तीन झुंजार सुना भाग १५

सुना आता कार्यरत व्हायला लागल्या आहेत. बघूया पुढे काय होतं ते.

                       तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेव राव सुळे                  वर्षाचे वडील

विजया बाई                      वर्षांची आई.

शिवाजी राव                     विदिशाचे  वडील

वसुंधरा बाई                     विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीक राव                      शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

भाग १५

भाग १४ वरून पुढे वाचा .................

“हे सगळं ऐकून बाबा म्हणाले की बारक्या म्हणतो आहे ते बरोबर आहे. सरिता तू एकदा विचार कर.” – बाबा.

“पण बाबा, एवढे पैसे आपण नाही देऊ शकणार.” सरिता म्हणाली.

“बारक्या,” बाबा म्हणाले, “तू त्यांना असं सांग की कायमची नोकरी हवी असेल तर पगार फक्त २०० रुपये मिळेल. त्यांच्या राहण्याची सोय आपण करू. इथे मोकळी जागा आहे तिथे एक टीन शेड बांधून देऊ. दोन्ही वेळेचं जेवण सुद्धा आपल्याकडे. मग त्यांना २०० रुपये रोज परवडायला हरकत नाही. त्यांना काही खर्चच नाहीये. विचारून बघ. तयार असतील तर ठीक आहे नाही तर जाऊ दे.”

“ठीक आहे बोलतो त्यांच्याशी.” असं म्हणून बारक्या गेला.

जेवण झाल्यावर बाबा थोडी वामकुक्षी करत  होते आणि सरिता पडल्या पडल्या पुढचा विचार करत होती. अशात बाहेर स्कूटर थांबल्याचा आवाज आला. आता या वेळेला स्कूटर वरून कोण आलं असावं असा विचार करत सरिता उठली. पाहिलं तर नवी कोरी हार घातलेली स्कूटर दारात उभी होती, वर्षा आणि विदिशा स्कूटर वरूनच आल्या होत्या.

“अरे वा नवीन घेतलेली दिसते आहे स्कूटी. अभिनंदन.” सरिता म्हणाली. बाबा पण आता बाहेर आले होते. त्यांना पण आनंद झालेला दिसत होता. ते पण म्हणाले “वा छान, छान आता तुम्हाला बाहेर कुठे जायला अडचण येणार नाही.”

“हो बाबा म्हणूनच मागे लागून, लागून घेतली. इतर कुठे तर नाही, पण इकडे यायला फार मिनतवाऱ्या कराव्या लागायच्या, म्हणून. आता प्रश्न नाही.” वर्षा म्हणाली.  

थोडा वेळ इकडचं तिकडचं  बोलणं झाल्यावर वर्षा म्हणाली की वहिनी, “आम्हाला इथे यायची खूप इच्छा होती पण गाडी नसल्यामुळे येताच आलं नाही. शेवटी हट्ट करून स्कूटी घेतली आणि आलो.” 

“का ग, दोन दोन गाड्या आहेत घरी मग काय प्रॉब्लेम होता ?” सरितानी विचारलं.

“एक गाडी विकली. परवडत नाही म्हणे. पण ते जाऊ द्या. आम्हाला काही सांगायचं आहे, म्हणून आम्ही आलो आहोत.” विदिशा म्हणाली.

“असं काय सांगायचं आहे ?” – सरिता.

“या दोघांना काही व्यवसाय करायचा होता म्हणून शेती कसायला दिली असं म्हणाले होते ना ?” – विदिशा.

“हो.” – सरिता.

“पण तसं काही दिसत नाहीये. दोघंही नुसते बसून आहेत. अमरावतीला जातात आणि सिनेमे बघतात. मित्रांना जमा करून आणिक काय करतात देव जाणे. आम्ही त्यांना बरंच समजावण्याचा प्रयत्न केला पण आमच्या कडे दुर्लक्ष करतात.” वर्षा काळजीने म्हणाली.

“मग आता ?” – सरिता.

