तीन झुंजार सुना भाग १

श्रीपत पाटलांच्या तीन सुना सर्वांच्या विरोधाला न जुमानता कसं यशाचं शिखर गाठतात त्यांची कथा.

Disclaimer

ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे आणि यातील सर्व व्यक्तिरेखा आणि प्रसंग  काल्पनिकच आहेत. यांचा कोणत्याही जीवंत अथवा मृत व्यक्तीशी अथवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर कोणाला काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

दिलीप भिडे

                                           तीन झुंजार सुना.

                                                पात्र  रचना

श्रीपती पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                        श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची प्रेयसी.

विजयाबाई                       वर्षांची आई.

 भाग  1

मोर्षीच्या श्रीपती पाटलांच्या वाड्यात आज मोठी धामधूम होती. त्याला कारणही तसंच होतं. त्यांच्या मोठ्या मुलाचं म्हणजे प्रतापचं  लग्न जळगाव च्या लक्ष्मणराव जाधवांच्या मुलीशी, सरिताशी होणार होतं. प्रताप कृषिविज्ञानात पदवीधर होता आणि सरिता विज्ञानाची पदवीधर. जोडा एकदम अनुरूप होता. आणि आता वरात यायची वेळ झाली होती. स्वागताची तयारी पूर्ण झाली होती. आत्याबाई म्हणजे श्रीपतरावांची आत्या, कमलाबाई स्वत: जातीने सगळीकडे लक्ष ठेऊन होत्या. काही कुठे कमी पडायला नको म्हणून स्वत:, वयामुळे झेपत नसतांना सुद्धा, धावपळ करत होत्या.

वरात आली. जोरदार आतिषबाजी झाली. उंबऱ्यावरचं माप ओलांडून नवी गृहलक्ष्मी गृह प्रवेश करती झाली. लक्ष्मी पूजन झालं नव्या नवरीचं नाव काय ठेवायचं यावरून थोडा गोंधळ झाला. यमुनाबाईंना म्हणजे श्रीपतीच्या बायकोला सुनेच नाव बकुळा ठेवायचं होतं. पण यमुनाबाई आणि आत्याबाई सोडून बाकी सगळ्यांनीच नाकं मुरडली. प्रतापच्या दोन्ही भावांना आणि बहिणीला, एखादं मॉडर्न नाव ठेवायला हवं होतं. नावावर बऱ्याच चर्चा झाल्यावर शेवटी प्रतापनीच तिढा सोडवला. तो म्हणाला मी नाव बदलणार नाहीये. तिचं जे आहे ते सरिता हेच नाव छान आहे. नवीन पिढीला ते पण जुनाट वाटलं, पण प्रतापने फायनल सांगितल्याने कोणी काही नंतर बोललं नाही. वऱ्हाडातलं लग्नं, आठ दिवस मांडव पडला होता. पाहुणेरावळे, मित्र मंडळी वगैरे जवळ जवळ शंभर माणसांचं खटलं. श्रीपती पाटलांच्या घरचं लग्नं गावात आठ दिवस गाजत होतं. हळू हळू पाहुणे आपापल्या घरी पांगले. आता फक्त श्रीपती ची मुलगी, मेघना, तिचा नवरा वसंत आणि मुलगा अंकित आणि आत्याबाई एवढेच पाहुणे उरले. अजून एका आठवड्याने आत्याबाई अमरावतीला आणि मेघनाचं कुटुंब अहमदाबादला निघून गेले. नंतर आठवड्या भराने नव परिणीत दाम्पत्य उटीला जावून आले.

आता रोजचं रुटीन सुरू झालं. यमुनाबाई कोल्हापूरच्या निंबाळकरांची लेक. त्यामुळे खाण्या पिण्याच्या सवयीत वऱ्हाड आणि कोल्हापूरचा सुरेख संगम झाला होता. आता त्यात खानदेशाची भर पडली. वऱ्हाडी पाटवडीचा रस्सा, सावजी मटण, या बरोबरच कोल्हापूरचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि खानदेशी शेवेची भाजी तितक्याच आवडीने घरात बनू लागली. नवी सून, सासूच्या हाताखाली धडे घेत होती. नवीन गोष्टी शिकून घेत होती. मोठी सून असल्याने तिच्या वरच्या जबाबदार्‍या समजून घेत होती. मन मिळावू असल्याने लवकरच घरात सामावून गेली. एकंदरीत सगळं छान चाललं होतं.

श्रीपती पाटलांकडे 30 एकर शेती होती. पंचक्रोशी मध्ये, प्रगतीशील कास्तकार, असा त्यांचा लौकिक होता. शेती मध्ये बरेच नव नवीन प्रयोग करून शेतीत भरपूर नफा कमावला होता. प्रताप कृषि विज्ञानाचा पदवीधर होता, त्यामुळे, तो सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आणखी भरभराट कशी होईल त्या बद्दल सतत प्रयोग करत होता आणि त्याचा फायदा पण  दिसायला लागला होता. धाकटा भाऊ निशांत, B. Com. झाला होता. आणि भावा बरोबर शेतीच्या कामात लक्ष घालत होता. त्याला शेती मध्ये विशेष रस नव्हता पण नोकरी मिळणं इतकं सोपं नसल्याने मन मारून तो शेतीच्या  कामात लक्ष घालत होता. प्रत्यक्ष शेती पेक्षा इतर वरच्या कामाची जबाबदारी सांभाळत होता. सोबतच नोकरी शोधणं चालूच होतं. अशातच वर्ष उलटलं. निशांतचं त्यांच्याच कॉलेज मधल्या एका वर्षा नावाच्या मुलीवर प्रेम होतं.

दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पण प्रताप च झाल्याशिवाय ते शक्य नव्हत. आता प्रतापचं लग्न झालं होतं पण निशांत नोकरीच्या शोधात होता. ती मिळाली की नोकरीच्या गावी आपण संसार थाटायचा, असा दोघांचा विचार होता. वर्षाला आणि निशांतला दोघांनाही मोर्षी आवडत नव्हतं. पण अजून तरी निशांतला पर्याय सापडला नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी निशांतला वर्षांचा फोन आला.

“निशांत उद्या अमरावतीला ये. मला अतिशय महत्वाचं बोलायचं आहे.” वर्षा म्हणाली

“लग्नाबद्दलच ना, माहीत आहे. मी नोकरीसाठी प्रयत्न करतोच आहे. एवढं काय ?” – निशांत

“आता वेळ निघून चालली आहे. आई, बाबा आता थांबायला तयार नाहीत. त्यांनी एक मुलगा पसंत केला आहे आणि तो मला पहायला येणार आहे.” – वर्षा

“अरे, असं कसं ? तू तर म्हणाली होतीस की, आपल्याबद्दल तू सगळं सांगितलं आहे, आणि त्यांची काही हरकत नाहीये म्हणून. मग आता अचानक अस काय घडलं की ते दूसरा मुलगा बघताहेत ? बरं मला ते ओळखत नाहीत, असंही नाही. मग ?” निशांत आता गोंधळला होता.

“अरे ते सर्व ठीक आहे. पण चार दिवसांपूर्वी आमच्या बाबांचे एक मित्र कोणाच्या तरी लग्नाला आले होते. ते आमच्याच कडे उतरले होते. बरोबर काकू पण होत्या. आईचं आणि काकूंच बऱच काही बोलणं झालं. काकूंनी एक मुलगा सुचवला आहे. गोरा आहे देखणा आहे, उच्च पदवीधर आहे. एका MNC मध्ये मोठ्या पगाराची नोकरी आहे. आणि मुख्य म्हणजे CKP आहे, म्हणजे आमच्याच जातीचा आहे. आईला आणि बाबांना हा मुलगा खूप आवडला आहे. काकूंनी त्याचा फोटो पण मागवून घेतला आणि आम्हाला दाखवला. आता ते मला म्हणताहेत की निशांत चा नाद सोड. मग आता काय करायचं, तू ताबडतोब ये मग आपल्याला काही तरी ठरवता येईल. येतोस न ?” वर्षा समजावणीच्या सुरात बोलली.

“अग वर्षा, उद्याच्या उद्या कसं येता येईल ? उद्या आमच्या शेतावर तहसीलदारांची व्हिजिट आहे. उद्या शक्य नाही.” निशांतनी आपली असमर्थता दर्शवली.

“तू नसलास तर काय बिघडणार आहे ? तुझे बाबा आणि दादा तर आहेतच न ?” वर्षाला समजत नव्हतं की, हा आढेवेढे का घेतो आहे ते.

“हो पण का अमरावतीला जायचं आहे असं विचारलं तर काय उत्तर देऊ ?”- निशांत

“जे खरं आहे ते सांग. तुझ्यासाठी तहसीलदारांची व्हिजिट जास्त महत्वाची आहे का ? मी कोणीच नाहीये का ? अरे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.” वर्षा वैतागली  

“अग खरंच उद्या खूप महत्त्वाची व्हिजिट आहे. कदाचित जिल्ह्यातला सर्वोत्तम शेतकरी असा पुरस्कार मिळू शकतो. त्याचीच पाहणी करण्यासाठी उद्याची व्हिजिट आहे. सॉरी. मी नाही उद्या येऊ शकणार. ठेवतो मी.” निशांतनी फायनल सांगून टाकलं.

वर्षा चरफडतच घरी गेली. घरी गेल्यावर आईनी विचारलच

“का ग ? चेहरा असा काय झाला तुझा ?”

“काही नाही. तुला काय करायचय ? माझी कोणालाच फिकीर नाही.” अस बडबडतच ती आपल्या खोलीत गेली आणि आपल्या मागे धाडकन  दार लाऊन घेतलं. आईला तशी कल्पना आलीच होती. म्हणून तिने वर्षाला काहीच विचारलं नाही. शांत झाल्यावर आपणहून सांगेल असा विचार करून गप्प बसली.  बराच वेळ रडल्यानंतर वर्षांनीच दार उघडलं.

‘हा असं कसं वागू शकतो ? मी आता त्याच्याशी कधीच बोलणार नाही.’ – वर्षा स्वत:शीच बडबडत बाहेर आली.

आई तिच्याकडे बघत होती पण बोलली काहीच नाही.

“अग मी तुझ्याशी बोलते आहे. का तुलाही माझा कंटाळा आला आहे ?” वर्षा  आता आईवर चिडली.

“तू काही सांगशील तर मला कळेल न. आधी शांत हो. घे पाणी घे. तुला काही खायला देऊ का ? पाहुण्यांसाठी पोहे केले आहेत देऊ का तुला ? जरा शांत पणे बसून सांग काय झालं एवढं चिडायला ?” विजयाबाई शांतपणे म्हणाल्या.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all