

“का ग टेंशन आलं का तुला ?” – बाबा

“नाही हो, पण म्हणजे एका अर्थांनी हो.” – सरिता.

“काय कारण आहे ? नीट सविस्तर सांग बघू. म्हणजे त्यावर काही उपाय करता येईल, गोष्टी वेळ असतानाच निस्तरायला पाहिजेत. उशीर केला, आणि चिघळल्या तर फार भारी पडेल.” – बाबा

“मला विचार पडतो आहे की जर रावबाजीने असं काही केलं, की ज्यामुळे आपल्या पिकांची नासाडी होईल, तर आपण काय करणार आहोत ? आपली सगळी पिकं हाय व्हॅल्यू  आहेत. आणि मालाची ऑर्डर आणि अडवांस आधीच घेऊन ठेवल्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.” सरितानी तिच्या मनात असलेली भीती बोलून दाखवली.

“पण ही भीती तुला का वाटते ? शेताला कंपाऊंड आहे आणि आपल्याजवळ माणसं पण आहेत. रात्रीची गस्त घालणं काही अवघड नाहीये.” – बाबा

तेवढ्यात निशांत, विशाल आणि वर्षा, विदिशा येऊन पोचले. मग चहा नाश्ता झाल्यावर, सरितानी तिचं आणि बाबांचं काय बोलण सुरू होतं त्याबद्दल सांगितलं. चर्चा पुढे चालू झाली.

“हो, खरंच वहिनी, बाबा म्हणताहेत ते बरोबर आहे, प्रॉब्लेम कुठे आहे ?” – विशाल.

“माझ्या लक्षात येतंय” विदिशा म्हणाली “ वहिनींना काय म्हणायचं आहे ते. रावबाजीने दीड ट्रक शेणखत चोरून नेलं होतं. जो माणूस हे काम, चुपचाप, अगदी, या कानाचं त्या कानाला कळू न देता, करू शकतो, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. हो, न वहिनी ?”

“हो, असाच विचार मनात येतो आहे. काय करावं ?” – सरिता.

निशांत आणि विशालला, या प्रश्नात काही दम वाटत नव्हता. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, आणि हसले. निशांत म्हणाला “ वहिनी, तू उगाच चिंता करते आहेस. कालच्या घटने  वरून रावबाजीने बोध घेतलाच असेल. आता तो असं काही करण्याचा विचार पण मनात आणणार नाही. तू निश्चिंत रहा.”

“निशांत” सरिता म्हणाली, “ काल तू म्हणाला होतास की 

‘वहिनी, तू फार मोठी रिस्क घेतलीस. तू नागाच्या शेपटीवर पाय  ठेवला आहेस. अग रावबाजी साधासुधा  माणूस नाहीये. तो आता कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही. अग जरा तरी विचार करायचा होतास.’

हे तुझच वाक्य आहे ना निशांत ? मग आज तुला तो एकदम निरुपद्रवी कसा वाटतो आहे ?”

निशांत जवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तो गप्प बसला. मग म्हणाला “मग आता काय करायचं ? बाबा म्हणाले त्या प्रमाणे आपण सुरक्षा करू शकतो.”

वर्षा पण म्हणाली “ वहिनी तुम्ही अनाठाई चिंता करता आहात. एवढी माणसं आहेतच की आपल्या जवळ.”

पण सरिता काही बोलायच्या आत, याचं उत्तर विदिशानी दिलं. “मला वाटतं की वाहिनींच्या मनात काय चाललं आहे ते माझ्या लक्षात आलं आहे.”

“नेहमीच तू असं कसं म्हणतेस की तुला कळलं आहे म्हणून ? तू अंतर्यामी आहेस की काय ?” विशालनी थट्टेच्या सुरात म्हंटलं.

“नाही, पण मी सतत वहिनीच्या बरोबर असते ना, म्हणून मला पण, आता त्यांच्या मनात काय चाललंय ते थोडं फार कळायला लागलय.” विदिशाने वार परतवला.

“असं ? मग कळू दे आम्हाला.” – विशाल. अजून विशाल थट्टेच्याच मूड मधे होता.

“मला जेवढं समजलंय त्यावरून सांगते, मुसळी आणि अश्वगंधा दोन्ही गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते. त्या साठी माणसंच लागतात. दुसरं आपण भृंगराज लावणार आहोत, त्याला वर्षभर बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात. आणि ..” विदीशाला निशांतनी मध्येच थांबवलं. म्हणाला-

भृंगराज ही वनस्पती आमच्या माहिती प्रमाणे, रानटी वनस्पती आहे आणि तिची काहीही काळजी घेण्याची जरूर नसते. आम्ही तर असंही ऐकलं आहे की मुख्य पिकांच्या मधे बऱ्याच वेळेला ही वनस्पती उगवते, आणि ज्यांच्या शेतात ही उगवते, त्या शेतातलं तण म्हणजे ही वनस्पती मजूर लोकं विनामूल्य काढतात आणि विकतात.”

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all