“वहिनी तुमचे कुठलेही प्लॅन्स पूर्ण होऊ नये म्हणून ते दोघं आणि तो रावबाजी काही तरी ठरवत असतात.” – विदिशा.

“असं का ?” सरितानी विचारलं.

“माहीत नाही. पण मग आम्ही ठरवलं की आता गोडी गुलाबीने घ्यायचं. मग आम्ही त्यांना सांगितलं की एक दिवस मी आणि एक दिवस विदिशा इथे येत जाऊ. आणि तुम्हाला मदत करू. म्हणजे इथली बातमी पण आपल्याला कळत जाईल. ते त्यांना पटलं आणि स्कूटी घरी आली. आता उद्या पासून मी आणि विदिशा एक दिवसा आड येत जाऊ. आणि इथलं सगळं स्वयंपाक पाणी सांभाळू. म्हणजे तुम्हाला कामाला पूर्ण मोकळीक मिळेल. कसंही करून तुमच्या योजना पूर्णत्वाला जायला पाहिजेत, त्या शिवाय या लोकांचे डोळे उघडणार नाहीत. मग येऊ ना आम्ही ?” वर्षा म्हणाली.

“या तुम्ही, आम्हाला काय, आनंदच आहे. पण कामाचं इतकं काही विशेष नाहीये. घरात फार काही काम नसतं.” सरिता म्हणाली. 

“ठीक आहे तर मग. मी येते उद्या सकाळी.” वर्षा म्हणाली.

संध्याकाळी बारक्या आला.

“वहिनी साहेब, रघुवीरशी बोलणं झालं. तो आणि त्यांची परदेश मजुरांची गॅंग आपल्या अटींवर यायला एका पायावर तयार आहेत. त्यांना आपल्या इथलं वातावरण खूपच आवडलं आहे. मग काय सांगू त्यांना ?”

“अरे वा. चांगलं आहे. टीन शेड ला काय काय सामान लागतं ते बघा आणि त्यांच्याच  मदतीने बांधून घ्या. एक बाथरूम आणि संडास पण तयार करून घ्या.” – सरिता.

“करतो वहिनी साहेब.” असं म्हणून बारक्या गेला.

दुसऱ्या दिवशी drip पाइप टाकायला सुरवात झाली. बारक्या जातीने लक्ष  पुरवत होता.

वर्षा ठरल्या प्रमाणे आली होती आणि तिने सगळी व्यवस्था सांभाळली होती. सरिता दिवस भर drip च्याच मागे होती. पाइप टाकतांना वाफ्या ची नासाडी होऊ नये म्हणून लक्ष पुरवत होती. चेक करत होती. संध्याकाळी गोठ्यात जाऊन नेहमी प्रमाणे प्रत्येक  गाय आणि म्हशीची विचारपूस केली. प्रत्येकीच्या  पाठीवरून हात फिरवला. शेण खताच काम कुठवर आलं आहे ते बघितलं. आणि समाधानाने घरी आली. वर्षांनी पण आपलं काम चोख केलं होतं. आई, बाबांकडे जातीने लक्ष्य पुरवलं होतं. बाबा खुश होते.

पण दुसऱ्या दिवशी जरा गडबड झाली. सकाळी सकाळीच बारक्या आणि दाजी आले होते आणि बाबांशी बोलत होते. सरिता कामात होती, तिला बाबांनी बोलावलं. बारक्या आणि दाजीला पाहिल्यावर तिला वाटलं की कोणी तरी दूधाचे पैसे दिले नसतील म्हणून सांगत आले असतील.

“काय दाजी, आज सकाळी सकाळीच इकडे ?” सरितानी विचारलं.

“वहिनी साहेब, माफी करावी. चूक झाली.” – दाजी अपराधी मुद्रा करून उभा होता.

“दाजी, काय चूक झालीय ? माफी कशाला मागताय ?” सरितानी विचारलं.

“शेणखत काल राती चोरीला गेलं.” – दाजी.

“शेणखत चोरीला गेलं ? म्हणजे ?” सरिताला कळेना की शेणखत कसं चोरीला जाऊ शकतं ते.

“काल तुम्ही बघितलं होतं न, शेणखत वाळवण्यासाठी पसरून ठेवलं होत.” – दाजी.

“हो मग ?” – सरिता.

“ते सगळं चोरीला गेलं. आज सकाळी बघितल तर तिथे काहीच नाहीये.” – दाजी.

“असं कसं होईल ? चल दाखव मला.” – सरिता.

सरितानी बघितलं, खरंच सगळं शेणखत उचलून नेलेलं दिसत होतं.

“इतकी सफाईदार चोरी ! तुम्हाला पत्ता पण लागला नाही ? कुठलाही आवाज ऐकू आला  नाही ? जवळ जवळ दोन ट्रक  भरेल इतकं खत होतं ना ?” सरितानी आश्चर्यानी विचारलं.

कोणीच काही बोललं नाही. खाली मान घालून उभे होते. रखमा आणि सुरेश पण तिथे होते.

“कोणी केलं असेल ?” – सरिता.

“रावबाजीचीच माणसं असतील वहिनी साहेब. ते लोक असं काही करतील असं वाटलं नव्हतं. पण दुसरं कोणी करण्याची शक्यताच नाहीये.” बारक्यानीच तोंड उघडलं. 

“दाजी, आज शेण खत नेलं, उद्या गुरं नेली तर काय कराल ? परवा उभ पीक कापून नेलं तर काय कराल ? चूक झाली, माफी करा. असंच ना.” – सरिता आता चिडली होती.

सगळे चूप चाप माना खाली घालून उभे होते. बोलण्या सारखं काहीच नव्हतं.

“ठीक आहे. आता लक्ष द्या. पुन्हा असं व्हायला नको. बारीकराव तुम्ही या माझ्या बरोबर.” – सरिता.

घरी परतल्यावर, सरितानी बाबांना सगळं अपडेट दिलं. आज विदिशा आली होती. ती पण तिथेच होती. तिला धक्काच बसला.

“असं कसं केलं त्यांनी ? विशाल ला विचारते आज खडसावून. ही काय रीत झाली का वागायची ? या दोघांना माहिती असलंच पाहिजे. वहिनी, तुम्ही फोन लावा आणि जाब विचारा.” विदिशा चिडून म्हणाली.

“विदिशा, तू नको त्रास करून घेऊस.” सरिता म्हणाली “झालं ते झालं. Forget it. मी बघते काय करायचं ते. तू विशाल ला काही बोलू नकोस.”

“सरिता,” बाबा बोलले, “कुंपण घाल, तीन बाजूंनी कुंपण आहेच. आता दोघांच्या शेती मध्ये घाल. प्रश्न कायमचा मिटवून टाक. दुसऱ्या कोणाचं शेत असतं तर घातलच असतं ना. तसंच समज.”

“बाबा, लाख भर खर्च येईल.” – सरिता.

“येऊ दे. पण एकदाचा बंदोबस्त करून टाक.” – बाबा. 

“ठीक आहे.” सरितानी बारीकरावांना सांगितलं. “बारीकराव, करा व्यवस्था कुंपणाची. लगेच कामाला लागा. आणि हो दोन टोकावर उंच खांब उभारून दोन मोठे flood lights लावा. आणि एक मोठी बेल लावा घरा पाशी, आणि बटणं लावा खांबांपाशी. कळलं ?आणि हो  कोणीतर रोज बसवा राखण करण्या साठी. काही विपरीत दिसलं तर बेल वाजवायला सांग.”

“हो वहिनी साहेब.” – बारीकराव.

तीन चार दिवसांत कुंपण घातल्या गेलं. Flood lights लागले, drip पाइप चं काम पण पूर्ण झालं. मग सरितानी सर्वांना बोलावलं, आणि सूचना दिल्या. 

“आता drip lines चालू करा. Sprinkler  आठ तासांतून  एकदा तासभर चालू ठेवा. वाफे चांगले दमट ओलसर होऊ द्या मग दोन तीन दिवसांनी आपण रोवणीला सुरवात करू. पावसाच्या आशेवर आता थांबता यायचं नाही.”

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all